(द्वारा- श्रीमती ज्योती पत्की, सदस्य) या तक्रारीची थोडक्यात हकीकत खालीलप्रमाणे आहे. तक्रारदाराचे म्हणणे असे आहे की, तिने गैरअर्जदार होम सोलुशन रिटेल (इंडिया) लि., औरंगाबाद यांचेकडे दि.03.05.2008 रोजी पाच वस्तुंचा पॅलेसिओ बेडरुम सेटची ऑर्डर नोंदविली. तक्रारदाराने दि.07.05.2008 रोजी सदर वस्तुंची एकूण किंमत रक्कम रु.33,798/- गैरअर्जदारास दिले व गैरअर्जदाराने सदर वस्तु त्याच दिवशी तिचे घरी पाठविल्या. सदर बेडरुम संच खरेदी करताना गैरअर्जदाराने हया पाच वस्तु चांगल्या (2) त.क्र.52/09 प्रतीचा असून त्यात कसल्याही प्रकारची अंतर्गत खराबी नसल्याचे आश्वासन दिले. गैरअर्जदाराने सदर वस्तुंचा संच तक्रारदाराचे घरी येऊन जोडून दिला नाही त्यामुळे तक्रारदार वस्तु खरेदीनंतर एक महिना बेडचा उपयोग घेऊ शकली नाही. त्यानंतर गैरअर्जदाराचे दुकानातील एक प्रतिनिधी बेड जोडून देण्यासाठी आले परंतू बेड जोडल्यानंतर खात्री करण्यासाठी बेडवर बसले असता, बेडवरील प्लायवुड बॉक्समधे पडले. हयावरुन तक्रारदाराचे असे निदर्शनास आले की, गैरअर्जदाराने दिलेला संपूर्ण बेड हा खराब असून त्यासाठी लागणारे लाकूड हे निकृष्ट दर्जाचे आहे व ब-याच ठिकाणी बेडला जोड दिलेले आहे. तक्रारदाराने गैरअर्जदारास सदर बेड बदलून देण्याची विनंती केली परंतू त्यांनी तात्पुरता बेड दुरुस्त करुन वापरण्यास सांगितले म्हणून तक्रारदाराने सदरील बेडच्या बॉक्समधे लाकडी पटटया बसवून घेतल्या. सदरील बेडमधील खराबी दुरुस्त होण्यासारखी नसल्यामुळे तक्रारदाराने गैरअर्जदारास सदर बेड बदलून द्यावा अथवा बेडरुम सेटची रक्कम रु.33,978/- परत द्यावेत अशी नोटीस पाठविली, परंतू गैरअर्जदाराने कोणताही प्रतिसाद दिला नाही. अशा प्रकारे गैरअर्जदाराने तिला त्रुटीची सेवा दिली म्हणून तक्रारदाराने गैरअर्जदाराकडून संपूर्ण सेटची रक्कम रु.33,978/- 18% व्याजासह व इतर खर्च मिळावेत अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार होम सोलुशन रिटेल (इंडिया) लि., औरंगाबाद यांनी लेखी निवेदन दाखल केले. त्यांचे म्हणणे असे आहे की, तक्रारदाराने सर्व वस्तु स्वतः बघून व पारखुन समाधान झाल्यानंतरच वस्तुंची ऑर्डर दिली. सदर वस्तु तक्रारदाराचे घरी दि.07.05.2008 व दि.16.05.2008 रोजी दिलेल्या आहेत. गैरअर्जदारांचे प्रतिनिधींनी दि.27.05.2008 रोजी सर्व वस्तु जोडून व्यवस्थित लावून दिलेल्या आहेत व तक्रारदाराने वस्तु जोडून दिल्याबाबत जॉब कार्डवर सही देखील केलेली आहे. तक्रारदारास दिलेला संपूर्ण संच हा योग्य स्थितीत व चांगल्या अवस्थेत दिलेला असून, तक्रारदाराने सदर वस्तु जोडून देताना तक्रार केलेली नाही. तक्रारदाराच्या चुकीच्या वापरामुळे व स्वतःच्या निष्काळजीपणामुळे सदर बेड खराब झालेला असून तक्रारदार स्वतः त्यास जबाबदार आहेत. तक्रारदाराने आजपर्यंत कोणतीही नोटीस पाठविलेली नाही. तक्रारदार व गैरअर्जदार यांच्यात झालेल्या व्यवहारानुसार तसेच अडव्हान्स पावतीच्या अटी व शर्तीनुसार दोघामधील वाद चालविण्याची कार्यकक्षा ही मुंबई येथील सक्षम न्यायालयास असून इतर कोणत्याही न्यायालयास व ग्राहक मंचास दोघांमधील वाद चालविण्याचा व त्यात निर्णय देण्याचा अधिकार व कार्यकक्षा नाही. तक्रारदाराने सत्य परिस्थिती मंचासमोर न आणता (3) त.क्र.52/09 पैसे उकळण्याच्या हेतुने खोटी तक्रार दाखल केली आहे. म्हणून तक्रारदाराची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी अशी मागणी गैरअर्जदाराने केली आहे. दोन्ही पक्षांनी दाखल केलेले शपथपत्र व कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदाराच्या वतीने अड स्मिता कुलकर्णी व गेरअर्जदाराच्या वतीने अड अनिरुध्द पाठक यांचा युक्तिवाद ऐकण्यात आला. तक्रारदाराने दि.03.05.2008 रोजी गैरअर्जदार होम सोलुशन रिटेल (इंडिया) लि., औरंगाबाद यांचे दुकानामधे पॅलेसिओ बेडरुम संच त्यातील पाच वस्तुंसह बुक केला त्यावेळेस रक्कम रु.3,500/- आणि दि.07.05.2008 रोजी रक्कम रु.31,498/- देऊन खरेदी केल्याचे पावतीवरुन दिसून येते. गैरअर्जदाराच्या म्हणण्यानुसार सदर पावतीच्या अटी व शर्तीनुसार दोघामधील वाद चालविण्याची कार्यकक्षा मुंबई येथील सक्षम न्यायालयास असून तक्रारदाराची तक्रार या मंचात चालू शकत नाही. परंतू तक्रारदाराने पॅलेसिओ बेडरुम संच हा होम सोलुशन रिटेल (इंडिया) लि., यांचे औरंगाबाद येथील दुकानातून खरेदी केलेला असल्यामुळे सदर बेडरुम संचाचे संदर्भात काही वाद उदभवल्यास सदर वाद चालविण्याची कार्यकक्षा ही औरंगाबाद येथील ग्राहक मंचास आहे असे मंचाचे मत आहे. तक्रारदाराने गैरअर्जदाराकडून खरेदी केलेला पाच वस्तुंचा बेडरुम संच हा गैरअर्जदारांचे प्रतिनिधींनी दि.27.05.2008 रोजी तक्रारदाराचे घरी जाऊन जोडून दिलेला आहे ही बाब जॉब कार्डवरुन दिसून येते. तसेच सदर जॉब कार्डवर तक्रारदाराने स्वाक्षरी केलेली असल्यामुळे तक्रारदार वस्तु खरेदीनंतर एक महिना बेडचा उपयोग घेऊ शकली नाही या तक्रारदाराच्या म्हणण्यामधे काहीही अर्थ नाही. तक्रारदाराने गैरअर्जदाराकडून खरेदी केलेला बेड हा खराब असून त्यासाठी वापरलेले लाकूड हे निकृष्ट दर्जाचे आहे व जुन 2008 मधे बेड दुरुस्त केला हया म्हणण्यापुष्टयर्थ रतनलाल दाया या सुताराचे शपथपत्र दाखल केले आहे. परंतू तक्रारदाराने दाखल केलेल्या सुताराचे शपथपत्रावरुन तो काही बेड तयार करणारा नसून तो त्यातील तज्ञ नाही म्हणून त्याने बेड संदर्भात नोंदविलेला अभिप्राय ग्राहय धरता येणार नाही. परंतू तक्रारदाराने गैरअर्जदाराकडून खरेदी केलेला बेड खराब निघालेला असून दुरुस्त होण्यासारखा नसल्यामुळे बेड बदलून द्यावा अशी कायदेशीर नोटीस दि.28.07.2008 रोजी गैरअर्जदारास पाठविली परंतू गैरअर्जदाराने सदर नोटीस घेण्यास इन्कार केल्याचे पोस्टाचे पाकीटावरुन स्पष्ट दिसून येते. त्यामुळे तक्रारदाराने गैरअर्जदाराकडून दि.07.05.2008 रोजी खरेदी केलेल्या पाच वस्तुंपैकी बेड खराब निघाल्याचीच तक्रार दाखल केली आहे. तक्रारदाराने गैरअर्जदाराच्या विरुध्द खोटी (4) त.क्र.52/09 तक्रार दाखल करावयाची असती तर त्याने खरेदी केलेल्या पाच वस्तुंची दाखल केली असती परंतू तक्रारदाराने फक्त बेड संदर्भातच तक्रार दाखल केली आहे. तक्रारदाराने गैरअर्जदाराकडून खरेदी केलेला बेड हा खरेदी केल्यानंतर लगेचच खराब झालेला असल्याची तक्रार गैरअर्जदाराकडे केल्यानंतर गैरअर्जदाराने सदर बेड ताबडतोब दुरुस्त करुन देणे आवश्यक होते. आणि गैरअर्जदाराने तक्रारदाराने विनंती करुनही तक्रारदाराचा बेड दुरुस्त न करुन देऊन तक्रारदारास त्रुटीची सेवा दिलेली आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. तक्रारदाराने मागणी करुनही गैरअर्जदाराने बेड दुरुस्त करुन दिला नाही त्यामुळे तिला मानसिक त्रास होणे साहजिकच आहे. तक्रारदाराने गैरअर्जदाराकडून संपूर्ण संचाची रक्कम रु.33,798/- मिळावी अशी मागणी केली. परंतू तक्रारदाराने खरेदी केलेल्या पाच वस्तुंच्या संचापैकी फक्त बेड खराब निघाल्याची तक्रारदाराची तक्रार असल्यामुळे तक्रारदारास संपूर्ण बेडरुम संचाची रक्कम गैरअर्जदाराने परत करावी असा आदेश देणे उचित ठरणार नाही. म्हणून खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश 1) तक्रार अंशतः मान्य करण्यात येते. 2) गैरअर्जदार होम सोलुशन रिटेल (इंडिया) लि., औरंगाबाद यांनी तक्रारदाराचा बेड निकाल मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत व्यवस्थित दुरुस्त करुन द्यावा. 3) गैरअर्जदार होम सोलुशन रिटेल (इंडिया) लि., औरंगाबाद यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.1,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.1,000/- असे एकूण रु .2,000/- निकाल मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत द्यावेत. 4) दोन्ही पक्षांना आदेश कळविण्यात यावा. श्रीमती ज्योती पत्की श्रीमती रेखा कापडिया श्री.डी.एस.देशमुख सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |