जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, लातूर
ग्राहक तक्रार क्रमांक : 155/2013 दाखल तारीख :04/10/2013
निकाल तारीख :26/02/2015
कालावधी :01वर्षे 04म.26 दिवस
श्रावण पिता संभाजी साबणे,
वय 40 वर्षे, धंदा व्यापार,
रा. शिवाजी चौकी, देवणी,
ता. देवणी जि. लातूर. ...तक्रारदार.
-विरुध्द-
1) अधिकृत विक्रेता,
महिंद्रा टु व्हिलर, विवेक मोटार्स,
अंबाजोगाई रोड, एस.पी. ऑफिस जवळ, लातूर.
2) मा. व्यवस्थापक,
महिंद्रा टु व्हिलर्स लि.
पुणे ऑफिस : डी-1, ब्लॉक, प्लॉट नं. 18/2 (पार्ट)
एम आय डी सी चिंचवड पुणे 411 019. ..... गैरअर्जदार
कोरम : 1) श्रीमती ए.जी.सातपुते, अध्यक्षा.
2) श्री.अजय भोसरेकर, सदस्य
3) श्रीमती रेखा जाधव, सदस्या.
तक्रारदारातर्फे : अॅड.एम.एम.भोंगे.
गै.अ.क्र.1 तर्फे : अॅड. एन.आर.माने (हाळीकर)
गै.अ.क्र.2 तर्फे : अॅड. अनिल जी.गायकवाड.
::: निकालपत्र :::
(घोषित द्वारा: श्री अजय भोसरेकर, मा. सदस्य.)
तक्रारदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की,
तक्रारदार हा देवणी जि. लातूर येथील रहिवाशी असून तक्रारदाराने सामनेवाला क्र. 1 यांचकडून सामनेवाला क्र. 2 यांनी उत्पादीत केलेली मोटार सायकल महिंद्रा स्टॅलिओ ही सर्वकरासह रक्कम रु. 49,652/- रोख देवुन खरेदी केली. त्याचा आर.टी.ओ. क्र. एम.एच.24/डब्ल्यु 955 असा आहे. खरेदी केलेल्या गाडीचा इंजिन क्रमांक MFEAG004480 असा आहे.
तक्रारदाराने सामनेवाला क्र.1 यांच्याकडे सदर वाहनाचे इंजिन ऑईल गळती होत असल्या बाबतची तक्रार केली. त्यानुसार सामनेवाला क्र. 1 यांनी तक्रारदारास इंजिन बदलुन दिले. त्याचा क्र. MFEAI017832 असा आहे. तक्रारदार सामनेवाला क्र. 1 यांच्याकडून इंजिन बदलल्या नंतर गाडी घेवुन जात असतांना, गाडी आपोआप न्युट्रल होत होती. व गाडीचे चैन सॉकेट निघुन पडले. त्यामुळे तक्रारदाराने सामनेवाला क्र. 1 यांच्याकडे तक्रार करुन परत गाडी दुरुस्त करुन नेली. सामनेवाला क्र. 1 यांनी तक्रारदाराच्या गाडीचे इंजिन बदलुन देवुनही आजतागायत त्याची ऑईल गळती थांबलेली नाही, असे म्हटले आहे. दि. 10.07.2013 रोजी तक्रारदराने सामनेवाला क्र . 1 यांच्या शोरुम मध्ये सदर गाडी जमा केली व त्याची रितसर पावती सामनेवाला क्र. 1 यांनी तक्रारदारास दिली.
तक्रारदाराने सामनेवाला क्र. 1 यांच्याकडे सदर गाडी Suspension problems, gear setting problems, pickup problems, petrol lickage problems, oil lickage problems etc, या प्रकारच्या तक्रारी निदर्शनास आणुन दिल्या. सदर तक्रारी सांगीतल्यानंतर सामनेवाला क्र. 1 यांनी गाडीच्या इंजिन मध्ये निर्मिती दोष असल्या बद्दलचे म्हटले असून, उडवाउडवीची उत्तरे दिल्या कारणाने तक्रारदाराने सामनेवाला यांना दि. 07.08.2013 रोजी कायदेशिर नोटीस पाठवली. सदर नोटीस मिळूनही उत्तर दिले नाही , म्हणुन तक्रारदाराने सदर तक्रार या न्यायमंचात दाखल केली आहे. तक्रारदाराने दुचाकी वाहनाची रक्कम रु. 50,000/- खरेदी तारखे पासुन 12 टक्के व्याज अथवा नविन दुचाकी वाहन मिळण्याची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु. 25,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रु. 10,000/- मिळण्याची मागणी केली आहे.
तक्रारदाराने आपले तक्रारीचे पुष्टयर्थ शपथपत्र व एकुण 13 कागदपत्रे दाखल केले आहेत.
सामनेवाला क्र. 2 यांनी आपले लेखी म्हणणे दि. 13.03.2014 रोजी दाखल केले असून, त्यांचे सदर लेखी म्हणणे शपथपत्राशिवाय दाखल केले असल्याकारणाने ते ग्राहक संरक्षण कायदया नुसार ग्राहय धरता येणार नाही.
सामनेवाला क्र. 1 यांनी त्यांचे लेखी म्हणणे दि. 25.04.2014 रोजी दाखल केले असून, तक्रारदाराने गाडी खरेदी केली हे मान्य केले आहे. परंतु सदर तक्रार ही खोटी व त्रास देण्याच्या उद्देशाने दाखल केली आहे असे म्हटले आहे, त्यामुळे तक्रारदाराची तक्रार खर्चासह रद्द करावी, अशी मागणी केली आहे.
सामनेवाला यांनी आपले लेखी म्हणण्याचे पुष्टयर्थ शपथपत्राशिवाय अन्य कोणतेही कागदपत्र दाखल केले नाहीत.
तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार व सामनेवाला यांनी दाखल केलेले लेखी म्हणणे यांचे बारकाईने अवलोकन केले असता, तक्रारदाराने दाखल केलेले सदर गाडीचे आर.टी.ओ. रजिस्ट्रेशन स्मार्ट कार्डची प्रत पाहिली असता, तक्रारदाराने तक्रारीत नमुद केलेले इंजिन बदलले असल्याचे दिसून येत आहे. सदर बाब सामनेवाला यांनी कोणतीही हरकत घेतलेली नाही, किंवा नाकारलेली नाही. म्हणजेच तक्रारदारास दिलेल्या गाडीचे इंजिन हे उत्पादीत दोष असल्या कारणाने बदलुन दिले आहे, सामनेवाला यांच्या लेखी म्हणण्याच्या अवलोकना वरुन हे न्यायमंच, सदर वाहनात उत्पादीत दोष असल्याच्या निष्कर्षास येत आहे. त्यामुळे तक्रारदाराने केलेली मागणीचा विचार करता, तक्रारदार सदर वाहनाची रक्कम मिळण्यास पात्र आहे, असे या न्यायमंचाचे मत आहे. त्यामुळे सामनेवाला क्र. 1 व 2 यांनी तक्रारदारास वाहनाची खरेदी रक्कम सर्व करासहपरत करावी व तक्रारदाराचे आपल्याकडे जमा असलेले वाहन आपणाकडेच ठेवुन घ्यावे, मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु. 5000/- व दाव्याच्या खर्चापोटी रु. 3000/- मिळण्यास पात्र आहे.
सबब न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
- सामनेवाला क्र. 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, संयुक्तीक अथवा वैयक्तीक आदेश प्राप्ती पासुन 30 दिवसाचे आत तक्रारदारास रक्कम रु. 49,650/- अदा करावेत.
- सामनेवाला क्र. 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, आदेश क्र. 2 चे पालन मुदतीत न केल्यास, त्यावर दि. 10.07.2013 पासून द.सा.द.शे.10 टक्के व्याज देण्यास जाबाबदार राहतील.
- सामनेवाला क्र. 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारास मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु. 5000/- व दाव्याच्या खर्चापोटी रु. 3000/- , आदेश प्राप्ती पासुन 30 दिवसाचे आत दयावेत.
स्वा/- स्वा/- स्वा/-
(अजय भोसरेकर) (श्रीमती ए.जी.सातपुते) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्षा सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच लातूर.
**//राजूरकर//**