::: आ दे श :::
( पारीत दिनांक : 11/08/2015 )
आदरणीय अध्यक्षा सौ. एस. एम. उंटवाले, यांचे अनुसार
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रारीचा सारांश येणेप्रमाणे, …
तक्रारकर्ता हा गाडीद्वारे माल वाहतुकीचे काम करतो व या द्वारे स्वत:चा व कुटूंबाचा उदर निर्वाह करतो. तक्रारकर्त्याजवळ माल वाहतुकीसाठी टाटा कंपनीचे, टाटा 709 हे वाहन आहे, त्याचा नोंदणी क्र. महा-14/एफ-9793 असा आहे. या वाहनामध्ये वाहन नोंदणीपत्रानुसार बैठक संख्या 1 + 2(3) आहे. सदर वाहन तक्रारकर्त्याने विजय हरीभाऊ घारे यांच्याकडून दि. 5/3/2014 रोजी विकत घेतले आहे. या वाहनाचा विरुध्दपक्षाकडून विमा काढण्यात आला असून त्याचा पॉलिसी क्र. 10003/31/14/455429 व कालावधी दि. 11/03/2014 ते 27/10/2014 असा होता. दि. 27/04/2014 रोजी सदर वाहनाचा अकोला-अकोट रोडवर दहीहांडा फाट्याजवळ रात्री 23.00 वाजता ट्रक क्र. एमएच 28/बी-7137 ने ठोस मारल्यामुळे अपघात झाला व वाहनाचे पुर्णपणे नुकसान झाले. या अपघाताबाबत ट्रक क्र. एमएच 28/बी 7137 चा चालक व तक्रारकर्त्याच्या वाहनाचा चालक यांच्या विरुध्द पोलिस स्टेशन दहीहांडा येथे एफ.आय.आर. दाखल करण्यात आला. सदर अपघातामध्ये एकजन मरण पावला. तक्रारकर्त्याने सदर अपघातामधून झालेल्या वाहनाच्या नुकसानीबाबत विरुध्दपक्षाकडे पॉलिसी अंतर्गत दावा नोंदविला त्याचा क्र. 10000/31/15सी/004250 आहे. तक्रारकर्त्याने वाहनाच्या दुरुस्तीकरिता अंदाजीत खर्चाचे इस्टीमेट रु. 6,30,358/- विरुध्दपक्षाला दिले. त्यानंतर विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याच्या वाहनाचा प्राथमिक सर्व्हे, इंजिनियरच्या माध्यमातून केला, विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास सांगीतले की, सदर दावा हा टोटल लॉस मध्ये बसतो व म्हणून त्याकरिता विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याकडून क्लेम डिस्चार्ज कम सॅटीसफॅक्शन व्हाऊचर करुन घेतले. परंतु विरुध्दपक्षाकडून आज पर्यंत कोणतीही रक्कम तक्रारकर्त्याला मिळाली नाही. तक्रारकर्त्यास दि. 31/05/2014 रोजी त्याचे जुने घर बदलावे लागले, परंतु तक्रारकर्त्याने त्याचा मोबाईल क्रमांक सर्व्हेअर यांचेकडे दिला होता. या नंतर तक्रारकर्त्याने विमा दाव्याबाबत वारंवार विरुध्दपक्षाकडे चौकशी केली. त्यानंतर दि. 12/08/2014 रोजीचे पत्र तक्रारकर्त्यास मेलद्वारे दिले, त्यावरुन असे दिसते की, विरुध्दपक्षाने दि. 12/8/2014 रोजी त्यांच्या नवनीत अपार्टमेंट, तोष्णीवाल लेआऊट अकोला येथील पत्यावर एकच रजिस्टर पोष्टाने पत्र पाठविले व त्यानंतर तक्रारकर्त्याचा विमा दावा नाकारण्यात आला, असे तक्रारकर्त्याला कळविण्यात आले. सदर पत्रात नमुद केले की, विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला एफ.आय.आर., चार्ज शिट, परमिट, फिटनेस, क्लेम फॉर्म, डिस्चार्ज व्हाऊचर, वाहन चालक परवाना व रिपेअर इस्टीमेट ई, कागदपत्रांची मागणी केली व त्याप्रमाणे तक्रारकर्त्याने सर्व कागदपत्रे विरुध्दपक्षाला दि. 08/10/2014 ला दिली. तसेच विरुध्दपक्षाने कळविले की, अपघाताच्या वेळेस वाहनात 4 मजूर व चालक बसले होते व त्यामुळे पॉलिसीच्या कंडीशनचे उल्लघन केले. सदर पत्र जुन्या पत्यावर पाठविले असल्यामुळे तक्रारकर्त्यास मिळू शकले नाही. परंतु सदर नोटीस तक्रारकर्त्यास न मिळाल्यानंतर दुस-या कोणत्याही साधनांनी तक्रारकर्त्यास सेवा देण्याबाबत तजवीज केली नाही. तक्रारकर्त्याने लगेच या बाबत विरुध्दपक्षास नोटीस उत्तर वजा खुलासा पाठविला. परंतु त्याची कोणतीही दखल विरुध्दपक्षाने घेतली नाही. तक्रारकर्त्याच्या वाहनात जरी अपघाताच्या वेळेस 4 मजुर व चालक बसले होते व परवान्यानुसार 1+ 2 असे तीन लोकांना बसण्याची तजवीज असली तरी देखील पॉलिसीच्या करारामध्ये ब्रीच ऑफ कंडीशन हे फंडामेंटल स्वरुपाचे होऊ शकत नाही, की ज्यामुळेच अपघात हा घडून आला, सदर अपघात हा ट्रक क्र. एमएच 28/बी-7137 ने ठोस मारल्यामुळे घडून आला. अशा प्रकारे विरुध्दपक्षाने सेवा देण्यास न्युनता दर्शविली. तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार मंचासमक्ष दाखल करुन विनंती केली आहे की, तक्रारकर्त्याची तक्रार मंजुर करण्यात यावी व विरुध्दपक्षाकडून वाहनास झालेल्या नुकसान भरपाई बाबत रु. 6,30,358/- विरुध्दपक्षाकडून देण्याचा आदेश व्हावा, तसेच मानसिक त्रासापोटी रु. 70,000/- व्यवसायाचे नुकसानीपोटी रु. 1,50,000/- तसेच सॉलवेजचे गॅरेज भाडे रु. 1,20,000/- व न्यायिक खर्चापोटी रु. 10,000/- विरुध्दपक्षाकडून मिळावे.
सदर तक्रार शपथेवर दाखल असून त्यासोबत एकंदर 13 दस्तऐवज पुरावे म्हणून जोडण्यात आले आहेत.
विरुध्दपक्ष यांचा लेखीजवाब :-
2. सदर तक्रारीचे अनुषंगाने, विरुध्दपक्ष यांनी आपला लेखीजवाब, शपथेवर दाखल केला त्यानुसार तक्रारकर्त्याच्या तक्रारीतील बहुतांश विधाने नाकबुल करुन असे नमुद केले आहे की,…
तक्रारकर्त्याने सदर तक्रार त्याच्या व्यावसायिक वाहनाबाबत केली असून, व्यावसायिक विमा पॉलीसी अंतर्गत विमा पॉलिसी काढलेली आहे. त्यामुळे तक्रारकर्ता हा ग्राहक होऊ शकत नाही. दि. 27/04/2014 रोजी अपघाताची सुचना प्राप्त होताच विरुध्दपक्षाने क्लेम नं. 15/004250 नोंदवून, श्री व्ही एस कलंत्री यांचे मार्फत दि. 28/4/2014 रोजी स्पॉट सर्व्हे करण्यात आला. त्यावेळी तक्रारकर्त्यातर्फे क्लेम फॉर्म देण्यात आला, त्यानुसार सदर वाहन हे तकारकर्ता स्वत: चालवित होता. घटनेबाबत सखोल चौकशी केली असता, असे आढळून आले की, घटनेच्या वेळी तक्रारकर्ता हा वाहनामध्ये क्षमतेपेक्षा जास्त व्यक्तींची वाहतूक करीत होता व सदर वाहन हे हर्षल भदे हा व्यक्ती चालवित होता. क्षमतेपेक्षा जास्त व्यक्तींची वाहतुक करणे हे मोटारवाहन अधिनियमाच्या विसंगत आहे. सदर अपघातात ट्रकचा विमा फक्त रु. 1,74,726/- इतक्या रुपया पर्यंतच आय.डी.व्ही. नमुद करुन तक्रारकर्त्याने काढला आहे. याची जाणीव असतांना सुध्दा मंचासमोर सदर आय.डी.व्ही रक्कम लपवून विपर्यास्त रकमेची मागणी तक्रारकर्ता करीत आहे. टोटल लॉस बेसीसच्या आधारावर सॉल्वेज रक्कम रु. 49,226/- व अतिरिक्त लागत रु. 500/- वगळून विमा कंपनीची जबाबदारी फकत रु. 1,25,000/- पर्यंत आहे. मात्र तक्रारकर्त्याने विमा कराराच्या तरतुदीचे पालन न केल्यामुळे, तो सदरची रक्कमही घेण्यास पात्र नाही, अशा परिस्थितीत विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याचा क्लेम नाकारला आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात यावी.
3. त्यानंतर दोन्ही पक्षांतर्फे तोंडी युक्तीवाद करण्यात आला.
::: का र णे व नि ष्क र्ष :::
4. तक्रारकर्त्याची तक्रार, दाखल दस्तऐवज, विरुध्दपक्ष यांचा लेखी जवाब, उभय पक्षाने दाखल केलेले सर्व दस्तऐवज, उभय पक्षांचा तोंडी युक्तीवाद व तक्रारकर्ते यांनी दाखल केलेले न्यायनिवाडे, यांचे काळजीपुर्वक अवलोकन केल्यास, असे दिसते की, या प्रकरणात उभय पक्षाला हे मान्य आहे की, तक्रारकर्त्याचे वाहन, चारचाकी माल वाहक गाडीचा विमा विरुध्दपक्षाकडे दि. 11/03/2014 ते 27/10/2014 या कालावधीकरिता काढलेला होता व सदर वाहनाची IDV ही रु. 1,74,726/- या रकमेची होती. उभय पक्षात या बाबत देखील वाद नाही की, सदर वाहनाचा दि. 27/4/2014 रोजी रस्ता अपघात झाला होता व त्यात वाहनाचे नुकसान झाले होते.
तक्रारकर्त्याचा युक्तीवाद असा आहे की, या अपघातात वाहन क्षतीग्रस्त होवून ते दुरुस्त करण्याकरिता एकंदर रक्कम रु. 6,30,358/- चे इस्टीमेट, टोटल लॉस तरतुदीनुसार विरुध्दपक्षाच्या कार्यालयात, वाहनाच्या विमा दाव्यापोटी दिले व विरुध्दपक्षाने मागणी केलेले सर्व कागदपत्रे वेळोवेळी पुरवली, परंतु विरुध्दपक्षाने सदरहू विमा दावा, असे कारण देवून नाकारला की, अपघात घटनेच्या वेळी या वाहनात क्षमतेपेक्षा जास्त व्यक्ती बसलेल्या होत्या व गाडीच्या चालकाबद्दलची खोटी माहिती तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाला दिली होती. त्यामुळे मोटारवाहन अधिनियमाचा भंग होवून, या विमा पॉलिसीच्या बेसीक अटी व शर्तीचे तक्रारकर्त्याने उल्लंघन केले आहे, परंतु तक्रारकर्ते यांनी रेकार्डवर दाखल केलेल्या न्यायनिवाड्यातील निर्देशानुसार व रेकार्डवरील दस्तऐवज, जसे की, अपघात घटनेचा एफ.आय.आर, अंतीम अहवाल नमुना, यांचे अवलोकनातून असे आढळते की, तक्रारकर्त्याच्या सदर वाहनाला दुस-या वाहनाने समोरुन ठोस मारल्यामुळे हा अपघात झाला होता. त्यामुळे या आकस्मीक अपघाताला क्षमतेपेक्षा जास्त व्यक्ती वाहून नेण्याचे कारण नव्हते. तसेच अशी वाहतुक करणे हे पॉलिसीच्या बेसीक अटी-शर्तीचे उल्लंघन होवू शकत नाही. तसेच वाहन चालकाबद्दलची कोणतीही माहीती तक्रारकर्त्याकडून लपविल्या गेली नव्हती, असे देखील दाखल दस्तांवरुन समजते. त्यामुळे विरुध्दपक्षाने नमुद केलेले कारण, विमा दावा नाकारण्यास उचित नाही, असे मंचाचे मत आहे. तक्रारकर्त्याने या अपघातामुळे त्याच्या वाहनास जे नुकसान झाले, त्याबद्दलची रक्कम रु. 6,30,358/- एवढी इस्टीमेट नुसार मागीतली आहे, परंतु सदर वाहनाची विम्यानुसार IDV रक्कम रु. 1,74,726/- आहे, शिवाय तक्रारकर्त्याची दाखवलेली ही रक्कम इस्टीमेट म्हणून दर्शविलेली आहे, त्यामुळे तक्राकर्त्याच्या मागणीनुसार विमा रक्कम मिळण्यास तक्रारकर्ता पात्र नाही. विरुध्दपक्षाने रेकार्डवर अपघातग्रस्त वाहनाचा सर्व्हे रिपोर्ट दाखल केला आहे व तो मंचाने का स्विकारु नये, या बद्दलचा ठोस पुरावा तक्रारकर्त्याने रेकार्डवर दाखल केला नाही. विरुध्दपक्षाच्या सर्व्हेअरने विमा कंपनीची जबाबदारी रु. 1,25,000/- पर्यंत ठरविलेली आहे व विरुध्दपक्षाने, तक्रारकर्त्याकडून सदर पॉलिसीच्या अटी व शर्तीचे उल्लंघन झाले हे सिध्द केले नसल्यामुळे, तक्रारकर्ता सदर वाहनाच्या अपघाती नुकसान भरपाई बाबत, विमा पॉलिसी अंतर्गत, सर्व्हेअरने विहीत केलेली रक्कम रु. 1,25,000/- सव्याज विरुध्दपक्षाकडून मिळण्यास पात्र आहे. तसेच तक्रारकर्ते शारीरिक, आर्थिक व मानसिक नुकसान भरपाईपोटी रु. 5000/- व प्रकरण खर्च रु. 3000/- विरुध्दपक्षाकडून मिळण्यास देखील पात्र आहे, या निष्कर्षाप्रत सदर मंच आलेले आहे. म्हणून तक्रारकर्त्याच्या इतर मागण्या नाकारुन अंतिम आदेश पारीत केला तो येणेप्रमाणे…
:::अं ति म आ दे श:::
- तक्रारकर्ते यांची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
- विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास त्याच्या वाहनाच्या अपघाती नुकसान भरपाई बाबत दुरुस्ती खर्चापोटी रक्कम रु. 1,25,000/- ( रुपये एक लाख पंचविस हजार ) दरसाल दरशेकडा 8 टक्के दराने दि. 05/01/2015 ( प्रकरण दाखल तारीख ) पासून रक्कम प्रत्यक्ष अदाईपर्यंत व्याजासहीत द्यावी. तसेच शारीरिक, आर्थिक व मानसिक नुकसान भरपाईपोटी रु. 5000/- ( रुपये पांच हजार ) व प्रकरण खर्च रु. 3000/- ( रुपये तिन हजार ) द्यावा
- सदर आदेशाचे पालन निकालाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसांच्या आंत करावे.
4) सदर आदेशाच्या प्रती उभयपक्षांना निशुल्क देण्यात याव्या.