तक्रारदारातर्फे – वकील – एकनाथ जी काकडे,
सामनेवाले 1 व 2 तर्फे – वकिल – एस. के. राऊत .
।। निकालपत्र ।।
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदाराने सामनेवाले नं. 1 कडून महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचा 605 अर्जुन कंपनीचा ट्रॅक्टर, स्टेट बँक ऑफ हैद्राबाद, शाखा- अंमळनेर या बँकेकडून कर्ज घेवून रक्कम रु. 6,10,000/- मध्ये खरेदी घेतलेला आहे.
सामनेवाले नं. 1 कडे तक्रारदार व त्यांचा भाचा बाबु गणपत शेळके हे ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी गेले असता, सामनेवाले नं. 1 ने ट्रॅक्टरची सविस्तर माहिती देवून वॉरंटी व गॅरंटी बद्दल सांगितले व या कंपनीचा ट्रॅक्टर उत्तम प्रकारचा असून सदर ट्रॅक्टरचे अनुभवाची माहिती पटवून दिली. तक्रारदारास ट्रॅक्टरचे मशिनबद्दल पूर्णत: खात्रीशिर दोन वर्षाची गॅरंटी देण्याबद्दलचा ठराव करुन विश्वासात घेतले. ट्रॅक्टरच्या मशिनमध्ये कोणत्याही प्रकारचा मोठा बिघाड झाल्यास संपूर्ण ट्रॅक्टरचे हेड कंपनीकडून बदलून दिले जाते, असे सांगितले. त्यावर तक्रारदाराने विश्वास ठेवून वरील प्रमाणे ट्रॅक्टर तारीख 12/04/2010 रोजी महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर हेड इंजिन नं. आर जे यु- 1556 रक्कम रु. 6,10,000/- व साई कंपनीचा 16 इंची नांगर किंमत रु. 52,000/- त्यासोबत खरेदी केलेला आहे.
तक्रारदाराने ट्रॅक्टर विकत घेतल्यानंतर सदर ट्रॅक्टरने त्याचे शेतीची नांगरणी केली. त्यावर ड्रायव्हर म्हणून बिभीषण पवार, रा. अंबेवाडी, ता. पाटोदा हा होता. ट्रॅक्टर सुरळीतपणे चालू असतांना सामनेवाले नं. 1 चे सांगण्याप्रमाणे पहिल्या 60 तासाला ऑईल बदली व सर्व्हीसींग करण्यासाठी सामनेवालेंना कळविले असता सामनेवाले नं. 1 कडील शोरुममधील श्री कुटे यांनी अंमळनेर येथे येवून सर्व्हीसींग व ऑईल बदली केली. त्यावेळी श्री कुटे, फिटर यांनी सदर ट्रॅक्टरमध्ये कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम नसल्याचे सांगितले.
तक्राराराने तारीख 04/05/2010 रोजी शेती नांगरणीसाठी ड्रायव्हरला ट्रॅक्टर घेवून शेतात जाण्यास सांगितले असता तक्रारदाराचे घरापासून 200 ते 250 मिटर अंतरावर गेल्यावर चालता ट्रॅक्टर अचानकपणे बंद पडला व ट्रॅक्टरमधून धूर बाहेर पडला. त्यावेळी कोणतेही लोडींग काम नव्हते फक्त 186 तास झालेले होते. त्यानंतर ड्रायव्हरने ट्रॅक्टर चालू करण्याचा प्रयत्न केला असता ट्रॅक्टर चालूच झाला नाही. याबाबत ड्रायव्हरने तक्रारदारास माहिती दिली असता तक्रारदाराने तात्काळ मोबाईलवरुन सामनेवाले नं. 1 ला माहिती दिली. सामनेवाले नं. 1 ने फिटरला ट्रॅक्टरची पाहणी करण्यासाठी पाठविले. फिटरने आईल व ट्रॅक्टरची तपासणी केली असता त्यामध्ये 9 लिटर ऑईल असल्याचे सांगितले व प्रयत्न करुनही ट्रॅक्टर चालू न झाल्याने त्याबाबतचा रिपोर्ट संबंधीत कंपनीला पाठवून नवीन हेड देण्याचे आश्वासन तक्रारदारास दिले.
संबंधीत फिटरने ट्रॅक्टरचे हेडमध्ये मोठा बिघाड असल्याचे सांगितल्यानंतर सामनेवाले नं. 1 ने स्वत: येवून ट्रॅक्टरचे हेडची पाहणी केली व ट्रॅक्टर दोन दिवस सामनेवाले नं. 2 कडे पाठवून दुसरा नवीन हेड देण्यात येईल, असे सांगून बीड येथे निघून गेले. त्यानंतर तक्रारदाराने सामनेवाले नं. 1 कडे ट्रॅक्टरची बदली करण्याबाबत फोन लावला असता त्यांनी फोन उचलला नाही. त्यावरुन सामनेवाले यांनी नवीन हेड बदलून देवून असे केवळ आश्वासनच देवून, उडवाउडवीची उत्तरे देवून फसवणूक केली असल्याचे समजले.
दुसरे दिवशी तक्रारदार पुन्हा सामनेवाले नं. 1 ची भेट घेण्यासाठी शोरुममध्ये गेला असता सामनेवाले नं. 1 हे बाहेरगावी गेल्याचे तक्रारदारास सांगण्यात आले. त्यावेळी तक्रारदाराने शोरुममधील कर्मचा-यांना कागदपत्रांची मागणी केली असता ‘आम्हाला कागदपत्र देता येत नाहीत, मालक आल्यानंतर घेवून जा, असे सांगण्यात आले. त्यानंतर अनेकवेळा तक्रारदाराने सामनेवाले नं. 1 शी मोबाईलवर संपर्क केला असता ते तात्काळ मोबाईल बंद करत होता, त्यामुळे तक्रारदाराची फसवणूक झाल्याचा मोठा धक्का तक्रारदारास बसला.
याबाबत तक्रारदाराने सामनेवालेंना नोटीस पाठवली. सामनेवाले नं. 1 ला नोटीस मिळाल्यानंतर त्यांनी तक्रारदारास ट्रॅक्टर घेवून शोरुमला येण्यास सांगितले. तक्रारदाराने दि. 19/5/2010 रोजी सकाळी 8.30 वाजता रु. 1,500/- भाडे देवून ट्रॅक्टरला टोचन करुन शोरुमला पोहच केले. सामनेवाले नं. 1 ने तक्रारदाराने पाठवलेल्या नोटीसचा राग मनात धरुन तक्रारदारास तुम्ही या कायदयाच्या भानगडीत पडायचे नव्हते. आमचे काही वाकडे होत नाही, असे म्हणून तुम्ही उदया या आमचे सवडीनुसार इंजिन बदली करुन देऊत, असे सांगितले.
तारीख 20/05/2010 रोजी तक्रारदार शोरुमला गेला असता इंजीनची बदली केली आहे, तुम्ही रक्कम रु. 2,338/- जमा करा, त्याबदलची पावती व संपूर्ण्ं रक्कम मिळाल्याची पावती तक्रारदाराने मागितली असता फक्त ट्रॅक्टर व नांगराची पावती मिळेल, इतर खर्चाची पावती मिळणार नाही, असे सांगून फक्त ट्रॅक्टर व नांगर याचीच पावती सामनेवाले नं. 1 ने दि. 25/5/10 रोजी दिली. तक्रारदाराने ट्रॅक्टर बंद असल्याबाबत लेखी देण्याची मागणी केली त्यावेळी तक्रारदारांना लेखी दिलेले आहे. तसेच सामनेवालेने ट्रॅक्टरचे चाकातील वजन देखील 1 महिना 18 दिवसांनी बसविलेले आहे. त्यामुळे टायरचे मोठयाप्रमाणात घर्षण होऊन टायर देखील खराब झालेले होते. सामनेवालेने जाणीवपूर्वक मानसिक, आर्थिक व शारिरीक त्रास तक्रारदारास दिलेला आहे. तसेच मशागतीचे दिवसांमध्ये एकूण 12 दिवसांचे दररोज रु. 5,000/- ते रु. 6,000/- प्रमाणे तक्रारदाराचे नुकसान झालेले आहे. सदरचे नुकसान मागण्यास तक्रारदार हक्कदार आहे.
सामनेवालेंनी बदलेले तक्रारदाराचे ट्रॅक्टरचे इंजिन देखील खराब दिल्याचे दि. 27/5/2010 रोजी तक्रारदारास माहीत झाले. सदर बदलून दिलेल्या मशिनमधून देखील आईल गळत होते. तसेच स्टेअरींगमध्ये देखील आवाज येत होता. त्यानंतर सामनेवालेकडे फोन केला असता तुमचा नेहमीचा प्रॉब्लेम आहे, मी फिटरला दुस-या दिवशी पाठवून देतो, असे सांगण्यात आले. तक्रारदाराने दुस-या दिवशी फोन केला असता,फिटर लग्नाला गेलेला आहे, उद्या पाठवतो, असे म्हणून उडवा-उडवीचे उत्तरे दिली. पुन्हा तक्रारदाराने दुसरे दिवशी फोन केला असता तक्रारदाराचा फोनच उचलला नाही, त्यामुळे तक्रारदाराच्या ट्रॅक्टरला सामनेवाले नं. 1 ने जुने व बिघाड झालेले इंजिन, डिझेल जास्त लागणारे, अर्धवट कलर गेलेले इंजिन बसवून तक्रारदारास सेवा देण्यास जाणीवपूर्वक कसूर केलेला आहे. त्यामुळे तक्रारदार खालील प्रमाणे नुकसान भरपाई मिळण्यास हक्कदार आहे.
अ) अर्जदाराचा ट्रॅक्टर बंद पडल्यापासून दि. 04/05/2010 ते
दि. 25/05/2010 (कमीत कमी 4000/- दररोज याप्रमाणे
झालेले नुकसान. रु. 80,000/-
ब) दि. 25/05/2010 रोजी विना पावती घेतलेली आगाऊ
रक्कम व येण्या-जाण्यासाठी झालेला खर्च. रु. 2,538/-
क) मानसिक, आर्थिक व शारिरीक त्रासापोटी. रु. 10,000/-
ड) नोटीसचा खर्च. रु. 1,000/-
इ) तक्रारीचा खर्च. रु. 2,000/-
---------------------------------------
एकूण :- रु. 95,538/-
विनंती की, तक्रारदारास नवीन ट्रॅक्टर हेड बदलून देण्याबाबत सामनेवालेंना आदेशीत करावे तसेच तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे एकूण नुकसान भरपाईची रक्कम रुपये 95,538/- व त्यावर द. सा. द. शे. 18 टक्के देण्याबाबत सामनेवालेंना आदेश व्हावा.
सामनेवाले नं. 1 व 2 यांनी नोटीसा स्विकारल्या. त्यांच्या वतीने अँड. एस. के. राऊत अनुक्रमे तारीख 11/08/2010 व ता. 26/10/10 रोजी हजर झाले. परंतू त्यांनी ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदीप्रमाणे मुदतीत खुलासा दाखल केलेला नाही, म्हणून सामनेवाले नं. 1 व 2 विरुध्द तारीख 12/11/2010 रोजी सामनेवालेंच्या खुलाशाशिवाय तक्रार चालविण्याचा निर्णय न्याय मंचाने घेतला.
न्याय निर्णयासाठी मुद्दे उत्तरे
1. सामनेवाले नं. 1 व 2 यांनी तक्रारदारांना दोषयुक्त
ट्रॅक्टर दिल्याची बाब तक्रारदाराने सिध्द केली आहे
काय 1 होय.
2. सामनेवाले नं. 1 व 2 यांनी तक्रारदारांना ट्रॅक्टर
विक्रीनंतर दोषयुक्त ट्रॅक्टर मधील दोष दूर करुन
न देवून दयावयाच्या सेवेत कसूर केल्याची बाब
तक्रारदाराने सिध्द केली आहे काय 1 होय.
3. तक्रारदार दाद मिळण्यास पात्र आहे काय 1 होय.
4. अंतिम आदेश 1 निकालाप्रमाणे.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे शपथपत्र, यांचे सखोल वाचन केले. तक्रारदाराचे विद्वान अँड. ए.जी. काकडे यांचा युक्तिवाद ऐकला. तक्रारीतील कागदपत्रे पाहता तक्रारदाराने सामनेवालेकडून कर्जाने ता. 12/04/2010 रोजी महिंद्रा-605 अर्जुन या मॉडेलचा ट्रॅक्टर विकत घेतलेला आहे. तसेच सदरचे ट्रॅक्टर हे तारीख 04/05/2010 रोजी चालवत असतांना अचानक रस्त्यात बंद पडलेले आहे. सदरचे ट्रॅक्टर हे आजपर्यंत सामनेवाले नं. 1 व 2 यांनी त्यांना तक्रारदाराने वेळोवेळी कळवूनही योग्य त-हेने दुरुस्ती करुन दिलेले नाही, त्यामुळे ट्रॅक्टर बंदच आहे. त्यामुळे तक्रारदाराचे नुकसान होत आहे, म्हणून तक्रारदाराने सदर ट्रॅक्टर व हेड बदलून मिळण्याची विनंती केलेली आहे.
वरील तक्रारीत सामनेवालेचा कोणताही आक्षेप, नाही, त्यामुळे तक्रारदाराचे ट्रॅक्टर विक्रीनंतर लगेचच एक महिन्याच्या कालावधीत बंद पडले व त्याचे कारण सामनेवाले 1 व 2 यांना समजू शकलेले नाही, असे तक्रारीवरुन दिसते, त्यामुळे दोषयुक्त ट्रॅक्टर विकल्याची बाब स्पष्ट होते.
विक्री नंतर ट्रॅक्टर बंद पडल्यामुळे तक्रारदाराने लगेचच सामनेवालेंना कळविलेले आहे. त्यांनी दुरुस्ती केल्याची सविस्तर माहितीही तक्रारदाराने तक्रारीत दिलेली आहे, ती स्वयंस्पष्ट आहे. प्रयत्न करुनही ट्रॅक्टर दुरुस्ती झालेला नाही.
ट्रॅक्टर कशामुळे बंद पडला याबाबत सामनेवाले नं. 1 व 2 न्याय मंचात हजर हजर नाहीत व ट्रॅक्टरची दुरुस्ती करुन दिली याबाबतची कोणतीही कागदपत्रे दाखल नाहीत. ट्रॅक्टर नादुरुस्त झाल्यानंतर सामनेवालेंनी प्रयत्न करुनही तो योग्यत-हेने दुरुस्ती झाला नाही. सदरचा ट्रॅक्टार वॉरंटी काळात नादुरुस्त झालेला असतांना तो दुरुस्ती करुन देण्याची सामनेवाले नं. 1 व 2 यांची नैतिक व कायदेशीर जबाबदारी असतांना सामनेवालेंनी ट्रॅक्टरची दुरुस्ती करुन किंवा हेड बदलून दिलेले नाही, त्यामुळे सामनेवालेंनी तक्रारदारांना दयावयाच्या सेवेत कसूर केल्याची बाब तक्रारीवरुन स्पष्ट होते, असे न्याय मंचाचे मत आहे. सामनेवाले नं. 1 व 2 यांनी तक्रारदाराचा ट्रॅक्टर दुरुस्ती करुन देणे उचित होते. तसेच तक्रारदाराचा ट्रॅक्टर बंद असल्यामुळे तक्रारदाराने ज्या उद्देशाने ट्रॅक्टर विकत घेतलेला होता तो तक्रारदाराचा उद्देश सफल न झाल्याने निश्चितच तक्रारदारांना मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागलेला आहे व लागत आहे. त्यामुळे सामनेवाले नं. 1 व 2 यांनी तक्रारदारांना प्रत्येकी रक्कम रु. 5,000/-, मानसिक व शारिरीक त्रासापोटी नुकसान भरपाई तक्रारदारांना देणे उचित होईल. तसेच ट्रॅक्टर बंद असल्यामुळे तक्रारदारांना त्याचा वापर करता आला नाही त्यामुळे त्याबाबत नुकसान भरपाईपोटी प्रत्येकी रक्कम रु. 5,000/-, सामनेवाले नं. 1 व 2 यांनी देणे तसेच तक्रारीचा खर्च प्रत्येकी रु. 2,000/- देणे उचित होईल, असे न्याय मंचाचे मत आहे.
सबब, न्याय मंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
2. सामनेवाले नं. 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदारांना ट्रॅक्टरचे हेड आदेश मिळाल्यापासून एक महिन्याच्या आत योग्य त-हेने दुरुस्ती करुन दयावे.
3. सामनेवाले नं. 1 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदारांना ट्रॅक्टरच्या नुकसानीबाबत रु. 5,000/-(अक्षरी रुपये पाच हजार) , मानसिक त्रासाबाबत रु. 5,000/-(अक्षरी रुपये पाच हजार) व तक्रारीच्या खर्चाबाबत रु. 2,000/-(अक्षरी रुपये दोन हजार) आदेश मिळाल्यापासून एक महिन्याच्या आत अदा करावेत.
4. सामनेवाले नं. 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदारांना ट्रॅक्टरच्या नुकसानीबाबत रु. 5,000/-(अक्षरी रुपये पाच हजार) , मानसिक त्रासाबाबत रु. 5,000/-(अक्षरी रुपये पाच हजार) व तक्रारीच्या खर्चाबाबत रु. 2,000/-(अक्षरी रुपये दोन हजार) आदेश मिळाल्यापासून एक महिन्याच्या आत अदा करावेत.
5. सामनेवाले नं. 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी वरील रक्कम विहीत मुदतीत तक्रारदारांना अदा न केल्यास त्यावर द.सा.द.शे. 9 टक्के प्रमाणे व्याज देण्यास सामनेवाले नं. 1 व 2 जबाबदार राहतील.
6. ग्राहक संरक्षण कायदा 1986 अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे
तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदारांला परत करावेत.
(सौ.एम.एस.विश्वरुपे) ( पी.बी.भट )
सदस्या, अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, बीड जि.बीड