न्या य नि र्ण य
व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा
1. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदयातील तरतुदींप्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे—
तक्रारदार हे त्यांचे उदरनिर्वाहासाठी शेती उपयोगी अवजारे तसेच कमान पाटे तयार करण्याचा व्यवसाय करतात. वि.प. यांचा वाहतूकीचा व्यवसाय आहे. तक्रारदार यांनी त्यांचे नाशिक येथील ग्राहकाचे मागणीवरुन 4 सेट कमानपाटे रक्कम रु. 19,163/- इतक्या रकमेचा माल वि.प. यांचे ट्रान्स्पोर्ट मार्फत दि. 27/09/2019 रोजी पाठविला होता. त्याप्रमाणे वि.प. यांनी योग्य ती आकारणी करुन तक्रारदार यांना एनआर नं. 27425 ची पावती दिली. तथापि वि.प. यांचेमार्फत पाठविलेला माल आजअखेर पोच झालेला नाही. त्याबाबत तक्रारदार यांनी लेखी पत्राने कळविले होते. परंतु तरीही वि.प. यांनी याबाबत कोणताही योग्य तो खुलासा केलेला नाही. तसेच सदरचा माल तक्रारदार यांचे ग्राहकापर्यंत आजअखेर पोचविलेला नाही. तक्रारदार यांनी वि.प. यांना वकीलांमार्फत दि. 24/12/2019 रोजी नोटीस पाठविली होती. परंतु तरीही वि.प. यांनी त्यास कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. अशा प्रकारे वि.प. यांनी सेवात्रुटी केली आहे. म्हणून, तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रारअर्ज या आयोगात दाखल केला आहे.
2. प्रस्तुतकामी तक्रारदाराने वि.प. यांचेकडून मालाची किंमत रक्कम रु. 20,000/- तसेच मानसिक त्रासापोटी रु.1,00,000/-, नोटीस खर्च रु. 5,000/-, तक्रारीचा खर्च रु. 20,000/- वि.प. कडून मिळावा अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
3. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत प्रस्तुतकामी तक्रारदाराने वि.प. यांनी दिलेली पावती, तक्रारदारांनी वि.प. यांना पाठविलेली नोटीस, सदर नोटीसची पोस्टाची पावती व पोचपावती, तक्रारदारांनी वकीलामार्फत पाठविलेली नोटीस, सदर नोटीसची पोस्टाची पावती व पोचपावती, तक्रारदार यांनी त्यांचे ग्राहकांना पाठविलेल्या मालाचे बिल वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
4. प्रस्तुत कामी वि.प. यांना नोटीस लागू होऊनही सदर वि.प. याकामी गैरहजर राहिलेने वि.प. यांचेविरुध्द एकतर्फा आदेश नि.1 वर पारीत झालेला आहे.
5. वर नमूद तक्रारदार यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे वि.प. यांचेकडून पाठविलेल्या मालाची रक्कम व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
वि वे च न –
6. वर नमूद मुद्दा क्र.1 ते 3 ची उत्तरे आम्ही होकारार्थी दिली आहेत कारण तक्रारदार हे त्यांचे उदरनिर्वाहासाठी शेती उपयोगी अवजारे तसेच कमान पाटे तयार करण्याचा व्यवसाय करतात. वि.प. यांचा वाहतूकीचा व्यवसाय आहे. तक्रारदार यांनी त्यांचे नाशिक येथील ग्राहकाचे मागणीवरुन 4 सेट कमानपाटे रक्कम रु. 19,163/- इतक्या रकमेचा माल वि.प. यांचे ट्रान्स्पोर्ट मार्फत दि. 27/09/2019 रोजी पाठविला होता. त्याप्रमाणे वि.प. यांनी योग्य ती आकारणी करुन तक्रारदार यांना एनआर नं. 27425 ची पावती दिली. सदरची पावती तक्रारदाराने याकामी दाखल केली आहे. वि.प. यांनी याकामी हजर होवून प्रस्तुत बाब नाकारलेली नाही. सबब, तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्पष्ट सिध्द झाली आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
7. तक्रारदारांचे तक्रारअर्जातील कथनानुसार, तक्रारदार यांनी त्यांचे नाशिक येथील ग्राहकाचे मागणीवरुन 4 सेट कमानपाटे रक्कम रु.19,163/- इतक्या रकमेचा माल वि.प. यांचे ट्रान्स्पोर्ट मार्फत दि. 27/09/2019 रोजी पाठविला होता. तथापि वि.प. यांचेमार्फत पाठविलेला माल आजअखेर पोच झालेला नाही. त्याबाबत तक्रारदार यांनी लेखी पत्राने कळविले होते. तसेच तक्रारदार यांनी वि.प. यांना वकीलांमार्फत दि. 24/12/2019 रोजी नोटीसही पाठविली होती. परंतु तरीही वि.प. यांनी सदरचा माल तक्रारदार यांचे ग्राहकापर्यंत आजअखेर पोचविलेला नाही अशी तक्रारदाराची तक्रार आहे. सदर कथनांचे पुष्ठयर्थ तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र दाखल केले आहे. तक्रारदाराचे तक्रारअर्जातील सदरची कथने वि.प. यांनी याकामी हजर होवून नाकारलेली नाहीत. तक्रारदारांनी वि.प. यांना वकीलामार्फत नोटीस पाठवूनही वि.प. यांनी त्यास कोणताही प्रतिसाद दिलेला नाही हे दाखल कागदपत्रांवरुन दिसून येते. वि.प. यांना प्रस्तुत तक्रारअर्जाची नोटीस लागू होऊनसुध्दा ते याकामी मंचात हजर झाले नाहीत. म्हणून, वि.प.क्र.1 ते 3 यांचेविरुध्द नि.1 वर एकतर्फा आदेश पारीत झालेला आहे. म्हणजेच वि.प. यांनी तक्रारदाराचे तक्रारअर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही. सबब, तक्रारदाराने तक्रारअर्जात केले कथनांवर विश्वासार्हता ठेवणे न्यायोचित वाटते. सदरची बाब विचारात घेता, वि.प. वाहतूक कंपनी यांनी तक्रारदाराचा माल त्यांचे ग्राहकापर्यंत न पोचवून तक्रारदाराला सदोष सेवा दिली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
8. वि.प. यांनी तक्रारदाराचा माल त्यांचे ग्राहकापर्यंत न पोचविल्याने तक्रारदारांचे सदर मालाचे नुकसान झाले आहे. सबब, तक्रारदार हे सदर मालाची किंमत रक्कम रु. 19,163/- मिळणेस पात्र आहेत. तसेच सदरचे रकमेवर तक्रारदार हे वि.प.मार्फत पाठविल्याचे तारखेपासून म्हणजेच दि. 27/09/2019 पासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याजदराने वसूल होवून मिळणेस तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व अर्जाचा खर्च रक्कम रु.3,000/- वि.प. यांचेकडून वसूल होवून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, प्रस्तुतकामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2) वि.प.यांनी तक्रारदार यांना रक्कम रु. 19,163/- अदा करावेत व सदर रकमेवर दि. 27/09/2019 पासून रक्कम प्रत्यक्ष तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज अदा करावे.
3) मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 5,000/- व अर्जाचा खर्च रु.3,000/- वि.प. यांनी तक्रारदारास अदा करावेत.
4) वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदींप्रमाणे कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.