न्या य नि र्ण य
व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा
1. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 2019 चे कलम 34 व 35 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे—
तुकडी व जिल्हा कोल्हापूर, पोट तुकडी व तहसिल करवीर, कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील सी वॉर्ड, सोमवार पेठ, रिकिबदार गल्ली येथील सि.स.नं. 1760/1 आणि 1760/2 या मिळकतीवर बांधण्यात आलेल्या अथर्व प्लाझा या इमारतीतील पहिले मजलेवरील फ्लॅट युनिट नं. एफ-2, क्षेत्र 36.80 चौ.मी. ही मिळकत या सदर तक्रारअर्जाचा विषय आहे. सदरची मिळकत वि.प. यांनी तक्रारदारांना रक्कम रु. 5,54,000/- इतका मोबदला स्वीकारुन विक्री करण्याचे वि.प. यांनी मान्य केले. त्यानुसार तक्रारदार यांनी वि.प. यांना सदरची रक्कम वेळोवेळी अदा केलेली आहे. परंतु वि.प. यांनी सदर मिळकतीचा ताबा मिळकतीमध्ये लाईट फिटींग, दरवाजे खिडक्या, संडास बाथरुम, पूर्ण टाईल्स, प्लंबिंग इ. कामे अपूर्ण असताना दि. 2/5/2019 रोजी दिलेला आहे. अपूर्ण कामांचा तपशील पुढील प्रमाणे -
- फ्लॅट युनिटमधील संपूर्ण इलेक्ट्रीक फिटींग, वायरिंग आणि वीज मीटर बसविणेचे होते.
- फ्लॅट युनिटमधील किचन कट्टा, टाईल्स, प्लंबिंग, व सिंकसह पाईपलाईन पूर्ण केलेली नव्हती.
- टेरेसवरील फ्लोअरिंग टाईल्स बसविलेल्या नव्हत्या.
ड. फ्लॅट युनिटची रंगरंगोटी केलेली नव्हती.
इ. फ्लॅट युनिटचा बाहेरील बाजूचा गिलावा केलेला नव्हता.
ई. फ्लॅट युनिटमधील दरवाजे, खिडक्या बसविलेल्या नव्हत्या, संडास बाथरुमचे
फिटींग केलेले नव्हते, प्लंबिंगचे काम पूर्ण केलेले नव्हते. फ्लॅट युनिटमध्ये
सर्व टाईल्स बसविलेल्या नव्हत्या.
प. फ्लॅट युनिट मिळकतीचे खरेदीपत्र करुन दिलेले नाही.
फ. पिण्याचे पाण्याची व्यवस्था नाही.
सदर कामे पूर्ण करुन देणेबाबत तक्रारदारांनी वेळोवेळी वि.प. यांना विनंती केली असता वि.प. यांनी टाळाटाळ केली आहे व मिळकतीचे खरेदीपत्र देखील पूर्ण करुन दिलेले नाही. म्हणून तक्रारदारांनी स्वखर्चाने काही अपूर्ण कामे पूर्ण करुन घेतलेली आहेत तसेच पाण्याचे स्वतंत्र कनेक्शन घेतलेले आहे. तक्रारदारांनी लाईट फिटींग करिता रक्कम रु.7,000/- व पाणी कनेक्शन करिता रु.3,120/- खर्च केलेले आहेत. अशा प्रकारे वि.प. यांनी सेवात्रुटी केली आहे. म्हणून, तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रारअर्ज या आयोगात दाखल केला आहे.
2. प्रस्तुतकामी तक्रारदाराने वि.प. यांचेकडून वादमिळकतीचे नोंद खरेदीपत्र तक्रारदार यांचे नावे नोंदणीकृत करुन द्यावे, वाद मिळकतीतील वर नमूद अपूर्ण कामे पूर्ण करुन द्यावीत, लाईट फिटींगसाठी तक्रारदारांनी खर्च केलेली रक्कम रु.7,000/- व पाणी कनेक्शनकरिता खर्च केलेली रक्कम रु.3,210/-, मानसिक त्रासापोटी रु.25,000/-, तक्रारीचा खर्च रु.10,000/- वि.प. कडून मिळावा अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
3. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत वि.प. यांनी तक्रारदार यांना रक्कम मिळालेल्या दिलेल्या पावत्या, वि.प. यांनी तक्रारदार यांना दिलेले पत्र, तक्रारदारांनी पाणी कनेक्शनसाठी भरलेल्या रकमांच्या पावत्या वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच पुरावा शपथपत्र दाखल केले आहे.
4. प्रस्तुत कामी वि.प.क्र.1 व 2 यांना नोटीस लागू होऊनही सदर वि.प. याकामी गैरहजर राहिलेने वि.प.क्र.1 व 2 यांचेविरुध्द एकतर्फा आदेश नि.1 वर पारीत झालेला आहे. वि.प.क्र.3 यांना नोटीस लागू झालेनंतर ते याकामी हजर झाले. परंतु विहीत मुदतीत त्यांनी आपले म्हणणे दाखल न केलेने त्यांचेविरुध्द म्हणणे नाही असा आदेश पारीत करण्यात आला.
5. वर नमूद तक्रारदार यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प.क्र.1 ते 3 हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | वि.प.क्र.1 ते 3 यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे वि.प. क्र.1 ते 3 यांचेकडून वाद मिळकतीमधील अपूर्ण कामे पूर्ण करुन नोंद खरेदीपत्र करुन मिळणेस व नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
वि वे च न –
6. वर नमूद मुद्दा क्र.1 ते 3 ची उत्तरे आम्ही होकारार्थी दिली आहेत कारण तुकडी व जिल्हा कोल्हापूर, पोट तुकडी व तहसिल करवीर, कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील सी वॉर्ड, सोमवार पेठ, रिकिबदार गल्ली येथील सि.स.नं. 1760/1 आणि 1760/2 या मिळकतीवर बांधण्यात आलेल्या अथर्व प्लाझा या इमारतीतील पहिले मजलेवरील फ्लॅट युनिट नं. एफ-2, क्षेत्र 36.80 चौ.मी. ही मिळकत या सदर तक्रारअर्जाचा विषय आहे. सदरची मिळकत वि.प. यांनी तक्रारदारांना रक्कम रु. 5,54,000/- इतका मोबदला स्वीकारुन विक्री करण्याचे वि.प. यांनी मान्य केले. त्यानुसार तक्रारदार यांनी वि.प. यांना सदरची रक्कम वेळोवेळी अदा केलेली आहे. तक्रारदारांनी वि.प. यांना अदा केलेल्या रकमांच्या पावत्या याकामी दाखल केलेल्या आहेत. वि.प.क्र.1 ते 3 यांनी याकामी हजर होवून प्रस्तुत बाब नाकारलेली नाही. सबब, तक्रारदार व वि.प.क्र.1 ते 3 हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्पष्ट सिध्द झाली आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
7. तक्रारदारांचे तक्रारअर्जातील कथनानुसार, परंतु वि.प. यांनी सदर मिळकतीचा ताबा मिळकतीमध्ये लाईट फिटींग, दरवाजे खिडक्या, संडास बाथरुम, पूर्ण टाईल्स, प्लंबिंग इ. कामे अपूर्ण असताना दि. 2/5/2019 रोजी दिलेला आहे. सदर कामे पूर्ण करुन देणेबाबत तक्रारदारांनी वेळोवेळी वि.प. यांना विनंती केली असता वि.प. यांनी टाळाटाळ केली आहे व मिळकतीचे खरेदीपत्र देखील पूर्ण करुन दिलेले नाही. म्हणून तक्रारदारांनी स्वखर्चाने काही अपूर्ण कामे पूर्ण करुन घेतलेली आहेत तसेच पाण्याचे स्वतंत्र कनेक्शन घेतलेले आहे. तक्रारदारांनी लाईट फिटींग करिता रक्कम रु.7,000/- व पाणी कनेक्शन करिता रु.3,120/- खर्च केलेले आहेत. अशा प्रकारे वि.प. यांनी सेवात्रुटी केली आहे असे तक्रारदाराचे कथन आहे. तक्रारदाराचे तक्रारअर्जातील सदरची कथने वि.प. यांनी याकामी हजर होवून नाकारलेली नाहीत. वि.प.क्र.1 व 2 यांना तक्रारअर्जाची नोटीस लागू होऊनसुध्दा ते याकामी मंचात हजर झाले नाहीत. म्हणून, वि.प.क्र.1 व 2 यांचेविरुध्द नि.1 वर एकतर्फा आदेश पारीत झालेला आहे. वि.प.क्र.3 हे याकामी हजर झाले परंतु त्यांनी आपले म्हणणे दाखल केले नाही. म्हणून त्यांचेविरुध्द नो से आदेश पारीत झालेला आहे. म्हणजेच वि.प. यांनी तक्रारदाराचे तक्रारअर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही. तक्रारदारांनी त्यांचे कथनाचे पुष्ठयर्थ पुराव्याचे शपथपत्र दाखल केले आहे. सबब, तक्रारदाराने तक्रारअर्जात केले कथनांवर विश्वासार्हता ठेवणे न्यायोचित वाटते. सदरची बाब विचारात घेता, वि.प.क्र.1 ते 3 यांनी तक्रारदार यांचेकडून वादमिळकतीचे मोबदल्यापोटी रक्कम स्वीकारुन देखील नोंद खरेदीपत्र करुन दिलेले नाही तसेच वाद मिळकतीतील वर नमूद कामे अपूर्ण ठेवली आहेत ही बाब शाबीत होते. सबब, वि.प.क्र.1 ते 3 यांनी तक्रारदाराला सदोष सेवा दिली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
8. सबब, तक्रारदार हे वि.प.क्र.1 ते 3 यांचेकडून वाद मिळकतीतील वर नमूद अपूर्ण कामे पूर्ण करुन घेवून वादमिळकतीचे नोंद खरेदीपत्र करुन मिळणेस पात्र आहेत. तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.3,000/- अशी रक्कम वि.प. क्र.1 ते 3 यांचेकडून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग मंच येत आहे.
सबब, प्रस्तुत कामी आम्ही पुढीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2) वि.प.क्र.1 ते 3 यांनी तक्रारदार यांना तुकडी व जिल्हा कोल्हापूर, पोट तुकडी व तहसिल करवीर, कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील सी वॉर्ड, सोमवार पेठ, रिकिबदार गल्ली येथील सि.स.नं. 1760/1 आणि 1760/2 या मिळकतीवर बांधण्यात आलेल्या अथर्व प्लाझा या इमारतीतील पहिले मजलेवरील फ्लॅट युनिट नं. एफ-2, क्षेत्र 36.80 चौ.मी. या वाद मिळकतीतील अपूर्ण कामे पूर्ण करुन द्यावीत व तदनंतर वाद मिळकतीचे नोंद खरेदीपत्र करुन द्यावे.
3) वि.प.क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना लाईट फिटींगसाठी तक्रारदारांनी खर्च केलेली रक्कम रु.7,000/- व पाणी कनेक्शनकरिता खर्च केलेली रक्कम रु.3,210/- अदा करावी.
4) मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व अर्जाचा खर्च रु.3,000/- वि.प. क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदारास अदा करावेत.
5) वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता वि.प. क्र.1 ते 3 यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.
6) विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदीनुसार कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.