ग्राहकतक्रारअर्जक्र. 199/2011
दाखलदिनांक – 28/03/2011
अंतीमआदेशदि. 18/02/2014
कालावधी 02 वर्ष, 10 महिने,21दिवस
नि.22
अतिरिक्त जिल्हा ग्राहकतक्रारनिवारण न्यायमंच, जळगाव.
सुधाकर ओंकार अस्वार, तक्रारदार
रा. रावेर, ता. रावेर जि. जळगांव (अॅड.श्री.जितेंद्र व्ही. दांडगे)
विरुध्द
1. मे. अस्वार कृषी केंद्र .सामनेवाला
आठवडे बाजार, रावेर,, (स्वतः)
ता. रावेर, जि. जळगांव,
(बियाने विक्री केंद्र)
2. विनायका सिडस, (सा.वा क्र. 2 व 3
श्री.हरी कृपा कॉम्प्लेक्स, अॅड. नरेंद्र ओ. दूत)
जयस्तंभ चौक, बुलडाणा, ता.जि.बुलडाणा
(बियाणे वितरक कंपनी)
3. मे. प्रभात अॅग्रो बायोटेक (लि. 6-3-541/ब)
हेरिटेज पुना गुटटाच्या बाजुला, हैद्राबाद (आं.प्र)
(बियाणे उत्पादक कंपनी)
(निकालपत्र अध्यक्ष, मिलींद सा. सोनवणे यांनीपारीतकेले)
निकालपत्र
प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1984, कलम 12 अन्वये, दाखल करण्यात आलेली आहे.
02. तक्रारदारांचे म्हणणे थोडक्यात असे की, ते शेतकरी आहेत. दि. 03/06/2010 रोजी त्यांनी सामनेवाला क्र. 1 यांच्याकडून सामनेवाला क्र. 2 यांनी पुरविलेले व सामनेवाला क्र. 3 यांनी उत्पादीत केलेले, विनायका बी-टी या कापसाच्या वाणाची तीन पाकिटे खरेदी केले. त्या वाणाचा लॉट क्र. 4934771 असा होता. त्यांनी त्याची पेरणी त्यांच्या शेतात केली. मात्र पिकास कापसाची बोंडे आलीच नाही. सामनेवाल्यांशी संपर्क साधता त्यांनी, त्यांनी त्यांना उडावा उडवीची उत्तरे दिली. दि.18/10/2010 रोजी त्यांनी गट विकास अधिकारी, पंचायत समिती, रावेर यांच्या कडे पंचनाम्यासाठी अर्ज दिला. त्यानुसार दि. 26/10/2010 रोजी तालुका कृषी अधिकारी व पंचायत समिती अधिकारी यांनी कंपनीच्या जिल्हा प्रतिनिधीच्या समक्ष पाहणी पंचनामा केला. त्यात सदर अधिका-यांनी एका झाडाला एक बोंड तसेच 6 फुले व 10 पाख्या त्यांना आढळून आल्याचे नमूद केलेले आहे. त्या समितीने 0.78 आर क्षेत्रा करीता 780 कि.लो ग्रॅम या प्रमाणे रु. 31,200/- इतके नुकसान झाल्याचा अंदाज दिलेला आहे. ती नुकसान भरपाई त्यांनी सामनेवाल्यांकडे मागितली, परंतू सामनेवाल्यांनी आजतागायत ती न दिल्यामुळे, त्यांनी प्रस्तुत तक्रार अर्ज दाखल केलेला आहे. तक्रारदारांनी आपल्यास एकूण रु. 71,200/- इतकी नुकसान भरपाई मिळावी, अशी विनंती मंचास केलेली आहे.
03. सामनेवाला क्र. 1 यांनी जबाब नि. 17 दाखल केला. त्यात त्यांनी तक्रारदारांनी त्यांच्या कडून बियाणे खरेदी केले, ही बाब मान्य केलेली आहे. मात्र बियाणाची बंद पाकिटे सामनेवाला क्र.2 व 3 यांच्या कडून त्यांना प्राप्त झालेली आहेत. त्यातील बियाणे पॅकिंग मध्ये असल्यामुळे ते चांगले की वाईट, याची जबाबदारी त्यांच्यावर टाकता येणार नाही. त्यामुळे प्रस्तुत अर्ज आपल्या विरुध्द बसत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.
04. सामनेवाला क्र. 2 व 3 यांनी जबाब नि.15 दाखल करुन, प्रस्तुत अर्जास विरोध केला. त्यांच्या मते बियाणे उगविण्यासाठी वातावरण, मातीचा दर्जा, मुबलक पाऊस, वापरलेली खते व किटक नाशके व इतर घटक जबाबदार असतात. त्यामुळे तक्रारदाराच्या तक्रारीस आपण जबाबदार नाही. तक्रारदाराने त्यांचे बियाणे सामनेवाला क्र. 1 यांच्या कडून उधारीवर विकत घेतलेले असल्यामुळे तक्रारदार त्यांचे ग्राहक नाहीत. तसेच, ज्या शेतजमीनीत तक्रारदाराने ते बियाणे पेरले त्या बाबतची कागदपत्र दाखल करण्यात आलेली नाहीत. तालुका तक्रार निवारण समितीच्या क्षेत्रिय भेटी बाबत, समितीतील सातही सदस्यांनी शेत पिकाची पाहणी करणे बंधनकारक असतांना, तशी पाहणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे तक्रारदाराने दाखल केलेला समितीचा अहवाल शासकीय नियमानुसार व कायदयानुसार नसल्यामुळे ग्राहय धरता येणार नाही. त्या अहवालातही बियाण्यामध्ये दोष होता, याबाबत स्पष्ट उल्लेख नाही. अहवालावर समितीच्या सर्व सदस्यांच्या स्वाक्ष-या नाहीत. थोडक्यात तक्रारदाराच्या झालेल्या नुकसानीस बियाणे हा घटक कारणीभूत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. या व्यतिरिक्त, तक्रारदाराने जरी रु. 71,200/- इतकी नुकसान भरपाई मागितलेली असली, तरी शेत मशागती करता तसेच, निंदणी वखरणी व किटकनाशक फवारणी इत्यादीसाठी आलेला खर्च तपशिलवार सांगण्यात आलेला नाही. त्यामुळे तक्रारदाराचा अर्ज फेटाळण्यात यावा, अशी विनंती त्यांनी मंचास केलेली आहे.
05. उभयपक्षांच्या वकीलांचे युक्तीवाद ऐकण्यात आले.
06. निष्कर्षांसाठीचे मुदे व त्यावरील आमचे निष्कर्ष कारणांसाहीत खालील प्रमाणे आहेत.
मुद्दे निष्कर्ष
1) सामनेवाल्यांनी पुरविलेले बियाणे
सदोष होते किंवा नाही ? होकारार्थी
2) आदेशा बाबत काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमिमांसा
07. मुद्दा क्र.1 : सामनेवाला क्र. 2 व 3 यांनी तक्रारदारांच्या शेती पाहणी अहवालावर तो अहवाल शासनाने विहीत केलेल्या पध्दतीचा अवलंब न करता दिलेला असल्याने स्विकारता येणार नाही, असा बचाव घेतलेला आहे. तक्रारदारांचे वकील अॅड. श्री. दांडगे यांनी मात्र नि. 5/6 ला दाखल असलेला अहवाल समितीचाच असल्याबाबत व शासकीय परिपत्रकानुसारच पध्दत अवलंबून तयार करणे असल्याबाबत प्रतिपादन केलेले आहे.
08. तक्रारदारा तर्फे नि.5/2 ला जिल्हास्तरीय पीक तक्रार मोका तपासणी अहवाल दाखल करण्यात आलेला आहे. त्याचे अवलोकन करता सदरची मोका तपासणी दि. 26/10/2010 रोजी सकाळी 11.20 ते 12.50 दरम्यान करण्यात आलेली आहे. ती मोका तपासणी तालुका कृषी अधिकारी रावेर, कंपनीचा जिल्हा प्रतिनीधी नितीन चौधरी व कृषी अधिकारी पंचायत समिती यांनी संयुक्तीकरित्या केलेला आहे. त्या मोका तपासणी अहवाला सोबत पंचनामा देखील करण्यात आलेला आहे. त्या पंचनाम्यात 10 X 10 मीटर प्लॉट चे निरीक्षण केल्या अंती त्यात 102 कै-या तसेच, 6 फुले व 10 पात्या आढळल्या. कापूस वानात जमीनीपासून 2 ते 2.5 फुटापर्यंत बोंडे फुले व पाला आढळून आला नाही, इ. बाबी नमूद आहे. या ठिकाणी आम्ही हे नमूद करु इच्छितो की, सदर मोका तपासणी अहवाल शासनाच्या दोन कृषी अधिकारी व सामनेवाला कंपनीच्या जिल्हा प्रतिनीधीच्या उपस्थितीत करण्यात आलेला आहे. त्यामुळे त्या तपासणी अहवाला कडे व पंचनाम्याकडे गांभिर्याने बघावे लागेल.
09. वर नमूद मोका तपासणी अहवाल नि. 5/2 व्यतिरिक्त, तक्रारदाराने नि. 5/6 ला जिल्हास्तरीय कापूस बियाणे तक्रार निवारण समिती जळगांव, यांच्या पाच सदस्यीय पथकाने दिलेला तपासणी अहवाल दाखल केलेला आहे. त्या तपासणी अहवाला नुसार 5 सदस्यीय समितीच्या पथकाने दि. 20/12/2010 रोजी तक्रारदारांच्या शेताचे निरीक्षण केले. त्यात त्यांना पेरण्यात आलेले बियाण्यात अनुकूलन अक्षमता आढळून आली. त्यामुळे तक्रारदारांचे 0.78 हेक्टर करीता रु. 780/- प्रतिकिलो ग्रॅम हया हिशोबाने रु. 31,200/- इतक्या रुपयांचे नुकसान झालेले आहे, असे त्या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे. सदर अहवालावर जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी यांची अध्यक्ष म्हणून तर कृषी विकास अधिकारी जळगांव, शास्त्रज्ञ कृषी विदयापीठ, तालुका कृषी अधिकारी रावेर, सदस्य सचिव जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक, यांच्या सदस्य म्हणून सहया आहेत. आमच्या मते, हा अहवाल तज्ञ व्यक्तींनी प्रत्यक्ष निरीक्षण करुन दिलेला असल्याने महत्वपुर्ण आहे.
10. सामनेवाला क्र. 2 व 3 यांनी जरी वर नमूद अहवाल व पंचनामा शासनाने विहीत केलेल्या पध्दतीचा अवलंब न करता दिलेला असल्या बाबत प्रतिपादन केलेले असले तरी वरील विवेचन स्पष्ट करते की, मोका तपासणी अहवाल व अनुषंगिक पंचनामा नि. 5/1 व समितीचा अहवाल नि. 5/2 पुरेशा स्पष्टपणे व सामनेवाला क्र. 2 व 3 चा जिल्हा प्रतिनीधी मधूकर चौधरी यांच्या उपस्थितीत करण्यात आलेला आहे. समिती अहवाल नि. 5/2 मध्ये बियाणे सदोष होते किंवा नाही, या बाबत काहीही नमूद नसल्याचे सामनेवाला क्र. 2 व 3 यांचे म्हणणे असले तरी, त्या अहवाला वरुन बियाणात अनुकूलन अक्षमता असल्याबाबत स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे. पिकाच्या वाढीसाठी शेतातील मातीचा दर्जा, पर्जन्यमान, हवामान, किटकनाशकांची फवारणी, निंदणी, कोळपणी असे अनेक घटक परिणाम कारक असले तरी, प्रस्तुत केस मध्ये तज्ञ व्यक्तींचा समावेश असलेल्या तपासणी समितीने त्यांचा अहवाल नि. 5/6 ला यात बियाणाची अक्षमता हे कारण दिलेले आहे.
11. National Seeds Corporation Ltd. Vs. M. Madhusudhan Ready and Others (2012) 2, S.C.C. 506, या न्यायनिर्णयात मा. सर्वोच्च न्यायालयाने विकण्यात आलेल्या बियाण्यांचा नमूना सिड रुल्स, Rule 13 (3) अन्वये, बियाणे उत्पादीत करणा-या कंपनीवर असल्याचे नमूद करुन, बियाणाच्या बाबतीत तक्रार झाल्यावर बियाणे उत्पादीत करणा-या कंपनीने, त्या बियाणाचा नमूना ग्राहक न्यायालयासमोर सादर करुन तपासून न घेतल्यामुळे तक्रारदार शेतक-यांच्या बियाणे दोषपुर्ण असल्याच्या दाव्यात, तथ्य असल्याचा निर्वाळा दिलेला आहे. प्रस्तुत केस मध्ये दि. 18/10/2010 रोजी गटविकास अधिकारी, रावेर यांनी तक्रारदाराच्या शेताची तपासणी केली, त्यावेळी सामनेवाले क्र. 3 यांचा प्रतिनिधी हजर होता. म्हणजेच बियाणात दोष आहेत अशी तक्रार झाल्याची बाब, सामनेवाला क्र. 3 यांना माहीत होती. त्यामुळे त्यांना त्यांच्याकडे असलेल्या बियाण्याच्या नमून्याचे परिक्षण करुन घेणे शक्य होते. मात्र तसे झालेले नाही. तो नमूना त्यांनी मंचाकडे दाखल करुन प्रयोगशाळेकडून तपासून घेतलेला नाही. त्यामुळे तक्रारदाराने शेतीच्या अयोग्य पध्दती वापरल्या असे म्हणत त्यांनी विकलेल्या बियाण्यात दोष नव्हता, असा तांत्रिक बचाव सामनेवाला क्र.2 व 3 यांना घेता येणार नाही. यास्तव मुदा क्र. 1 चा निष्कर्ष आम्ही होकारार्थी देत आहोत.
12.मुद्दा क्र.2 : मुद्दा क्र.1 चा निष्कर्ष स्पष्ट करतो की, सामनेवाला क्र. 2 व 3 यांनी पुरविलेल्या बियाण्यात दोष होता. तज्ञ समितीने त्या बाबतचा दिलेला अहवाल नि. 5/6 व कृषी अधिका-यांनी केलेला मोका तपासणी अहवाल त्याबाबत पुष्टी देतो. तज्ञ समितीच्या मते तक्रारदाराचे सदोष बियाणामुळे रु. 31,200/- चे नुकसान झाले. तक्रारदाराने त्याचे एकूण नुकसान रु. 71,200/- इतके झालेले आहे, असा दावा केलेला असला तरी त्याचा तपशिल त्याने दिलेला नाही. त्यामुळे सदोष बियाणामुळे झालेले त्याचे नुकसान रु. 31,200/- व शेतमशागत व इतर फवारणी साठी किमान रु. 10,000/- असे एकूण रु. 41,200/- इतके कमाल नुकसान तक्रारदाराचे झाले असावे, असे आमचे मत आहे. त्यामुळे ती रक्कम सामनेवाला क्र. 2 व 3 यांच्याकडून मागण्याचा तक्रारदारास अधिकार आहे. सामनेवाला क्र. 1 विक्री प्रतिनीधी असल्यामुळे सदोष बियाण्याबाबत त्याच्यावर नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी टाकता येणार नाही. तक्रारदाराने शारीरिक व मानसिक त्रासापोटी कोणतीही नुकसान भरपाई मागितली नाही. त्याचप्रमाणे त्याने अर्ज खर्चाची सुध्दा मागणी केलेली नाही. मात्र एकूण परिस्थितीचा विचार करता प्रस्तुत अर्जाच्या खर्चापोटी रु. 7,000/- मंजूर करणे न्यायोचित ठरेल, असे आमचे मत आहे.
आदेश
- सामनेवाला क्र. 2 व 3 यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी वैयक्तीक व संयुक्तीक रित्या तक्रारदारास रु.41,200/- इतकी नुकसान भरपाई तक्रार दाखल तारखेपासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याजाने अदा करावी.
- सामनेवाला क्र. 2 व 3 यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी वैयक्तीक व संयुक्तीक रित्या, तक्रारदारास अर्जखर्चापोटी रक्कम रु 7000/- अदा करावेत.
- निकालपत्राच्या प्रती उभयपक्षांना विनामुल्य देण्यात याव्यात.
जळगांव
दिनांकः- 18/02/2014 (श्री.सी.एम.येशीराव) (श्री.एम.एस.सोनवणे)
सदस्य अध्यक्ष