--- आदेश ---
(पारित दि. 21-11-2007 )
द्वारा श्रीमतीप्रतिभाबा. पोटदुखे, अध्यक्षा
तक्रारकर्ता श्री.शिवचरण श्यामजी इरले,यांनी दाखल केलेल्या ग्राहक तक्रारीचा आशय असा की,.......................
1. त.क.यांनी वि.प.यांच्याकडून विद्युत जोडणी क्रमांक -445760510469 हा घेतलेला आहे. वि.प.यांनी नविन जोडणी देतांना ती त.क.यांच्या गोठयावरुन दिलेली होती व त्याचा वायर हा त.क.यांच्या गोठयाला स्पर्श करीत होता.
2. दि. 07.04.2006 रोजी त.क.यांचा गोठा हा शार्ट सर्किटमुळे जळाला. त्याबाबत त.क.यांनी वारंवार वि.प.यांच्याकडे नुकसान भरपाईची मागणी केली परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
3. त.क.यांनी मागणी केली आहे की, दि. 07.04.2006 रोजी शार्ट सर्किटमुळे झालेल्या त.क.यांच्या नुकसानीची भरपाई वि.प.यांनी करण्याचे आदेश व्हावे व वि.प.यांच्याकडून रुपये 25,000/- ऐवढी नुकसान भरपाई शारीरिक व मानसिक त्रासासाठी मिळावी.
4. वि.प.यांनी त्यांचे लेखी बयान निशाणी क्रं. 11 वर दाखल केले आहे. वि.प.म्हणतात की, त.क.यांच्या गोठयाला लागलेली आग ही शार्ट सर्किटमुळे नव्हती. सर्व्हीस वायर ही इन्स्यूलेट कोटेड ट्वाईन कोअर वायर असल्यामुळे तिच्यामुळे शार्ट सर्किट होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तलाठी, तहसिलदार किंवा पोलिस पाटील यांना आगीमुळे झालेले नुकसान ठरविण्याचा अधिकार नाही. वि.प.यांच्या सेवेत कोणतीही न्यूनता नाही त्यामुळे त.क.यांची तक्रार ही खर्चासह खारीज करण्यात यावी.
कारणे व निष्कर्ष
5. त.क.व वि.प.यांनी दाखल केलेली कागदपत्रे, शपथपत्र, व वि.प.यांनी केलेला युक्तिवाद यावरुन असे निदर्शनास येते की, त.क.यांनी त्यांच्या गोठयाला लागलेली आग ही शार्ट सर्किटमुळे लागलेली असल्याचा निश्चित असा पुरावा दिलेला नाही.
6. विद्युत कायदा 2003 च्या कलम-161 प्रमाणे विजेमुळे झालेल्या अपघाताची चौकशी करण्याचे अधिकार हे विद्युत निरीक्षक यांना देण्यात आलेले आहे. वि.प.यांनी विद्युत निरीक्षक यांचा रिपोर्ट रेकॉर्डवर दाखल केलेला आहे. त्यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, श्री. शिवचरण श्यामजी इरले यांच्या गोठयाला लागलेली आग ही नेमकी विजच्या शार्ट सर्किटनेच लागली असा निष्कर्ष काढता येत नाही.
7. प्रकरण दाखल केल्याच्या तारखे पासून त.क. व त्यांचे वकील सतत गैरहजर आहेत. त.क.यांनी पोलिस पाटील व तलाठी यांचा पंचनामा व अहवाल रेकॉर्डवर दाखल केला आहे व त्यात रुपये 74000/- चे नुकसान झाले असे नमूद केलेले असले तरी सुध्दा त.क.यांच्या गोठयाला लागलेली आग ही शार्ट सर्किटमुळे लागली याचा सबळ पुरावा रेकॉर्डवर नसल्यामुळे सदर पंचनामा व अहवाल हा विचारात घेता येत नाही.
असे तथ्य व परिस्थिती असतांना सदर आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
सदर ग्राहक तक्रार ही खारीज करण्यात येत आहे.