नि. 26
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचे समोर
मा.अध्यक्ष : श्री.ए.व्ही.देशपांडे
मा.सदस्य : श्री के.डी.कुबल
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 364/2010
----------------------------------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : 28/07/2010
तक्रार दाखल तारीख : 29/07/2010
निकाल तारीख : 08/05/2013
-----------------------------------------------------------------
श्री युवराज राघोबा शिंदे
वय वर्षे – 50, धंदा – शेती व मजूरी
रा. शेगांव ता.जत, जि. सांगली ....... तक्रारदार
विरुध्द
1. सहायक कार्यकारी अभियंता
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.
शाखा जत ता.जत जि. सांगली
2. कनिष्ठ अभियंता,
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.
शाखा शेगांव ता.जत जि. सांगली ..... जाबदार
तक्रारदार तर्फे : अॅड एस.बी.ओलेकर
जाबदार तर्फे : अॅडयू.जे.चिप्रे
- नि का ल प त्र -
द्वारा – मा. सदस्य - श्री के.डी.कुबल
1. प्रस्तुतची तक्रार तक्रारदारांच्या शेतावरुन गेलेल्या जाबदार कंपनीची विद्युत प्रवाहाची तार तुटून शॉर्ट सर्किटमुळे तक्रारदाराच्या ऊसाच्या उभ्या पिकामध्ये ऊसास आग लागल्याने नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल करण्यात आली आहे.
2. सदरच्या तक्रारीचा थोडक्यात तपशील असा -
तक्रारदार हा शेतकरी असून सांगली जिल्हयातील मौजे शेगांव येथील जमीन गट 1639 क्षेत्र 3 हेक्टर 54 आर पैकी 1 हेक्टर 60 आर शेतजमीन आहे. सदर शेतीसाठी 5000 फूट इतक्या दूरवरुन पाईपलाईन करुन शेतीसाठी पाण्याची सोय करण्यात आलेली आहे. आग लागली त्यावेळी ऊसाचे पीक 5 फूटापर्यंत उंच आलेले होते. दि.20/4/2010 रोजी तक्रारदाराचे शेतावरुन गेलेल्या जाबदार कंपनीच्या विदयुत प्रवाहाची तार तुटून शॉर्टसर्किटमुळे तक्रारदाराच्या ऊसाच्या उभ्या पिकामध्ये पडल्यामुळे ऊस पिकास आग लागली. आग आटोक्यात न आल्याने संपूर्ण 4 एकरातील ऊस जळून खाक झाला. तक्रारदारांनी तलाठयामार्फत शेतमिळकतीमध्ये प्रत्यक्ष पाहणी करुन पंचासमक्ष पंचनामा केला. सदरची आग विद्युत पुरवठयाची तार तुटून शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे पंचनाम्यात नमूद आहे असे तक्रारदाराचे लेखी कथनात म्हणणे आहे. तसेच 1 हे 60 आर म्हणजे 4 एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला. प्रत्येक एकरी 55 ते 60 टन उत्पादन मिळाले असते म्हणजे एकूण 240 टन एवढे ऊसाचे उत्पादन मिळाले असते. प्रतिटन रु.2,000/- याप्रमाणे एकूण रु.4,80,000/- इतके उत्पन्न मिळाले असते. खत, मजूरी वगैरे रु.80,000/- खर्च वजा जाता रु.4,00,000/- इतके उत्पन्न मिळाले असते. परंतु जाबदार कंपनीमुळे तक्रारदाराचे नुकसान झाले. जाबदार कंपनीला विधिज्ञांमार्फत नुकसानीबाबत नोटीस पाठवूनही त्यांनी नुकसान भरपाई दिलेली नाही. त्यामुळे तक्रारदारास ग्राहक मंचासमोर येणे भाग पडले. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीत पुढीलप्रमाणे मागणी केलेली आहे. ऊस पिकाचे नुकसान भरपाई रु.4,00,000/- द.सा.द.शे. 12 टक्के, मानसिक आर्थिक त्रासाबद्दल रु.30,000/-, तक्रारीचा खर्च रु.500/- इत्यादी जाबदाराकडून मिळणेसाठी प्रस्तुतचा तक्रारअर्ज मंचासमोर दाखल केला आहे.
3. तक्रारीच्या पुष्ठयर्थ नि.3 वर स्वतःचे शपथपत्रासह नि.5 वर एकूण 6 कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
4. जाबदार क्र.1 व 2 यांनी आपले म्हणणे नि.14 वर लेखी स्वरुपात कथन केले असून त्यांनी तक्रारदाराचा तक्रारअर्ज, त्यातील कथन व मागण्या नाकबूल केल्या असून सर्व कथनांचा व मागण्यांचा स्पष्टपणे इन्कार केलेला आहे. जाबदाराच्या विधिज्ञांच्या युक्तिवादामध्ये त्यांनी प्रामुख्याने पंचनम्यामधील कथन मांडले. पंचनाम्यामध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे नमूद असून तार तुटून शॉर्ट सर्कीट झाल्याचे म्हटलेले नाही. तसेच पंचनाम्यात नुकसान भरपाई रु.1,60,000/- दर्शविण्यात आली आहे. तसेच गट नं.1639 मध्ये युवराज शिंदे यांचा ½ हिस्सा असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे 4 एकर ऊसाचा तक्रारदार मालक दिसून येत नाही. विदयुत प्रवाहाची तारही व्यवस्थित होती. कोणताही दोष नव्हता तसेच तक्रारदार हे जाबदार कंपनीचे ग्राहक नाहीत, त्यामुळे सेवेमध्ये कोणतीही त्रुटी केलेली नाही. इत्यादी मुद्दे लेखी कथन व युक्तिवादामध्ये नमूद केले आहेत.
5. जाबदार क्र.1 व 2 यांनी आपले म्हणणेचे पुष्ठयर्थ कोणतीही कागदपत्रे दाखल केलेली नाहीत.
6. तक्रारदार व जाबदार क्र.1 व 2 यांचे लेखी कथन, पुराव्याची कागदपत्रे, न्यायनिवाडे, व दोन्ही विधिज्ञांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमंचापुढे निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होत आहेत.
अ.क्र. |
मुद्दे |
उत्तरे |
1. |
तक्रारदार हे जाबदार यांचा ग्राहक आहेत काय ? |
नाही |
2 |
जाबदार यांनी तक्रारदारास द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय ? |
नाही |
3 |
काय आदेश ? |
अंतिम आदेशाप्रमाणे |
कारणमिमांसा
मुद्दा क्र.1 ते 3
तक्रारदाराच्या शेतीक्षेत्रावर केवळ विद्युतवाहिनी गेलेली आहे. शेतीसाठी लागणारे पाणी 5000 फूट अंतरावरुन पाईप लाईनने घेतलेचे कथन तक्रारदारांनी केलेले आहे. मात्र त्यासाठी विदयुत पंप घेतला होता किंवा विद्युत कनेक्शन घेतल्याचा पुरावा जोडलेला नाही. त्यामुळे जाबदार क्र.1 व 2 यांचेबरोबर ग्राहक-सेवादार नाते कुठेही प्रस्थापित झाल्याचे दिसून येत नाही. केवळ विद्युत लाईन त्या भूक्षेत्रावरुन गेली म्हणून तक्रारदार ग्राहक ठरु शकत नाही असे मंचाला वाटते. त्यामुळे तक्रारदार जाबदार यांचे ग्राहक नाहीत हे स्पष्ट होते.
सदर घटना दि.20/4/2010 रोजी घडली. नि.क्र.5 वर पंचनामा गावकामगार तलाठी मौजे शेगांव यांनी केला आहे. त्यामध्ये “अचानक शॉर्ट सर्किटमुळे ऊसास आग लागली ” असे नमूद आहे. त्यामध्ये कुठेही तार तुटल्याचे पंचनाम्यात नमूद नाही व फोटोमध्ये कुठेही तार तुटल्याचे दिसून येत नाही. तक्रारदार आपल्या तक्रारीत जाबदार कंपनीची विद्युत प्रवाहाची तार तुटून शॉर्ट सर्कीट झाल्याचे केलेल्या कथनाला सहाय्य करणारा योग्य तो पुरावा सादर करु शकलेला नाही, त्यामुळे तक्रारदाराच्या उपरोक्त कथनाला पुष्टी प्राप्त होत नाही. नि.क्र.5 वरील पंचनाम्यामध्ये एकूण नुकसान रु.1,60,000/- दर्शविणेत आले आहे तर तक्रारदाराने रु.4,00,000/- चे नुकसान झालेचे दर्शविलेले आहे. ही तफावत मंचाला मान्य नाही. मूलतः जमीन क्षेत्राचा विचार केला तर तक्रारदाराच्या ऊसाचे क्षेत्र 1 हेक्टर 60 आर आहे. (1 हेक्टर म्हणजे 2.50 एकर)2.50+ 0.60 = 3 एकर 10 गुंठे एवढेच क्षेत्र आहे जे कथनात तक्रारदाराने 4 एकर असल्याचे दर्शविले आहे. 7/12 उता-यामध्ये एकूण 3 हेक्टर 54 क्षेत्रामध्ये एकूण 9 हिस्सेदार दिसून येतात. त्यामध्ये (नि.5/2) मध्ये प्रत्यक्ष तक्रारदाराचा हिस्सा किती याबाबत कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे तक्रारदाराचे नेमके किती शेती क्षेत्राचे नुकसान झाले हे स्पष्ट होत नाही. तसेच त्यांनी केलेले आर्थिक गणित तार्कीकदृष्टया पटणारे नाही. तक्रारदार यांना जमीनीतील ½ हिस्सा दिसून येत नाही. पर्यायाने दर्शविलेली नुकसानी ही सुध्दा आकडेवारीच्या दृष्टीने न पटणारी अशी असल्याचे मंचाचे निदर्शनास आलेले आहे. प्रत्यक्षात तक्रारदार ग्राहक नसल्याने दूषित सेवा देण्याचा प्रश्नच येत नाही व त्यामुळे जाबदार नुकसानी भरुन देण्यास जबाबदार नाहीत असे मंचाचे स्पष्ट मत आहे व जाबदारने सेवेत त्रुटी दिल्याचे असंभवनीय दिसून येते. म्हणून तक्रारदाराने जाबदार क्र.1 व 2 यांचेकडे मागितलेली नुकसान भरपाई, मानसिक आर्थिक त्रासाबद्दल भरपाई देण्यास जाबदार बांधील नाहीत असे मंचाला वाटते. त्यामुळे आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
तक्रारदाराची तक्रार रु.1,000/- च्या खर्चासह नामंजूर करण्यात येत आहेत.
सांगली
दि. 08/05/2013
(के.डी. कुबल ) ( ए.व्ही. देशपांडे )
सदस्य अध्यक्ष