निकालपत्र (पारीत दिनांक : 22.03.2013) द्वारा श्री. मिलींद बी. पवार(हिरुगडे), मा.अध्यक्ष तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षा विरुध्द ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्याच्या तक्रारीतील मजकूर थोडक्यात खालील प्रमाणे : 1. त.क. हे वयोवृध्द जेष्ठ नागरीक असून व्यवसायाने कास्तकार आहेत. त.क. यांच्या नांवे मौजा- पारडी, येथे शेत सर्व्हे नं. 330, आराजी 2.91 हे. आर. ची शेत जमीन आहे. सदर जमिनीत त.क. हे कापूस, तुर, सोयाबीन इत्यादी पिके घेत होते. सन 2006 मध्ये त्यांनी आपल्या शेतात सोयाबीन पिक घेतले होते. त.क. यांच्या शेतीमध्ये विजेची 4पोल असून त्यामधून वीज लाईन कायमस्वरुपी चालू असते. दि. 22.10.2006 रोजी त.क. च्या शेतात मध्यरात्री 12 ते 1 च्या दरम्यान वादळाने वीज वायरमधून आगेची ठिणगी पडल्यामुळे त.क.चे शेतातील 60 पोते ऐवढे सोयाबीन पिकाची गंजी जळून खाक झाले. त्यानंतर त.क.यांनी सदरची घटना दि. 23.10.2006 रोजी हिंगणघाट पोलीस स्टेशनला कळविले व त्याप्रमाणे झालेल्या पोलिस पंचनामाप्रमाणे रुपये 80,000/-(अक्षरी- रु. ऐंशी हजार फक्त) चे नुकसान झालेले आहे. त्यांनतर वि.प. यांचे विद्युत निरीक्षक यांच्या मार्फत दि. 22.10.2007 रोजी प्रत्यक्ष घटना स्थळावर येऊन चौकशी करुन वि.प. कंपनीस अहवाल सादर करण्यात आला. त्यामध्ये ही वि.प.यांच्या सदोषपूर्ण वीज संच मांडणीमुळे आग लागल्याने ,त.क.चे नुकसान झाल्याचे नमूद आहे. तसेच सदर नुकसानभरपाई वि.प. 1 व 2 यांनी देण्यास जबाबदार असल्याचे सदर अहवालात नमूद आहे. त्याप्रमाणे त.क.यांनी वारंवार मागणी करुनही त.क.ला कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई दिली गेली नाही. त.क. यांनी वारंवांर जिल्हाधिकारी , उप-विभागीय अधिकारी यांना तक्रार देऊन लोकशाही दिनात ही तक्रार देऊन ही त.क.ला कोणतीही नुकसान भरपाई मिळाली नाही. दि. 24.10.2008 रोजी वि.प. यांनी त.क.ला पत्र पाठवून नुकसान भरपाईसाठी प्रस्ताव मुख्य कार्यालयाकडे मंजुरीकरिता पाठविलेले असल्याचे कळविले व त्यानंतर ही नुकसान भरपाईबाबत कोणतीही कारवाई झाली नाही. वि.प. हे वारंवार फक्त त.क. यांच्याकडे वेगवेगळया कागदपत्राची मागणी करीत आहे. सदरच्या कागदपत्रांची पूर्तता करुनही कोणतीही कारवाई केली जात नाही अशी त.क.ची तक्रार आहे. पोलिस पंचनामा व कृषी अधिकारी यांनी दिलेल्या पत्रावरुन त.क. यांचे रु.78,000/- चे नुकसान झाल्याचे म्हटले आहे व ते देण्यास वि.प. हे टाळाटाळ करीत आहेत. वि.प.यांनी त.क. यांना दोषपूर्ण सेवा दिलेली आहे व त्यासाठी वि.प.यांच्याकडून नुकसान भरपाई रुपये 78,000/- मिळण्यासाठी प्रस्तुत तक्रार मंचात दाखल केलेली आहे. पोलिस पंचनामा व कृषी अधिकारी यांचे पत्र, विद्युत निरीक्षकाचा अहवाल इत्यादी वाजवी कागदपत्रे असूनही वि.प.नी नुकसान भरपाई दिलेली नाही. त्यामुळे शेवटी त.क. यांना वकिलामार्फत नोटीस पाठवून नुकसान भरपाईची मागणी केली. तरी ही वि.प.यांनी त.क.ची नुकसान भरपाई दिली नाही. त्यामुळे वि.प.यांच्याकडून त.क. यांची झालेली नुकसान भरपाई व झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासासाठी नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रस्तुत तक्रार मंचात दाखल केलेली आहे. त.क. यांनी त्यांच्या तक्रारीसोबत एकूण 29 कागदपत्रे दाखल केलेली आहे. नि.क्रं. 6 वर शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केलेला आहे. 2. वि.प. 1 व 2 यांना मंचा मार्फत नोटीस बजाविण्यात आली. सदरची नोटीस वि.प. 1 व 2 यांना प्राप्त झाल्याचे नि.क्रं. 5 वरील पोच पावती वरुन निदर्शनास येते. तरीही वि.प. 1 व 2 मंचात उपस्थित झाले नाही व त्यांनी आपला लेखी जबाब दाखल केला नाही. त्यामुळे वि.प.च्या विरुध्द एकतर्फी प्रकरण चालविण्याचा आदेश नि.क्रं. 1 वर दि. 13.09.2012 रोजी पारित करण्यात आला. उपलब्ध कागदपत्र , त.क.चे अधिवक्ता यांनी केलेला युक्तिवाद याचे अवलोकन केले असता खालील कारणे व निष्कर्ष निघतात. कारणे व निष्कर्ष 3. त.क. यांनी नि.क्रं. 6 नुसार शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला. वि.प. विरुध्द एकतर्फी आदेश असल्याने त्यांना त.क.ची तक्रार, विनंती, मागणी मान्य असल्याचे समजण्यात येते. त.क. हा शेतकरी असल्याचे नि.क्रं. 4 (1) वरुन सिध्द होते. त.क.च्या शेतातून वीजेची लाईन गेली आहे व त्यामुळे त.क.च्या शेतात 4 पोल आहे हे विद्युत निरीक्षकाच्या अहवालावरुन दिसून येते. त.क. यांनी शेती केलेल्या सोयाबीन पिकाची गंजी शेतीमध्ये रचलेली होती. मात्र दि. 22.10.2006 रोजी मध्यरात्री वादळामुळे वीजेच्या तारा ऐकमेकावर घासून आगेची ठिणगी पडल्यामुळे त.क.ने रचलेली सोयाबीन पिकाची गंजी जळून खाक झाली. सदर पिकाची गंजी ही विजेच्या तारा ऐकमेंकावर घासून ठिणगी पडल्यामुळे झाली आहे हे नि.क्रं. 4(3) वरुन पोलिस पंचनामा नुसार दिसून येते. तसेच नि.क्रं. 4 (5) सहा.अभियंता, हिंगणघाट यांनी दिलेल्या आदेशावरुन कनिष्ठ अभियंता, संजय गहाणे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी करुन दिलेल्या अहवालावरुन वीजेच्या लाईनचे पोल जवळील ज्वारीचा कडबा जळलेल्या स्थितीत आहे व सोयाबीनची गंजी जळून खाक झालेल्या अवस्थेत दिसत आहे. तसेच नि.क्रं. 4(4) मध्ये मंडळ अधिकारी यांनी ही तहसिलदार, हिंगणघाट यांनी दिलेल्या माहिती अहवालावरुन सिध्द होते. दि. 22.10.2006 रोजी वादळामुळे विजेच्या ताराची ठिणगी पडून सोयाबीन पिकाची गंजी जळून खाक झाली आहे हे दिसून येते. नि.क्रं. 4(3), 4 (4) 4 (5) वरील कागदपत्रवरुन त.क.चे नुकसान हे वि.प.च्या वीज वाहक तारा ऐकमेकांवर घासून त्यातून आगेची ठिणगी पडल्यामुळे झाल्याचे सिध्द होते. तसेच सदरचे नुकसान रुपये 80,000/-च्या दरम्यान झाल्याचे नि.क्रं. 4(3) वरील पोलिस पंचनामा तसेच 4(9) नायब तहसिलदार यांनी दिलेल्या प्रमाणपत्रावर रु.78,000/- चे नुकसान झाले आहे असे नमूद आहे. यावरुन त.क. चे रुपये 78,000/- ते रु.80,000/- चे नुकसान झाल्याचे सिध्द होते. 4. त्यानंतर त.क. यांनी सदर झालेली नुकसान भरपाई मागण्यासाठी जिल्हाधिकारी, उप-विभागीय अधिकारी यांना नि.क्रं. 4(6-7) नुसार अनुक्रमे अर्ज करुन नुकसान भरपाई देण्याची विनंती केल्याचे दिसून येते. तसेच नि.क्रं. 4(10) च्या कागदपत्राचे अवलोकन केले असता त.क.चे नुकसान हे वि.प.च्या सदोषपूर्ण विद्युत वाहिनीमुळे झाले आहे व सदर नुकसान भरपाई देण्यास वि.प. 1 व 2 जबाबदार असल्याचे स्पष्ट प्रतिपादन विद्युत निरीक्षक निरीक्षण विभाग वर्धा यांनी दि. 22.07.2010 चा पत्रात कार्यकारी अभियंता म.रा.वि.वि.कं.हिंगणघाट यांना कळविल्याचे दिसून येते. नि.क्रं. 4(11) 4(12) 4(17) 4(20) च्या कागदपत्रावरुन वि.प.यांनी त.क. यांना सदर नुकसान भरपाईसाठी आवश्यक असणारे 7/12, तहसिलदाराचा दाखला, पिकाचे व्हल्यूशन रिपोर्ट जळीत पिकाचे फोटो मागणी केल्याचे दिसून येते. त्याप्रमाणे त.क. यांनी सदरचे कागदपत्र पुरविलेले आहे. तरी ही वि.प. यांनी कोणतीही नुकसान भरपाई त.क. यांनी अद्याप ही दिलेली नाही. त्यामुळे त.क. यांनी लोकशाहीदिनीही वि.प.कडून नुकसान भरपाईची मागणी केल्याचे दिसून येते. नि.क्रं. 4(16) च्या कागदपत्राचे अवलोकन करता वि.प.चे अधिक्षक अभियंता, वर्धा यांनी दि. 26.02.2009 रोजी त.क. यांना पत्रा द्वारे कळवून सदर पिकाची नुकसान भरपाईचा प्रस्ताव मंजुरीसाठी मुंबई कार्यालयाकडे पाठविलेले आहे हे दिसून येते. मात्र त्यानंतर ही कोणतीही कारवाई झाली नाही व पुनःश्च नि.क्रं. 4(17) व 4(20) वर तहसिलदाराचे प्रमाणपत्र, कृषि अधिकारी यांचे व्हॅल्यूशन रिपोर्ट , त.क. चे शपथपत्र व इतर कागदपत्र वि.प.ने त.क.ला मागितले होते. त्याची पूर्तता करुन ही वि.प.यांनी कोणतीही नुकसान भरपाई दिली नाही. नि.क्रं. 4(19) च्या पत्रावरुन हे स्पष्ट होते की, गट विकास अधिकारी पंचायत समिती हिंगणघाट यांनी वि.प. यांना कळवून त.क. यांची नुकसान भरपाई रु.78,000/- देण्यास हरकत नसल्याचे कळविले. तरी ही त्याबाबत वि.प.यांनी कोणतीही दखल घेतली नाही. नि.क्र. 4(21 -22) च्या पत्रावरुन वेळोवेळी वि.प.ने मागणी केल्याप्रमाणे त.क. हे सर्व कागदपत्रांची पूर्तता करीत आहे हे दिसून येते. त्यानंतर ही नुकसान भरपाई न मिळाल्यामुळे पुनःश्च त.क.ने नि.क्रं. 4(23-25) प्रमाणे वि.प.यांच्याशी पत्र व्यवहार करुन नुकसान भरपाई मागितल्याचे दिसून येते.नि.क्रं.4(26) वरुन वि.प.यांनी त.क.यांना दि.08.12.2011 रोजी च्या पत्रान्वये सदर त.क. चे झालेले नुकसान लागलेल्या आगीबाबत संशय व्यक्त करुन वि.प.यांच्या अधिका-यांनी दिलेला अहवालबाबत संशय व्यक्त केला आहे व त्यावरुन त.क. यांची नुकसान भरपाई देण्यास टाळत असल्याचे नि.क्रं. 4(26) वरील कागदपत्रावरुन दिसून येते. एवढा उपदव्याप करुन ही वि.प. हे नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करीत आहे असे दिसून आल्यावर त.क. यांनी आपल्या वकिला मार्फत नि.क्रं. 4(28) नुसार नोटीस पाठवून सर्व वस्तुस्थिती पुन्हा कथन करुन नुकसान भरपाईची मागणी केली. सदर नोटीस वि.प.ला प्राप्त होऊन ही वि.प.यांनी त्याकडे पूर्णतः दुर्लश केले व त.क.ची नुकसान भरपाई देण्याचे टाळले. 5. त.क. यांनी एकूण 29 कागदपत्र दाखल केले त्याचे अवलोकन करता, त.क. हे आपलया न्यायासाठी झगडत आहे असे दिसून येते. परंतु वि.प. 1 व 2 हे त्यास कोणताही प्रतिसाद देत नाही. त.क. च्या वकीलांची नोटीस मिळून ही त्याकडे पूर्णतः दुर्लश केले. तसेच मंचा मार्फत नोटीस प्राप्त होऊनही मंचात उपस्थित झाले नाही यावरुन वि.प.यांची नकारात्मक मानसिकता स्पष्टपणे दिसून येते. ही वि.प.यांच्या सेवेतील त्रृटी आहे हे पुराव्यानिशी सिध्द होते. त.क. च्या मागणीप्रमाणे त्याच्या झालेल्या नुकसानीसाठी रुपये 78,000/- व्याजासह मिळण्यास त.क. पात्र असल्याचे मंचाचे मत आहे. 6. नि.क्रं. 4(6-7) 4(23-25) इत्यादी कागदपत्रांचे अवलोकन करता त.क. हे वि.प.यांच्याकडून नुकसान भरपाई मिळण्यासाठी वेगवेगळया ठिकाणी धाव घेत आहेत. त्यामुळे त्यांना अपरिमित असे शारीरिक व मानसिक त्रास झालेला आहे व त्यापोटी त्यांना रु.10,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 2,000/- मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे. 7. वरील सर्व कारणे व निष्कर्षावरुन वि.प.1 व 2 हे त.क.ला नुकसान भरपाई देण्यास जबाबदार आहे. न्यूनता व दोषपूर्ण सेवा दिल्यामुळे खालीलप्रमाणे आदेश पारित करण्यात येत आहे. सबब खालील आदेश पारीत करण्यात येत आहे. आ दे श 1½ तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते. 2) विरुध्द पक्ष 1 व 2 यांना त्यांच्या दोषपूर्ण सेवेबद्दल वि.प.हे तक्रारकर्त्याच्या झालेल्या रु.78,000/- च्या नुकसान भरपाई देण्यास जबाबदार आहेत. सदर रक्कम रु.78,000/- दि. 22.10.2006 पासून प्रत्यक्ष त.क. यांना प्राप्त होईपर्यंत द.सा.द.शे 12℅ दराने व्याजासह वि.प. 1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या त.क. ला द्यावे.. 3) वि.प 1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या त.क.ला झालेल्या मानसिक, शारिरीक त्रासा बद्दल रुपये-10,000/(अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारीचे खर्चापोटी रुपये-2000/- (अक्षरी रुपये दोन हजार फक्त) द्यावे... . वरील आदेशाची पूर्तता वि.प. 1 व 2 यांनी आदेश पारित झाल्यापासून एक महिन्याच्या आत करावी. |