(आदेश पारीत द्वारा- श्री.विजयसिंह ना. राणे, मा.अध्यक्ष) -/// आ दे श ///- (पारीत दिनांक – 10 जून, 2011) यातील तक्रारदाराने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये मंचासमक्ष दाखल केलेली आहे. यातील तक्रारदाराची गैरअर्जदार यांचेविरुध्द थोडक्यात तक्रार अशी आहे की, तक्रारदार हे स्वतःच्या व त्याचे कुटूंबियांच्या उदरनिर्वाहाकरीता स्मृती बार अँड रेस्टारंट या नावाने व्यवसाय करीतात व त्यावर त्यांचा चरीतार्थ आहे. त्याठिकाणी गैरअर्जदार यांचेतर्फे विद्युत मीटर लावण्यात आले असून त्याचा ग्राहक क्रमांक 417040372154 असा आहे. सन 2003 पासून त्यांना विद्युत देयके मिळत होती व त्यांनी नियमितपणे त्याचा भरणा केलेला आहे. त्यांना डिसेंबर, 2010 मध्ये 4153 युनिटचे देयक देण्यात आले आणि जास्त रकमेचे देयक देण्यात आले व तेवढा त्यांचा वापर नाही. त्यांनी गैरअर्जदार यांचेकडे तक्रार केली. गैरअर्जदार यांनी तात्पुरती दुरुस्ती करुन दिली. पुढे तक्रारदाराने वारंवार तक्रारी केल्या, मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही ही गैरअर्जदार यांच्या सेवेतील त्रुटी आहे म्हणुन शेवेटी तक्रारदार यांनी ही तक्रार मंचासमक्ष दाखल करुन तीद्वारे गैरअर्जदाराने तक्रारदारास त्रुटीपूर्ण सेवा दिलेली आहे असे घोषित करावे, डिसेंबर 2010 रोजीचे देयक चूकीचे असल्याचे घोषित करावे व त्यापोटी प्राप्त केलेली जास्तीची रक्कम 9% व्याजासह परत मिळावी आणि तक्रारीचा खर्च रुपये 10,000/- मिळावा अशा मागण्या केल्या आहेत. सदर प्रकरणात गैरअर्जदार यांना मंचाद्वारे नोटीस बजाविण्यात आली, त्यावरुन हजर होऊन त्यांनी आपला लेखी जबाब मंचासमक्ष दाखल केलेला आहे. गैरअर्जदाराने सर्व विपरीत विधाने नाकबूल केली. त्यांचे म्हणण्याप्रमाणे तक्रारदार देयके भरीत नाही. मीटर नोंदणी करण्याचे काम खाजगी संस्थेला दिलेले आहे आणि त्यांनी नोंदविलेल्या नोंदीप्रमाणे देयक देण्यात येते. संपूर्ण परीस्थितीचा आढावा घेऊन तक्रारदारास रुपये 28,730/- चे देयक दिले. त्यापूर्वी तक्रारदाराने तक्रार केली व देयक बरोबर नसल्याचे कळविले होते. सदर देयक मंजूर नसल्यास मीटर विद्युत निरीक्षक यांचेकडे तपासणीकरीता पाठवावे असे सांगीतले, मात्र तक्रारदाराने मीटर काढून घेण्यास नकार दिला. थोडक्यात सदर तक्रार ही खोटी व चूकीची आहे म्हणुन ती खारीज करावी असा उजर घेतला. यातील तक्रारदाराने आपली तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केलेली असून, सोबत विद्युत देयके, तक्रारदार व गैरअर्जदार यांचेतील पत्रव्यवहार इत्यादी दस्तऐवज मंचासमक्ष दाखल केलेले आहेत. गैरअर्जदाराने मीटर टेस्टींग रिपोर्ट, असेसमेंट शीट असे दस्तऐवज मंचासमक्ष दाखल केले आहेत. सदर प्रकरणात दोन्ही पक्षांचा तोंडी युक्तीवाद मंचाने ऐकला. सदर प्रकरणात पुढे तक्रारदाराचे मीटर गैरअर्जदाराने दिनांक 9 मार्च 2011 रोजी बदलवून दिल्याची बाब स्पष्ट झालेली आहे आणि त्याठिकाणी दुसरे मीटर लावण्यात आलेले आहे. तक्रारदाराने गैरअर्जदाराने जी मीटरची तपासणी केली ती चूकीची आहे असा आक्षेप घेतला. युक्तीवादाचे दरम्यान, तक्रारदाराला जी देयके सन 2010 मध्ये देण्यात आली ती मीटर फॉल्टी इत्यादी कारणामुळे व काही देयके सरासरीची देण्यात आली होती आणि पुढे मात्र त्यांना योग्य देयक देण्यात आले असे गैरअर्जदाराने सांगीतले. जेव्हा की, तक्रारदाराच्या असे निदर्शनास आले की, गैरअर्जदाराने त्यांना जे मीटर सन 2011 मध्ये बदलवून दिले व त्यावरुन जी देयके देण्यात येत आहेत ती योग्य वापराची देयके येत आहेत. यावरुन असे दिसते की, तक्रारदाराचे पूर्वीचे मीटर योग्य नव्हते. गैरअर्जदाराने जो मीटरचा तपासणी अहवाल दाखल केला तो गैरअर्जदार यांच्याच यंत्रणेने केलेला असल्यामुळे विचारात घेण्याजोगा नाही आणि यात निष्पक्ष अहवाल येणे गरजेचे आहे. वरील सर्व परीस्थितीचा विचार करता, तक्रारदारास सन 2010 मध्ये देण्यात आलेली देयके योग्य रकमेची नव्हती व त्यानंतर निदान चार देयके सरासरीप्रमाणे देण्यात आल्याचे दिसून येते. योग्य रकमेची देयके न देणे हीच मुळात गैरअर्जदार यांच्या सेवेतील त्रुटी आहे असे आमचे मत आहे. यास्तव आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. -000 अं ती म आ दे श 000- 1) तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) तक्रारदारास देण्यात आलेली जानेवारी 2010 ते फेब्रुवारी 2011 या कालावधीची सर्व देयके रद्द करण्यात येत आहेत. 3) गैरअर्जदार यांनी तक्रारदाराकडे मार्च 2011 मध्ये तक्रारदाराकडे लावलेल्या मीटरवर तेथून पुढील 6 महिन्यांचे कालावधीसाठी जो विद्युत वापर नोंदविण्यात येईल त्याचे सरासरीप्रमाणे जानेवारी 2010 ते फेब्रुवारी 2011 या कालावधीची देयके तयार करुन ती तक्रारदारास देण्यात यावी. तक्रारदाराने जमा केलेल्या रकमा समायोजित कराव्या. सदर कालावधीच्या देयकात दंडनिय शुल्क इत्यादी आकारण्यात येऊ नये. 4) तक्रारदाराकडून उरलेली रक्कम घेणे निघत असल्यास ती भरण्याची जबाबदारी तक्रारदाराची राहील. 5) गैरअर्जदाराने तक्रारदारास तक्रारीच्या खर्चाबाबत रुपये 1,000/- (रुपये एक हजार केवळ) एवढी रक्कम द्यावी. सदरची रक्कम तक्रारदार देयकात समायोजित करु शकतील. गैरअर्जदार यांनी सदर आदेशाचे पालन आदेशाची प्रत प्राप्त झाल्याचे दिनांका पासून चार महिन्यांचे आत करावे.
| [HONABLE MRS. Jayashree Yende] MEMBER[HONORABLE Shri V. N. Rane] PRESIDENT | |