मा. अध्यक्षा, सौ. एस.एम. उंटवाले यांनी निकाल कथन केला :-
ग्राहक संरक्षण कायदयाचे कलम 12 अन्वये तक्रारदाराने दाखल केलेल्या तक्रारीचा सारांश येणेप्रमाणे :-
तक्रारकर्ते हे बेलतळा, ता. पातूर, जि. अकोला येथील रहिवासी असून विरुध्दपक्ष ही विदयुत वितरण कंपनी आहे. दिनांक 10-06-2013 रोजी तक्रारकर्ता क्रमांक 1 व 2 यांचा मुलगा अजय राजेश जाधव वय अंदाजे 15 वर्षे याचा मृत्यू जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बेलतळा येथे सदोष विदयुत पुरवठा पुरविल्यामुळे तक्रारकर्ता क्रमांक 1 व 2 यांचे मुलाला इलेक्ट्रीक करंट लागला व त्यामुळे तक्रारकर्त्या क्रमांक 1 व 2 यांच्या मुलाचा मृत्यू झालेला आहे.
विरुध्दपक्ष यांनी सदोष विदयुत पुरवठा केल्यामुळे तक्रारकर्त्या क्रमांक 1 व 2 चा मुलगा मरण पावलेला आहे. तक्रारकर्त्याच्या मुलाच्या मृत्युस विरुध्दपक्ष जबाबदार आहे. तक्रारकर्ते यांनी विरुध्दपक्षाकडे जाऊन वारंवार नुकसान भरपाईची मागणी केली. परंतु, विरुध्दपक्षाने तक्रारकर्ता क्रमांक 1 व 2 यांना कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई दिलेली नाही. विरुध्दपक्ष यांनी सदोष विदयुत पुरवठा करुन विरुध्दपक्षाच्या सेवेत त्रुटी व न्युनता केलेली आहे तसेच अनुचित व्यापार पध्द्तीचा अवलंब केलेला आहे.
तक्रारकर्त्याच्या क्रमांक 1 व 2 च्या मुलाचे मृत्युसमयी वय 15 वर्षे होते व तक्रारकर्त्याचा मुलगा साधारणपणे वयाच्या 58 वर्षापर्यंत काम करु शकत होता. तक्रारकर्त्या क्रमांक 1 व 2 च्या मुलाने ₹ 100/- दररोज कमावले असते तरी तक्रारकर्त्याचा मुलगा हा ₹ 3,000/- प्रति महिना व ₹ 36,000/- प्रतिवर्षी कमावू शकत होता. त्यामुळे तक्रारकर्ते क्रमांक 1 व 2 यांना विरुध्दपक्षाविरुध्द नुकसान भरपाईचा दावा 43 वर्षे x ₹ 36,000/- = ₹ 15,48,000/- कमवू शकत होता. त्यापैकी 1/3 रक्कम ₹ 5,16,000/- स्वत:साठी खर्च करीत होता. त्यामुळे तक्रारकर्त्याचा नुकसान भरपाईचा दावा हा ₹ 10,32,000/- होतो. परंतु, तक्रारकर्ता क्रमांक 1 व 2 यांनी आपला दावा हा ₹ 6,00,000/- पर्यंत मर्यादित ठेवला आहे. तक्रारकर्त्याच्या मुलाचा मृत्यू झाल्यामुळे तक्रारकर्त्या क्रमांक 1 व 2 चे अंदाजे ₹ 6,00,000/- नुकसान झालेले आहे तसेच तक्रारकर्ते हे मयत अजय यांच्या कमाईवर अवलंबून होते. तक्रारकर्ता क्रमांक 1 व 2 यांनी विरुध्दपक्ष यांना सूचित केले की, नोटीस मिळाल्यापासून 7 दिवसांच्या आंत तक्रारकर्ते क्रमांक 1 व 2 यांना नुकसान भरपाई ₹ 6,00,000/- दयावी. परंतु, विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्ते यांना नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे तक्रारकर्ते हे विदयमान न्यायमंचासमोर मागणी करत आहे की, 1) तक्रारकर्त्याची तक्रार मंजूर करावी. 2) विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्याला ₹ 6,00,000/- नुकसान भरपाई व कोर्ट खर्च ₹ 15,000/- दयावे.
सदर तक्रार शपथेवर दाखल असून त्यासोबत एकंदर 11 दस्तऐवज पुरावे म्हणून जोडण्यात आले आहेत.
विरुध्दपक्षाचा लेखी जवाब :-
विरुध्दपक्ष यांनी प्रस्तुत प्रकरणात लेखी जबाब दाखल केला असून, त्यानुसार त्यांनी तक्रारीतील बहुतांश विधाने नाकबुल करीत अधिकच्या कथनात असे नमूद केले की, विरुध्दपक्ष कंपनीस महाराष्ट्र राज्यामध्ये वीज विक्रीचा परवाना मिळाला आहे. सदरहू परवानाच्या अंतर्गत विरुध्दपक्षातर्फे ग्राहकांना विविध ठिकाणी वीज पुरवठा देण्यात येतो. विरुध्दपक्षातर्फे पातूर तालुक्यातील मौजे बेलतळा येथील जिल्हा परिषद शाळेकरिता ग्राहकाचे मागणीनुसार त्या शाळेतील वापराकरिता विदयुत पुरवठा देण्यात आला होता. विरुध्दपक्षातर्फे देण्यात येणारा विदयुत पुरवठा हा वीज मापकापर्यंत ( मिटर ) पुरवण्यात येत असतो. त्यापुढील सर्व वायरिंग व उपकरणांची उभारणी ही ग्राहकांतर्फे नोंदणीकृत कंत्राटदारामार्फत करुन घेवून त्याबाबतचा चाचणी अहवाल विरुध्दपक्ष कंपनीस दिल्यानंतर वीज पुरवठा मिटरपर्यंत जोडून देण्यात येत असतो.
दिनांक 10-06-2013 रोजी विरुध्दपक्षाचे संबंधित कार्यालयास मौजे बेलतळा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये विजेचा शॉक लागून एका व्यक्तीचे निधन झाले असल्याची माहिती मिळाल्यावरुन विरुध्दपक्षाच्या संबंधित कर्मचा-याने त्याबाबत असलेली परिस्थिती सदरच्या ठिकाणचा वीज पुरवठा संबंधित रोहित्रांवरुन खंडित केला व त्याबाबतची माहिती ही विदयुत कायदयाचे तरतुदीनुसार विदयुत निरीक्षक यांना दिनांक 10-06-2013 रोजी दूरध्वनीद्वारे सूचित केले व सदर घटनास्थळी पाहणी केली असता असे निदर्शनास आले की, जिल्हा परिषद शाळा यांनी सदरच्या ईमारतीत सुरुवातीचे केलेल्या वीज वाहिणी संच मांडणीमध्ये अतिरिक्त उपकरणे ज्यामध्ये की, पंखे, टयुबलाईट ही अनधिकृत विदयुत कंत्राटदारांमार्फत दिनांक 05-01-2013 रोजी करवून घेतली होती. सदरच्या अनधिकृत कंत्राटदाराचे विदयुत शास्त्राचे अज्ञानामुळे छतामध्ये लावलेला पंखा हा कनिष्ठ स्तराचा असून त्यामधून विजेचा करंट हा लिकेज झाला व तो लोखंडी टीन पत्र्यामध्ये प्रवाहित झाला. शाळेच्या लगतच असलेल्या ध्वजारोहणाच्या खांबावरुन मयत हा शाळेच्या टीनाच्या छतावर चढण्याच्या प्रयत्नात असतांना त्यास विजेचा शॉक लागला व त्याचे निधन झाले. विदयुत निरीक्षकांनी केलेल्या तपासणीमध्ये मुळ ग्राहक मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा, बेलतळा यांनी भारतीय विदयुत नियम 29 व 45 चे उल्लंघन केल्याचे आढळून आल्याने विदयुत निरीक्षक यांनी दिनांक 17-06-2013 रोजी मुख्याध्यापक जिल्हा परिषद, बेलतळा यांना उपरोक्त प्राणांतिक अपघाताबाबत कारणे दाखवा नोटीस निर्गमित केली आहे. त्यामध्ये मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बेलतळा यांच्या दोषपूर्ण उपकरणांच्या उभारणीमुळे व अकुशल तथा अनधिकृत व्यक्तींकडून सदरच्या उपकरणाच्या उभारणीमध्ये गंभीर स्वरुपाचे दोष राहिल्याने सदरचा अपघात घडला असल्याचे सूचित केले आहे व सदरच्या अपघाताबाबत मुख्याध्यापक जिल्हा परिषद, प्राथमिक शाळा, बेलतळा यांना जबाबदार धरले आहे.
उपरोक्त विवेचनांवरुन ही बाब स्पष्ट होते की, झालेला तथाकथित प्राणांतिक अपघात हा विरुध्दपक्ष यांचे निष्काळजीपणाने उदभवला नसून विरुध्दपक्षाचे मुळ ग्राहक मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बेलतळा यांचे निष्काळजीपणामुळे उदभवला आहे. त्यामध्ये विरुध्दपक्षाचा कोणताही संबंध येत नाही तसेच सदरच्या प्रकरणामध्ये विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याने दिलेल्या दिनांक 19-01-2015 चे रजिस्टर्ड नोटीसला खुलासेवार जवाब देऊनही सदरच्या प्रकरणात मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बेलतळा यांना गैरअर्जदार म्हणून जाणुनबुजून जोडलेले नाही. यामुळे आवश्यक गैरअर्जदार प्रकरणात नसल्याने सदरचे प्रकरण विरुध्दपक्षाचे विरुध्द चालू शकत नाही, ते खर्चासह खारीज करावे, ही. विनंती.
:: का र णे व नि ष्क र्ष ::
या प्रकरणातील तक्रारकर्ते यांची तक्रार, विरुध्दपक्षाचा लेखी जवाब, उभय पक्षाने दाखल केलेले सर्व दस्तऐवज, विरुध्दपक्षाचा प्रतिज्ञालेख व तोंडी युक्तीवाद यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन खालील निष्कर्ष कारणे देवून पारित केला.
तक्रारकर्ते यांचे असे कथन आहे की, त्यांचा मुलगा अजय राजेश जाधव वय अंदाजे 15 वर्षे याचा मृत्यू जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बेलतळा येथील टिनाच्या छताला इलेक्ट्रीक करंट लागल्यामुळे झालेला आहे व विरुध्दपक्षाने या शाळेला सदोष विदयुत पुरवठा पुरविलेला आहे, त्यामुळे यात विरुध्दपक्षाचा दोष व सेवा न्युनता आहे म्हणून विरुध्दपक्षाकडून प्रार्थनेप्रमाणे नुकसान भरपाई दयावी.
विरुध्दपक्षाचा युक्तीवाद असा आहे की, सदर मौजे बेलतळा जिल्हा परिषद शाळेकरिता विरुध्दपक्षाने विदयुत पुरवठा दिला आहे. त्यांना या घटनेची महिती मिळाल्यानंतर, सदर घटनास्थळाची पाहणी केली असता असे निदर्शनास आले की, जिल्हा परिषद शाळेने सदरच्या ईमारतीत सुरुवातीस केलेल्या वीज वाहिणी संच मांडणीमध्ये अतिरिक्त उपकरणे ज्यामध्ये पंखा, टयुबलाईट ही अनधिकृत विदयुत कंत्राटदारांमार्फत दिनांक 05-01-2013 रोजी करवून घेतली होती, त्या कंत्राटदाराच्या विदयुत शास्त्राच्या अज्ञानामुळे छतावर लावलेल्या पंख्यामधून वीज प्रवाहाची गळती झाली व तो लोखंडी टीन पत्र्यामध्ये प्रवाहित झाला त्याबद्दल मुळ ग्राहक मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा, बेलतळा यांनी भारतीय विदयुत नियम 29 व 45 चे उल्लंघन केल्याबद्दलची नोटीस विरुध्दपक्षाने जारी केली आहे. म्हणून सदर अपघात हा मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा, बेलतळा यांच्या निष्काळजीपणामुळे उदभवला आहे.
उभयपक्षाने दस्तऐवज दाखल केले आहे. तक्रारकर्ते यांनी रेकॉर्डवर IV (2008)-CPJ-139(NC) CGM P & O NPDCL & Ors. Versus Koppu Duddarajam & anothers हा न्यायनिवाडा दाखल केला, त्यातील निर्देशानुसार तक्रारकर्ते हे लाभार्थी/ग्राहक या संज्ञेत बसतात तसेच तक्रारकर्ते यांच्या मुलाचे निधन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बेलतळा येथील शाळेच्या टीनाचे छतामधून विजेचा धक्का लागल्याने झाला आहे, त्यामुळे यात दोष कुणाचा आहे, हे पाहण्याकरिता विरुध्दपक्षाने दाखल केलेले पृष्ठ क्रमांक 46 वरील दस्त तपासले असता असे दिसून आले की, विरुध्दपक्षाच्या पातूर येथील कार्यालयाने सदर अपघाती मृत्युबाबत तेथील विदयुत निरीक्षक यांना पत्र देऊन त्याबद्दलचा पाहणी अहवाल मागविला होता, दाखल केलेले दस्ताऐवज जसे की, घटनास्थळ पंचनामा, रेखाचित्र, कारणे दाखवा नोटीस यावरुन असा बोध होतो की, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा, बेलतळा यांनी अनधिकृत व्यक्तीद्वारे शाळेमधील संच मांडणीचे कामकाज करवून घेतले होते, त्यामुळे वायरिंगमध्ये गंभीर स्वरुपाचे दोष अकुशल कारागीराने केलेल्या कामामुळे उत्पन्न झालेले होते. शाळेमध्ये बसविलेल्या निम्न दर्जाच्या सिलींग टीनपत्र्यामध्ये विदयुत प्रवाह प्रवाहित झाला होता. मयत हा शाळेने उभारलेल्या ध्वजारोहणाच्या खांबावरुन शाळेच्या टिनावर चढण्याच्या प्रयत्नात असतांना हा अपघात झाला होता. त्यामुळे विदयुत निरीक्षक यांनी मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बेलतळा यांना त्यांच्या शाळेतील दोषपूर्ण वायरिंग दुरुस्ती करण्याबाबतचे निर्देश देवून त्यांच्या विरुध्द भारतीय विदयुत अधिनियम 29 व 45 चे उल्लंघनाबाबत कारणे दाखवा नोटीस ही जारी केली होती, असे कागदपत्रांवरुन दिसते व ही बाब विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याच्या नोटीसचे उत्तर देवून त्यांना कळविली होती, असेही दिसून येते. तरी तक्रारदाराने मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बेलतळा यांना या प्रकरणात पक्ष केलेले नाही व विरुध्दपक्षाने दाखल केलेल्या वरील दस्तानुसार यात विरुध्दपक्षाचा निष्काळजीपणा दिसून येत नाही, त्यामुळे तक्रारदार यांची नुकसान भरपाई मिळणेबद्दलची प्रार्थना मंचाला मंजूर करता येणार नाही. सबब, अंतिम आदेश पारित केला तो येणेप्रमाणे.
अं ति म आ दे श
1) तक्रारकर्ते यांची तक्रार खारीज करण्यात येते.
2) न्यायीक खर्चाबाबत कोणतेही आदेश पारित नाही.
3) उभयपक्षकारांना आदेशाची प्रमाणित प्रत विनामुल्य देण्यात यावी.