::: आ दे श :::
( पारित दिनांक : 28/12/2017 )
मा. सदस्य श्री. कैलास वानखडे, यांचे अनुसार : -
1) तक्रारकर्त्याने सदरहू तक्रार, ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम 12 अन्वये, दोषपूर्ण सेवे संदर्भात विरुध्द पक्षांकडून नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल केली आहे.
2) तक्रारकर्ते यांची तक्रार, विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 चा संयुक्त लेखी जबाब, उभय पक्षाने दाखल केलेले सर्व दस्तऐवज व उभय पक्षाचा लेखी युक्तिवाद यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन खालीलप्रमाणे निर्णय पारित केला.
उभय पक्षात याबद्दल वाद नाही की, तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडे कृषी पंप कनेक्शन साठी दिनांक 29/06/2015 रोजी कोटेशन भरणा रक्कम रुपये 6,200/- अदा केली होती. त्यामुळे तक्रारकर्ता विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 चा ग्राहक आहे, या निष्कर्षावर मंच आले आहे.
3) तक्रारकर्ता यांचा युक्तिवाद असा आहे की, विरुध्द पक्षाने कोटेशन भरुन घेतल्यानंतर, विद्युत पुरवठा करण्यास टाळाटाळ केली व त्यानंतर विरुध्द पक्षाने ठेकेदाराची भेट घेण्यास सांगितले. तक्रारकर्त्याने ठेकेदाराची भेट घेतली असता, ठेकेदाराने संपूर्ण खर्च देत असाल तरच तुमचे काम करतो, असे सांगितले. मात्र तक्रारकर्ता हा अनाठायी खर्च करण्यास समर्थ नाही. त्यामुळे सन 2007-08 मध्ये लागवड केलेल्या संत्र्याच्या झाडाला, भाड्याने ट्रॅक्टर लावून व डोक्यावर पाणी नेवून, संत्र्याच्या झाडांना पाणी देणे सुरु केले. त्यामुळे योग्य तो पाणी-पुरवठा न झाल्यामुळे संत्र्याची झाडे सुकून गेले व अंदाजे रक्कम रुपये 19,00,000/- चे नुकसान सोसावे लागले. म्हणून तक्रार प्रार्थनेनुसार मंजूर करावी, अशी विनंती तक्रारकर्त्याने मंचास केली आहे.
4) यावर विरुध्द पक्षाचा युक्तिवाद असा आहे की, तक्रारकर्ता यांचे कृषी पंपाचे कनेक्शन बाबत तार व पोलचे काम दिनांक 15/06/2015 रोजी पूर्ण झाले आहे. तक्रारकर्ता यांनी विहिरीजवळ मीटर घर उभारुन, बोर्ड फिटींग करणे, वायरींग व अर्थिंग करणे, ही काम करणे आवश्यक असते. परंतु तक्रारकर्त्याने हे केले नाही. तसेच तक्रारकर्त्याने मेन स्विज, स्टार्टर बसवणे व प्रायव्हेट कंत्राटदाराकडून चाचणी अहवाल विरुध्द पक्षाकडे दाखल करणे नियमानुसार बंधनकारक आहे. ही जबाबदारी देखील तक्रारकर्त्याने पार पाडली नाही. त्यामुळे संबंधीत विज जोडणीसाठी तक्रारकतर्याकडून ऊशिर होत आहे. त्यामुळे यात विरुध्द पक्षाची सेवा न्युनता नाही.
5) उभय पक्षाचा युक्तिवाद एैकल्यानंतर, मंचाचे असे मत आहे की, तक्रारकर्ते यांचे तक्रारीतील कथन असे आहे की, त्यांनी त्यांच्या शेतामध्ये सन 2007-08 मध्ये 700 संत्र्याच्या झाडांची लागवड केली होती. तक्रारकर्त्याच्या शेतात शेततळे व विहिर आहे, अशी कबुली, तक्रारकर्त्याने तक्रारीत दिली आहे. दिनांक 28/02/2015 मध्ये त्यांनी बोअरवेल घेतली व त्यावरील मोटर पंपासाठी त्याने विरुध्द पक्षाकडे कोटेशन रक्कम भरुन, विद्युत पुरवठा करण्याची मागणी केली. विरुध्द पक्षातर्फे दाखल केलेल्या अर्जातील मजकूरावरुन असा बोध होतो की, तक्रारकर्त्याने कोटेशन भरणा केल्यानंतर मंजूरीप्रमाणे व फंड उपलब्धतेनुसार विरुध्द पक्षाने कंत्राटदारास ऑर्डर देवून काम पूर्ण केल्याची तारीख दिनांक 15/06/2015 अशी नमुद आहे. म्हणजे विज वाहिनी पूर्ण करुन विहिरीपर्यंत आणलेली आहे. विरुध्द पक्षाचे असे म्हणणे आहे की, तक्रारकर्त्याने मीटर घर उभारुन, बोर्ड फिटींग करणे, वायरींग करणे, मेन स्विज, स्टार्टर बसवणे, सुरक्षा उपकरण बसवून अर्थिंग करणे, इ. कामे त्यानंतर करणे गरजेचे आहे. परंतु तक्रारकर्त्याने अशी तयारी केलेली नाही. तसेच तक्रारकर्त्याने प्रायव्हेट कंत्राटदाराकडून टेस्ट रिपोर्ट / चाचणी अहवाल विरुध्द पक्षाचे कार्यालयास सादर करणे आवश्यक असते. परंतु हे ही काम तक्रारकर्त्याने न केल्यामुळे विरुध्द पक्षाला मिटर लावणे शक्य झाले नाही. यावर तक्रारकर्त्याने योग्य ते स्पष्टीकरण दिलेले नाही. तसेच तक्रारकर्त्याच्या प्रार्थनेमध्ये विरुध्द पक्षाने लवकरात लवकर विद्युत पंपासाठी विद्युत पुरवठा द्यावा, असे नमूद नाही. तक्रारकर्त्याने फक्त नुकसान भरपाई रक्कम मंचासमोर मागीतलेली आहे. तक्रारकर्त्याने दस्तऐवज दाखल करुन त्याच्या बागेतील संत्र्याच्या झाडाचे नुकसान झाले, असे नमूद केले आहे. सदर सर्व प्रमाणपत्र सन 2016 तील आहे व विरुध्द पक्षाच्या कबुलीनुसार त्यांचे विज वाहिनी पूर्ण केल्याचे काम हे सन 2015 मध्येच पूर्ण झाले होते. परंतु त्यानंतरची कामे तक्रारकर्त्याने केली नाही, असे मंचाचे मत आहे. तक्रारकर्त्याने संत्र्याच्या झाडाची लागवड सन 2007-08 मध्ये केली होती व त्याच्या शेतात शेततळे व विहिर आहे. सन 2007-08 मधील संत्रा लागवडीसाठी तक्रारकर्त्याने ईतक्या विलंबाने सन 2015 मध्ये विरुध्द पक्षाकडून कृषी पंपासाठी विद्युत पुरवठा मागणी कली, यास का विलंब झालेला आहे? ही बाब देखील तक्रारकर्त्याने युक्तिवादात स्पष्ट केली नाही. तसेच संत्र्याच्या झाडांना भाड्याने ट्रॅक्टर लावून पाणी दिले, ही बाब देखील कागदपत्र दाखल करुन, सिध्द केली नाही. त्यामुळे तक्रारकर्त्यास प्रार्थनेतील नुकसान भरपाई देता येणार नाही, कारण विरुध्द पक्षाच्या कबुली जबाबानुसार त्यांनी त्यांचे काम पूर्ण केले व उर्वरीत फिटींग व कृती ही तक्रारकर्त्यास करणे भाग होती, असे मंचाचे मत आहे. म्हणून तक्रार खारिज करणे क्रमप्राप्त ठरते.
सबब अंतिम आदेश, खालीलप्रमाणे पारित केला.
:: अंतीम आदेश ::
1. तक्रारकर्ता यांची तक्रार सिध्दतेअभावी खारिज करण्यात येते.
2. न्यायिक खर्चाबाबत कोणतेही आदेश नाही.
3. उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
( श्री. कैलास वानखडे ) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.
svGiri