:: नि का ल प ञ ::
(मंचाचे निर्णयान्वये, मनोहर गो.चिलबुले मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक :19/08/2013)
अर्जदाराने प्रस्तुत तक्रार ग्राहक सरंक्षण कायद्याचे कलम 12 अन्वये दाखल केली आहे.
1. संक्षेपाने अर्जदाराचे म्हणणे असे की, अर्जदाराकडे गैरअर्जदार यांचेकडून विज पुरवठा सुरु आहे. अर्जदार हे गैरअर्जदारांचे ग्राहक आहेत. अर्जदाराने दि.22/06/2011 चे 60 युनिट विज वापर असलेल्या एक महिण्याचे विज देयक रक्कम रु.230/- बरोबर असल्याने गैरअर्जदारकडे सदर रक्कमेचा भरणा केला. परंतु गैरअर्जदारने दि. 21/07/2011 पासून दि.19/11/2011 पर्यंत सतत चुकीचे विज देयक अर्जदाराला पाठविले. तोंडी व लेखी स्वरुपात मागणी केल्यानंतर विज देयकामध्ये दुरुस्ती करुन तात्पुरत्या स्वरुपाचे विज देयक गैरअर्जदार देत गेले. गैरअर्जदाराने अर्जदाराला पुढील बिलात दुरुस्ती करुन सुधारीत बिल पाठविण्यात येईल असे सांगितले म्हणून अर्जदाराने सदर वादग्रस्त बिलांचा भरणा केलेला आहे. परंतु गैरअर्जदाराने पुढील सर्व विज देयके हे सुधारीत विज देयके न पाठविता मागील थकबाहीसह चुकीचे विज देयके पाठविलेले आहेत ते येणे प्रमाणे.
दिनांक | मागील रिडींग | चालु रिडींग | युनिट | बिल रक्कम (थकबाकीसह) | तात्पुरते बिल |
21/07/2011 | 7296 | 7838 | 542 | 3,600/- | 200/- |
17/08/2011 | 7838 | 7872 | 34 | 3620/- | 150/- |
15/09/2011 | 7872 | 7430 | 128 | 4050/- | 350/- |
21/10/2011 | 7872 | 7480 | 128 | 4300/- | 350/- |
19/11/2011 | 7872 | 7527 | 128 | 4550/- | 600/- |
2. अर्जदाराने, गैरअर्जदाराला वरील चुकीचे बिलांमध्ये दुरुस्ती करुन सुधारीत बिल पाठविण्यासंबंधी तोंडी व लेखी स्वरुपात मागणी अनुक्रमे दि.25/07/2011, 01/08/2011, 03/11/2011 व 01/12/2011 ला केलेली आहे. गैरअर्जदाराने अर्जदाराला बिलामध्ये वेळीच दुरुस्ती करुन न देता वारंवार तात्पुरते बिल देत राहिल्याने अर्जदाराला गैरअर्जदाराकडे वारंवार चकरा माराव्या लागल्या. गैरअर्जदाराने अर्जदारास विज मिटरचे फोटोनुसार कायमस्वरुपी देयकात दुरुस्ती करणे आवश्यक होते, परंतु गैरअर्जदाराने ती केलेली नाही. त्यामुळे अर्जदारास शारिरीक व मानसिक ञास झाला आहे. म्हणून अर्जदाराने सदरहू तक्रार दाखल करुन दि.21/07/2011 पासून दि.19/11/2011 पर्यंतचे चुकीचे बिल रद्द करुन उपलब्ध मिटर रिडींग नुसार सुधारीत बिल कुठल्याही प्रकारचे व्याजाची आकारणी न करता. तसेच शारीरीक व मानसिेक ञासापोटी रक्कम रु.10,000/- व तक्रार खर्च रु.5,000/- गैरअर्जदाराने अर्जदाराला दयावे असा आदेश गैरअर्जदारा विरुध्द पारीत करावा अशी मागणी केली आहे.
3. अर्जदाराने तक्रारीच्या कथनापृष्ठयर्थ नि.5 नुसार 9 दस्ताऐवज दाखल केलेले आहेत.
4. गैरअर्जदाराने नि.11 नुसार आपले लेखी उत्तर दाखल केले आहे. गैरअर्जदाराने आपल्या लेखी बयाणा मध्ये अर्जदाराचे कथन नाकारले, परंतु गैरअर्जदाराने हे मान्य केले की, अर्जदाराला गैरअर्जदाराकडून दि. 22/06/2011 चे 60 युनिटचे 1 महिण्याचे रु.230/- चे विज बिल दिले व ते बरोबर असल्याने अर्जदाराने सदर बिलाचा भरणा केला आहे. तसेच हे सुध्दा मान्य केले की, दि. 01/08/2011 ला अर्जदाराने, गैरअर्जदाराचे कार्यालयात जाऊन बिलात दुरुस्तीची मागणी केली. परंतु पुढील बिल हे सुधारीत बिल देण्यात येईल हे अर्जदाराचे कथन नाकारले. गैरअर्जदाराने आपले विशेष कथनात नमुद केले की, अर्जदाराला दिल्या गेलेले संपूर्ण वादग्रस्त बिल हे गैरअर्जदाराने अर्जदाराच्या मिटर रिडींग नुसार व वापरानुसार वेळोवेळी अर्जदाराने केलेल्या विनंती वरुन दुरुस्त करुन दिलेली आहेत. परंतु सदरील सुधारीत देयकाचे कम्प्युटरमध्ये नोंदणी/फिडींग न झाल्यामुळे अर्जदाराला दि.21/07/2011, 17/08/2011, 15/09/2011, 21/10/2011, 19/11/2011 चुकीने दिल्या गेलेली देयके आहेत.
5. तसेच गैरअर्जदाराने पुढे नमुद केले कि, संगणकामध्ये वेळेवर नोंद न झाल्यामुळे वादग्रस्त देयक चुकीने दिल्या गेले. गैरअर्जदाराने, अर्जदाराच्या विनंतीवरुन कनिष्ठ अभियंता मार्फत चौकशी करुन बिलामध्ये योग्य ती दुरुस्ती करण्यासाठी संगणकिय विभागात पाठवून संपूर्ण वादग्रस्त बिल दुरुस्त करुन दिलेली आहेत. व त्याप्रमाणे अर्जदाराने सदर बिलाचा भरणा केलेला आहे सदरची बिले ही बरोबर असल्यामुळे रद्द करण्याचा प्रश्न निर्माण होत नाही कारण अर्जदाराला संगणकामध्ये नोंद झाल्यावर पुढील देयके दि.23/01/2012 पासून सुधारीत रिडींग नुसार दिल्या गेले आहे. करीता अर्जदाराने केलेली तक्रार खारीज होण्यास पाञ आहे.
6. अर्जदाराने नि. 16 नुसार आपले शपथपञ दाखल केले तसेच गैरअर्जदाराने नि. 13 नुसार पुरसीस दाखल करुन लेखी उत्तरालाच पुरावा समजण्यात यावा असे नमुद केले.
7. अर्जदार व गैरअर्जदार यांचे परस्पर विरोधी कथना वरुन खालील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले त्यावरील मंचाचे निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे
मुद्दे निष्कर्ष
1) गैरअर्जदाराने अर्जदारास न्युनतापूर्ण सेवा
दिली आहे काय ? होय.
2) अर्जदाराची तक्रार मंजूर करण्यास पाञ आहे काय ? अंशतः पाञ आहे.
3) अंतीम आदेश काय ? अंतीम आदेशा प्रमाणे
कारण मिमांसा
मुद्दा क्रं 1 व 2 बाबत.
8. गैरअर्जदार यांनी अर्जदारास दि.21/07/2011 पासून दि. 19/11/2011 पर्यंत सतत चुकीचे विज देयके दिलेली आहेत सदरचे चुकीचे दिलेले विज देयके नि.क्रं 5 वरील दस्त क्रं. अ-2, अ-4 ते अ-7 वर दाखल आहेत. अर्जदाराने गैरअर्जदाराकडे जावून तोंडी व लेखी स्वरुपात विज देयकांसंबंधी तक्रार केल्यानंतर गैरअर्जदाराने सदरहु देयकाचे तात्पुरते विज देयक दिले. सदरहु लेखी तक्रार अर्ज व तात्पुरते विज देयक हे नि.क्रं. 4 वरील अनुक्रमे दस्त क्रं. अ-3, अ-8, अ-9 व विज देयके अ-4 ते अ-7 वर दाखल आहे. व अर्जदाराने मागणी केल्यानंतरही गैरअर्जदाराने कायमस्वरुपी उपाययोजना नकरता गैरअर्जदार तात्पुरते विज देयके देत राहीले दि.21/07/2011 ते 19/11/2011 पर्यंत सतत तात्पुरते विज देयके देत राहीले व नंतर अर्जदाराने जेव्हा 03/11/2011 ला परत लेखी पञ देवून विज देयकामध्ये दुरुस्ती करण्याबाबत अर्ज केला तेव्हा गैरअर्जदाराने कनिष्ठ अभियंत्यामार्फत चौकशी करुन योग्य ती दुरुस्ती करण्यासाठी संगणकीय विभागात पाठवून संपूर्ण वादग्रस्त देयके दुरुस्त करुन दिलेली आहेत व संगणकामध्ये नोंद झाल्यावर दि.23/01/2012 चे विज देयक अर्जदाराला सुधारित रिडींग नुसार दिलेले आहे गैरअर्जदाराने सदर देयकामध्ये अर्जदाराचे मागणी नंतर ताबडतोब दुरुस्ती करुन दयायला हवी होती परंतु गैरअर्जदाराने तसे केले नाही. त्यामुळे अर्जदाराला मानसिक ञास सहन करावा लागला.
9. या प्रकरणात गैरअर्जदारानी अर्जदाराला विज देयकामध्ये दुरुस्ती करुन सुधारीत विज देयके दिलेले आहे व अर्जदाराने सदर बिलाची रक्कम भरणा केली आहे. लेखी उत्तरामध्ये तसेच युक्तीवादाचे दरम्यान दोन्ही पक्षाच्या वकीलांनी असे सांगितले की, आता नविन देयक योग्य त्या मिटर वाचनाप्रमाणे येत असल्याने देयकाच्या रक्कमेबाबत वाद राहीला नाही. विज पुरवठादार म्हणून गैरअर्जदाराने विद्युत ग्राहकास प्रत्यक्ष विज वापराप्रमाणे विज देयके देणे ही कायदेशिर जबाबदारी आहे परंतु दि.21/07/2011 ते 19/11/2011 पर्यंत गैरअर्जदाराने अर्जदारास सतत चुकीचे विज देयक दिलेले आहेत आणि सदरची बाब निर्दशणास आणून दिल्यावरही त्यावर वेळीच उपाय योजना केलेली नाही ही गैरअर्जदाराने विज ग्राहकाप्रती अवलंबविलेली सेवेतील न्युनता आहे.
10. या प्रकरणात अर्जदाराला सुधारीत देयके दि.23/01/012 पासुन दिलेले आहे परंतु दि. 21/07/2011 पासून दि.19/11/2011 पर्यंत सतत चुकीचे देयके अर्जदाराला दिलेले आहे. त्यामुळे अर्जदाराला वारंवार गैरअर्जदाराकडे चकरा माराव्या लागल्याने त्यास झालेल्या मानसिक ञासाबद्दल रु. 1,000/- ची प्रतिकात्मक नुकसान भरपाई तसेच या प्रकरणाच्या खर्चाबाबत रु.500/-मंजूर करणे न्यायोचित होईल. म्हणून मुद्दा क्रं.1 व 2 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविण्यात आले आहेत.
वरील निष्कर्षास अनुसरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतिम आदेश
अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः खालील प्रमाणे मंजूर करण्यात येत आहे.
1) शारीरीक व मानसिक ञासापोटी रु.1,000/-
गैरअर्जदाराने अर्जदारास द्यावे.
2) तक्रारीचा खर्च अर्जदारास रु.500/- गैरअर्जदाराने
अर्जदारास द्यावा वरील आदेशाची पूर्तता आदेशाचे
दिनांकापासून 1 महिण्याचे आत करण्यात यावी.
3) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
चंद्रपूर.
दिनांक : 19/08/2013.