::: निकालपत्र :::
(घोषित द्वारा: श्री.अजय भोसरेकर, मा.सदस्य.)
तक्रारदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की,
तक्रारदार हा बाकली ता.शिरुर अनंतपाळ येथील रहिवाशी असून, तक्रारदाराच्या वडिलाच्या नावे घरगुती व शेती वापरासाठी वीज कनेक्शन सामनेवाला यांच्याकडून घेतलेले आहे. त्याचा ग्राहक क्र. अनुक्रमे 615270000449 व 615270000601 असा आहे. तक्रारदार हा उपभोक्ता लाभार्थी असून सामनेवाला यांचा ग्राहक आहे. तक्रारदाराचा गट क्र. 99 मध्ये 1 हे. 69 आर शेतजमीन असून दि. 22.03.2013 रोजी सकाळी 10.10 चे सुमारास मध्यम दाबाच्या 3 तारापैकी 2 तारा मध्ये स्पार्कींग होवुन एकमेकास चिकटल्यामुळे तारांच्या खालील उसात व पाचटावर ठिणग्या पडल्यामुळे 2 एकर ऊस जळुन, रु. 1,80,000/- चे नुकसान व स्प्रिंकलर संचाचे 12 पाईप आगीत जळाल्या कारणाने रु. 6000/- असे एकुण रु. 1,86,000/- चे नुकसान झाल्याचे म्हटले आहे.
दि. 25.03.2013 रोजी सामनेवाला यांच्याकडे नुकसानीची पाहणी व पंचनामा करुन, नुकसान भरपाई मिळण्यासाठी तक्रारदाराने अर्ज केला, त्याचबरोबर पोलिस स्टेशन व तहसीलदार शिरुर अनंतपाळ यांना अर्ज केला. तहसील व पोलिस स्टेशन शिरुर अनंतपाळ यांनी तक्रारदाराच्या आगीतील नुकसानीचे पंचनामे केले. सामनेवाला यांनी तक्रारदाराच्या तक्रारीची दखल न घेतल्यामुळे तक्रारदाराने विदयुत निरीक्षक लातूर यांना पंचनामा करुन अहवाल मिळण्यासाठी दि. 08.04.2013 रोजी अर्ज केला. सदर अहवाल तक्रारदाराने तक्रारी सोबत दाखल केला आहे.
सामनेवाला यांनी तक्रारदारास नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ केल्यामुळे, सदर तक्रार या न्यायमंचात दाखल केली आहे. तक्रारदाराने सामनेवाला यांच्या विदयुत ताराच्या घर्षनाने आगीमुळे नुकसान झालेली रक्कम रु. 1,86,000/- त्यावर 18 टक्के व्याज, शारिरीक मानसिक त्रासापोटी रु. 8000/- तक्रारीच्या खर्चापोटी रु. 5000/- मिळण्याची मागणी केली आहे.
तक्रारदाराने आपले तक्रारीचे पुष्टयर्थ शपथपत्र व एकुण 10 कागदपत्रे दाखल केले आहेत.
सामनेवाला यांना न्यायमंचाची नोटीस प्राप्त असून, त्यांचे लेखी म्हणणे दि. 17.02.2014 रोजी दाखल झाले असून, तक्रारदाराची संपुर्ण तक्रार खोटी असल्याचे म्हटले असून तक्रारदार हा आमचा ग्राहक नाही, कारण वीज पुरवठा हा पंढरी अनंतराव शिंदे यांच्या नावाने आहे. त्यामुळे तक्रारदार हा ग्राहक होत नसल्याकारणाने सदर तक्रार या न्यायमंचात चालवता येत नाही. म्हणुन तक्रारदाराची तक्रार खर्चासह खारीज करावी अशी मागणी केली आहे.
सामनेवाला यांनी आपले लेखी म्हणण्याचे पुष्टयर्थ फक्त शपथपत्र दाखल केले असून, अन्य कोणतेही कागदपत्र दाखल केले नाहीत.
तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार, सोबतचे कागदपत्रे, सामनेवाला यांनी दाखल केलेले लेखी म्हणणे यांचे बारकाईने वाचन केले असता, तक्रारदाराच्या वडिलाच्या नावाने विदयुत कनेक्शन आहे, हे सामनेवाला यांनी मान्य केले आहे. त्यामुळे तक्रारदार हा लाभार्थी ग्राहक या व्याख्येमध्ये येतो. कारण तो संबंधीत वीज पुरवठयाचा उपभोग घेत असून, सदर वीज देयके तक्रारदाराने दाखल केलेल्या वरुन तक्रारदार विज देयके भरत असल्याचे दिसून येते.
तक्रारदाराने दाखल केलेले तहसील व पोलिस पंचनामो यावरुन तक्रारदाराच्या शेतात सामनेवाला यांच्या तारांच्या स्पार्कींगमुळे ठिणग्या पडून आग लागुन तक्रारदाराचे नुकसान झाले आहे असे दिसते. तक्रारदाराने विदयुत निरीक्षक लातूर यांचा दि. 15.05.2013 रोजीचा अहवाल या न्यायमंचात दाखल केला आहे, त्या अहवालातील निष्कर्षानुसार विदयुत निरीक्षक यांनी सामनेवाला यांच्या तारात झोळ असल्याने वा-यामुळे तारा एकमेकांना घासल्या गेल्या असाव्यात, त्यामुळे तेथे स्पार्कींग होवुन ठिणगी पडून उस व पाचटावर पडून उस पेटला असावा, असा निष्कष्र काढला आहे.
तक्रारदाराने दाखल केलेल्या तक्रारीत किती एकरात उस लागवड केली आहे व तो कोणत्या महिन्यात लागण केली , याबाबत कोणताही ठोस पुरावा या न्यायमंचात दाखल केला नाही. जळीत ऊस हा किती महिन्याचा परिपक्व होता, या निष्कर्षास येण्यासाठी आवश्यक असणारे पुरावे नसल्या कारणाने तक्रारदार उस बेने, खते, शेतीची मशागत व स्प्रींकलर चे 12 पाईप याचे अंदाजे रु. 40,000/- नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे, तसेच तक्रारदारास मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु. 3000/- व तक्रारीचे खर्चापोटी रु. 2000/- देणे योग्य व न्यायाचे होईल असे या न्यायमंचाचे मत आहे.
सबब न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
- सामनेवाला यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारास ऊस जळीत नुकसान भरपाईपोटी रक्कम रु. 40,000/- (रुपये चाळीस हजार फक्त) आदेश प्राप्ती पासुन 30 दिवसाचे आत अदा करावेत.
- सामानेवाला यांना आदेश देण्यात येतो की, आदेश क्र. 2 चे पालन मुदतीत न केल्यास, त्यावर तक्रार दाखल तारखे पासुन द.सा.द.शे् 9 टक्के व्याज देणे बंधनकारक राहील.
- सामनेवाला यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारास मानसिक व शारीरीक त्रासापोटी रक्कम रु. 3000/- व तक्रारीचे खर्चापोटी रु. 2000/- आदेश प्राप्ती पासुन 30 दिवसाचे आत अदा करावेत.