नि.19 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 275/2010 नोंदणी तारीख - 13/12/2010 निकाल तारीख - 5/3/2011 निकाल कालावधी - 82 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ संजय साहेबराव बाबर मातोश्री निवास, स्वरुप कॉलनी, महानुभाव मठासमोर, करंजे पेठ, सातारा ----- अर्जदार (अभियोक्ता श्री विनय मुळे) विरुध्द 1. असिस्टंट प्रॉव्हिडंट फंड कमिशनर, भविष्य निर्वाह निधी भवन, कोल्हापूर ----- जाबदार क्र.1 (अभियोक्ता श्री भागवतराव सानप) 2. अध्यक्ष, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक स्टाफ भविष्य निर्वाह निधी, द्वारा सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सदर बझार, सातारा जिल्हा परिषदेसमोर, टपाल पेटी क्रमांक 5, सातारा कँप ----- जाबदार क्र.2 (अभियोक्ता श्री संग्राम मुंढेकर) न्यायनिर्णय 1. अर्जदार हे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अधिकारीपदावर दि.14/12/87 रोजी नोकरीला लागले. नोकरीच्या अटीनुसार अर्जदारचे दरमहा पगारातून फंडाची वर्गणी कपात करुन जाबदार क्र.1 ने ठेवलेल्या सभासद खात्यात जमा करणेत आली आहे. अर्जदारचे माहितीप्रमाणे दि.30/9/2006 अखेर अर्जदारचे खात्यात एकूण रक्कम रु.6,34,219/- इतकी रक्कम शिल्लक होती. सदरची रक्कम जाबदार क्र.2 यांचे अधिपत्याखालील जाबदार क्र.1 या ट्रस्टकडे जमा आहे. त्यानंतर दि.8/5/2006 पर्यंत म्हणजे नोकरी संपुष्टात येईपर्यंत जमा झालेल्या रकमांचा तपशील जाबदार क्र.1 यांनी मागणी करुनही दिलेला नाही. दि.8/5/2006 रोजी अर्जदार याला बँकेने नोकरीतून कमी केले. तदनंतर अर्जदार यांनी सदरचे प्रा.फंड खात्यातून बिनपरतीच्या कर्जाची मागणी कायद्यातील तरतुदींनुसार मागणी केली. परंतु जाबदार यांनी बिनपरतीचे कर्ज मंजूर न करता अर्जदारचे फंड खाते बंद करुन त्यातील शिल्लक असणा-या रकमेचा चेक पाठविला. परंतु अर्जदार यांनी सदरचा चेक जाबदार क्र.1 यांचेकडे परत पाठविला. तदनंतर अर्जदार यांनी कामगार न्यायायालयात दाखल केलेल्या तक्रारीचे कामकाज संपुष्टात आले. त्यामुळे अर्जदार यांस फंडाचे खातू चालू ठेवण्याचे कारण उरले नाही. म्हणून त्यांनी फंडातील रकमेची मागणी केली असता जाबदार यांनी पूर्वीच्याच रकमेचा नवीन चेक पाठविला. जाबदार यांनी सदरची रक्कम 2 वर्षे 3 महिने वापरुनही त्यावर कायद्याप्रमाणे व्याज दिले नाही. सबब व्याजाची होणारी रक्कम रु.1,44,182/- व मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी रक्कम मिळावी म्हणून अर्जदार यांनी या मंचासमोर दाद मागितली आहे. 2. जाबदार क्र.1 यांनी नि.8 कडे म्हणणे देऊन तक्रार नाकारली आहे. जाबदार यांचे कथनानुसार कर्मचा-यांचे भविष्यनिर्वाह निधीबाबतचे कोणतेही दावे पारीत करताना जाबदार क्र.2 यांचेमार्फत टाळाटाळ झाल्यास व संबंधीत कर्मचा-याने सदरची बाब जाबदार क्र.1 यांचे निदर्शनास आणल्यास त्याबाबत हस्तक्षेप करुन जाबदार क्र.2 यांना योग्य ते आदेश दिले जातात. प्रस्तुत प्रकरणात अर्जदार यांनी जाबदार क्र.1 यांचेशी कधीही संपर्क साधलेला नाही. कर्मचा-याने घरबांधणीसाठी कर्ज घेतले असल्यास व ते कर्जपरतफेडीसाठी त्याने भविष्य निर्वाह निधीतून कर्जाची मागणी केल्यास त्याचा अर्ज नाकारता येत नाही. परंतु इतर कारणासाठी घेतलेले कर्ज परत करणेसाठी सदरचे कायद्यात तरतूद नाही. सदरचे व्यवहार हे जाबदार क्र.2 यांचेमार्फत चालत असल्याने व त्याबाबत अर्जदारने जाबदार क्र.1 यांचेकडे कोणतीही तक्रार न केलेने जाबदार क्र.1 यांनी सेवा देण्यामध्ये कोणतीही त्रुटी केलेली नाही. सदर बाबीशी जाबदार क्र.1 यांचा काहीही संबंध नाही. सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार क्र.1 यांनी कथन केले आहे. 3. जाबदार क्र.2 यांनी नि.12 कडे म्हणणे देऊन तक्रार नाकारली आहे. जाबदार यांचे कथनानुसार अर्जदार हे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयामध्ये नोकरीस होते. त्यांची बदली नेले शाखेत केलेनंतर ते बदलीच्या ठिकाणी हजर झाले नाहीत. म्हणून कामावरुन कारणाशिवाय गैरहजर राहिल्याने त्यांची खातेनिहाय चौकशी होवून त्यांना नोकरीतून बडतर्फ करण्यात आले. अर्जदार यांनी बदली आदेश रद्द होणेसाठी कामगार न्यायालयात दावा दाखल केला होता. सदरचा दावा त्यांनी स्वतः काढून घेतला. तदनंतर त्यांनी औद्योगिक न्यायालयात दुसरा दावा दाखल केला. त्यामध्ये त्यांना पुन्हा नोकरीवर घेण्याचा आदेश मा.औद्योगिक न्यायालयाने दिला. सदरचे निर्णयाविरुध्द बँकेने हायकोर्टात अपिल केले. सदरचे अपिलकामी मा. हायकोर्टाने औद्योगिक न्यायालयाचा निर्णय रद्द केला. अर्जदार यांनी बँकेच्या व्यवस्थापकांना पत्र पाठवून भविष्य निर्वाह निधीतील संपूर्ण रकमेची मागणी केली. त्यानुसार जाबदार क्र.2 यांनी त्यांना संपूर्ण रकमेचा चेक पाठविला. परंतु तो चेक त्यांनी स्वीकारला नाही. त्यानंतर अर्जदार यांनी खात्यामध्ये रु.1000/- शिल्लक ठेवून उर्वरीत रकमेची मागणी केली. त्यानुसार जाबदार क्र.2 यांनी रु.1000/- वजा जाता उर्वरीत रकमेचा चेक अर्जदार यांना पाठविला परंतु तोही चेक अर्जदार यांनी स्वीकारला नाही. त्यानंतर पुन्हा दि.18/2/09 रोजी अर्जदार यांनी कर्जाची कपात करुन उर्वरीत रकमेची मागणी केली. सदरचा चेक जाबदार यांनी पाठविल्यानंतर तो अर्जदार यांनी स्वीकारला. अशा प्रकारे अर्जदार यांना एकूण 4 वेळा चेक दिलेला होता. सदरचे चेकची रक्कम ट्रान्झीटमध्ये असल्याने त्या रकमेचा विनियोग जाबदार क्र.2 यांना करता आलेला नाही. त्यामुळे सदरचे रकमेवर पुढील व्याज देणे जाबदार क्र.2 यांना शक्य नव्हते व तसे पत्राने अर्जदार यांना कळविलेही होते. सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार क्र.1 यांनी कथन केले आहे. 4. अर्जदार व जाबदारतर्फे युक्तिवाद ऐकणेत आला तसेच दाखल कागदपत्रे पाहणेत आली. 5. अर्जदारची तक्रार पाहता जाबदार क्र.1 यांनी अर्जदारची प्रॉव्हिडंड फंडाची रक्कम 2 वर्षे 3 महिने वापरली. परंतु अर्जदारास सदर फंडाचे रकमेवर व्याज दिले नाही तरी व्याज मिळावे अशी तक्रार दिसते. 6. जाबदार क्र.1 यांनी नि.8 कडे कैफियत देवून अर्जदारची तक्रार नाकारली आहे. जाबदार क्र.1 यांचे कथनानुसार प्रा.फंडाची रक्कम जाबदार क्र.2 यांचेकडे जमा असते. सबब आमचा संबंध येत नाही असे कथन केले आहे. 7. जाबदार क्र.2 यांनी नि.12 कडे कैफियत देवून अर्जदारची तक्रार नाकारली आहे. जाबदार क्र.2 चे कथनानुसार अर्जदार यास नोकरीतून बडतर्फ केले आहे. सबब त्यानंतर अर्जदारने ज्या ज्या वेळेस प्रा.फंडाचे रकमेची मागणी केली आहे, त्या त्या वेळेस जाबदार क्र.2 यांनी अर्जदारना प्रा.फंडाचे रकमेचा चेक पाठवला आहे परंतु प्रत्येक वेळेस अर्जदारने चेक न घेता परत पाठवला आहे. निर्विवादीतपणे जाबदार क्र.2 यांनी नि.2 कडे दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन जाबदार क्र.2 यांचे कथनात तथ्य आहे हे दिसून येत आहे. अर्जदारास प्रथम अर्जदारचे रक्कम मागणी अर्जानुसार प्रथम दि.16/8/2006 रोजी चेक पाठवता त्यानंतर दि.7/2/2007 पर्यंत जाबदार क्र.2 यांनी अर्जदारचे मागणीनुसार अनेक वेळा चेक पाठवले परंतु अर्जदारने ते स्वीकारले नाहीत परत पाठवले आहेत हे दाखल कागदपत्रांवरुन दिसून येत आहे. सबब सदर काळात रक्कम ट्रान्झीट मध्ये राहिली. बॅंकेला वापरता आली नाही, सबब व्याज देणेचा प्रश्न नाही या जाबदार क्र.2 चे कथनात तथ्य आहे हे दिसून येते. परंतु दि.7/2/2007 पासून ते अर्जदार पुन्हा दि.18/2/2009 रोजी पत्राने प्रॉ.फंडाचे रकमेची मागणी करेपर्यंत रक्कम जाबदारकडेच जमा होती हे जाबदारचे पुराव्यावरुन दिसून येत आहे. निर्विवादीतपणे दि.18/2/2009 चे मागणी पत्रानुसार जाबदार नं.2 यांनी दि.2/3/2009 रोजीचा रक्कम रु.6,34,219/- चा चेक अर्जदारला दिला आहे व अर्जदारने तो स्वीकारला आहे. अर्जदारचे कथनानुसार कायद्यानुसार फंडाचे रकमेवर दर सहामाहीस 9 टक्के दराने व्याज देणेची तरतूद आहे. जाबदार क्र.2 यांनी दि.1/2/2007 रोजीच अर्जदारला वेळोवेळी चेक परत पाठवणे, असल्या उध्दट वागणुकीमुळे शिल्लक रकमेवर व्याज मिळणार नाही असे आम्ही पत्राने कळवले होते सबब व्याज देवू शकत नाही असे कथन केले. निर्विवादीतपणे दाखल कागदपत्रांवरुनही दि.16/8/2006 ते 7/2/2007 या काळात अर्जदारने जाबदार पाठवत असलेले चेक पुन्हा परत पाठवणे अशीच वर्तणूक करीत होते सबब या काळात अर्जदारमुळेच रकमेचा वापर न होता रक्कम ट्रान्झीट मध्ये रहात होती. सबब सदर काळातील व्याज मिळणेस अर्जदार पात्र नाहीत या निर्णयाप्रत हा मंच आला आहे. 8. परंतु दि. 7/2/2007 ते दि.2/3/2009 पर्यंत दाखल कागदपत्रांवरुन अर्जदार व जाबदार यांचेमध्ये काहीही व्यवहार झालेला दिसत नाही. सबब दि.7/2/07 ते 2/3/09 पर्यंत अर्जदारची प्रा.फंडाची रक्कम जाबदार क्र.2 कडेच खात्यात शिल्लक होती हे स्पष्ट आहे. सबब सदर काळासाठी प्रा.फंडाचे शिल्लक रकमेवर व्याज मिळणेस अर्जदार पात्र आहे या या निर्णयाप्रत हा मंच आला आहे. केवळ सध्याचे उध्दट वर्तणुकीमुळे पुढील काळातीलही व्याज देय होणार नाही हे जाबदार क्र.2 यांचे वर्तन योग्य व बरोबर नाही. निर्विवादीतपणे अर्जदार बडतर्फ झालेल्या दिवशी म्हणजे दि.8/5/2006 रोजी अर्जदारचे प्रा.फंडाची शिल्लक रक्कम रु.6,34,219/- होती हे जाबदार मान्य करतात. 9. अर्जदारने कायद्यानुसार प्रा.फंडाचे रकमेवर सहामाही 9 टक्के व्याज आकारले जाते असे कथन केले आहे. जाबदारांनी याबाबत काहीही ऊहापोह केलेला नाही. अर्जदार यांनीही सदर व्याजदराबाबत स्वतःचे कथनाव्यतिरिक्त पुरावा दाखल केला नाही. सबब अर्जदारने प्रा.फंडातील उर्वरीत रक्कम रु.6,34,219/- (सहा लाख चौतीस हजार दोनशे एकोणीस) वरती नियमानुसार होणारे दि.7/2/2007 ते 2/3/2009 पर्यंतचे व्याज जाबदार यांनी द्यावे या निर्णयाप्रत हा मंच आला आहे. 10. सबब आदेश. आदेश 1. अर्जदारचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. 2. जाबदार यांनी अर्जदार यास रक्कम रु.6,34,219/- (सहा लाख चौतीस हजार दोनशे एकोणीस) वरती दि.07/02/2007 ते 02/03/2009 पर्यंत नियमानुसार होणारी व्याजाची रक्कम द्यावी. 3. जाबदार यांनी अर्जदार यास या तक्रारीचा खर्च व मानसिक त्रासाची रक्कम रु.5,000/- (पाच हजार) द्यावेत. 4. जाबदार यांनी वरील आदेशाचे अनुपालन त्यांना या न्यायनिर्णयाची सत्यप्रत मिळाल्यापासून 30 दिवसात करावे. 5. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 5/3/2011 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |