(घोषित दि. 17.12.2012 व्दारा श्रीमती रेखा कापडिया, प्र.अध्यक्ष)
अर्जदार हे गैरअर्जदार वीज कंपनीचे ग्राहक असून त्यांना देण्यात आलेल्या वाढीव वीज बिलाच्या तक्रारीची दखल घेण्यात न आल्यामुळे त्यांनी ग्राहक संरक्षण कायदा अंतर्गत मंचात तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांनी घरगुती वापरासाठी वीज पुरवठा घेतला आहे व त्यांचे सरासरी वीज बिल 150 ते 200 रुपये प्रति महिना आहे. सप्टेंबर 2011 मध्ये गैरअर्जदार यांनी त्यांना 1,637/- रुपयाचे डिसेंबर 2011 चे 390 युनिट वीज वापराचे चुकीचे वीज बिल आकारले. या चुकीच्या वीज बिला विरुध्द त्यांनी दिनांक 11.01.2012 तसेच 13.03.2012 रोजी गैरअर्जदार यांच्याकडे तक्रार केली असून सुधारीत वीज बिल देण्याची मागणी केली. सप्टेबर 2012 ते फेब्रूवारी 2012 या कालावधीत गैरअर्जदार यांनी त्यांना 24,830/- रुपयाचे चुकीचे वीज बिल आकारले आहे. गैरअर्जदार यांनी त्यांच्या तक्रारीची दखल न घेता व सुधारीत वीज बिल न देता त्यांचे मीटर काढून नेले व वीज पुरवठा खंडीत केला. गैरअर्जदार यांच्या या कृती विरुध्द अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली असून खंडीत केलेला वीज पुरवठा पुनर्रजोडणी करुन देण्याची व नुकसान भरपाईची मागणी केली.
अर्जदाराने तक्रारी सोबत वीज बिलाच्या प्रती गैरअर्जदार यांना दिलेली तक्रार इत्यादी कागदपत्रे मंचात दाखल केली आहेत.
अर्जदार यांनी तक्रारी सोबत वीज पुरवठा पुनर्रजोडणी करुन देण्याबाबत अंतरिम आदेशाची विनंती केली आहे. अर्जदाराने केलेल्या अर्जावर मंचाने दिनांक 21.05.2012 रोजी सुनावणी घेऊन 24,830/- रुपया पैकी 6,500/- रुपये भरल्यास गैरअर्जदार यांनी त्यांचा वीज पुरवठा पुनर्रजोडणी करुन द्यावा असा अंतरिम आदेश पारित केला.
गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या जवाबाबनुसार अर्जदाराने वीज देयकाचा भरणा न केल्यामुळे नियमानुसार त्यांचा वीज पुरवठा खंडीत केल्याचे म्हटले आहे. दिनांक 21.09.2012 रोजी अर्जदाराचे जुने मीटर बदलण्यात आले त्यावेळेस सप्टेंबर 2012 मध्ये अर्जदारास देण्यात आलेले 5,013.50 रुपयाचे क्रेडीट चुकीचे होते असे आढळून आल्यावर ते रद्द करुन वीज बिलात समाविष्ट करण्यात आले. अर्जदाराकडे एप्रिल 2010 मध्ये बसविण्यात आलेल्या वीज बिलाची रक्कम या बिलात समाविष्ट करण्यात आली असून अर्जदारास देण्यात आलेले वीज बिल योग्य असल्याचे सांगून तक्रार खारीज करण्याची विनंती केली आहे.
अर्जदार व गैरअर्जदार यांनी मंचात दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन असे दिसून येते की, अर्जदाराने घरगुती वापरासाठी वीज पुरवठा घेतला आहे. त्यांचा ग्राहक क्रमांक 5100/0/062287 असा असून सध्या असलेल्या मीटरचा क्रमांक 14/02843160 असा असल्याचे दिसून येते. गैरअर्जदार यांनी मंचात जानेवारी 2010 ते ऑगस्ट 2012 या कालावधीचे सी.पी.एल. दाखल केले आहे. या सी.पी.एल. चे निरीक्षण केल्यावर असे दिसून येते की,
1. जानेवारी 2010 मध्ये अर्जदाराकडे लावण्यात आलेल्या मीटरचा क्रमांक 90/00086880 असा होता.
2. जानेवारी 2010 ते मार्च 2010 या काळात अर्जदारास मीटर वरील रिडींग प्रमाणे बिल आकारण्यात आले. यामध्ये त्यांचा सरासरी वापर 18+96+29 = 47 असा असल्याचे स्पष्ट होते. 3
3. एप्रिल 2010 ते एप्रिल 2011 या काळात अर्जदासरास मागील रिडींग व चालू रिडींग 3201 असे दर्शवून 34 युनिट प्रतिमाह या प्रयमाणे बिल आकारण्यात आले.
4. मे 2011 ते फेब्रूवारी 2012 या काळात हाच मीटर क्रमांक दर्शवून अर्जदारास वीज बिल देण्यात आले आहे.
5. मार्च 2012 ते जून 2012 या काळात अर्जदारास 0 युनिट वीज वापराचे बिल देण्यात आले.
6. जुलै 2012 व ऑगस्ट 2012 या दोन महिन्यासाठी अर्जदारास 14/02843160 या क्रमांकाच्या मीटर वरील नोंदी प्रमाणे बिल आकारल्याचे दिसून येते.
गैरअर्जदार यांच्या म्हणण्यानुसार सप्टेंबर 2010 मध्ये चुकीच्या अहवालामुळे अर्जदारास 5,013.50 रुपये क्रेडीट देण्यात आले. एप्रिल 2010 मध्ये अर्जदाराकडे 13889667 या क्रमांकाचे मीटर बसविण्यात आले पण त्यानुसार बिल आकारण्यात आले नाही. गैरअर्जदार यांनी दिनांक 27.02.2012 रोजी केलेल्या स्थळपाहणी अहवाल तसेच दिनांक 21.09.2012 तारखेचा मीटर बदली अहवाल ज्यामध्ये 86880 हे मीटर दिनांक 08.04.2010 या रोजी बदलण्यात आले असे म्हटले आहे. या दोन्ही अहवालावर अर्जदाराची सही नसल्याचे दिसून येते. त्यामुळे ते ग्राहय मानता येत नाही. दिनांक 02.03.2012 रोजी 13889667 या मीटरची चाचणी केल्याचा अहवाल गैरअर्जदार यांनी मंचात दाखल केला आहे. या चाचणी अहवालाचे निरीक्षण केल्यावर मीटरची चाचणी पूर्णपणे केलेली नसल्याचे दिसून येते. अशा परिस्थितीत गैरअर्जदार यांच्याकडून अर्जदारास देण्यात आलेले एप्रिल 2010 ते फेब्रूवारी 2012 या काळातील वीज बिला बाबत सरासरीवर बिल आकारणी करणे योग्य ठरेल असे मंचाचे मत आहे. गैरअर्जदार यांनी दिनांक 12.07.2011 रोजी केलेल्या स्थळ पाहणी अहवालात अर्जदाराचा वीजेचा जोडभार 470 वॅट असल्याचे म्हटले आहे. गैरअर्जदार यांनी मे 2010 ते एप्रिल 2011 या काळात 34 युनिट प्रति महिना अशी सरासरीवर अधारीत वीज आकारणी केली आहे जी योग्य असल्याचे दिसून येत असल्यामुळे फेब्रूवारी 2012 पर्यंत 34 युनिट प्रतिमाह या प्रमाणे बिल आकारणी करणे योग्य ठरलेल असे मंचाचे मत आहे. अर्जदाराची तक्रार मान्य करण्यात येते.
आदेश
- एप्रिल 2010 ते फेब्रूवारी 2012 या कालावधीसाठी देण्यात आलेले वीज बिल रद्द करण्यात येत आहे.
- गैरअर्जदार यांनी अर्जदारास एप्रिल 2010 ते फेब्रूवारी 2012 या कालावधीसाठी 34 युनिट प्रतिमाह सरासरी वापरानुसार वीज बिल आकारणी करावी व अर्जदारास 30 दिवसात सुधारीत वीज बिल द्यावे.
- वरील प्रमाणे देण्यात येणा-या सुधारीत वीज बिलात कोणताही व्याज व दंड आकारु नये व अर्जदाराने या कालाधीत भरलेल्या रकमेची त्यातून वजावट करावी.
- गैरअर्जदार यांनी अर्जदारास मानसिक त्रास व खर्चा बद्दल रुपये 1,000/- 30 दिवसात द्यावे.