नि. 17
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचे समोर
मा.अध्यक्ष : श्री.ए.व्ही.देशपांडे
मा.सदस्य : श्री के.डी.कुबल
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 264/2011
----------------------------------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : 15/09/2011
तक्रार दाखल तारीख : 28/09/2011
निकाल तारीख : 24/05/2013
-----------------------------------------------------------------
श्री आनंदा एकनाथ मुळीक
वय वर्षे – 56, धंदा – शेती
रा. येलुर, ता.वाळवा जि.सांगली ....... तक्रारदार
विरुध्द
1. असिस्टंट इंजिनिअर
महाराष्ट्र ग्रामीण विद्युत कंपनी (ग्रामीण विभाग),
येलूर, ता.वाळवा जि. सांगली
2. कार्यकारी अभियंता,
महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी (ग्रामीण विभाग),
विश्रामबाग, सांगली
3. मुख्य कार्यकारी अभियंता,
महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी, ताराबाई पार्क,
कोल्हापूर ..... जाबदार
तक्रारदार तर्फे : अॅड आर.बी.कोकाटे
जाबदार तर्फे : अॅड यू.जे.चिप्रे
- नि का ल प त्र -
द्वारा – मा. सदस्य - श्री के.डी.कुबल
1. प्रस्तुतची तक्रार तक्रारदार याच्या शेतीला जाबदार वीज कंपनीच्या विद्युत तारांचे शॉर्ट सर्कीट झाल्याने आग लागून नुकसान झालेने त्यासंदर्भात भरपाई मिळणेसाठी तक्रारअर्ज दाखल करणेत आला आहे.
2. सदर तक्रार अर्जाचा तपशील थोडक्यात पुढीलप्रमाणे -
तक्रारदार शेतकरी असून येलूर येथील रहिवासी आहेत. त्यांचे मालकीची येलूर येथे गट नं.671 व 672 याचे क्षेत्र 0 हे. 41 आर अशी शेतजमीन आहे. सदर शेतजमीनीमध्ये तक्रारदार शेतीला पाणीपुरवठा करणेसाठी जाबदार यांचेकडून विद्युत मोटर वीज कनेक्शन घेतले. त्याचा ग्राहक क्र.284220353344 असा आहे. सदर शेतीक्षेत्रामध्ये 2009-10 व 2010-11 या वर्षी 265 जातीच्या ऊसाची लागवड केली होती. सदर ऊसाच्या पिकासाठी पाण्याच्या सोईसाठी तक्रारदाराने ठिबक सिंचन योजनेच्या पाईप वापरल्या होत्या. सदर शेतजमीनीच्या वरील बाजूने जाबदाराच्या अखत्यारितील विजेच्या तारा गेल्या होत्या. सदर तारा लोंबकळत होत्या. त्या तारांची देखरेख व निगा राखणेचे जाबदारचे कर्तव्य होते. त्यासंदर्भात जाबदार यांचेकडे तक्रार केली होती. मात्र तरीही जाबदाराने दुर्लक्ष व हयगय केली. त्यामुळे तारा ऊसाला चिकटून दि.21/2/2010 रोजी शॉटसर्कीट झाले. त्यामुळे ऊसाचे व ठिबक सिंचन यांचे रु.2,00,000/- चे नुकसान झाले. याचा पंचनामा तलाठी यांनी केला. या संदर्भात नुकसानीची मागणी जाबदाराकडे वेळोवेळी केली असता त्यांनी टोलवाटोलवी केली. पुन्हा दुस-या वर्षी दि.31/3/11 रोजी सकाळी पुन्हा तशीच घटना घडली व जाबदाराचे ऊसाचे पीक जळून खाक झाले व रु.1,80,000/- चे नुकसान झाले व ठिबक सिंचन पाईपचे रु.50,000/- असे एकूण रु.2,30,000/- चे नुकसान झाले. त्याचाही पंचनामा तलाठी यांनी केला आहे. दोन्ही वर्षी जाबदाराच्या हलगर्जीपणामुळे व सेवेतील त्रुटीमुळे तक्रारदाराचे मोठे नुकसान झालेले आहे. दोन्ही वर्षांची मिळून रु.4,30,000/- ची मागणी दि.20/4/2011 रोजी रजि.पोस्टाने तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडे केली असता जाबदारांनी सदर नुकसानीची रक्कम दिलेली नाही. शॉर्ट सर्कीटची घटना घडूनही जाबदाराने तारा ओढल्या नाहीत किंवा त्यांचा मार्ग बदलला नाही त्यामुळे त्यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिलेली आहे आणि म्हणून तक्रारदाराने
रु.2,00,000/- - 2009-10 ची नुकसान भरपाई,
रु.2,30,000/- - 2010-11 ऊस व ठिबक योजना पाईपची मागणी
रु.10,000/- - अर्जाचा खर्च
रु.10,000/- - तक्रारदाराला झालेला मानसिक त्रास
अशी एकूण रु.4,50,000/- नुकसानभरपाई द.सा.द.शे. 12 टक्के व्याजदराने अर्ज दाखल तारखेपासून जाबदाराकडून वैयक्तिक वा संयुक्तपणे वसूल करुन मिळावी यासाठी हा तक्रारअर्ज मंचासमोर दाखल केलेला आहे.
3. तक्रारदार यांनी तक्रारअर्जासोबत स्वतःचे शपथपत्रासह नि.क्र.45 यादीने एकूण 14 कागदपत्रे दाखल केली आहेत.
4. जाबदारतर्फे आपले लेखी म्हणणे नि.क्र.13 वर सादर करण्यात आले. तक्रारदाराच्या तक्रारीतील सर्व मुद्दे अमान्य केले असून त्यामध्ये प्रामुख्याने -
i) तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक असल्याबाबत संपूर्ण तक्रारअर्जात उल्लेख नाही.
ii) दि.20/2/2010 मध्ये रु.2 लाखचे नुकसान झालेचे कथन आहे मात्र त्यासाठी
लेखी तक्रार अथवा नुकसान भरपाई मागितली नाही.
iii) तारा लोंबकळत होत्या याची तक्रार नोंदवहीत नोंद नाही.
iv) 265 जातीचा ऊस घेतला होता हे दर्शविणारा पुरावा नाही.
v) फोटोग्राफरचे प्रतिज्ञापत्र / फोटोची निगेटीव्ह, फोटोग्राफरचे नाव इ. नाही.
vi) ठिबक सिंचन नवीन सेट बसविल्याचा पुरावा नाही.
vii) वारणा सहकारी साखर कारखान्यास सन 2009-10 साली 110 टन व 2010-11
साली 104 टन पुरवठा केल्याचे दिसून येते.
5. तक्रारदार यांची तक्रार, जाबदारांचे लेखी कथन, पुराव्यादाखल दाखल केलेली कागदपत्रे यांचे अवलोकन केले असता तसेच दोन्ही विधिज्ञांचा युक्तिवाद ऐकल्यावर न्यायमंचापुढे निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होत आहेत.
अ.क्र. |
मुद्दे |
उत्तरे |
1. |
तक्रारदार हे जाबदार यांचा ग्राहक आहेत काय ? |
होय |
2 |
जाबदार यांनी तक्रारदारास द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय ? |
नाही |
3 |
काय आदेश ? |
खालीलप्रमाणे |
कारणमिमांसा
मुद्दा क्र.1 ते 3
अ. तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक असल्याचा पुरावा नि.4/8 वर दिसून येतो. जाबदार यांनी सादर केलेल्या बिलामध्ये वीज ग्राहक क्र. 284220353344 निदेर्शित केलेला आहे. सदर वीज बिलाच्या पुराव्यामुळे तक्रारदार हे जाबदारांचे निश्चितपणे ग्राहक आहेत.
ब. सन 2010 मध्ये पहिल्यांदा शॉट सर्कीट होऊन रु.2,00,000/- चे नुकसान झाल्याचे कथन जाबदार यांनी केले आहे. त्यासाठी नि.क्र.4/3 वर पंचनामा, पुरावा म्हणून दाखल केला आहे. सदर पंचनाम्यामध्ये शॉर्ट सर्कीटमुळे जळीत झाले असे वाटते. सदर वाक्यावरुन निश्चित शॉर्ट सर्कीटमुळेच आग लागल्याचा बोध होत नाही. सदर पंचयादीमध्ये एका व्यक्तीची सही आहे. मात्र त्या व्यक्तीचे नाव नमूद नाही किंवा इतर अन्य पंचांची नावे अथवा सही दिसून येत नाही. त्यामुळे सदर पंचनामा कोणी केला हे स्पष्टपणे दिसून येत नसल्याने सदरचा पुरावा ग्राहय धरता येत नाही. सन 2010 मध्ये घटना घडूनही त्याबाबत कोणतीही तक्रार तक्रारदार याने जाबदाराकडे केल्याचा पुरावा सादर केलेला नाही. रु.2 लाख चे नुकसान झाल्यावर कोणीही व्यक्ती गप्प राहू शकेल का ? तारा लोंबकळत होत्या तर त्या संदर्भात लेखी तक्रार व तक्रारबुकात नोंद केलेचा कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. त्यामुळे जाबदाराने सेवेत त्रुटी केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत नाही.
क. सन 2011 मध्ये पुन्हा शॉर्टसर्कीटमुळे ऊसाला आग लागून ऊसपिकाचे व ठिबकसिंचन पाईपचे असे मिळून रु.2,30,000/- चे नुकसान झालेचे कथन तक्रारदाराने केले आहे. त्यासाठी गावकामगार तलाठी पंचनामा आणि अहवाल सादर करणेत आला आहे, मात्र सदर पंचनाम्याच्या वेळी जाबदार यांना घटनास्थळी समक्ष पाचारण करण्यात आलेले नाही. सदर घटनेसंदर्भातील फोटो पुरावा म्हणून दाखल करणेत आले. मात्र फोटोग्राफरचे नाव, त्याचे शपथपत्र, फोटोच्या निगेटीव्ह, फोटोग्राफरचे बिल जोडण्यात आलेले नाही. त्यामुळे सदरचे फोटोग्राफ्स त्याच क्षेत्राचे आहेत असे म्हणता येणार नाही आणि फोटोवरुन तारा लोंबकळत आहेत असे कुठेही दिसून येत नाही. जमीनीपासून तारांची उंची साधारणपणे 35 फूट असते, ऊसाची उंची 10 ते 12 फूट गृहीत धरली तर तारांना ऊसाच्या पिकांचा स्पर्श होणे आणि शॉर्टसर्कीट होणे अशक्यप्राय वाटते. त्यामुळे तक्रारदाराच्या सदर कथनात तथ्य वाटत नाही. 2011 मध्ये घडलेल्या घटनेपूर्वी लेखी स्वरुपाची तक्रार किंवा तक्रारवहीत नोंद केल्याचा पुरावा नाही. त्यामुळे इथेही सदर घटना घडल्याचे तत्त्वतः संभवत नाही असे मंचाला वाटते.
ड. तक्रारदाराने सादर केलेली ठिबकसिंचन मटेरिअल्सच्या बिलांचे निरिक्षण केले असता सदर बिले सन 2008 मधील दिसून येतात. त्या सर्व बिलांची एकूण रक्कम रु.1,00,464/- एवढी होते. पहिल्या जळीत घटनेच्या वेळी संपूर्ण ठिबक सिंचन जळले असे गृहीत धरले तर त्यानंतर पुन्हा नव्याने ठिबक सिंचन बसविल्याचा पुरावा तक्रारदारातर्फे देण्यात आलेला नाही. पहिल्या घटनेनंतर ठिबक सिंचन नव्याने बसविल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे दर्शविलेल्या खर्चाबाबत मंचाला साशंकता वाटण्यास वाव आहे. त्यामुळे झालेले नुकसान कल्पोकल्पित वाटते.
इ. नि.14 वर दर्शविलेप्रमाणे तक्रारदाराने संबंधीत कारखान्यास घातलेला ऊस सन 2009-10 साली 110 टन व सन 2010-11 साली 104 टन दिसून येतो. त्यामुळे ऊस जर जळालेला असेल तर उपरोक्त ऊसाचा पुरवठा तक्रारदाराने कसा काय केला ? या सर्व बाबी संभ्रमीत करणा-या असून सर्व गोष्टी ठरवून केल्याचे दिसून येतात व यामध्ये जाबदार क्र.1 ते 3 यांनी सेवेमध्ये कोणतीही त्रुटी केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे तक्रारदार हा जाबदारकडून नुकसान भरपाई भरुन घेण्यास सक्षम पुराव दाखल करु शकलेला नाही असे मंचाला वाटते. त्यामुळे खालील आदेश आम्ही पारीत करीत आहोत.
आदेश
तक्रारदाराची तक्रार रु.500/- च्या खर्चासह नामंजूर करणेत येत आहेत.
सांगली
दि. 24/05/2013
(के.डी. कुबल ) ( ए.व्ही. देशपांडे )
सदस्य अध्यक्ष