::निकालपत्र::
(पारीत व्दारा- श्री शेखर प्रभाकर मुळे, मा.अध्यक्ष.)
(पारीत दिनांक– 17 ऑक्टोंबर, 2017)
01. तक्रारकर्त्याने ही तक्रार ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली विरुध्दपक्ष महाराष्ट्र राज्य विद्दुत वितरण कंपनी आणि तिचे अधिका-यां विरुध्द सेवेतील कमतरता आणि निष्काळजीपणा या आरोपा खाली अतिरिक्त ग्राहक मंचा समक्ष दाखल केलेली आहे.
02.तक्रारकर्त्याचे तक्रारी नुसार संक्षीप्त कथन पुढील प्रमाणे-
तक्रारकर्ता हा व्यवसायाने शेतीकरी असून त्याचे मालकीची मौजा सोनोली, तालुक काटोल, जिल्हा नागपूर येथे शेती असून त्याचा सर्व्हे क्रं-195/1 असून क्षेत्रफळ 4.00 हेक्टर-आर एवढे आहे. सन-2011-2012 मध्ये त्याने 1.20 हेक्टर आर क्षेत्रात ऊसाच्या पिकाची लागवड केली होती. तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष महाराष्ट्र राज्य विद्दुत वितरण कंपनीचा ग्राहक असून त्याने शेतातील विद्दुत पंपासाठी विरुध्दपक्ष विद्दुत वितरण कंपनी कडून विज कनेक्शन घेतलेले आहे. त्याच्या शेतातील उभ्या पिका वरुन विद्दुत तारा गेलेल्या असून त्या तारा सैल पडल्यामुळे खाली लोंबकळत होत्या, त्या बद्दल त्याने विरुध्दपक्ष क्रं-1) चे कार्यालयातील तक्रार पुस्तीकेत दिनांक-16/11/2011 रोजी तक्रार सुध्दा नोंदविली होती परंतु त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. विरुध्दपक्षाच्या हलगर्जी आणि निष्काळजीपणा मुळे ऊसाच्या पिका वरुन गेलेल्या विद्दुत तारा खाली लोंबकळत असल्यामुळे त्यात दिनांक-22/02/2012 रोजी शॉर्ट सर्कीट होऊन ऊसाच्या पिकाला आग लागून पिकाचे नुकसान झाले, या संबधी त्याने पोलीस स्टेशन काटोल व उपविभागीय अधिकारी, काटेल यांचे कडे तक्रार नोंदविली. तक्रारी नंतर पोलीसानीं घटनास्थळ पंचनामा केला होता. त्याने मागितलेल्या सर्व दस्तऐवजांची पुर्तता केली होती परंतु विरुध्दपक्षाने त्याचा नुकसान भरपाई मिळण्यासाठीचा अर्ज खारीज केला. तक्रारकर्त्याचे अंदाजे रुपये-4,20,000/- एवढे नुकसान झाले, ज्यापैकी त्याला पुर्ती साखर कारखान्या कडून उर्वरीत ऊस विकल्या संबधी रुपये-69,000/- प्राप्त झाले होते म्हणून त्याने या तक्रारीव्दारे विरुध्दपक्षा कडून ऊसाचे पिकाचे नुकसानी पोटी रुपये-2,70,000/- एवढया रकमेची मागणी केली असून, त्याला झालेल्या मानसिक त्रासा बद्दल रुपये-50,000/- आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-30,000/- मिळावेत अशी मागणी केलेली आहे.
03. अतिरिक्त ग्राहक मंचाची नोटीस विरुध्दपक्ष महाराष्ट्र राज्य विद्दुत वितरण कंपनी तर्फे विरुध्दपक्ष क्रं-1) ते क्रं-4) यांना मिळाल्या नंतर ते मंचा समक्ष उपस्थित झाले व सर्व विरुध्दपक्षानीं एकत्रित लेखी उत्तर सादर केले, त्यांनी लेखी उत्तरात तक्रारकर्ता हा त्यांचा ग्राहक असल्याची बाब मान्य केली तसेच त्याच्या शेतावरुन विद्दुत तारा गेल्याची बाब सुध्दा मान्य केली परंतु त्यांनी ही बाब नाकबुल केली की, त्या विद्दुत तारा सैल पडल्यामुळे खाली लोंबकळत होत्या आणि त्या संदर्भात तक्रारकर्त्याने त्यांचे कडे तक्रार केली होती. त्यांनी ही बाब सुध्दा नाकबुल केली की, शेता वरील विद्दुत तारा या सैल पडल्यामुळे त्यात शॉर्ट सर्कीट होऊन आग लागली आणि त्यामुळे तक्रारकर्त्याचे शेतातील ऊसाचे पिक जळून त्याचे आर्थिक नुकसान झाले. परंतु पोलीस पंचनामा आणि पंचा कडे केलेली तक्रार विरुध्दपक्षाने मान्य केलेली आहे. तक्रारकर्त्याच्या शेतातील ऊसाचे पिक हे साखर कारखान्याने विकत घेतले होते. विद्दुत तारांमुळे शॉर्ट सर्कीट झालेले नसून क्षुल्लक आगीमुळे खाली पडलेली सुकलेली पाने जळाल्याने ऊसाचे पिकाला आग लागली. आगीच्या घटने मध्ये विरुध्दपक्षाचा हलगर्जीपणा तसेच निष्काळजीपणा कारणीभूत होता ही बाब नाकबुल केली. तक्रारकर्त्याने मागितलेली नुकसान भरपाई नामंजूर करुन तक्रार खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्षां तर्फे करण्यात आली.
04. तक्रारकर्त्याची तक्रार, तक्रारी सोबत दाखल दस्तऐवज, विरुध्दपक्षाचे उत्तर तसेच उभय पक्षांच्या लेखी युक्तीवादाचे अवलोकन करण्यात आले. उभय पक्षांचे वकीलांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला, यावरुन अतिरिक्त ग्राहक मंचा तर्फे पुढील प्रमाणे निष्कर्ष देण्यात येतो-
::निष्कर्ष ::
05. या प्रकरणात सर्व प्रथम असा मुद्दा उपस्थित होतो की, तक्रारकर्त्याच्या शेतातील ऊसाचे पिकाला लागलेली आग ही शॉर्ट सर्कीटमुळे लागली होती की, अन्य काही कारणामुळे लागली होती, ही बाब सिध्द करण्यासाठी तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष महाराष्ट्र राज्य विद्दुत वितरण कंपनीचे कार्यालयात दिलेल्या काही तक्रारींच्या प्रती दाखल केलेल्या आहेत, त्याचे अवलोकन केले असता असे दिसते की, त्या सर्व तक्रारी या आगीची घटना घडल्या नंतर दिलेल्या आहेत, आगीची घटना ही दिनांक-22/02/2012 रोजी घडली आणि दाखल केलेल्या सर्व तक्रारी या जून-2012 मध्ये दिल्याचे दिसून येते. परंतु त्या तक्रारीं मध्ये असे लिहिलेले आहे की, त्याच्या शेता वरुन गेलेल्या विद्दुत तारा या सैल पडल्यामुळे त्या लोंबकळत होत्या तसेच घटनेचा उल्लेख सुध्दा काही तक्रार अर्जातून केला आहे की, त्या तारा ताणल्या न गेल्यामुळे फेब्रुवारी 2012 मध्ये शॉर्ट सर्कीट मुळे एकदा ऊसाचे पिकाला आग लागली होती परंतु या तक्रारीं वरुन ही बाब सिध्द झाली असे म्हणता येणार नाही की, ऊसाचे पिकाला शॉर्ट सर्कीटमुळे आग लागली होती.
06. पोलीसानीं केलेल्या पंचनाम्याची प्रत दाखल केलेली असून त्यामध्ये ऊसाचे काही पिक जळाल्याची बाब नमुद केली आहे परंतु आग शॉर्ट सर्कीटमुळे लागली याचा उल्लेख घटनास्थळ पंचनाम्या मध्ये नाही.
07. विरुध्दपक्षाने दिनांक-29/04/2015 रोजी दिलेल्या पत्रा नुसार सदर्हू क्षेत्रा मधील सब-इंजिनियर यांनी घटना स्थळी भेट देऊन पाहणी केली होती आणि त्यांच्या पाहणी अहवाला नुसार 03 एकर मधील ऊसाचे पिक जे जळाले होते ते L.T. Line च्या जवळ आणि खाली होते परंतु त्या L.T. तारांमध्ये विद्दुत घर्षण (Electric Sparking) झाल्या बद्दल कुठलाही पुरावा आढळलेला नाही, त्या अहवाला वरुन विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याच्या पिकाचे नुकसान भरपाई संबधीचा अर्ज खारीज केला होता.
08. तक्रारकर्त्याने तहसिलदार, काटोल यांचे दिनांक-04/09/2012 रोजीचे प्रमाणपत्र दाखल केले, ज्यानुसार त्याच्या शेतातील 1.20 हेक्टर आर मधील ऊसाचे पिकाला शॉर्ट सर्कीटमुळे आग लागून अंदाजे रुपये-2,70,000/- नुकसान झाल्याचे नमुद केले आहे, हे प्रमाणपत्र तलाठी अहवाला वरुन दिलेले आहे. विरुध्दपक्ष महाराष्ट्र राज्य विद्दुत वितरण कंपनीच्या सब-इंजिनिअरने केलेला पाहणी अहवाल आणि तहसिलदार, काटोल यांनी दिलेले प्रमाणपत्र या दोघांचा जर विचार केला तर असे म्हणता येईल की, तक्रारकर्त्याचे शेतातील विद्दुत तारांच्या खाली ऊसाचे पिक होते, त्या तारा सैल पडल्यामुळे लोंबकळत होत्या हे सुध्दा विरुध्दपक्षाच्या सब-इंजिनियरच्या पाहणी अहवाला वरुन दिसून येते, कारण तक्रारीत असे स्पष्ट नमुद आहे की, ऊसाचे पिक हे विद्दुत तारांच्या फार जवळ होते म्हणजेच त्या विद्दुत तारा या लोंबकळलेल्या होत्या असा निष्कर्ष काढता येईल. तहसिलदार काटोल यांचे प्रमाणपत्र खोटे आहे किंवा ते वस्तुस्थितीला धरुन नाही असे विरुध्दपक्षाने कुठेही म्हटलेले नाही त्यामुळे एकंदर परिस्थितीचा सारासार विचार करता तक्रारकर्त्याचे शेतातील ऊसचे पिकाला लागलेली आग ही तारांमध्ये विद्दुत सर्कीट झाल्यामुळे लागली होती.
09. तक्रारकर्त्याने ऊसाचे पिकाचे नुकसानी संबधाने रुपये-2,70,000/- नुकसान भरपाई मागितली आहे. तक्रारकर्त्याचे शेतातील उर्वरीत ऊस हा साखर कारखान्याने विकत घेतलेला असून त्या संबधी रुपये-69,000/- एवढी रक्कम तक्रारकर्त्याला मिळालेली आहे. तक्रारकर्त्याचे असे म्हणणे आहे की, 1.20 हेक्टर आर क्षेत्रा मध्ये 270 ते 360 टना पर्यंत ऊसाचे उत्पादन झाले असते परंतु आगीमुळे जमतेम 46 टन ऊस निघाला. घटनेच्या मागील वर्षी रुपये-1500/- प्रती टन या भावाने त्याचे शेतातील ऊस खरेदी केला होता, त्यानुसार जर हिशोब केला तर तक्रारकर्त्याचे अंदाजे रुपये-4,00,000/ ते रुपये-5,00,000/- एवढया रकमेचे नुकसान झालेले आहे म्हणून त्याने उर्वरीत रुपये-2,70,000/- एवढया रकमेची नुकसान भरपाई मागितलेली आहे परंतु तक्रारकर्त्याने 7/12 उता-याची प्रत दाखल केलेली नाही, त्यामुळे त्याने नेमक्या किती क्षेत्रात ऊसाचे पिकाची लागवड केली होती आणि त्यापैकी किती क्षेत्रातील ऊसाचे पिक जळाले होते या बद्दल खात्रीशीर पुरावा नाही. तसेच तक्रारकर्त्याने पहिल्यांदा सन-2012 मध्ये ऊसाचे पिकाची लागवड केली होती. साखर कारखान्याने रुपये-1500/- प्रती टन भावाने ऊस विकत घेतला होता, त्या बद्दलचे प्रमाणपत्र दाखल केले, त्यामुळे जरी किती क्षेत्रातील ऊसाचे पिकाचे नुकसान झाले या बद्दल खात्रीशीर पुरावा नाही तरी तक्रारकर्त्याचे त्याचे शेतातील ऊसाचे पिकाला लागलेल्या आगीमुळे काही प्रमाणात आर्थिक नुकसान झाले ही बाब सिध्द होते. तसेच विरुध्दपक्षाने त्याच्या शेतावरुन गेलेल्या विद्दुततारांची निट काळजी घेतली नव्हती ज्यामुळे त्या विद्दुत तारा सैल होऊन त्या लोंबकळत पिकावर खाली आल्या होत्या हे सुध्दा दाखल दस्तऐवजा वरुन सिध्द होते म्हणून मंचाचे मते तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष महाराष्ट्र राज्य विद्दुत वितरण कंपनी कडून काही प्रमाणात पिकाचे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यास पात्र आहे.
10. उपरोक्त नमुद वस्तुस्थितीचा विचार करुन आम्ही तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
::आदेश::
1) तक्ररकर्ता श्री राजेंद्र गुलाबराव बंदे यांची, विरुध्दपक्ष महाराष्ट्र राज्य विद्दुत वितरण कंपनी तर्फे विरुध्दपक्ष क्रं-(1) ते (4) यांचे विरुध्दची तक्रार वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या अंशतः मंजूर करण्यात येते.
2) विरुध्दपक्ष महाराष्ट्र राज्य विद्दुत वितरण कंपनी तर्फे विरुध्दपक्ष क्रं-(1) ते (4) यांनी, तक्रारकर्त्याचे शेतातील ऊसाचे पिकाचे नुकसानी संबधाने भरपाई म्हणून रुपये-1,00,000/- (अक्षरी रुपये एक लक्ष फक्त) एवढी रक्कम तक्रारकर्त्याला द्दावी.
3) तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-15,000/- (अक्षरी रुपये पंधरा हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) विरुध्दपक्ष महाराष्ट्र राज्य विद्दुत वितरण कंपनी तर्फे विरुध्दपक्ष क्रं-(1) ते (4) यांनी द्दावेत.
4) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष महाराष्ट्र राज्य विद्दुत वितरण कंपनी तर्फे विरुध्दपक्ष क्रं-(1) ते (4) यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या (Jointly & Severally) निकालपत्राची प्रत मिळाल्या पासून 30 दिवसांचे आत करावे.
5) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.