निकालपत्र :- (दि.21.12.2010)(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तिवाद केला. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, सामनेवाला विद्युत कंपनीने कोणतेही कारण नसताना कमर्शियल मिटरमार्फत वीजेचा गैरवापर करतात असा आरोप केला व कमर्शिअल तसेच घरगुती मिटर जप्त केले व रुपये 1,54,714/- भरणेविषयी दि.30.03.2002 रोजी कळविले. सदर रक्कम भरलेशिवाय लाईट चालू करता येणार नाही असे उत्तर दिले. सामनेवाला यांनी कोर्टात खोटी केस दाखल केली असल्याने व झालेल्या बदनामीमुळे तक्रारदारा वडिल मानसिक धक्क्याने दि.23.11.2008 रोजी मयत झाले. तक्रारदारांनी सामनेवाला यांना विद्युत कनेक्शन चालू करणेबाबत वकिलामार्फत नोटीस पाठविली. त्यास सामनेवाला यांनी खोटया मजकूराचे उत्तर पाठविले व सेवेत त्रुटी केलेली आहे. सबब, सामनेवाला यांनी तक्रारदारांचे घरगुती व कमर्शियल मिटर चालू करुन द्यावेत असे आदेश व्हावेत. शारिरीक-मानसिक त्रासापोटी रुपये 10,000/-, नुकसान भरपाई रुपये 3 लाख व खर्च रुपये 5,000/- देणेचा आदेश व्हावा अशी विनंती केली आहे. (3) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत तक्रारदारांचे विरुध्द दाखल केलेल्या क्रि.केस नं 32/02 चे चार्जशीट, दि.22.01.02 चे वीज देयक, सामनेवाला यांनी दि.05.03.02, दि.30.03.02, दि.01.01.03 रोजी पाठविलेली पत्रे, तक्रारदारांनी पाठविलेली नोटीस दि;27.07.09, सामनेवाला यांचे दि.07.08.09 चे उत्तर इत्यादीच्या प्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (4) सामनेवाला विद्युत कंपनीने त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रारदारांच्या वडिलांनी स्क्रॅप मर्चंट या दुकानामध्ये घरगुती कारणाकरिता दि.22.09.2009 रोजी विद्युत पुरवठा घेतला. त्याचा ग्राहक क्र.2502122112808 असा आहे. तसेच, सन 1998 पासून व्यापारी कारणाकरिता विद्युत पुरवठा घेतला, त्याचा क्र.250212094702 असा होता. सामनेवाला विद्युत कंपनीच्या फिरते पथकाने दि.14.02.2002 रोजी तक्रारदारांच्या स्क्रॅप मर्चंट दुकानामध्ये उपरोक्त दोन्ही कनेक्शनची तपासणी केली असता विद्युत कनेक्शनच्या मिटरला सामनेवाला यांनी बसविलेली काच सरकवून निर्माण होणा-या फटीतून मिटरमधील फिरणारी चकती थांबवून वारंवार मिटर रिडींग कमी करुन वीज चोरी करीत असल्याचे आढळून आल्याने एकूण रक्कम रुपये 1,54,871/- इतक्या रक्कमेची वीज चोरी केली आहे व तक्रारदारांच्या वडिलांवर पेठ वडगांव पोलीस स्टेशन येथे दि.15.02.2002 रोजी फिर्याद नोंदविली व पोलीसांनी त्याची चौकशी करुन ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट वर्ग-1, पेठ वडगांव यांचे कोर्टात फौजदारी केस नं.32/2002 दाखल केली. आरोपी रमेशचंद्र शहा यांचा मृत्यू झालेने कोर्टाने दि.31.01.2009 रोजी सदर फिर्याद निकाली काढली. दि.14.02.2002 रोजी तात्पुरत्या स्वरुपात वीज पुरवठा बंद केला होता व दि.31.05.2002 रोजी कायमस्वरुपी वीज पुरवठा बंद केलेला आहे व फायनल बिलाची रक्कम रुपये 43,650/- सामनेवाला वीज वितरण कंपनीकडे जमा करुन वीज पुरवठा सुरु करुन घेतलेला नाही. त्यामुळे कायमस्वरुपात बंद केलेला पुरवठा पुन्हा चालू करता येणार नाही. सबब, तक्रारदारांची तक्रार फेटाळणेत यावी व नुकसानीदाखल रुपये 10,000/- देणेबाबत आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे. (5) सामनेवाला यांनी त्यांच्या म्हणण्यासोबत फिरते पथकाचा तपासणी अहवाल, स्पॉट इन्स्पेक्शन रिपोर्ट, वर्कशीट, पोलीसांत दिलेली फिर्याद, पोलीसांनी केलेला पंचनामा, क्रि.केस नं.32/03 मधील चार्जशीट, मयत रमेशचंद शहा यांना दिलेले पत्र, दुरुस्त बिल, तक्रारदारांचे नोटीसीस दिलेले उत्तर इत्यादीच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. (6) या मंचाने उपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन केले आहे. तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीत तक्रारीस कारण हे सामनेवाला विद्युत कपंनीच्या फिरत्या पथकाने तक्रारदारांच्या मिटरची तपासणी सन 2002 साली केली आहे व तक्रारदारांच्या वडिलांवर चोरीची फिर्याद दाखल केली होती. सदर तक्रारीस सन 2002 साली कारण घडलेले आहे व त्याबाबतची दाद ही प्रस्तुत तक्रारीने मागत आहेत. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 24(ए) यातील तरतुद विचारात घेतली असता सदर तक्रारीस मुदतीचा बाध येत आहे. प्रस्तुत तक्रारीमध्ये असलेल्या गुणवत्तेचा विचार करता सन 2002 साली वीज चोरीबाबतचा गुन्हा सामनेवाला विद्युत कंपनीने तक्रारदारांच्या वडिलांवर दाखल केलेला आहे. तक्रारदारांचे वडिल दि.23.11.2008 रोजी मयत झाले आहे. त्यामुळे त्यांचेविरुध्द दाखल केलेली चोरीची फिर्याद कोर्टाने काढून टाकलेली आहे. तसेच, विद्युत कंपनीने दि.14.02.2002 रोजी तात्पुरत्या स्वरुपात विद्युत पुरवठा बंद करुन दि.31.05.2002 रोजी विद्युत पुरवठा कायमस्वरुपी बंद केलेला आहे व अंतिम देयक रुपये 43,650/- इतके असलेचे दिसून येते. विद्युत चोरीचा निर्माण झालेला वाद तसेच त्या अनुषंगाने विद्युत कंपनीने दाखल केलेली फौजदारी तक्रार इत्यादी बाबी विचारात घेतल्या असता सदरचा वाद हा ग्राहक वाद होत नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1. तक्रारदारांची तक्रार फेटाळणेत येते. 2. खर्चाबाबत आदेश नाहीत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |