जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – ०१/२०१३
तक्रार दाखल दिनांक – ०२/०१/२०१३
तक्रार निकाली दिनांक – ३०/१०/२०१३
श्री. हिदायतअली जोरावरअली सैय्यद, उ.व.६४,
धंदा – सेवानिवृत्त, राहणार – प्लॉट नं.५४,
वैभवनगर, जमनागिरी रोड, धुळे, तालुका व
जिल्हा – धुळे. ------------- तक्रारदार
विरुध्द
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.
नोटीसीची बजावणी – म. अधिक्षक अभियंता
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, सहयाद्री
बिल्डींग, आनंदनगर, देवपूर, धुळे, तो.जि. धुळे.
यांचेवर व्हावी. ------------- सामनेवाला
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्या – सौ.एस.एस.जैन)
(मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – वकील श्री.डी.डी. जोशी)
(सामनेवाला तर्फे – वकील श्री.वाय.एल. जाधव)
निकालपत्र
(दवाराः मा.सदस्या – सौ.एस.एस.जैन)
सामनेवाला यांनी तक्रारदारस अवाजवी बील देऊन सेवेत कमतरता केल्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.
१. तक्रारदार यांचे थोडक्यात तक्रार अशी आहे की, तक्रारदारचे वडीलांचे नावावर वीज वितरण सेवा कार्यरत आहे. तक्रारदारचे वडिलांचा ग्राहक क्रमांक ०८००१०१८४४१३ असा असून मीटर क्र.७६०११९१०५४ असा आहे. तक्रारदारास साधारणपणे वीजेचे युनीट दरमहा ५० ते ६० चे दरम्यान असते. परंतु डिसेंबर- ११ पासून हे युनीटचे प्रमाण वाढून ते ४४२ युनीट, जानेवारी-२०१२ मध्ये ३२४ युनीट, फेब्रुअरी-१२ मध्ये ३३७ युनीट, मार्च-१२ मध्ये २८७ युनीट, एप्रिल-१२ मध्ये ४६२ युनीट, मे-१२ मध्ये ३०९ युनीट, ऑगस्ट-१२ मध्ये ४०३ युनीट, सप्टेंबर-१२ मध्ये ४६१ युनीट, ऑक्टोंबर-१२ मध्ये ४४३ युनीट असे वापर दाखवलेले आहे.
२. तक्रारदारने डिसेंबर-११ मध्ये ४४२ युनीटचे बील आल्यावर सामनेवाला यांच्या कार्यालयात त्वरीत संपर्क साधून जास्तीचे बीलाबाबत तक्रार केली. त्यावेळेस सामनेवाला यांनी २०-२५ दिवसात मीटर तपासून कळविण्यात येईल असे सांगितले. परंतु त्यानंतरही उपयोग न झाल्याने तक्रारदारने दि.२७/०८/१२ रोजी लेखी अर्ज देवूनही सामनेवाला यांनी काही एक कार्यवाही केलेली नाही. तक्रारदारास जून-१२ चे बील रू.११८०/- आलेले आहे ते त्यांनी दि.१६/०७/१२ रोजी रू.१२००/- भरलेले आहेत. जास्तीचे रू.२०/- जुलै-१२ च्या बीलात वजावट दाखवणे आवश्यक असतांना ते वजावट दाखवलेले नाहीत.
३. तक्रारदारचे पुढे असे म्हणणे आहे की, तक्रारदारच्या विनंतीनुसार अवास्तव बील रदृ केले नाहीत म्हणून सामनेवाला यांना दि.२६/०९/१२ रोजी रजिस्टर नोटी पाठविली असता सामनेवाला यांनी खोटे, चुकीचे नोटीस उत्तर पाठविले व त्यानंतर सुध्दा सप्टेंबर, ऑक्टोंबर-१२ चे बील अवास्तव व अवाजवी पाठविलेले आहे. तक्रारदारने सर्व वीज बीलांची रक्कम भरलेली आहे. अशाप्रकारे सामनेवाला यांनी सेवेत कमतरता केली आहे.
४. तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडून डिसेंबर-११ ते ऑक्टोबर-१२ पर्यंत सर्व बील रदृ करून नवीन वाजवी व योग्य बील अदा करावे. शारिरिक, आर्थिक, मानसिक त्रासापोटी रू.१०,०००/-, तसेच तक्रार अर्जाचा खर्च मिळावा अशी विनंती केली आहे. तक्रारदारने आपल्या म्हणण्याच्या पृष्टयार्थ नि.६ सोबत मार्च ते ऑक्टोबर-१२ चे वीज बीलाची प्रत, तक्रार अर्जाची प्रत, नोटीस प्रत, इत्यादी कागदपत्रे दाखल केलेले आहेत.
५. सामनेवाला यांनी आपले लेखी म्हणणे नि.११ वर दाखल केलेले आहेत. त्यात त्यांनी तक्रार खोटी, चुकीची व बेकायदेशीर आहे. तक्रारदारने वीजचोरीचे बिलाबाबत हरकत उपस्थित केली आहे. नियमित बील भरून सेवा दिली नाही अशी तक्रार नाही यास्तव तक्रारीस अधिकार क्षेत्राची बाधा येत आहे. खाते उतारा पाहता, मीटरवर वाचन येवू दिले नाही, मीटरमध्ये हेराफेरी, छेडछाड केलेली होती. मीटर वाचन येत नाही अश्या ग्राहकांकडे सामनेवालाचे भरारी पथक तपासणी कामी जातात. त्यावेळी तक्रारदारकडे त्याचे समक्ष दि.१८/११/११ रोजी सकाळी मीटरची स्थिती व स्थळ पाहणी अहवाल तयार केला. यावेळी मीटरचे सील तुटलेले आढळले. वापर पाहता बील कमी आढळले. तरी पुढील सखोल तपासणी कामी मीटर सील करून, तपासणी कक्षात त्याच दिवशी सकाळी ११ वाजता कार्यालयात बोलाविण्यात आले. त्यावेळी सर्वासमक्ष तपासणी केली असता मीटर ९५.९७% (कमी) फिरतांना आढळले. मीटर उघडून आतील निरीक्षण केले असता मीटरच्या मूळ सर्किट मध्ये दोन्ही सीटीच्या करडया (जांभळया) रंगाच्या वायर कट करून त्यामध्ये प्रत्येकी एक करडया रंगाचे रेझीस्टन जोडलेले आढळून आले. यामुळेच मीटर वरील वाचन ९५.९७% स्लो येत होते. पुर्ण तपासणी नंतर मीटर पुन्हा संयुक्त सहयांचे दोन कागदी सील लावून युनिट प्रमुखाचे ताब्यात देण्यात आले.
६. वीज चोरीची आकारणी १ वर्षाची कालावधी करिता प्रचलीत दराप्रमाणे त्यातून भरलेली बिल वजा करून एकूण रू.१९१९०/- चे विदयुत कायदा कलम १५२ प्रमाणे तडजोड आकार भाराप्रमाणे २ के. डब्ल्युचे रू.४०००/- प्रत्येकी प्रमाणे रू.८०००/- चे स्वतंत्र बिल देण्यात आले आहे. तक्रारदारचा प्रथम गुन्हा असल्याने तडजोड आकाराचे बिल कलम १५२ प्रमाणे देण्यात आले आहे. डिसेंबर-११ चे कारण दर्शवून तक्रार दाखल मुदतीत नाही. सबब तक्रार खर्चासह रदृ व्हावी. तसेच खोटया तक्रारीबदृल तक्रारदारकडून कॉस्ट रू.१०,०००/- दयावे, असे नमूद केले आहे.
७. सामनेवाला यांनी आपले म्हणण्याचे पृष्टयार्थ नि.१३ सोबत, दि.१८/११/११ चा मीटर तपासणी रिपोर्ट, तपासणी अहवाल प्रत, प्रचलित दराने केलेल बिलचे असेसमेंट शीट प्रत, बीलाची प्रत, कलम १५२ प्रमाणे कंपौंडिंग बील प्रत, विजचोरीबाबतचा तपशील प्रत, खाते उतारा प्रत, इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
८. तक्रारदारची तक्रार, सामनेवाला यांचा खुलासा, दोन्ही वकिलांचा युक्तीवाद ऐकता तसेच दाखल कागदपत्रे पाहता आमच्या समोर निष्कर्षाकरिता खालील मुददे उपस्थित होतात. त्याची उत्तरे आम्ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
मुददे निष्कर्ष
१. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना दयावयाच्या
सेवेत कमतरता केली आहे काय ? नाही
२. आदेशकाय ? अंतिम आदेशाप्रमाणे
विवेचन
९. मुद्दा क्र.१- तक्रारदार यांची मुख्य तक्रार अशी आहे की, तक्रारदारचे वीजेचे युनीट दरमहा ५० ते ६० युनीट येत होते, परंतु डिसेंबर-११ पासून ते ऑक्टोबर-१२ पर्यंत युनीट अचानकपणे वाढून आलेले असल्याने सामनेवाला यांना वेळोवेळी तोंडी व लेखी अर्ज करूनही अवास्तव बील रद्द केले नाही. त्यामुळे तक्रारदारने दि.२६/०९/१२ रोजी रजिस्टर नोटीस पाठविली परंतु सामनेवाला यांनी खोटे, चुकीचे नोटीस उत्तर पाठविले व त्यानंतर सुध्दा काहीएक कार्यवाही केलेली नाही.
१०. याबाबत सामनेवाला यांचा खुलासा व दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता, सामनेवाला यांनी नि.१३ सोबत तक्रारदारचे मीटर तपासणी अहवाल, अहवालाप्रमाणे केलेले बील, विदयुत कायदा १५२ प्रमाणेचे कंपौंडिंग बील, विजचोरी बाबतचा तपशील तसेच खाते उतारा प्रत दाखल केलेली आहे. दि.१८/११/११ च्या तक्रारदारचे मीटर तपासणी अहवालात, तसेच संयुक्त तपासणी अहवालात मीटरचे सील तुटलेले होते. सदर मीटरच्या मुळ सर्कीटमध्ये दोन्ही सीटींच्या करडया रंगाच्या वायर कट करून त्यामध्ये प्रत्येकी एक करडया रंगाचे रेझीस्टन जोडलेले आढळून आले. सदर मीटरमध्ये केलेला फेराफार/ हेराफेरीमुळे मीटर ९५.९७% स्लो असल्याचे आढळून आले, असू नमूद केलेले आहे. यावरून तक्रारदारने वीज चोरी केल्याचे निष्पन्न होत आहे. तसेच सामनेवाला यांनी सदर अहवालाप्रमाणे प्रचलित दराने केलेले असेसमेंट शीट तसेच दि.१९/११/११ चे असेसमेंट बील व कंपौडिंग बील दाखल केलेले आहे. सदर असेसमेंट शीट व बीलांवरही विज चोरी बाबत उल्लेख आहे व सदरचे दोन्ही बीले तक्रारदारने भरलेली नसल्याचे खाते उतारा पाहता निर्देशनास येत आहे. यावरून तक्रारदारांस पूर्वी येत असलेले कमी युनीटचे बील हे त्याने केलेल्या मीटरमधील हेराफेरी/ फेराफेरीमुळे होते हे सिध्द होत असल्याने त्यांनतर आलेली वाढीव युनीटचे बील हे योग्य असेल असे आमचे मत आहे. तसेच तक्रारदारने सामनेवाला यांनी दाखल केलेली कागदपत्रे ही खोटी, चुकीचे आहेत हया बददल काहीएक हरकत घेतलेली नाही किंवा तसे सिध्दही केलेले नाही.
११. सामनेवाला यांनी दाखल केलेल्या C.P.L. पाहता तक्रारदारचा ऑक्टोंबर-११ पर्यंत मीटर क्र.९०००२६८२३६ असा होता. सदर मीटर हे वीज चोरी संदर्भात सील करण्यात आल्याचे मीटर तपासणी रिपोर्टवरून स्पष्ट होत आहे व त्यानंतर तक्रारदारला नवीन मीटर क्र.७६०११९१०५४ चे दिलेले असल्याने त्यापुढील तक्रारदारास आलेले बील हे योग्य आहे, असे आमचे मत आहे.
१२. तसेच सामनेवाला यांनी पाठविलेले नोटीस उत्तर ही तक्रारदारने मंचासमोर आणलेले नाही व ते चुकीचे असल्याचे सिध्द केलेले नाही. संपूर्ण तक्रारीत नेमके वाजवी बिल किती दराचे होते ? व अवाजवी बील म्हणजे किती जास्त रकमेचे आहे हे ही सप्रमाण सिध्द केलेले नाही. यावरून सामनेवाला यांनी तक्रारदार यास दयावयाच्या सेवेत कमतरता केलेली नाही या मतास आम्ही आलो आहोत, म्हणून मुद्दा क्र.१ चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत.
१३. मुद्दा क्र.२ - वरील विवेचनावरून आम्ही खालीलप्रमाणे ओदश देत आहोत.
आ दे श
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
२. तक्रारदार व सामनेवाला यांनी आपआपला खर्च सोसावा.
धुळे.
दि.३०/१०/२०१३.
(श्री.एस.एस. जोशी) (सौ.एस.एस. जैन) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्य सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.