ग्राहक तक्रार अर्ज क्र. 225/2011
दाखल दिनांक. 08/04/2011
अंतीम आदेश दि. 28/01/2014
कालावधी 02 वर्ष,09 महिने, 20 दिवस
नि.08
अतिरीक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, जळगाव.
धनराज विठठल धनगर, तक्रारदार
उ.व.50, वर्षे धंदा-शेती, (अॅड.निलेश इ. लढे)
रा. कमळगांव, पोष्ट पंचक
ता. चोपडा, जि. जळगांव.
विरुध्द
1. कनिष्ठ अभियंता, सामनेवाला
म.रा.वि.वि.कं.मर्या. अडावद (एकतर्फा)
ता. चोपडा, जि. जळगांव.
2. सहायक अभियंता,
म.रा.वि.वि.कं. मर्या. चोपडा,
3. कार्यकारी अभियंता
म.रा.वि.वि.कं. मर्या. धरणगांव.
ता. धरणगांव. जि. जळगांव.
(निकालपत्र अध्यक्ष, मिलींद.सा.सोनवणे यांनी पारीत केले)
नि का ल प त्र
प्रस्तुत तक्रार सेवेतील कमतरतेमुळे ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 अन्वये दाखल करण्यात आलेली आहे.
02. तक्रारदाराचे म्हणणे थोडक्यात असे की, ते शेतकरी आहेत. मौजे, कमळगांव ता. चोपडा येथे त्यांच्या मालकीची गट क्र. 310/2 ही शेत जमीन आहे. त्यात शेतजमीनीला पाणी पुरवठा करण्यासाठी एक इलेक्ट्रीक पंप आहे. त्यासाठी त्यांनी सामनेवाल्यांकडून वीज जोडणी घेतलेली आहे. त्यांचा ग्राहक क्र. 135497042740 असा आहे. त्यांनी एप्रिल 1997 पर्यंतची सर्व वीज बिले भरलेली आहे.
03. तक्रारदाराचे असेही म्हणणे आहे की, एप्रिल 1997 पासून विहीरीला पाणी नसल्यामुळे त्यांचा वीज पंप बंद केलेला आहे. आजतागायत तो बंदच आहे. आर्थिक अडचणी मुळे त्यांनी त्या गटातील 92 आर एवढे क्षेत्र दुस-या शेतक-यास विकलेले आहे. अशा परिस्थितीत त्यांचा वीज पंप बंद असतांनाही सामनेवाल्यांनी त्यांना सन 1997 पासून वीज वापर न दाखवता बेकायदेशीर रित्या वीज बिले दिलेली आहे. दि. 29/01/2004 रोजी त्यांनी सामनेवाला क्र. 2 यांना लेखी पत्र देवून विहीरीस पाणी नसल्यामुळे सुमारे पाच ते सहा वर्षापासून वीज पंप बंद आहे. त्यामुळे कमीत कमी वीज बिल देण्यात यावे असा अर्ज दिला. मात्र त्यावर काहीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यानंतर ही वीज बिले दिल्यामुळे त्यांनी दि. 08/11/2005 व 14/12/2005 रोजी सामनेवाल्यांकडे अर्ज दिले. तसेच, दि. 23/11/2005 रोजी वायरमन श्री. शांताराम सावका भालेराव, यांनी त्यांच्या विहीरीस प्रत्यक्ष भेट देवून पाहणी करुन पाणी नसल्यामुळे चार ते पाच वर्षा पासून बागायती शेती होत नाही असा दाखला देवूनही, सामनेवाल्यांनी त्यांच्या अर्जावर कुठलीही कारवाई केलेली नाही. सामनेवाल्यांनी दि. 25/10/2010 रोजी त्यांच्या कडे रु. 1,28,210/- इतके वीज बिल थकीत आहे, म्हणून त्याची मागणी केली. सदरचे वीज बिल व आकारणी बेकायदेशीर आहे. त्यामुळे सन 1997 ते 2011 या कालावधीतील वीज बिले कमीत कमी चार्ज लावून आकारावीत. मानसिक त्रासापोटी रु. 25,000/- व अर्ज खर्च रु. 5,000/- मिळावेत, अशा मागण्या तक्रारदाराने मंचाकडे केलेल्या आहेत.
04. तक्रारदाराने दस्तऐवज यादी नि. 04 अन्वये, त्यांनी सामनेवाल्यांशी केलेला पत्र व्यवहार (एकूण चार पत्र), वायरमन भालेराव यांचा दाखला, तलाठी कमळगांव यांचा दाखला, विवादीत वीज बिल, गट क्र. 310/2 चा 7/12 उतारा, त्यांनी सामनेवाल्यांना दिलेली नोटीस व त्यास सामनेवाल्यांनी दिलेले उत्तर इ. कागदपत्रे दाखल केलेली आहे.
05. सामनेवाल्यांना तक्रार अर्जाची नोटीस बजावण्यात आली. मात्र, त्यानंतरही सामनेवाले मंचात हजर झाले नाहीत. त्यामुळे आमच्या पुर्वाधिकारी मंचाने प्रस्तुत अर्ज सामनेवाल्यां विरुध्द एकतर्फा चालविण्यात यावा, असा आदेश पारीत केला.
06. निष्कर्षासाठींचे मुद्दे व त्यावरील आमचे निष्कर्ष कारणमिमांसेसहीत खालीलप्रमाणे आहेत.
मुद्दे निष्कर्ष
1. तक्रारदार सामनेवाला यांचा ग्राहक आहे काय ? -- होय
2. सामनेवाला यांनी तक्रारदारास सेवा देतांना
कमतरता केली काय ? -- होय
3. आदेशाबाबत काय ? --अंतीम आदेशाप्रमाणे.
का र ण मि मां सा
मुद्दा क्र.1 बाबतः
07. तक्रारदारांनी त्यांची शेतजमीन गट क्रं. 310/2 यात वीज पंपास जोडणी घेतलेली आहे. त्यांचा ग्राहक क्र. 135497042740 असा आहे. या बाबी प्रतिज्ञापत्र नि. 07 मध्ये शपथेवर सांगितलेल्या आहेत. त्यांनी नि. 4/8 ला दाखल केलेला 7/12 उतारा व नि. 04/7 ला सामनेवाल्यांनी दि. 25/10/2010 रोजी जारी केलेले विवादीत वीज बिल, हा कागदोपत्री पुरावा तक्रारदारांच्या म्हणण्यास पुष्टी देतो. तक्रारदारांचा हा पुरावा सामनेवाल्यांनी हजर होवून आव्हानीत केलेला नाही. त्यामुळे तक्रारदार सामनेवाल्यांचे ग्राहक आहे ही बाब शाबीत होते. यास्तव मुद्दाक्र. 1 चा निष्कर्ष आम्ही होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र.2 बाबतः
08. तक्रारदारांनी तक्रार अर्जात व पुराव्याचे प्रतिज्ञापत्र नि. 07 मध्ये शपथेवर दावा केला की, एप्रिल 1997 पावेतोची वीज बिले त्यांनी नियमित पणे भरलेली आहेत. मात्र सन 1997-98 पासून विहीरीला पाणी नसल्यामुळे वीज मोटारीचा वापर होत नव्हता. तरी देखील सामनेवाल्यांनी त्यांना रेग्युलर वापरा प्रमाणे वीज बिल दिल्यामुळे त्यांनी दि. 29/01/2004 रोजी सामनेवाला क्र. 2 यांना सुमारे पाच ते सहा वर्षापासून वीज पंपाचा वापर होत नसल्यामुळे कमीत कमी वीज बिल देण्यात यावे असा विनंती अर्ज केला. त्यानंतरही दि. 08/11/2005 व 14/12/2005 रोजी तशाच आशयाचे अर्ज सामनेवाल्यांना दिलेले आहेत.
09. तक्रारदारांनी पुढे असाही दावा केलेला आहे की, दि. 23/11/2005 रोजी वायरमन शांताराम भालेराव यांनी विहीरीची प्रत्यक्ष पाहाणी करुन सुमारे चार ते पाच वर्षा पासून बागायती हंगाम घेत नसल्या बाबतचा दाखल देवूनही सामनेवाल्यांनी त्यांच्या विनंती अर्जावर काहीही कारवाई केलेली नाही. उलट दि. 25/10/2010 रोजी त्यांना रु. 1,28,210/- इतक्या रक्कमेचे वीज बिल देण्यात आले.
10. तक्रारदाराने नि. 04/1 ते 4 ला दाखल केलेला पत्र व्यवहार स्पष्ट करतो की, त्यांनी सामनेवाल्यांना दि. 29/01/2004 पासून वेळोवेळी विहीरीत पाणी नसल्या बाबतची बाब सूचित करुन कमीत कमी वीज बिल आकारणी करावी अशी विनंती केलेली आहे. त्याच प्रमाणे वायरमन भालेराव यांनी दिलेला दाखला नि. 4/5 स्पष्ट करतो की, तक्रारदाराच्या विहीरीस सूमारे 1997 पासून पाणी नसल्यामुळे बागायती पिके घेतली गेलेली नाही. आमच्या मते वरील कागदोपत्री पुरावा तोंडी पुराव्याशी जोडून पाहता, हेच स्पष्ट करतो की, तक्रारदाराची विनंती अर्ज सामनेवाल्यांनी गांर्भियाने घेतलेले नाहीत. तक्रारदाराच्या मागण्या आम्हांस अवास्तव वाटत नाहीत. कोणताही शेतकरी जो शेती उत्पन्न घेण्यासाठी वीज पंपाचा वापर करतो, वीज वितरण करण्या-या कंपनीचा सामान्य ग्राहक राहत नाही. कारण शेतीतून निघणारे उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नास वाढविणारे असते. आज ही भारतीय अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीवरच अवलंबून आहे. त्यामुळे शेतकरी ग्राहक हा घरगुती वीज वापरणा-या ग्राहकापेक्षा निश्चितच महत्वाचा आहे. त्यामुळे शेतकरी ग्राहकाने केलेल्या मागण्या या तातडीने व गांभिर्यपुर्वक विचारात घेतल्या जाणे आवश्यक ठरते. प्रस्तुत केस मध्ये सामनेवाल्यांनी तशा प्रकारे दखल घेतलेली दिसत नाही. उलट तक्रारदारास रु. 1,28,210/- इतक्या रुपयाचे वीज बिल पाठविण्यात आलेले दिसते. त्या बिलात दि. 30/06/2010 ते दि. 30/09/2010 या कालखंडात वीज आकारापोटी रु. 857/- आकारण्यात आलेले दिसतात. वीज वापर शुन्य असतांना तक्रारदारास त्या महिन्या पोटी रु. 4,183/- इतक्या रक्कमेची आकारणी करण्यात आलेली दिसते. आमच्या मते, अशा प्रकारची आकारणी स्वैर व अन्यायकारक आहे. सामनेवाल्यांना तक्रारदारांनी अनेक विनंत्या केल्यानंतर ही त्याचे वीज बिल दुरुस्त न करुन देणे व उलट जास्तीचे वीज बिल त्यास पाठविणे सेवेतील कमतरताच ठरतात. यास्तव मुद्दाक्र. 2 चा निष्कर्ष आम्ही होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र.3 बाबतः
11. मुद्दा क्र. 1 व 2 चे निष्कर्ष स्प्ष्ट करतात की, तक्रारदार सामनेवाल्यांचे ग्राहक आहेत. एप्रिल 1997 पासून त्या आजतागायत तक्रारदारांच्या विहीरीला पाणी नसल्यामुळे वीज पंपाचा वापर झालेला नाही. तसे असतांना देखील सामनेवाल्यांनी त्यांना दि. 25/10/2010 रोजी रु. 1,28,210/- इतक्या रक्कमेचे वीज बिल देणे, ही सेवेतील कमतरता आहे. ते अवास्तव वीज बिल रदद करण्यास पात्र आहे. त्यामुळे एप्रिल 1997 ते एप्रिल 2011 या कालावधीसाठी दरमहा वीज बिल कमीत कमी चार्ज म्हणून आकारण्यात यावे, ही तक्रारदाराची विनंती मंजूर होण्यास पात्र आहे. त्याचप्रमाणे सामनेवाल्यांनी केलेल्या सेवेतील कमतरतेमुळे तक्रारदारस शारीरीक व मानसिक त्रास झाला म्हणून नुकसान भरपाई म्हणून रु. 5,000/- व अर्ज खर्चापोटी रु. 3,000/- मिळण्यास देखील तक्रारदार देखील पात्र ठरतात. यास्तव मुद्दा क्र.3 चा निष्कर्षापोटी आम्ही खालील आदेश देत आहोत.
आ दे श
1. सामनेवाल्यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी
तक्रारदारास दिलेले दि.25/10/2010 रोजी दिलेले
रु. 1,28,210/- च्या वीज बिल रदद करुन एप्रिल 1997
ते एप्रिल 2011 या कालावधीसाठी कमीत कमी वीज
बिल (मिनीमम चार्ज) आकारावे.
2. सामनेवाल्यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारदारास शारिरीक,
मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रु.5,000/- अदा
करावेत.
3. सामनेवाल्यास आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारदारास अर्ज
खर्चापोटी रु.3,000/- अदा करावेत.
4. उभय पक्षांना निकालपत्राच्या प्रती विनामुल्य देण्यात याव्यात.
(चंद्रकांत एम.येशीराव) (मिलिंद सा.सोनवणे)
सदस्य अध्यक्ष