Exh.No.17
सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र.53/2010
तक्रार दाखल झाल्याचा दि. 06/07/2010
तक्रार निकाल झाल्याचा दि.30/10/2010
श्री सत्यवान तुकाराम ठुकरुल
वय सु.61 वर्षे, धंदा – सेवानिवृत्त,
रा.ओरोस बुद्रुक, सुलोचना नगर,
ता.कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. ... तक्रारदार
विरुध्द
1) उप क्षेत्रिय भविष्य निर्वाह निधी आयुक्त
उप क्षेत्रिय भविष्य निर्वाह निधी कार्यालय,
भविष्य निर्वाह निधी भवन, 283/ 6 ई
ताराबाई पार्क, कोल्हापूर
2) भविष्य निर्वाह निधी आयुक्त
बांद्रा (पूर्व) मुंबई – 51
3) सिंधुदुर्ग जिल्हा देखरेख सहकारी संस्था मर्यादित
मुळये बिल्डिंग, सिंधुदुर्ग ओरोस ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः-
1) श्री. महेन्द्र म. गोस्वामी, अध्यक्ष
2) श्रीमती उल्का राजेश गावकर, सदस्या
3) श्रीमती वफा जमशीद खान, सदस्या.
तक्रारदारातर्फेः- विधिज्ञ श्री एम.डी.कुंटे.
विरुद्ध पक्ष – 1 व 2 गैरहजर/ एकतर्फा.
विरुध्द पक्ष क्र.3 – व्यक्तीशः हजर.
(मंचाच्या निर्णयाद्वारे श्री महेंद्र म. गोस्वामी, अध्यक्ष)
निकालपत्र
(दि.30/10/2010)
1) विरुध्द पक्षाच्या उप क्षेत्रिय भविष्य निर्वाह निधी आयुक्त कार्यालयाने तक्रारदारास उशिराने पेन्शन लागू केल्यामुळे झालेल्या 10 महिन्याची नुकसान भरपाई आपणांस मिळावी यासाठी सदरची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
2) तक्रारदाराची तक्रार अशी आहे की, तक्रारदार हे विरुध्द पक्ष क्र.3 च्या संस्थेत आस्थापनेत मुख्य लिपिक या पदावर काम करीत होते व त्यांची जन्मतारीख 01/06/1949 अशी असून ते भविष्य निर्वाह निधीचे दि.01/04/1989 पासून सभासद झाले. त्यानुसार भविष्य निर्वाह निधीचे सभासद असलेल्या सभासदांना दि.16/11/1995 पासून निवृत्ती वेतन योजना लागू झाली. त्यानुसार तक्रारदार हे विरुध्द पक्ष क्र.3 च्या कार्यालयातून दि.01/06/2007 रोजी सेवा निवृत्त झाले. त्यामुळे त्यांना दि.02/06/2007 पासून निवृत्ती वेतन लागू होणे आवश्यक होते; परंतु तक्रारदारास विरुध्द पक्ष क्र.1 कडून बँक ऑफ इंडिया शाखा- ओरोस यांचेमार्फत प्राप्त झालेल्या दि.29/8/2008 चे आदेशामध्ये तक्रारदाराची जन्मतारीख 1/6/1949 असतांना ती जन्मतारीख 01/04/1950 अशी दर्शविल्यामुळे तक्रारदारास 10 महिन्याच्या कालावधीचे निवृत्तीवेतन कमी मिळाले.
3) त्यामुळे तक्रारदाराने विरुध्द पक्ष क्र.1 च्या कार्यालयासोबत चर्चा करण्याकरीता दि.12/6/2008, 16/12/2008 व 23/12/2008 ला भेट दिली; परंतु तक्रारदारास समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे तक्रारदाराने दि.11/04/2009 रोजी जन्मतारखेतील चुकीबाबत विरुध्द पक्ष क्र.1 यांचेकडे तक्रार अर्ज केला. हा अर्ज विरुध्द पक्ष क्र.1 यांना 13/4/2009 रोजी पोच झाला. तसेच पुन्हा 21/10/2009 रोजी कुरियर टपालाने लेखी अर्ज विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांना पाठविले; परंतु तक्रारदारास जन्मतारखेच्या चुकीच्या नोंदीतील 10 महिन्याच्या फरकाची रक्कम प्रतिमहा रु.1239/- या प्रमाणे एकूण रु.12390/- अदा केले नाहीत. त्यामुळे तक्रारदाराने विदयमान मंचासमोर आपणास व्याजासह निवृत्ती वेतनाच्या 10 महिन्याच्या फरकाची रक्कम मिळावी व मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.25000/- मिळावेत व तक्रारीचा खर्च रु.20000/- मिळावेत यासाठी सदरची तक्रार दाखल केली आहे.
4) तक्रारदाराने त्याचे तक्रारीसोबत जोडलेल्या नि.3 वरील दस्तऐवजाच्या यादीनुसार तक्रारदाराने विरुध्द पक्ष क्र.1 ला पाठविलेल्या तक्रार अर्जाची प्रत, तक्रारदाराचा शाळा सोडल्याचा दाखला, विरुध्द पक्ष क्र.3 ने विरुध्द पक्ष क्र.1 कडे पाठविलेला अर्ज, तक्रारदाराने विरुध्द पक्ष क्र.1 कडे पाठविलेले पेन्शन संदर्भातील कागदपत्रे, विरुध्द पक्ष क्र.3 ने विरुध्द पक्ष क्र.1 यांचेकडे पाठविलेली कागदपत्रे, सेवा पुस्तकातील जन्म नोंद असलेल्या पानाची प्रत व विरुध्द पक्षास पाठविलेल्या पत्राच्या पोस्टाच्या व कुरियरच्या पावत्या इ. कागदपत्रे दाखल केली व तक्रार मंजूर करण्याची विनंती केली.
5) सकृतदर्शनी तक्रारदाराची तक्रार दाखल होणेस पात्र असल्याचे निदर्शनास आल्यामुळे मंचाने तक्रारदाराचे तक्रारीवर दि.6/7/2010 ला आदेश पारीत करुन विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांना नोटीस बजावणी करण्याचे आदेश पारीत केले. त्यानुसार विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांना तक्रारीची नोटीस पाठविण्यात आली. त्यानुसार सर्वप्रथम विरुध्द पक्ष क्र.3 हे त्यांचे प्रतिनिधी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेमार्फत मंचासमोर हजर होऊन त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे नि.10 वर दाखल केले व तक्रारदाराने तक्रारीत केलेल्या मागणी व विनंतीचे समर्थन करुन 10 महिन्याचे फरकाचे सेवानिवृत्ती वेतन तक्रारदारास देण्याचे आदेश व्हावेत, अशी विनंती केली. तर दुसरीकडे विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांना मंचातर्फे नोटीस प्राप्त होऊन देखील ते मंचासमोर हजर न झाल्यामुळे डाक व तार कार्यालयाने दिलेल्या नि.13 व 14 वरील अहवालानुसार विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांच्या लेखी म्हणण्याविना प्रकरण एकतर्फी चालविण्याचे आदेश दि.14/10/2010 ला पारीत केले. त्यानुसार प्रकरण तक्रारदाराने प्रतिउत्तर देण्यासाठी ठेवण्यात आले; परंतु तक्रारदाराने नि.15 वर पुरसीस दाखल करुन आपणांस शपथेवर कोणत्याही पुरावा दयावयाचा नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे प्रकरण अंतीम युक्तीवादासाठी घेण्यात आले. त्यानुसार तक्रारदाराचे वकीलांनी विस्तृत स्वरुपात तोंडी युक्तीवाद केला. तसेच विरुध्द पक्ष क्र.3 च्या वतीने तोंडी युक्तीवाद करण्यात आला. परंतु विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांचेतर्फे कोणीही हजर न झाल्यामुळे त्यांचेतर्फे युक्तीवाद करण्यात आला नाही. त्यामुळे प्रकरण अंतीम निकालासाठी घेण्यात आले. त्यानुसार खालील मुद्दे निष्कर्षासाठी निघतात.
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
1 | ग्राहकाला देण्यात येणा-या सेवेत विरुध्द पक्षाच्या उप क्षेत्रिय भविष्य निर्वाह निधी आयुक्त कार्यालयाने त्रुटी केली आहे काय ? | होय |
2 | तक्रारदार जन्मतारखेच्या चुकीच्या नोंदीमुळे 10 महिन्याच्या फरकाचे निवृतीवेतन मिळण्यास पात्र आहेत काय ? | होय |
3 | तक्रारदाराची तक्रार मंजूर होण्यास पात्र आहे काय ? | होय/अंशतः |
-कारणमिमांसा-
6) मुद्दा क्रमांक 1 – तक्रारदार हे विरुध्द पक्ष क्र.3 च्या सिंधुदुर्ग जिल्हा देखरेख सहकारी संस्था मर्यादित या संस्थेच्या आस्थापनेत मुख्य लिपिक या पदावर काम करीत होते व ते दि.01/06/2007 रोजी सेवानिवृत्त झाले व त्यांची जन्मतारीख 01/06/1949 असल्याचे विरुध्द पक्ष क्र.3 ने त्यांचे नि.10 वरील लेखी म्हणण्यात मान्य केले आहे. सेवानिवृतीसंबंधाने पेन्शन लागू करण्यासाठी विरुध्द पक्ष क्र.1 च्या कार्यालयात विरुध्द पक्ष क्र.3 चे मार्फत अर्ज करण्यात आला होता. त्यामध्ये तक्रारदाराची जन्मतारीख ही 01/06/1949 नमूद करण्यात आली होती व तक्रारदार हा सन 1995 पासून भविष्य निर्वाह निधीचा सभासद असल्यामुळे निवृत्ती वेतन योजना तक्रारदारास लागू करण्यात आली; परंतु तक्रारदार हा दि.01/06/2007 रोजी निहित वयानुसार सेवानिवृत्त होऊन देखील त्याला दि.02/06/2007 पासून निवृत्तीवेतन लागू न करता हे निवृत्तीवेतन दि.01/04/2008 पासून लागू करण्यात आले. यासंबंधाने तक्रारदाराने नि.3 वरील दस्तऐवजाच्या यादीनुसार विरुध्द पक्ष 1 व 2 यांच्या कार्यालयाने तक्रारदारास बँकेमार्फत पाठविलेल्या पेन्शन ऑर्डरची प्रत मंचासमोर दाखल केली आहे. त्याचे अवलोकन करता तक्रारदाराची सेवानिवृत्तीची तिथी दि.01/06/2007 बरोबर नोंदलेली असून जन्मतारीख मात्र 01/04/1950 नोंदविल्याचे दिसून येते. प्रत्यक्षात मात्र तक्रारदाराच्या सर्व्हीस बुकातील जन्मनोंदीची (नि.3/10) पडताळणी करता त्यांची जन्मतारीख 01/06/1949 असल्याचे दिसून येते. तसेच पेन्शन योजनेचे अर्ज पाठवितांना तक्रारदाराच्या जन्माची नोंद दि.01/06/1949 केलेली असतांना देखील विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारदाराच्या जन्मतारखेची चुकीची नोंद करुन दि.02/06/2007 पासून निवृत्ती वेतन लागू न करता दि.01/04/2008 पासून निवृत्ती वेतन दरमहा रु.1239/- या प्रमाणे लागू केले व तक्रारदारास 10 महिन्याचे निवृत्ती वेतनाचे नुकसान केले. या विषयी तक्रारदाराने विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांना लेखी पत्रव्यवहार करुन देखील त्यांना वेतनाच्या फरकाची रक्कम देण्यात आली नाही. त्यामुळे ग्राहकाला देण्यात येणा-या सेवेत विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी त्रुटी केली आहे असे आमचे स्पष्ट मत आहे.
7) मुद्दा क्रमांक 2 व 3 – या निकालपत्रातील परिच्छेद क्र.6 मधील मुद्दा क्र.1 मध्ये विस्तृत स्वरुपात विवेचन केल्यानुसार विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी ग्राहकाला देण्यात येणा-या सेवेत त्रुटी केल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच तक्रारदाराची जन्मतिथी ही प्रत्यक्षात दि.01/06/1949 असतांना तक्रारदाराचे निवृत्ती वेतन मंजूर करतेवेळेस तक्रारदाराची चुकीची जन्मतारीख दि.01/04/1950 अशी नोंदवून दि.01/04/2008 पासून निवृत्तीवेतन लागू केले; मात्र प्रत्यक्षात तक्रारदाराचे जन्मतारखेनुसार व त्याचे निवृत्तीचे तारखेनुसार हे निवृत्तीवेतन दि.02/06/2007 पासून लागू करावयास पाहिजे होते; परंतु विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारदारास 10 महिन्याच्या निवृत्ती वेतनाच्या लाभापासून वंचित ठेवले. एवढेच नव्हेतर मंचातर्फे तक्रारीची बजावण्यात आलेली नोटीस प्राप्त होऊन देखील विरुध्द पक्ष क्र.1 व 2 हे मंचासमोर हजर झाले नाहीत व त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे दाखल केले नाही. त्यामुळे तक्रारदाराची तक्रार ही विना आव्हान राहिली असल्यामुळे तक्रारदार हे 10 महिन्याच्या फरकाचे निवृत्तीवेतन दरमहा रु.1239/- याप्रमाणे एकूण रक्कम रु.12390/- मिळण्यास पात्र आहेत, असे आमचे स्पष्ट मत आहे; परंतु विरुध्द पक्ष क्र.3 यांनी या प्रकरणात तक्रारदारास वेळोवेळी सहकार्य दिल्याचे दिसून येत असल्यामुळे त्यांचेविरुध्दची तक्रार फेटाळण्यास पात्र असून विरुध्द पक्ष क्र.1 व 2 ही शासन संस्था असल्यामुळे त्यांचेविरुध्द करण्यात आलेली नुकसान भरपाईची मागणी देखील फेटाळण्यात येते. त्यानुसार तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत असून त्या दृष्टीकोनातून खालील अंतीम आदेश पारीत करणेत येतात.
अंतिम आदेश
1) तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदारास 10 महिन्याच्या फरकाचे एकत्रित निवृतीवेतन रु.12,390/- (रुपये बारा हजार तीनशे नव्वद मात्र) अदा करणेचे आदेश पारीत करणेत येतात.
3) ग्राहकाला देण्यात येणा-या सेवेत त्रुटी केल्याबद्दल व प्रकरण खर्चाबद्दल एकत्रितपणे रु.3000/-(रुपये तीन हजार मात्र) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक वा संयुक्तिकरित्या तक्रारदारास अदा करावेत.
4) उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीचे 30 दिवसांचे आत करणेत यावी.
5) तक्रारदाराने केलेली मानसिक त्रासापोटीची नुकसान भरपाईची मागणी फेटाळण्यात येते. तसेच विरुध्द पक्ष क्र.3 यांचेविरुध्दची तक्रार फेटाळण्यात येते.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 30/10/2010
सही/- सही/- सही/-
(उल्का गावकर) (महेन्द्र म.गोस्वामी) ( वफा खान)
सदस्या, अध्यक्ष, सदस्या,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.
Ars/-