निकाल
(घोषित दि. 12.01.2017 व्दारा श्रीमती एम.एम.चितलांगे, सदस्य)
तक्रारदार याने सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 अन्वये गैरअर्जदार याने रक्कम रु.32,710/- इतके अवास्तव व चुकीचे वीज बिल दुरुस्त न केल्याबाबत दाखल केली आहे.
तक्रारदार याची तक्रार थोडक्यात येणेप्रमाणे.
तक्रारदार हा कॉटन फिल एस नं.37 अंबड जि.जालना येथील रहिवाशी आहे. गैरअर्जदार ही विद्युत कंपनी आहे. तक्रारदार याने गैरअर्जदार यांच्याकडून विद्युत पुरवठा घेतला आहे. त्याचा ग्राहक क्र.520010095950 असा आहे. गैरअर्जदार यांनी तक्रारदारास डिसेंबर 2009 या महिन्यात 1284 युनिटचे विद्युत बिल दिले आहे सदरचे विद्युत बिल दुरुस्तीकरता गैरअर्जदाराकडे अर्ज दिले असता त्यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यानंतर दि.08.04.2013 रोजी पुन्हा 1169 युनिटचे वीज देयक दिले. सदरील वीज देयक दुरुस्ती करुन देण्याबाबत गैरअर्जदारास अर्ज केले असता त्यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. तदनंतर दि.12.02.2016 रोजी रक्कम रु.32,710/- भरण्यास सांगितले. अन्यथा विद्युत पुरवठा खंडित करण्यात येईल अशी नोटीस दिली.
तक्रारदार हा जबाबदार व्यक्ती असून एल.आय.सी.कार्यालयात डी.ओ.म्हणून कार्यरत आहे. गैरअर्जदार याने दिलेले विद्युत बिला अन्वये रक्कम भरुन सुध्दा पुढील बिलात केलेली रक्कम वजा केली जात नाही. दि.11.05.2012 रोजी रक्कम रु.12,000/- व दि.20.06.2014 रोजी रक्कम रु.10,000/- गैरअर्जदाराकडे भरणा केला आहे. गैरअर्जदार याने सदरची रक्कम विद्युत बिलात वजा केली नाही. गैरअर्जदार याने तक्रारदार याने विद्युत बिल दुरुस्त करण्याचे व विद्युत पुरवठा खंडित करु नये अशी विनंती केली आहे.
गैरअर्जदार हे मंचासमोर हजर झाले. त्यानी आपले लेखी निवेदन नि.10 अन्वये दाखल केले आहे. लेखी निवेदनासोबत उपकार्यकारी अभियंता यांचे शपथपत्र दाखल केले आहे. गैरअर्जदार यांचे कथन असे की, तक्रारदार याने वीज चोरी केली असल्याने तक्रारदार विरुध्द नियमाप्रमाणे कार्यवाही करण्यात आलेली आहे. तक्रारदाराने एप्रिल 2014 चे वीज देयक मंचात दाखल केले आहे. त्यावर तक्रारदार याने वीज चोरी केल्याबाबतची नोंद आहे. तक्रारदार याने वीजचोरी केली असल्यामुळे व त्यासंबंधी दाद मागितले असल्यास सदरील तक्रार अर्जदारास दाखल करता येत नाही. अधिकार क्षेत्रांचा विचार करुन तक्रार फेटाळण्यात यावी. अर्जदाराने वापरलेल्या वीजेचे वीज देयके देण्यात आली आहे. अर्जदाराने सदरील तक्रार मुदतीत दाखल केली नाही. अर्जदारास देण्यात आलेली वीज देयके बरोबर असल्याने कोणतीही दुरुस्ती करणे आवश्यक नाही. गैरअर्जदार याने तक्रारीतील उर्वरीत मजकूर स्पष्ट नाकारलेला आहे. तक्रारदार हा स्वच्छ हाताने मंचासमोर आलेला नाही. गैरअर्जदार याने सेवा देण्यात त्रुटी ठेवली नाही. तक्रारदाराची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी अशी विनंती केली आहे.
तक्रारदार याने दाखल केलेले कागदपत्र तसेच गैरअर्जदार याने दाखल केलेले कागदपत्र याचे अवलोकन केले. तक्रारदार व गैरअर्जदार यांच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकला. न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1) तक्रारदार हे तक्रारीतील मागणी मिळण्यास
पात्र आहे काय? नाही.
2) आदेश काय? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमीमांसा
मुद्दा क्र.ः- 1 तक्रारदार यांच्या वकीलांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदार याने गैरअर्जदाराकडून विद्युत पुरवठा घेतला आहे. तक्रारदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे. तक्रारदार याने वेळोवेळी गैरअर्जदार यांच्याकडे वीज भरणा केला आहे. परंतू गैरअर्जदार याने सदरील जमा केलेली रक्कम तदनंतरच्या वीज देयकातून वजा केली जात नाही. तक्रारदार याने दि.11.05.2012 रोजी रक्कम रु.12,000/- दि.20.06.2014 रोजी रक्कम रु.10,000/- ची वीज देयकापोटीची रक्कम गैरअर्जदाराकडे भरली आहे.
गैरअर्जदार यांच्या वकीलांनी युक्तीवाद करत असताना सांगितले की, तक्रारदार याने दाखल केलेली तक्रार ही वीजचोरीची असल्याकारणाने व वीजचोरीची कार्यवाही विशेष मा.न्यायालयात प्रलंबित असल्याने सदरील तक्रार ही मा.मंचाच्या कार्यक्षेत्रात येत नसल्याने फेटाळण्यात यावी. युक्तीवाद करत असताना गैरअर्जदार यांच्या वकीलांनी माहे एप्रिल 2013 च्या वीज देयकावर मंचाचे लक्ष वेधले. त्यामध्ये असे निदर्शनास आणून दिले की, सदरील वीज देयकावर वीजचोरी झाल्याबाबतची नोंद आहे. तक्रारदार याने यापूर्वीही तक्रार क्रमांक 64/2012 ही मंचासमोर दाखल केली होती, सदर तक्रार ही निकाली काढण्यात आली आहे. त्यामुळे त्याच कारणास्तव तक्रारदारास परत सदरील तक्रार दाखल करता येत नाही. तक्रारदार हा स्वच्छ हाताने मंचासमोर आलेला नाही. तक्रारदारास देण्यात आलेले वीज देयक हे वीज वापरानुसार दिलेले आहे. त्याबाबतीत गैरअर्जदार यांनी तक्रारदारास सेवा देण्यात कोणतीही त्रुटी ठेवलेली नाही. सबब तक्रारदाराची तक्रार खारीज करण्यात यावी.
वर नमुद केलेला युक्तीवाद आम्ही लक्षात घेतला. तसेच तक्रारदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले कागदपत्र व सीपीएल याचे अवलोकन केले. यावरुन तक्रारदार याने वीज देयकापोटी भरणा केलेल्या रकमेची गैरअर्जदार याने दखल घेतली किंवा नाही हे पाहणे गरजेचे आहे. कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक असून त्यांचा ग्राहक क्र.520010095950 असा आहे. तक्रारदार याने यापूर्वीही तक्रार क्र.64/2012 या मंचासमोर दाखल केली होती ती तक्रार क्र.64/12 ही निकाली काढण्यात आलेली आहे. सदरील तक्रार क्र.64/2012 याचे अवलोकन केले असता व आता दाखल केलेल्या तक्रार क्र.31/2016 याचे अवलोकन केले असता यामधील तक्रार दाखल करण्याचे कारण वेगळे असल्याकारणाने सदरील तक्रार ही मा.मंचाच्या कार्यक्षेत्रात आहे असे या मंचाचे मत आहे. गैरअर्जदार यांनी सदरील तक्रार ही वीज चोरीची आहे व त्या विरुध्द कार्यवाही मा.विशेष न्यायालयात प्रलंबित आहे हे दर्शविण्यासाठी कोणताही कागदोपत्री पुरावा मंचासमोर दाखल केला नाही.
तक्रारदार याने दाखल केलेल्या वीज बिल भरणा तपशिल नि.क्र.16 याचे अवलोकन केले असता तक्रारदार याने माहे डिसेंबर 2012 नंतर दि.20.06.2014 रोजी वीज देयकापोटी रक्कम भरल्याचे निदर्शनास येते. तक्रारदाराच्या मागणीनुसार दि.11.05.2012 रोजी वीज देयकापोटी रक्कम रु.12,000/- भरल्याची पावती मंचासमोर दाखल नाही. त्याबाबत कोणताही पुरावा दाखल नाही. दि.20.06.2014 रोजी भरणा केलेली रक्कम रु.10,000/- ही गैरअर्जदार याने जमा केली नाही असा आरोप आहे. या मुद्यावर गैरअर्जदार याने दाखल केलेल्या सी.पी.एल.चे अवलोकन केले. माहे मे 2014 चे नेट बिल हे रक्कम रु.60,964.51 एवढे होते. त्यानंतर माहे जून 2014 चे नेट बिल हे रु.52367.62 एवढे होते. याचाच अर्थ असा की, तक्रारदार याने दि.20.06.2014 रोजी वीज देयकापोटी भरलेली रक्कम रु.10,000/- ही गैरअर्जदार यानी कपात केली आहे असे दिसून येते.
तक्रारदार याने दाखल केलेल्या दि.12.02.2016 च्या नोटीसवरुन तक्रारदार यांच्याकडे रक्कम रु.32710/- वीज देयकापोटी थकीत असल्याचे निदर्शनास येते. तक्रारदार हा जबाबदार व्यक्ती आहे. तो एल.आय.सी. येथील डेव्हलपमेंट ऑफीसर या पदावर कार्यरत आहे. तक्रारदार यास नियमितपणे वीज देयक मिळत असून देखील तक्रारदार याने वेळोवेळी वीज बिलाचा भरणा केला नाही. तक्रारदार हा वीजेचा वापर करत आहे. ग्राहक हा वीजेचा वापर करत असेल तर वेळोवेळी वीज देयकापोटी रकमेचा भरणा करणे हे अनिवार्य आहे. गैरअर्जदार याने दर महिन्याला वीज देयक देऊन सुध्दा तक्रारदार याने वीज देयकांचा भरणा केला नाही. तक्रारदार सारख्या जबाबदार व्यक्तीने वीजेच्या बिलांचा भरणा न करणे ही बाब अशोभनीय आहे. तक्रारदार हा स्वतःच दोषी आहे. त्याकरिता तक्रारदार हा स्वतःच सर्वस्वी जबाबदार आहे.
A Wrong doer has no right to take benefit of his own wrong.
तक्रारदार याने तक्रार अर्जात त्याने गैरअर्जदार यांच्याकडे भरलेल्या फक्त दोन रकमाबाबत ही कार्यवाही केली असल्याचे दिसते. एक रक्कम दि.11.05.2012 ची व दुसरी रक्कम दि.20.06.2014 ची आहे असे दिसते. त्यापैकी दि.11.05.2012 ची रक्कम खरोखरच भरली किंवा नाही. याबाबतची पावती व कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केला नाही. त्यामुळे आम्ही त्याबाबतच्या आरोपाची कोणीही दखल घेतली नाही.
तक्रारदार याने दि.20.06.14 च्या रकमेबाबत आक्षेप घेतला आहे. त्याबददलची चर्चा आम्ही आधीच्या परिच्छेदमध्ये केली आहे. सदर रक्कमेची नोंद गैरअर्जदार याने दाखल केलेल्या सी.पी.एल.च्या उता-यामध्ये सुध्दा घेतली असल्याचे दिसते. विशेष न्यायालयामध्ये वीजचोरीचा जो खटला आहे यामध्ये ही तक्रारदार हा त्याने भरलेल्या रकमेचा भरणा सी.पी.एल.मध्ये नमुद केला नाही या मुद्यावर दाद मागू शकतो परंतू तक्रारदार यांनी तसे केले नाही.
वरील सर्व बाबीवरुन असे निदर्शनास येते की, तक्रारदार हा वीज देयकापोटी रक्कम भरण्यास दोषी आहे असे दिसते. गैरअर्जदार याने दि.20.06.2014 ची रक्कम नंतरच्या वीज देयकातून कपात केली आहे. त्यामुळे गैरअर्जदार यांनी सेवेत कोणतीही त्रुटी केली नाही. म्हणून आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करतो.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार खारीज करण्यात येते.
2) खर्चाबाबत आदेश नाही.
श्रीमती एम.एम.चितलांगे श्री. के.एन.तुंगार
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, जालना