(घोषित दि. 25.02.2014 व्दारा श्रीमती नीलिमा संत,अध्यक्ष)
प्रस्तुत तक्रारदारांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अंतर्गत सेवेतील कमतरतेसाठी केलेली आहे. तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार हे भोकरदन जि.जालना येथील रहिवासी आहेत. ते स्वत:च्या घरात राहतात. त्यांनी गैरअर्जदार यांचेकडून घरगुती वापरासाठी वीज जोडणी घेतलेली आहे. त्यांचा ग्राहक क्रमांक 514010035361 असा आहे. त्यांना साधारणपणे तीनशे ते चारशे रुपये प्रतिमाह प्रमाणे विद्युत देयके येत होती व फेब्रूवारी 2013 पर्यंत त्यांनी नियमितपणे देयके भरलेली आहेत. मार्च 2013 मध्ये त्यांना एकदम 1,92,630/- रुपये इतके देयक आले व त्यात त्यांचा विद्युत वापर 17,943 युनिट इतका दाखवला आहे.
यापूर्वी त्यांनी दिनांक 27.12.2012 रोजी मीटर रीडींग योग्य नसल्या बाबत तक्रार अर्ज भोकरदन येथे सहाय्यक अभियंता, यांना दिलेला होता. त्यानंतर दिनांक 31.12.2012 रोजी त्यांच्या घरातील ‘लोड’ ची चाचणी करण्यात आली. त्यात अर्जदार यांचेकडे एक फॅन, एक फ्रीज, एक टी.व्ही, एक इन्व्हर्टर व चार सीएफएल दिवे आहेत असे नमूद केले आहे. दिनांक 17.04.2013 रोजी गैरअर्जदारांनी तक्रारदारांकडून रुपये 100/- मीटर तपासणी फी पोटी भरुन घेतले व त्यांचे मीटर काढून त्या जागी दुसरे मीटर बसवले. परंतु अर्जदाराच्या मीटरची तपासणी झाल्याबाबत त्यांना कळवण्यात आले नाही. तसेच अहवालही देण्यात आला नाही. ही गैरअर्जदार यांनी केलेली सेवेतील त्रुटी आहे गैरअर्जदार तक्रारदारांना रीडींग नुसार बिले दिलेली नाहीत व मीटर बदलण्याची सुचना दिली नाही या सर्व गोष्टी गैरअर्जदारांनी केलेली सेवेतील कमतरता दर्शवतात. म्हणून तक्रारदारांची गैरअर्जदार यांचे विरुध्द तक्रार आहे.
तक्रारदार गैरअर्जदार यांचेकडून नुकसान भरपाई रक्कम रुपये 35,500/- मागणी करत आहेत व मार्च 2013 चे वादग्रस्त विद्युत देयक रद्द करुन मागत आहेत.
तक्रारदारांनी आपल्या तक्रारी सोबत विद्युत देयके, मीटर तपासणी फी पावती, गैरअर्जदार यांचेकडे केलेली तक्रार अर्ज इत्यादि कागदपत्रे दाखल केली आहेत. तक्रारी सोबत गैरअर्जदार यांनी वीज पुरवठा खंडित करु नये अशा अंतरिम आदेशासाठी अर्ज दाखल केला होता. तो मंचाने दिनांक 04.06.2013 रोजी मंजूर केलेला आहे.
गैरअर्जदार मंचा समोर हजर झाले. त्यांनी आपला लेखी जबाब दाखल केला. त्यांच्या लेखी जबाबानुसार तक्रारदारांना दिलेली विद्युत देयक त्यांनी वेळेवेळी वापरलेल्या वीजेचेच देयक आहे व ते बरोबर आहे. तक्रारदारास दिनांक 17.06.2013 रोजी पत्र पाठवून मीटर तपासणीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. परंतु तक्रारदारांनी पत्र घेतले नाही व त्याच्या अपरोक्ष मीटर तपासण्यात आले. तेव्हा त्यावरील वाचन 18,933 युनिट होते व मार्च महिन्यातील वाचन 18,690 ऐवढे होते. तक्रारदारास तपासणी संदर्भातील सर्व कागदपत्रे देण्यात आली आहेत. गैरअर्जदारांनी आपल्या जबाबासोबत तक्रारदारांचे सीपीएल, तक्रारदारांच्या मीटरच्या वाचनाची सी.डी व फोटो, मीटर बदलल्याचा अहवाल, मीटर तपासणीचा अहवाल, तक्रारदारांच्या स्थळ तपासणी अहवाल, तक्रारदारांना गैरअर्जदारांनी दिलेले पत्र अशी सर्व कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यावरुन गैरअर्जदारांनी तक्रारदारांना द्यावयाच्या सेवेत काहीही त्रुटी केलेली नाही ही बाब स्पष्ट होते म्हणून तक्रारदारांची तक्रार फेटाळण्यात यावी.
तक्रारदारांचे विव्दान वकील श्री. विपुल देशपांडे व गैरअर्जदारांचे विव्दान वकील श्री.जी.आर.कड यांचा युक्तीवाद ऐकला. दाखल कागदपत्रांचा अभ्यास त्यावरुन खालील गोष्टी स्पष्ट होतात.
- तक्रारदारांचे मीटर ऑगस्ट 2011 मध्ये बदलले गेले व त्यांचा मीटर क्रमांक 152744898 असा होता. तक्रारदारांनी हे मीटर सदोष आहे व त्याची तपासणी व्हावी म्हणून दिनांक 27.12.2012 रोजी गैरअर्जदार यांचेकडे अर्ज केला. त्यासाठी तपासणी फी रुपये 100/- भरली. तक्रारदारांचे वादग्रस्त मीटर दिनांक 18.04.2013 रोजी बदलण्यात आले व त्याजागी नवीन मीटर बसवण्यात आले.
- मीटर बदलले तेव्हा त्यावरील वाचन 18933 युनिट असे दर्शवले होते. मीटर बदलल्यानंतर सुमारे दोन महिन्यांनी तक्रादारांनी प्रस्तुत तक्रार दाखल केल्यानंतर गैरअर्जदारांनी दिनांक 20.06.2013 रोजी मीटरची तपासणी केली. तपासणीत मीटर मधील चूक +0.02% इतकी आहे. असा अहवाल प्राप्त झाला आहे. परंतु तपासणीच्या वेळी तक्रारदार गैरहजर होते त्यामुळे तो अहवाल त्यांना मान्य नाही.
- दिनांक 31.12.2012 रोजी तक्रारदारांच्या घराची पाहणी गैरअर्जदारांच्या अधिका-यांनी केली होती. त्यात मीटरवरील वाचन 16,796 युनिट दर्शवले आहे. परंतु त्यातच ग्राहकाच्या काही अडचणींमुळे Connected load घेता आलेला नाही असे नमूद केले आहे.
- तक्रारदारांच्या सी.पी.एल चा अभ्यास केला असता ऑगस्ट 2011 मध्ये त्यांचे मीटर बदलल्याचे दिसते. त्यानंतर जूलै 2012 पर्यंत त्यांचे मीटर Normal असल्याची नोंद आहे व 10 महिन्यांच्या या कालावधीचा एकूण वीज वापर फक्त 747 युनिट एवढाच झालेला दाखवला आहे. त्यानंतर जुलै 2012 पासून जानेवारी 2013 पर्यंत मीटर Inacce असे दर्शवले आहे फेब्रूवारी व मार्च मध्ये मीटर Normal दखवून वीज वापर मागील प्रमाणे 747 युनिटचाच दाखवला आहे. आणि मार्च 2013 मध्ये एकदम 18,690 एवढा युनिट वीज वापर दाखला आहे. तक्रारदारांच्या घर पाहणी अहवालात मात्र डिसेंबर 2012 चे मीटर वाचन 16,796 एवढे दाखवले आहे. वरील युनिटची ऑगस्ट 2011 ते मार्च 2013 या 20 महिन्यांसाठी सरासरी काढली तर ती 935 युनिट इतकी येते. तक्रारदारांच्या घरात लावलेली अहवालात नमूद केलेली विद्युत उपकरणे विचारात घेतली तर एवढा वीज वापर होणे शक्य नाही. तसेच तक्रारदारांचे वादग्रस्त विद्युत देयकाच्या आधीचा व नंतरचा वीज वापर सी.पी.एल वरुन बघितला असता तो दरमहा 250 युनिटच्या दरम्यान आहे असे दिसते. म्हणजेच तक्रारदारांच्या सी.पी.एल वरील महिनावर नोंदी, गैरअर्जदारांनी दाखल केलेला घर तपासणी व अहवाल मीटर तपासणी अहवाल यात खूपच विसंगती दिसते.
वरील सविस्तर विवेचनावरुन तक्रारदारांना मार्च 2013 मध्ये देण्यात आलेले 18,690 युनिटचे वीज देयक रद्द करणे त्याच प्रमाणे तक्रारदारांना ऑगस्ट 2011 ते मार्च 2013 या 20 महिन्यांच्या कालावधीतील सर्व विद्युत देयके रद्द करणे व त्यांना त्या कालावधीसाठी 250 युनिट प्रतिमाह या प्रमाणे नव्याने वीज बिल देणे योग्य ठरेल असे मंचाचे मत आहे.
म्हणून मंच खालील आदेश पारित करत आहे.
- तक्रारदारांना दिलेली ऑगस्ट 2011 ते मार्च 2013 या कालावधीतील सर्व विद्युत देयके रद्द करण्यात येत आहेत.
- गैरअर्जदारांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी आदेश प्राप्ती पासून तीस दिवसात तक्रारदारांना ऑगस्ट 2011 ते मार्च 2013 या कालावधीसाठी 250 युनिट प्रतिमाह याप्रमाणे नव्याने विद्युत देयक द्यावे व त्या रकमेवर दंड व व्याज आकारणी करु नये.
- वरील कालावधीच्या विद्युत देयकांपोटी तक्रारदारांनी आधी भरलेली रक्कम वजा करण्यात यावी.
- खर्चाबाबत आदेश नाही.