निकालपत्र
(द्वारा- मा.सदस्य - श्री.एस.एस.जोशी)
(१) सामनेवाले यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला या कारणावरुन तक्रारदार यांनी सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम १२ अन्वये या मंचात दाखल केली आहे.
(२) तक्रारदार यांची तक्रार थोडक्यात अशी आहे की, ते सामनेवाले यांचे ग्राहक असून त्यांचा ग्राहक क्रमांक ०९६७२०००२२०२ असा आहे. सामनेवाले यांनी दिलेली वीज देयके तक्रारदार यांनी वेळोवेळी भरलेली आहेत. त्यांच्याकडे कोणतीही थकबाकी नाही. तरीही सामनेवाले यांनी दि.०४-०५-२०१२ रोजी तक्रारदार यांना “लेस बिलींग बिल” या नावाने रु.४२३३.०१/- एवढया रकमेचे देयक पाठविले. हे देयक न भरल्यास वीजपुरवठा खंडीत करण्याचा इशाराही दिला. तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार सामनेवाले यांनी पाठविलेले हे देयक बेकायदेशीर असून ते रद्द करण्यात यावे अशी मागणी त्यांनी या तक्रारीत केली आहे.
(३) आपल्या तक्रारीच्या पुष्टयर्थ तक्रारदार यांनी, प्रतिज्ञापत्र, दि.०४-०५-२०१२ रोजीचे देयक, एप्रिल २०१२ व जून २०१२ या महिन्यांची देयके, सामनेवाले यांच्याकडे दि.०४-०६-२०१२ रोजी केलेली लेखी तक्रार, वकिलामार्फत पाठविलेली नोटीस आदी कागदपत्रांच्या छायांकीत प्रती दाखल केल्या आहेत.
(४) सामनेवाले क्र.१ ते ३ यांनी हजर होऊन संयुक्त खुलासा दाखल केला आहे. त्यात म्हटले आहे की, तक्रारदार यांची तक्रार खोटी आणि बेकायदेशीर आहे. सामनेवाले यांनी सेवेत कोणतीही कमतरता केलेली नाही. जोडभारानुसार तपासणी ही नित्याची बाब आहे. मिटर वाचनातील एकूण युनिट आणि होणारा वापर यात तफावत आढळून आल्याने तक्रारदार यांना सदरचे देयक दिले आहे. त्यावेळी करण्यात आलेल्या तपासणी अहवालावर तक्रारदार यांची सही आहे. त्यामुळे तपासणी व जोडभार हे तक्रारदारास मान्य आहे. सदरचे देयक वीज चोरीचे नाही. मागील सहा महिन्यांच्या कालावधीतील ती मागणी आहे. तक्रारदार त्यांचे मिटरही बदलू देत नाहीत. त्यामुळे नवीन मिटरवर वाचन घेता येत नाही. या कारणास्तव तक्रारदार यांची तक्रार रद्द करावी, अशी मागणी सामनेवाले यांनी केली आहे.
(५) आपल्या खुलाशाच्या पुष्टयर्थ सामनेवाले यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. उभयपक्षांना युक्तिवादासाठी वेळोवेळी सुमारे सात तारखांना संधी देवूनही त्यांनी युक्तिवाद केलेला नाही.
(६) तक्रारदार यांची तक्रार, त्यासोबत दाखल केलेली कागदपत्रे, सामनेवाले क्र.१ ते ३ यांचा खुलासा यांचा विचार करता, आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्यांची उत्तरे आम्ही सकारण देत आहोत.
मुद्देः | निष्कर्षः |
(अ) तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? | : होय |
(ब) सामनेवाले यांनी दिलेले वीज देयक बेकायदेशीर आहे, हे तक्रारदार यांनी सिध्द केले आहे काय ? | : नाही |
(क) आदेश काय ? | : अंतिम आदेशाप्रमाणे |
| | | |
विवेचन
(७) मुद्दा क्र. ‘‘अ’’ – तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडून वीज पुरवठा घेतलेला आहे. त्यांचा ग्राहक क्रमांक ०९६७२०००२२०२ असा आहे. तक्रारदार यांनी तक्रारीसोबत त्यांच्या वीज देयकांच्या छायांकीत प्रती दाखल केल्या आहेत, ही बाब सामनेवाले यांनी नाकारलेली नाही. यावरुन तक्रारदार हे सामनेवाले यांचे “ग्राहक” आहेत हे सिध्द होते. म्हणून मुद्दा क्र. ‘‘अ’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(८) मुद्दा क्र. ‘‘ब’’ – सामनेवाले यांनी पाठविलेले दि.०४-०५-२०१२ रोजीचे “लेस बिलींग बिल” हे देयक बेकायदेशीर आहे अशी तक्रारदार यांची मुख्य तक्रार आहे. त्यामुळेच हे देयक रद्द करुन मिळावे अशी मागणी तक्रारदार यांनी केली आहे. तक्रारदार यांचे म्हणणे आणि त्यांची मागणी चुकीची आणि खोटी आहे, असे स्पष्टीकरण सामनेवाले यांनी आपल्या खुलाशात केले आहे. तक्रारदार यांच्याकडे केलेल्या तपासणीत त्यांच्याकडील जोडभार आणि वीज वापर यात तफावत आढळून आली असल्याचे सामनेवाले यांनी खुलाशात नमूद केले आहे. त्याच बरोबर तक्रारदार हे त्यांच्याकडील वीज मिटर बदलू देत नाहीत, याचाही उल्लेख केला आहे. सामनेवाले यांनी केलेल्या या खुलाशाबाबत तक्रारदार यांनी त्यांना संधी देवूनही आपले प्रति म्हणणे दाखल केलेले नाही.
सामनेवाले यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार यांच्याकडील जोडभार आणि वीज वापर यात तफावत आढळून येत असेल तर, त्यावर समाधानकारक स्पष्टीकरण देणे हे तक्रारदार यांचे कर्तव्य आणि जबाबदारी होती. तथापि तक्रारदार यांनी त्याबाबत आपले कोणतेही म्हणणे मांडलेले नाही. तक्रारदार यांना युक्तिवादासाठी संधी देवूनही त्यांनी युक्तिवाद केलेला नाही आणि आपल्या तक्रारीच्या पुष्टयर्थ कोणताही पुरावा मंचासमोर आणलेला नाही. यावरुन सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दिलेले दि.०४-०५-२०१२ रोजीचे देयक चुकीचे आणि बेकायदेशीर आहे हे तक्रारदार सिध्द करु शकलेले नाहीत, असे दिसून येते. याच कारणावरुन मुद्दा क्र. ‘‘ब’’ चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत.
(९) मुद्दा क्र. ‘‘क’’ – या मंचासमोर तक्रार दाखल केल्यानंतर त्याबाबतचे पुरावे समोर आणण्याची तसेच सामनेवाले यांनी दिलेले देयक कसे चुकीचे आणि बेकायदेशीर आहे हे सिध्द करण्याची जबाबदारी तक्रारदार यांची होती. तथापि, तक्रारदार यांनी ती जबाबदारी पार पाडलेली नाही, असे आमचे मत आहे. म्हणूनच सामनेवाले यांच्या विरोधात कोणताही निर्णय देणे योग्य होणार नाही असे आम्हाला वाटते. सबब आम्ही पुढील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
(अ) तक्रारदार यांची तक्रार रद्द करण्यात येत आहे.
(ब) तक्रार अर्जाचे खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
धुळे.
दिनांक : १६-१०-२०१४