(आदेश पारित व्दारा – श्रीमती मनिषा यशवंत येवतीकर, मा. सदस्या )
- आदेश –
( पारित दिनांक – 29 सप्टेंबर 2015 )
1.तक्रारकर्त्याने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 खाली दाखल केली आहे.
2.तक्रारकर्त्याची थोडक्यात तक्रार अशी आहे की, तक्रारकर्त्याचे पारशिवनी येथे घर असुन विरुध्द पक्षाचा विज पुरवठा असून त्याचा ग्राहक क्रमांक 422060033864 असा आहे आहे. तक्रारकर्त्याचा विज वापर हा घरगुती स्वरुपाचा आहे. तक्रारकर्त्यास सप्टेंबर 2014 मधे अवाजवी व चुकीचे विज देयकाबाबत आल्याने विरुध्द पक्षाचे कार्यालयात लेखी तक्रार केली. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला सप्टेबर 2014 मधे 1549 युनिट्चे रुपये 10140/- चे विज देयक दिले जे अवास्तव व चुकीचे दिले आहे. सदरचे विज देयकाचा भरणा करण्यास तक्रारकर्ता असमर्थ आहे. विरुध्द पक्षाने विज देयक कमी करुन दिले नाही म्हणुन विरुध्द पक्षाला दि. 10/10/2014 रोजी कायदेशीर नोटीस देण्यात आली असता विरुध्द पक्षाने त्यास उत्तर दिले नाही म्हणुन तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करुन सप्टेंबर 2014 चे 1549 युनिसचे 10140/- आवास्तव व चुकीचे देयक रद्द करण्यात यावे व प्रचलित दरानुसार विज वापराचे 48 युनिट्सचे 270/- प्रति महिन्याप्रमाणे विज देयक द्यावे. तसेच शारिरिक व मानसिक त्रासाबद्दल, आथिक त्रासाबाबत 20,000/-व तक्रारीच्या खर्चाबद्दल रुपये 5,000/-मिळावे अशा मागण्या केल्या आहेत.
3.तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीसोबत 9 दस्तऐवज दाखल केले आहेत.अंतरिम अर्ज, विजेचे देयक, कायदेशिर नोटीस, इत्यादी कागदपत्रे दाखल आहेत.
4.यात विरुध्द पक्षाला मंचातर्फे नोंदणीकृत डाकेने नोटीस पाठविण्यात आली नोटीस मिळुन विरुध्द हजर झाले व आपला लेखी जवाब नि.12 वर दाखल केला.
5.विरुध्द पक्ष आपले जवाबात तक्रारकर्त्यास विज पुरवठा दिल्याची बाब मान्य करतात व तक्रारकर्त्याचे विज देयक कमी करुन दिल्याचे नमुद केले आहे व त्याबाबत तक्रारकर्त्याचे विज वापराचे कंन्झुमर पर्सनल लेजर दाखल केले आहे. तक्रारकर्त्याचे विज मिटर बदलवून देयक कमी करुन दिले आहे व त्याबाबत आवश्यक कागदपत्रे अभिलेखावर दाखल केले आहे. तक्रारकर्त्यास दिलेली सर्व देयक ही मिटर मधील रिंडींगनुसार युनीट्स घेऊन दिलेली असल्याने विरुध्द पक्षाचे सेवेत कुठलीही त्रुटी नाही करिता तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी असा उजर घेतला.
6.उभयपक्षकाचा वकीलांचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला.
7.तक्रारीत दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता मंचाचे निष्कर्ष पुढील प्रमाणे.
8. तक्रारकर्त्याकडे विरुध्द पक्षाचा विज पुरवठा असल्याची बाब दोन्ही पक्षांना मान्य आहे. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास सप्टेबर 2014 मधे 1549 युनिट्चे रुपये 10140/- चे विज देयक दिले जे अवास्तव चुकीच आहे असे तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे. परंतु अभिलेखावर दाखल कंन्झुमर पर्सनल लेजर चे वाचन केले असता तक्रारकर्त्यास अवास्तव आलेले विज देयक कमी करुन देण्यात आल्याचे निर्देशनास येते. यावरुन तक्रारकर्त्याचे तक्रारीत आता कुठलाही वाद राहिलेला नाही. तसेच तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या पुरसिस मधे ही बाब मान्य केली आहे. वरील सर्व वस्तुस्थितीवरुन हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
- अं ती म आ दे श -
1. तक्रारकर्तीची तक्रार खारीज करण्यात येते.
2. तक्रारीत दाखल अंतरीम अर्ज निकाली काढण्यात येतो.
3. उभयपक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा
4. आदेशाच्या प्रती उभयपक्षकरांना नि:शुल्क पाठविण्यात याव्या.