जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 528/2010.
तक्रार दाखल दिनांक : 02/09/2010.
तक्रार आदेश दिनांक : 20/04/2012.
निकाल कालावधी :
चंद्रकांत हिरा किरवले, वय 53 वर्षे,
रा. घर नं.184, जुनी लक्ष्मी चाळ, सोलापूर. तक्रारदार
विरुध्द
सहायक आयुक्त, भविष्य निर्वाह निधी कार्यालय,
165-अ, रेल्वे लाईन, सुरवसे टॉवर, सोलापूर. विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- सौ. शशिकला श. पाटील, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य
सौ. विद्युलता जे. दलभंजन, सदस्य
तक्रारदारयांचेतर्फेअधिकारप-धारक:दिपक अंबादास साळुंके
विरुध्दपक्षयांचेतर्फेविधिज्ञ: एस.एस. कालेकर
निकालपत्र
सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्ययांचे द्वारा :-
1. प्रस्तुत तक्रारीमध्ये तक्रारदार यांनी उपस्थित केलेला विवाद थोडक्यात असा आहे की, ते दी लक्ष्मी-विष्णू टेक्स्टाईल मील येथे कामगार म्हणून कार्यरत होता आणि सदर मील सन 1995 मध्ये बंद झाली आहे. तक्रारदार यांचा विरुध्द पक्ष यांच्याकडील निवृत्तीवेतन योजनेचा क्रमांक एम.एच. 348/006812 आहे. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडे 10-सी अर्ज पूर्ण भरुन दाखल केला आहे. शाळेच्या दाखल्यामध्ये व मीलकडून दिलेल्या लेखी पत्रानुसार त्यांचा जन्म दिनांक 17/2/1957 नमूद केला आहे. परंतु विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांचा जन्म दिनांक त्यांच्या दाखल्याप्रमाणे नोंद न घेता दि.1/1/1958 प्रमाणे निवृत्ती वेतन दरमहा अदा केल्याचे पत्र दिले आहे. जन्म तारखेनुसार तक्रारदार यांना 13 महिन्याचा फरक निघत असल्यामुळे नोटीस देऊनही विरुध्द पक्ष यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल करुन विरुध्द पक्ष यांच्याकडून 13 महिन्याचा फरक व त्यावरील व्याज मिळावे आणि मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.20,000/- व तक्रार खर्चापोटी रु.1,000/- मिळावेत, अशी विनंती केली आहे.
2. विरुध्द पक्ष यांनी दि.15/12/2010 रोजी लेखी म्हणणे दाखल केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार हे मे. लक्ष्मी-विष्णू मील लि. मध्ये कार्यरत होते आणि त्यांचा पेन्शन अकाऊंट नं. एम.एच./348/6812 आहे. सेवा पूर्ण झाल्यानंतर तक्रारदार यांनी मासिक निवृत्तीवेतन मिळविण्यासाठी 10-डी नुसार क्लेम फॉर्म दि.6/1/2009 रोजी सादर केला. त्यांच्या अभिलेखावरुन दि.1/1/1958 जन्म-तारीख गृहीत धरुन निवृत्ती वेतन दावा निर्णयीत केला आहे. दावा सादर करताना दि.3/12/2008 रोजी तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्या कार्यालयामध्ये नोंदलेल्या जन्म-तारखेबाबत हरकत नसल्याचे अंडरटेकींग दिले आहे. तसेच भविष्यामध्ये त्याबाबत विरुध्द पक्ष यांच्याकडे हरकत नोंदविणार नसल्याचे लिहून दिले आहे. तक्रारदार यांच्या तक्रारीमध्ये तथ्य नसल्यामुळे तक्रार खर्चासह रद्द करण्याची त्यांनी विनंती केली आहे.
3. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा
दिली आहे काय ? होय.
2. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
निष्कर्ष
4. मुद्दा क्र. 1 व 2 :- तक्रारदार हे मे. लक्ष्मी-विष्णू मील लि. मध्ये कार्यरत असल्याचे व त्यांचा पेन्शन अकाऊंट नं. एम.एच./348/6812 असल्याबाबत विवाद नाही. तक्रारदार यांची सेवा पूर्ण झाल्यानंतर मासिक निवृत्तीवेतन मिळविण्यासाठी 10-डी नुसार तक्रारदार यांनी क्लेम फॉर्म दि.6/1/2009 रोजी सादर केल्याबाबत विवाद नाही. प्रामुख्याने, तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार शाळेच्या दाखल्यामध्ये व मीलकडून दिलेल्या लेखी पत्रानुसार त्यांचा जन्म दिनांक 17/2/1957 नमूद केला असताना विरुध्द पक्ष यांनी त्यांच्या दाखल्याप्रमाणे नोंद न घेता दि.1/1/1958 प्रमाणे निवृत्ती वेतन दरमहा अदा केल्याचे पत्र दिले आहे आणि जन्म तारखेनुसार तक्रारदार यांना 13 महिन्याचा फरक अदा केलेला नाही, असे नमूद केले आहे. उलटपक्षी, विरुध्द पक्ष यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडील अभिलेखावरुन दि.1/1/1958 जन्म-तारीख गृहीत धरुन निवृत्ती वेतन दावा निर्णयीत केला आहे आणि दावा सादर करताना दि.3/12/2008 रोजी तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्या कार्यालयामध्ये नोंदलेल्या जन्म-तारखेबाबत हरकत नसल्याचे व भविष्यामध्ये त्याबाबत विरुध्द पक्ष यांच्याकडे हरकत नोंदविणार नसल्याचे अंडरटेकींग दिले आहे.
5. तक्रारदार यांनी रेकॉर्डवर त्यांचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र दाखल केले आहे. त्यामध्ये त्यांचा जन्म दिनांक 17/2/1957 असल्याचे निदर्शनास येते. तसेच लक्ष्मी विष्णू मील कामगार संस्था, सोलापूर यांनी दि.31/12/2008 रोजी दिलेल्या पत्रामध्ये ‘श्री. चंद्रकांत हिरा हिरवले MH/348/6812 यांनी पेन्शन फॉर्म भरला आहे. त्यावर त्यांची जन्म दिनांक 17/2/57 अशी लिहिली आहे. तरी जन्म दिनांक त्यांचे शाळा सोडल्याचे दाखल्यावरुन लिहिली आहे’, असे नमूद केले आहे. त्यामुळे तक्रारदार यांची जन्मतारीख 17/2/1957 असल्याचे स्पष्ट व सिध्द होते आणि त्याबाबत विरुध्द पक्ष यांचेही दुमत नाही. वास्तविक पाहता, मासिक निवृत्तीवेतन मिळविण्यासाठी तक्रारदार यांनी सादर केलेला 10-डी अर्ज विरुध्द पक्ष यांनी रेकॉर्डवर दाखल केलेला नाही. तसेच तक्रारदार यांनी जन्मतारखेबाबत दिलेले कथित अंडरटेकींग रेकॉर्डवर सादर केलेले नाही. ज्यावेळी रेकॉर्डवर दाखल कागदपत्रांनुसार तक्रारदार यांची जन्मतारीख 17/2/1957 आहे आणि त्याप्रमाणे दुरुस्ती होण्याकरिता तक्रारदार यांनी वारंवार पाठपुरावा करुनही त्याची दखल घेण्यात आलेली नाही, हे स्पष्ट होते. तक्रारदार यांना त्यांच्या अधिकृत जन्म तारखेनुसार निवृत्तीवेतन मिळणे निश्चितच कायदेशीर ठरते. विरुध्द पक्ष यांनी त्याची दखल न घेऊन तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी केलेली आहे, या निर्णयाप्रत आम्ही आलो आहोत.
6. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत.
आदेश
1. तक्रारदार यांची जन्म तारीख 17/2/1957 निश्चित धरुन विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना निवृत्ती वेतनाबाबतचे उर्वरीत देय लाभ द्यावेत.
2. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.1,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत.
3. उपरोक्त आदेशाचे पालन विरुध्द पक्ष यांनी आदेशाची प्रमाणित प्रत मिळालेपासून 30 दिवसाचे आत करावे. त्याप्रमाणे विहीत मुदतीत न घडलेस मुदतीनंतर एकूण सर्व रक्कम द.सा.द.शे. 9 टक्के दंडात्मक व्याज संपूर्ण रक्कम देय होईपावेतो देण्यास विरुध्द पक्ष हे जबाबदार राहतील,
4. उभय पक्षकारांना आदेशाची सही-शिक्क्याची प्रत नि:शुल्क द्यावी.
(सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार)(सौ. विद्युलता जे. दलभंजन)(सौ. शशिकला श. पाटील÷)
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
----00----
(संविक/स्व/20412)