जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 527/2010.
तक्रार दाखल दिनांक : 09/08/2010.
तक्रार आदेश दिनांक : 19/08/2013. निकाल कालावधी: 03 वर्षे 00 महिने 10 दिवस
मच्छिंद्र धोंडीबा कांबळे, वय 59 वर्षे,
रा. 162, जुनी लक्ष्मी चाळ, सोलापूर. तक्रारदार
विरुध्द
सहायक आयुक्त, भविष्य निर्वाह निधी कार्यालय,
165-अ, रेल्वे लाईन्स्, सुरवसे टॉवर, सोलापूर. विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- श्री. दिनेश रा. महाजन, अध्यक्ष
सौ. विद्युलता जे. दलभंजन, सदस्य
तक्रारदार स्वत:
विरुध्द पक्ष यांचेतर्फे विधिज्ञ : एस.एस. कालेकर
आदेश
सौ. विद्युलता जे. दलभंजन, सदस्य यांचे द्वारा :-
1. प्रस्तुत तक्रारीमध्ये तक्रारदार यांनी उपस्थित केलेला विवाद थोडक्यात असा आहे की, ते दी लक्ष्मी-विष्णू टेक्स्टाईल मील येथे कामगार म्हणून कार्यरत होते आणि विरुध्द पक्ष यांचे निवृत्ती वेतनाचे सभासद आहेत. तक्रारदार यांचा निवृत्ती वेतन योजनेचा क्रमांक : एम.एच.348/002264 आहे. सन 1995 मध्ये मील बंद पडल्यानंतर तक्रारदार यांनी नियमाप्रमाणे निवृत्ती वेतन फॉर्म नं. 10-सी विरुध्द पक्ष यांच्याकडे भरुन दिला. त्यावेळी तक्रारदार शाळेचा दाखला दिलेला असून ज्यावर त्यांची जन्मतारीख 01/02/1951 आहे. परंतु विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांची जन्मतारीख 01/09/1952 ग्राह्य धरुन तक्रारदार यांना निवृत्ती वेतनाचा मोबदला प्रतिमहा अदा केल्याचे पत्र दिले. तक्रारदार यांनी नोटीस देऊन 19 महिन्याच्या फरकाची रक्कम मागणी केली असता विरुध्द पक्ष यांनी कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रारीद्वारे निवृत्ती वेतन योजनेबाबत 19 महिन्याच्या फरकाची रक्कम व त्यावरील व्याज मिळावे आणि मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.20,000/- व तक्रार खर्च रु.1,000/- मिळावा, अशी विनंती केलेली आहे.
2. विरुध्द पक्ष यांना मंचाच्या नोटीसची बजावणी झाल्यानंतर ते मंचासमोर उपस्थित झाले. परंतु उचित संधी देऊनही त्यांनी लेखी म्हणणे दाखल न केल्यामुळे प्रस्तुत तक्रार कैफियतीशिवाय चालविण्याचे आदेश दि.18/3/2011 रोजी करण्यात आले. त्यानंतर विरुध्द पक्ष यांनी दि.22/6/2012 रोजी अर्जाद्वारे लेखी म्हणणे दाखल करुन घेण्यासाठी No Say आदेश रद्द करण्याची विनंती करण्यात आली. रु.500/- खर्च भरण्याच्या अटीवर त्यांचा अर्ज मंजूर करण्यात आला. परंतु विरुध्द पक्ष यांना संधी असतानाही खर्चाची रक्कम भरणा केली नाही. त्यामुळे त्यांचे लेखी म्हणणे विचारात घेण्यासाठी अभिलेखावर दाखल/नोंद करता येणार नाही.
3. तक्रारदार यांची तक्रार, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे व लेखी युक्तिवादाचे अवलोकन करता निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा
दिली आहे काय ? होय.
2. तक्रारदार निवृत्ती वेतनाच्या फरकाची रक्कम मिळविण्यास
पात्र आहेत काय ? होय.
3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
निष्कर्ष
4. मुद्दा क्र. 1 व 2 :- तक्रारदार हे विरुध्द पक्ष यांच्याकडे कर्मचारी निवृत्ती वेतन योजना, 1995 अन्वये निवृत्ती वेतनाचे लाभ मिळविण्याकरिता पात्र असल्याबाबत त्यांनी अभिलेखावर पेन्शन पेमेंट ऑर्डर दाखल केलेली आहे. त्याचे अवलोकन करता तक्रारदार यांचा भविष्य निर्वाह निधी क्र. एम.एच.348/2264 असून त्यामध्ये त्यांची जन्मतारीख दि.1/9/1952 दर्शविलेली आहे. तक्रारदार यांच्या कथनाप्रमाणे शाळेचा सोडल्याच्या दाखल्यावर त्यांची जन्मतारीख 01/02/1951 असताना विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांची जन्मतारीख 01/09/1952 ग्राह्य धरुन निवृत्ती वेतनाचा मोबदला प्रतिमहा अदा केल्याचे पत्र दिलेले आहे. त्या अनुषंगाने त्यांना निवृत्ती वेतन योजनेबाबत 19 महिन्याच्या फरकाची रक्कम व त्यावरील व्याज न दिल्यामुळे प्रस्तुत तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.
5. अभिलेखावर तक्रारदार यांचा शाळा सोडल्याचा दाखला असून त्यामध्ये तक्रारदार यांची जन्मतारीख दि.1/2/1951 असल्याचे स्पष्टपणे निदर्शनास येते. तसेच विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना दिलेल्या ओळखपत्रामध्ये जन्म वर्ष हे 1951 नमूद करण्यात आलेले आहे. तक्रारदार यांच्या कथनाप्रमाणे विरुध्द पक्ष यांच्याकडे फॉर्म नं.10-सी भरुन देताना त्यावर जन्मतारीख दि.1/2/1951 नमूद करुन सोबत शाळा सोडल्याचा दाखला दिलेला होता. वरील वस्तुस्थिती स्पष्ट असताना विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांची जन्म तारीख दि.1/2/1951 ऐवजी दि.1/9/1952 अशी चुकीची नमूद करुन निवृत्ती वेतन अदा करण्याचा आदेश दिल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे निश्चितच तक्रारदार यांना 18 महिन्यांचे निवृत्ती वेतनाच्या रकमेपासून वंचित रहावे लागलेले आहे, हे मान्य करावे लागेल. मा. राष्ट्रीय आयोगाने ‘प्रॉव्हीडंट फंड कमिशनर, हुबळी /विरुध्द/ कृष्णा’, रिव्हीजन पिटीशन नं. 859/2007 मध्ये असे मत व्यक्त केले आहे की,
We are, therefore, of the view that the Fora below erred in concluding that the date of birth of the Respondent was 01.09.1940 and not 25.04.1936 by not giving due evidentiary value to the School Certificate which is usually taken as authentic proof of age
6. आमच्या समोरील प्रकरणात विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांची जन्मतारीख दि.1/2/1951 ऐवजी दि.1/9/1952 असल्याचे कोणत्याही प्रकारे सिध्द केलेले नाही. उलटपक्षी, विरुध्द पक्ष यांनी त्यांच्याकडे उचित कागदपत्रे दाखल केलेली असतानाही त्याकडे गंभीर दुर्लक्ष करुन चुकीच्या जन्मतारखेच्या आधारे निवृत्ती वेतनाचे लाभ मंजूर केलेले आहेत. इतकेच नव्हेतर, तक्रारदार यांनी पत्रव्यवहार करुनही त्यामध्ये योग्य दुरुस्ती करण्याची दखल घेतलेली नाही.
7. मंचासमोर दाखल कागदपत्रांवरुन व मा. राष्ट्रीय आयोगाच्या निर्णयातील तत्वाप्रमाणे विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांची जन्मतारीख दि.1/2/1951 असतानाही त्याकडे दुर्लक्ष करुन व कोणताही आधार नसताना जन्मतारीख दि.1/9/1952 गृहीत धरुन निवृत्ती वेतनाचे लाभ देण्याचे कृत्य चुकीचे, असंयुक्तिक व अयोग्य आहे. आमच्या मते, विरुध्द पक्ष यांचे सदर कृत्य हे सेवेतील त्रुटी ठरते आणि तक्रारदार हे 18 महिन्यांचे म्हणजेच दि.1/9/1952 ऐवजी दि.1/2/1951 प्रमाणे देय निवृत्ती वेतनाच्या फरकाची रक्कम व त्यावर व्याज मिळविण्यास पात्र ठरतात. सध्याच्या प्रचलित बँक व्याज दराप्रमाणे म्हणजेच द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने देय फरकाची रक्कम तक्रारदार यांना अदा करणे न्यायोचित आहे. सबब, आम्ही मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी दिलेले आहे.
8. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत.
आदेश
1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना देय निवृत्ती वेतनाबाबत दि.1/2/1951 पासून लाभ द्यावेत आणि त्या अनुषंगाने दि.1/2/1951 ते 1/9/1952 पर्यंतच्या निवृत्ती वेतनाच्या लाभाबाबत फरकाची एकूण देय रक्कम दि.21/6/2010 पासून संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने द्यावी.
2. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.1,000/- द्यावेत.
3. विरुध्द पक्ष यांनी उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत करावी.
4. उभय पक्षकारांना आदेशाची सही-शिक्क्याची प्रत नि:शुल्क द्यावी.
(सौ. विद्युलता जे. दलभंजन) (श्री. दिनेश रा. महाजन÷)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
----00----
(संविक/स्व/19813)