निकाल
(घोषित दि. 14.02.2017 व्दारा श्री. सुहास एम.आळशी, सदस्य)
तक्रारदाराने त्याच्या तक्रार अर्जात नमुद केले आहे की, तक्रारदार हा जालना येथील रहिवासी असुन तो प्रतिपक्ष यांचा ग्राहक आहे. तक्रारदाराने प्रतिपक्ष यांच्याकडुन घरगुती वापराचे वीज कनेक्शन घेतले आहे त्याचा ग्राहक क्र. 51003345566 असा आहे. तक्रारदार नियमित वीज देयकाचा भरणा करणारा ग्राहक असुन माहे एप्रिल 2016 पर्यतचे सर्व देयके त्याने भरलेली आहेत. दिनांक 13/5/2016 पासुन तक्रारदाराचे मिटरचा लाल लाईट सतत सुरु दिसु लागला. त्याबाबत त्याने प्रतिपक्ष यांच्याकडे अर्ज केला. तक्रारदाराचे सदर अर्जावर प्रतिपक्ष यांनी स्थळ पाहणी केली व तक्रारदार वापर करीत असलेल्या मिटरचा वेग 0.47 टक्के जास्त असल्याचा अहवाल दिला. त्यानंतर तक्रारदार याचे मिटर दि.30/6/2016 रोजी बदलण्यात आले. त्यानंतर माहे मे 2016 ते 7/6/2016 पर्यतचे देयक इनएक्सीस असे दर्शवून सरासरी 169 युनिटचे रु. 1120/- चे देयक तक्रारदारास देण्यात आले व पुर्वीचे रिडींग 2105 असे दर्शविण्यात आले. त्यानंतर माहे मार्च 2016 चे देयक पाठविले त्यामध्ये पुन्हा पुर्वीचे रिडींग 2105 दर्शवुन चालु रिडींग इनएक्सीस असे दर्शविले व 169 या सरासरीनुसार देयक दिले. त्यानंतर प्रतिपक्ष यांनी माहे जुन 2016 चे देयक दिले व त्यामध्ये पुन्हा पुर्वीचे रिडींग 2105 असे दर्शवून चालु रिडींग2453 दर्शविले व एकुण वापर 348 युनिटचा दर्शविला. माहे जुलै 2016 मध्ये प्रतिपक्ष यांनी जे देयक तक्रारदाराला दिले त्यामध्ये पुर्वीचे रिडींग 1 व चालु रिडींग 266 असे दर्शविले व एकुण वीज वापर1268 युनिटचा दाखवुन समायोजित युनिटच्या रकान्यामध्ये 1003 दर्शविले व 15620/- रु. चे देयक तक्रारदाराला दिले.
माहे ऑगस्टचे देयकामध्ये प्रतिपक्ष यांनी पुर्वीचे रिडींग 266 दर्शविले व चालु रिडींग 449 दर्शवुन 183 युनिटचा वापर दाखविला ते बरोबर असुन माहे मे-जुन-जुलै 2016 ची देयके चुकीची आहेत अशी तक्रारदाराची तक्रारअसुन रु. 15620/- चे देयक रदद होऊन मिळावे, 10,000/- रु. मानसिक त्रासापोटी मिळावे, व 5,000/- रु. नुकसान भरपाई रक्कम मिळावी, अशी मागणी त्याने त्याचे तक्रार अर्जात केली आहे. तक्रारदार याने मंचाचे दि. 10/10/2016 चे आदेशानुसार अंतरीम रक्कम रु. 5000/- चा भरणा केलेला आहे.
याबाबत प्रतिपक्ष क्र. 1 व 2 यांना नोटीसेस काढण्यात आल्या, त्यांनी नि.क्र. 13 वर जबाब दाखल केला. त्यामध्ये त्यांनी तक्रारदारास देण्यात आलेले देयक बरोबर आहे, मिटरची तपासणी केली असुन त्यामध्ये कोणताही दोष नाही, तक्रारीस कोणतेही कारण घडले नाही, तक्रारदारास नुकसान भरपाई मागण्याचा कोणताही अधिकारी नाही, देयकात कोणतीही तांत्रिक चुक नाही, असे नमुद केले असुन सी.पी.एल.चा उतारा दाखल केला व तक्रारदाराची मागणी खर्चासह फेटाळण्यात यावी, अशी मागणी केली आहे
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, व गैरअर्जदार यांनी प्रकरणात दाखल केलेला लेखी जबाब आणि दाखल दस्तऐवज यांचे अवलोकन करुन मंचाने खालील मुद्दे विचारात घेतले.
मुद्दे निष्कर्ष
1) प्रतिपक्ष यांनी सेवेत त्रुटी केली आहे काय ? होय.
2) काय आदेश ? अंतिम आदेशानुसार
कारणमीमांसा
मुददा क्र.1 ः तक्रारदाराच्या तक्रारीचे, गैरअर्जदार यांनी दिलेल्या जबाबाचे व दोन्ही पक्षांनी दाखल केलेल्या दस्तऐवजांचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, माहे एप्रिल 2016 चे देयकाबाबत तक्रारदार व गैरअर्जदार यांच्यामध्ये कोणताही वाद नव्हता व नाही. गैरअर्जदार यांनी रिडींग माहे मे 2016 चे जे देयक तक्रारदाराला दिले आहे ते INACCS असे आहे व त्यावर मागील 2105 असे दर्शविले आहे व ते देयक रु. 1130/- चे असुन सरासरी देयक 169 युनीटचे असे तक्रारादार याला देण्यात आलेले आहे. माहे 16/5/2016 रोजी तक्रारदार यांनी गैरअर्जदारास लेखी अर्ज करुन मिटरमधील तांत्रिक बिघाडाबाबत अवगत केले. 28/5/2016 रोजी स्थळ तपासणी अहवाल देण्यात आला. त्यानुसार तक्रारदार याच्या घरातील “सर्व लोड बंद केला असता पल्स पडतात” असा शेरा देण्यात आला. गैरअर्जदार यांच्या मिटर टेस्टींग युनिटमध्ये मिटरची तपासणी तांत्रिकदृष्टया करण्यात आली. सदर तपासणी अहवालानुसार तक्रारदार यांचे मिटर 47 टक्के जलद गतीने फिरत असल्याचे दर्शविले आहे. माहे जुन 2016 मध्ये परत मागील रिडींग 2105 दर्शवुन चालु रिडींग 2453 दर्शविली आहे व तक्रारदार याला 348 युनिटचे देयक देण्यात आले. सदर बिलामध्ये मे 2016 ची सरासरी युनिट 169 युनीटची भरलेली रक्कम रु. 1148/- वजा करण्यात आली त्या बाबत वाद नाही. त्यानंतर तक्रारदार याचे मिटर बदलण्यात आले व त्याला माहे जुलै 2016 चे देयक देण्यात आले त्यामध्ये मागील रिडींग 1 दर्शविले असुन चालु रिडींग 266 दर्शविले व समायोजित युनिट 1003 आहे असे दर्शविले आहे. त्याप्रमाणे वीज देयकाची रक्कम रु. 15620/- दर्शविली आहे. या देयकाला तक्रारदाराचा प्रमुख आक्षेप आहे.
वरील सर्व देयकांचे, दस्तऐवजांचे व गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या सि.पी.एल.चे अवलोकन केले असता, असे दिसुन येते की, ऑगस्ट 2015 पासुन जुन 2016 पर्यतची सर्व देयके तक्रारदाराचे प्रत्यक्ष वीज वापरानुसार व रिडींगनुसार देण्यात आलेली आहेत. परंतु माहे जुन मध्ये तक्रारदाराचे मिटर बदलल्यावर माहे जुलै 2016 चे देयकामध्ये एकुण समायोजित युनिटचे रकान्यामध्ये 1003 युनिट दर्शविले आहेत ते कसे व कोठुन आले या बाबत काहीही आकलन होत नाही. गैरअर्जदार यांनी त्याबाबत स्पष्टीकरण दिलेले नाही. गैरअर्जदार यांनी तक्रारदाराचे मिटरचा जो स्थळ पाहणी अहवाल व मिटर तपासणी अहवाल दिला त्यामध्ये परसेन्टेज एरर या रकान्यामध्ये तक्रारदाराचे मिटर 47 टक्के सदोष दर्शविले आहे. त्यामुळे ते जलदगतीने धावते हे स्पष्ट आहे. त्यामुळे माहे जुलैमध्ये रु. 15620/- चे देयक तक्रारदार याला देण्यात आलेले आहे ते पुर्णपणे चुकीचे व बेकायदेशीर आहे. मात्र माहे जुलैमध्ये तक्रारदारास दि. 8/6/2016 ते 8/7/2016 या कालावधीतील वीज वापरापोटी 265 युनिटचे देयक दिले आहे ते बदललेल्या व नवीन मिटरप्रमाणे असल्याने ते बरोबर आहे व त्याबाबत तक्रारदार व गैरअर्जदार यांच्यामध्ये कोणताही वाद नसल्याने ते भरणे तक्रारदारावर बंधनकारक आहे. त्यामुळे मुद्दा क्र. 1 चे उत्तर होकारार्थी देऊन, मुद्दा क्र. 2 नुसार मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येते.
- गैरअर्जदार यांनी तक्रारदारास दिलेले माहे जुलै 2016 चे रु. 15620/- चे वीज देयक रद्द करण्यात येत आहे.
ब) गैरअर्जदार यांनी तक्रारदारास माहे जुलैचे 265 युनिटचे वीज देयक द्यावे व
त्यावर व्याज व दंड आकारु नये. तक्रारदाराने भरलेल्या अंतरीम आदेशाची
रक्कम रु.5000/- चे समायोजन त्याचे देयकांमध्ये करण्यात यावे.
- गैरअर्जदार यांनी तक्रारदारास नुकसान भरपाईपोटी रु. 2,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रु. 1500/- द्यावे.
- सदर आदेशाचे पालन आदेश दिनांकापासुन 30 दिवसांचे आत करावे, न केल्यास आदेश कलम 3 मधील रकमेवर द.सा.द.शे. 9 टक्के व्याज देय राहील.
श्रीमती एम.एम.चितलांगे श्री. सुहास एम.आळशी श्री. के.एन.तुंगार
सदस्या सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, जालना