निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 05/10/2011
तक्रार नोदणी दिनांकः- 11/10/2011
तक्रार निकाल दिनांकः- 18/12/2013
कालावधी 02 वर्ष.02महिने.07 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल. M.Sc.LLB.
---------------------------------------------------------------------------------------------------------
श्री.सुरेश पिता भास्करसा बांडे. अर्जदार.
वय 54 वर्षे, धंदा.शेती व व्यापार. अॅड.जितेंद्र एन.घुगे.
रा.मेनरोड जिंतूर ता.जिंतूर जि.परभणी.
विरुध्द
सहाय्यक अभियंता. गैरअर्जदार.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं.लि. अॅड.एस.एस.देशपांडे.
(महावितरण) जिंतूर उपविभाग,
परभणी रोड,जिंतूर ता.जिंतूर जि.परभणी.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदाराने अर्जदारास चुकीची बिले देवुन सेवेत त्रुटी दिल्याबद्दलची तक्रार आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदार हा जिंतूर जि.परभणी येथील रहिवाशी असून त्याने गैरअर्जदाराकडून ग्राहक क्रमांक 540010160540 अन्वये विद्युत पुरवठा घेतला, ज्याचा मिटर क्रमांक 9000366670 असा आहे.
अर्जदाराचे म्हणणे की, तो गैरअर्जदाराकडे नियमित विज भरणा करत आला आहे, परंतु गेल्या 3 वर्षापासून गैरअर्जदाराने अर्जदारास अवाजवी बिले दिले आहेत.
अर्जदाराचे म्हणणे की, अर्जदारास जुलै 2008 ला 3450 युनीटचे बिल आलेले असून ऑगस्ट 2008 मध्ये 620 युनीटचे, सप्टेंबर 2008 मध्ये 620 युनीट, ऑक्टोबर 2008 मध्ये 620 युनीट, नोव्हेंबर 2008 मध्ये 620, डिसेंबर 2008 मध्ये 620 युनीट, व जानेवारी 2009 मध्ये 620 युनीटचे बिले गैरअर्जदाराने अर्जदारास दिली, सदर बिले ही पूर्णतः अवाजवी चुकीच्या स्वरुपाची आहेत.
अर्जदाराचे म्हणणे की, गैरअर्जदाराने बेजबाबदारपणाचा कळस गाठला जेव्हा त्यानी मे 2011 मध्ये 6735 युनीट, जुन 2011 मध्ये 842 युनीट, जुलै 2011 मध्ये 100 युनीटचे बिल दिले ही सर्वबिले चुकीची आहेत. याबद्दल अर्जदाराने गैरअर्जदारास वेळोवेळी तक्रार निवेदने दिली, परंतु त्याने दखल घेतली नाही. तसेच अर्जदाराचे विज पुरवठा तोडण्याची भिती गैरअर्जदाराने अर्जदारास दाखवलेमुळे अर्जदाराने अवाजवी बिलापोटी गैरअर्जदारास दिनांक 22/06/2011 रोजी 20,000/- रु. अदा केले तसेच 22/06/2011 रोजी 2500/- दिनांक 03/07/2009 रोजी 2000/- व दिनाक 23/12/2009 रोजी 1500/- रु. अदा केले.
अर्जदाराचे म्हणणे की, त्याने गैरअर्जदारास दिनांक 11/12/2008 रोजी 10/11/2008, 13/12/2009 रोजी लेखी निवेदन दिले, परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही, शेवटी अर्जदारास ऑगस्ट 2011 मध्ये 34720/- रु. चे बिल आले, म्हणून सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले व मंचास विनंती केली आहे की, सदरचा अर्ज मंजूर करुन जुलै 2008 ते ऑगस्ट 2011 पर्यंतचे बिले रद्द करावेत व तसेच अर्जदाराने गैरअर्जदाराकडे बिलापोटी भरण्यात आलेले 22500/- जे की, दिनांक 22/06/2011 रोजी भरलेली भरलेल्या तारखेपासून गैरअर्जदाराने अर्जदारास परत करण्याचा आदेश व्हावा तसेच अर्जदाराने दिनाक 03/07/2009 रोजी भरलेली 2000/- रु. व 23/12/2009 रोजी भरलेले 1500/- रु. व्याजासह अर्जदारास परत करण्याचा आदेश करावा व तसेच मानसिक त्रसापोटी 90,000/- व तक्रार अर्ज खर्चापोटी 10,000/- रु. गैरअर्जदाराने अर्जदारास देण्याचा आदेश करावा अशी विनंती केली आहे.
अर्जदाराने तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 2 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
अर्जदाराने पुराव्यासाठी नि.क्रमांक 6 वर 2 कागदपत्रे दाखल केले आहेत. ज्यामध्ये ऑगस्ट 2011 चे अर्जदारास आलेले लाईट बिल, अर्जदाराने दिनांक 26/09/2011 रोजी गैरअर्जदारास दिलेले निवेदन कागदपत्रे दाखल केले आहेत.
तक्रार अर्जास लेखी निवेदन सादर करण्यासाठी मंचातर्फे गैरअर्जदारांना नोटीसा काढण्यात आल्या, गैरअर्जदार वकिला मार्फत मंचासमोर हजर, व नि.क्रमांक 14 वर आपला लेखी जबाब सादर केला, त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, गैरअर्जदाराने अर्जदारास कसल्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिली नाही व प्रत्यक्ष रिडींग प्रमाणे गैरअर्जदाराने अर्जदारास विद्युत देयके दिलेली आहेत. सदरची तक्रार खोटी व बनावटी आहे व ती खारीज होणे योग्य आहे.
गैरअर्जदाराचे म्हणणे की, अर्जदाराचा सध्याचा मिटर क्रमांक 7612523076 असा आहे जर अर्जदाराच्या म्हणण्यानुसार गेल्या 3 वर्षापासून अवाजवी बिले मिळत होती तर त्यांनी इतक्या काळात गैरअर्जदाराकडे तक्रार का केली नाही ? अर्जदाराची मिटर रिडींग न मिळाल्यामुळे विज नियमाना अनुसरुन अर्जदारास सरासरी आधारावर विज बिले द्यावी लागली व प्रत्यक्ष रिडींग मिळाल्यावर सरासरी आधारे दिलेले बिले वजा करुन मग प्रत्यक्ष मिटर रिडींग प्रमाणे बिले देण्यात आले व ते बरोबर आहेत अर्जदाराने नियमितपणे विज बिल भरले नाही, म्हणून थकबाकी व त्यावर व्याज वाढले.
गैरअर्जदाराचे म्हणणे की, त्याने अर्जदारास कसल्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिली नाही,लाईट बिले रिडींग प्रमाणे दिले आहेत. त्यामुळे गैरअर्जदाराने मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी.
गैरअर्जदाराने लेखी जबाबाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 15 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन निर्णयास निर्णयास उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदाराने अर्जदारास जुलै 2008 ते ऑगस्ट 2011
पर्यंतचे चुकीचे लाईट बिले देवुन अर्जदारास सेवेत त्रुटी
दिली आहे काय ? नाही.
2 अर्जदाराने दिनांक 22/06/2011 रोजी 22,500/-
3/07/2009 रोजी 2,000/- व 23/12/2009 रोजी 1,500/- रु.
गैरअर्जदाराकडे भरलेले गैरअर्जदाराकडून वापस मिळण्यास
पात्र आहे काय ? नाही.
3 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे ही बाब नि.क्रमांक 6/1 वरील ऑगस्ट 2011 च्या लाईट बिलावरुन सिध्द होते. अर्जदाराचे म्हणणे की, गैरर्अदाराने अर्जदारास जुलै 2008 ते ऑगस्ट 2011 पर्यंतचे लाईट बिले चुकीची व अवाजवी दिली आहेत हे म्हणणे मंचास योग्य वाटत नाही, कारण अर्जदाराच्या तक्रार अर्जाचे संपूर्ण अवलोकन केले असता अर्जदाराने केवळ सदरची बिले चुकीची व अवाजवी आहेत, असे मोघम म्हंटले आहे.त्याचा विद्युत वापर दिलेल्या युनीट एवढा नाही, असे कोठेही म्हंटले नाही, तसेच जुलै 2008 ते ऑगस्ट 2011 पर्यंतचे लाईट बिले चुकीचे आहेत, याबाबत अर्जदारराने पुरावा म्हणून केवळ ऑगस्ट 2011 चे लाईट बिल दाखल केलेले आहे. अर्जदाराने सदरची बिले चुकीचे कशी आहेत हे सिध्द करण्याकरीता कोणताही ठोस पुरावा मंचासमोर आणला नाही. त्यामुळे सदरच्या काळातील बिले चुकीची होती हे म्हणने योग्य होणार नाही, असे मंचास वाटते. तसेच अर्जदाराने सदर दाखल केलेल्या संपूर्ण तक्रार अर्जाचे अवलोकन केले असता अर्जदाराने विनंती सदराखाली सदर जुलै 2008 ते ऑगस्ट 2011 पर्यंतची लाईट बिले फक्त रद्द करण्यात यावीत असे म्ंहटले आहे, जे की, नैसर्गिक न्यायतत्वाच्या विरोधात आहे. गैरअर्जदाराने सदरची बिले देवुन अर्जदारास कोठेही त्रुटी दिल्याचे दिसून येते नाही. असे मंचास वाटते, म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर नकारार्थी देत आहे.
मुद्दा क्रमांक 2.
अर्जदाराचे म्हणणे की, त्याने गैरअर्जदाराकडे दिनांक 22/06/2011 रोजी 22,500/- रु, 03/07/2009 रोजी 2000/- रु. व 23/12/2009 ला 1500/- रु भरलेले गैरअर्जदाराने परत करावे हे अर्जदाराचे म्हणणे मंचास योग्य वाटत नाही, कारण अर्जदाराने याबाबत पैसे भरल्याचा कोणताही ठोस कागदोपत्री पुरावा ( पावती ) मंचासमोर आणला नाही, म्हणून तो सदर रक्कम वापस मिळवण्यास पात्र नाही असे मंचास वाटते, म्हणून मुद्दा क्रमांक 2 चे नकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्यात येत आहे.
2 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
3 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.