निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 18.07.2011 तक्रार नोदणी दिनांकः- 19.07.2011 तक्रार निकाल दिनांकः- 04.02.2012 कालावधी 06 महिने 16 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकात बी. पांढरपटटे, B.Com.LL.B.
सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. अशोक पि.रामराव शिंदे अर्जदार वय 42 वर्षे धंदा वकिली व शेती, (अड.डी.यु.दराडे ) रा.रावराजुर, ता.पालम, जि.परभणी. विरुध्द सहायक अभियंता गैरअर्जदार महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी पालम (अड.एस.एस.देशपांडे) ता.पालम, जिल्हा परभणी ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपटटे अध्यक्ष 2) सौ.सुजाता जोशी सदस्या 3) सौ.अनिता ओस्तवाल सदस्या ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा – श्री.सी.बी.पांढरपटटे, अध्यक्ष ) शॉर्टसर्कीटने जळालेल्या उस फडाची नुकसान भरपाई मिळणेसाठी प्रस्तूतची तक्रार आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदार रावराजुर, ता. पालम, जि. परभणी येथील रहिवासी आहे. त्याच्या मालकीची रावराजुर येथे सर्व्हे क्र.12 क्षेञ 2 हेक्टर जमीन आहे. सन 2010 मध्ये त्याने शेतात 80 गुंठे क्षेञात उसाची लागवड केलेली होती. त्याच्या शेतातुन मौजे धनेवाडी या गावाकडे गैरअर्जदार याची विद्युत वाहिनी ओढलेली आहे. अर्जदाराने शेतजमिनीतील विहीरीवर देखील गैरअर्जदाराकडुन कृषी पंपाचे वीज कनेक्शन घेतलेले आहे. त्याचे वीज बिल तो नियमीत भरतो. शेतातुन गेलेल्या विद्युत वाहिनीच्या पोलवरील तारा खांब वाकल्यामुळे ढिल्या पडलेल्या होत्या. वा-यामुळे त्या चिकटल्यावर शेतात ठिणग्या पडतात म्हणुन गैरअर्जदारास दिनांक 26.04.2011 रोजी लेखी अर्ज देवुन त्याबाबत तक्रार केली होती. परंतु त्याने त्याची गंभीर दखल घेतली नाही. तारीख 02.05.2011 रोजी पुन्हा विद्युत वाहिनीच्या तारा एकमेकांना घासुन ठिणग्या पडुन अर्जदाराच्या शेतातील उभ्या उसाचे पीक संपुर्ण जळाले. दिनांक 03.05.2011 रोजी तहसिल कार्यालयामार्फत त्याचा पंचनामा झाला होता. अर्जदाराचे म्हणणे असे की, तो अनेक वर्षापासून उसाचे पीक घेतो, एकरी उतारा 40 टन इतका येतो. साखर कारखान्याकडून रूपये 2200/- प्रती टन उस घेतला जातो. त्यानुसार अर्जदारास एकुण 1,86,000/- उत्पन्नाचे नुकसान झाले. त्या नुकसानीस गैरअर्जदार हा सर्वस्वी जबाबदार आहे. म्हणुन ग्राहक मंचात प्रस्तुतची तक्रार दाखल करून गैरअर्जदाराकडुन वर नमुद केलेली नुकसान भरपाई व अर्जाचा खर्च रूपये 2000/- गैरअर्जदारकडुन मिळावा अशी मागणी केली आहे. तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ अर्जदाराचे शपथपत्र (नि.2) आणि पुराव्यातील कागदपत्रात नि. 4 लगत एकुण 5 कागदपत्रे दाखल केली आहेत. तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदारास मंचातर्फे रजिष्टर नोटीस पाठविली होती. नेमलेल्या तारखेस तक्रार अर्जावर लेखी म्हणणे देण्यासाठी मुदत मागितली. ती मंजुर करण्यात आली. त्यानंतरही पुन्हा दोन वेळा मुदती देवुनही लेखी म्हणणे सादर न केल्यामुळे त्याच्या विरूध्द दिनांक 14.12.2011 रोजी ‘नो से’ आदेश पारीत करून प्रकरण पुढे चालु ठेवले. अंतीम सुनावणीच्या वेळी अर्जदाराचा युक्तीवाद ऐकुन मेरीटवर प्रकरणाचा निकाल देण्यात येत आहे. निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे. मुद्दे उत्तर 1 अर्जदाराच्या शेतातुन गेलेल्या विद्युत वाहिनी तारा व्यवस्थीत ताण देवुन सुस्थितीत ठेवण्याच्या बाबतीत गैरअर्जदारकडुन सेवाञुटी झाली आहे काय ? होय 2 शेतावरील विद्युत तारा ढिल्या असल्यामुळे एकमेकांना घासुन शॉर्ट सर्कीटने जळालेल्या अर्जदाराच्या शेतातील उस पिकाची नुकसान भरपाई देण्यास गैरअर्जदार जबाबदार आहेत काय ? होय 2 अर्जदार किती नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे ? अंतिम आदेशाप्रमाणे कारणे मुद्ये क्रमांक 1 ते 3 - अर्जदाराने रावराजुर येथील त्याचे मालकीचे शेत सर्व्हे क्रमांक 12 मध्ये 80 गुंठे क्षेञात सन 2010-11 मध्ये उसाची लागवड केलेली होती हे अर्जदाराने पुराव्यात नि.4/3 वर दाखल केलेल्या जमिनीच्या 7/12 उता-यातील नोंदीवरून शाबीत झाले आहे. शेतातुन धनेवाडी, ता.पालम येथील गावासाठी विद्युत लाईन गेली आहे. विद्युत पोलच्या तारा ढिल्या असल्यामुळे हेलकावे खावुन एकमेकांना घर्षण झाल्यावर शॉर्ट सर्कीटने ठिणग्या पडतात अशी लेखी तक्रार अर्जदाराने दिनांक 26.04.2011 रोजी गैरअर्जदाराकडे दिलेली होती. त्या हस्तपोच अर्जाची स्थळप्रत पुराव्यात नि.4 वर दाखल केली आहे. दिनांक 02.05.2011 रोजी सकाळच्या सुमारास शेतातील विद्युत वाहिनीच्या तारांचा एकमेकांना स्पर्श होवुन शॉर्ट सर्कीटने ठिणग्या पडुन अर्जदाराच्या शेतातील उभे उसाचे पीक जळाले होते ही वस्तुस्थिती संबंधीत अर्जदाराने दिनांक 03/05/2011 रोजी तहसिलदार पालम यांच्याकडे लेखी अर्ज दिलेला होता. अर्जाची स्थळप्रत पुराव्यात नि. 4/1 वर दाखल केली आहे. अर्जदाराच्या अर्जानुसार मंडळ अधिकारी, चाटोरी, ता.पालम यांनी पंच साक्षीदारांसमक्ष जळालेल्या उसाच्या नुकसानीचा पंचनामा केलेला होता. त्या पंचनाम्याच्या सर्टीफाईड कॉपी पुराव्यात नि.4/5 वर दाखल केल्या आहेत. पुराव्यातील या वस्तुस्थितीवर अर्थातच शेतातुन गेलेल्या विद्युत लाईनवरील तारांच्या शॉर्ट सर्कीटमुळे उभ्या पिकांवर ठिणगी पडुन उस जळालेला होता हे शाबीत झालेले आहे. उस पीक जळाल्यानंतर अर्जदाराने जसे तहसिलदारांना कळविले होते तसे लगेच गैरअर्जदारास देखील कळविले होते यासंबंधी पुरावा प्रकरणात दाखल केलेला नसला तरी घटना घडण्यापुर्वी विद्युत वाहिनीच्या तारा ढिल्या असल्यामुळे त्याच्या ठिणग्या पडतात यासंबंधीची लेखी तक्रार अर्जदाराने गैरअर्जदाराकडे दिनांक 26.04.2011 रोजी म्हणजे घटनेच्या अगोदर 15 दिवसाच्या पुर्वी दिलेली होती हे पुराव्यातुन स्पष्ट दिसते. अर्जदाराने ती तक्रार दिल्यानंतर वास्तवीक गैरअर्जदाराच्या कर्मचा-यांनी त्याची गंभीर दखल घेवुन ढिल्या विद्युत तारांना आवश्यक तो ताण देवुन वा-याच्या हेलकाव्यामुळे एकमेकांना चिकटणार नाहीत. याची पुरेपुर खबरदारी तातडीने घेण्याची त्यांची जबाबदारी असतांनाही ती न घेतल्यामुळे व त्याबाबतीत गैरअर्जदाराकडुन दुर्लक्ष व निष्काळतीपणा झाल्यामुळे दिनांक 02.05.2011 ची घटना घडलेली होती असेच यातुन अनुमान निघते. त्यामुळे शेतातील जळालेल्या उभ्या पिकांच्या नुकसान भरपाईस गैरअर्जदार हाच सर्वस्वी जबाबदार ठरतो आणि याबाबत त्याच्याकडुन निष्काळजीपणे सेवाञुटी झालेली आहे असे आमचे मत आहे. अर्जदाराने तक्रार अर्जातील नुकसान भरपाई बाबत असे कथन केले आहे की, एकरी 40 टन इतके उत्पन्न निघते आणि प्रती टन 2200/- रूपये प्रमाणे कारखान्याकडुन दर मिळत असल्यामुळे त्याचे 1,86,000/- रूपयाचे नुकसान झाल्याचे नमुद केले आहे. परंतु त्यासंबंधी कोणताही सबळ व ठोस पुरावा प्रकरणात दाखल केलेला नाही. याउलट, महसुल अधिका-यांनी दिनांक 25.05.2011 रोजी जो पाच पंच साक्षीदारांसमक्ष पंचनामा (नि.4/5) केला होता, त्यामध्ये जळालेल्या पिकाचे नुकसान रूपये 1,00,000/- झाले असल्याचे नमुद केलेले आहे. तरी परंतु सारासार विचार करता साखर कारखान्याकडुन सध्या किमान 1500/- रूपये प्रती टन याप्रमाणे उस घेतला जातो हे कोणालाही नाकारता येणार नाही तसेच किमान 35 टन दर एकरी उत्पन्न् विचारात घेवुन अर्जदारास शेतातील 80 गुंठे (2 एकर) क्षेञातील उस संपुर्ण जळाला असल्यामुळे प्रती टन रूपये 1300/- ची नुकसान भरपाई मिळणे योग्य ठरेल. त्यानुसार एकुण रूपये 91,000/- ची नुकसान भरपाई अर्जदारास मिळणे न्यायोचीत होईल. तसेच गैरअर्जदारास निष्काळजीपणे व सेवाञुटीची नुकसान भरपाई रूपये 3000/- व अर्जाचा खर्च रूपये 1000/- अर्जदारास मिळणे योग्य ठरेल. सबब रिपोर्टेड केस 2002(सी.पी.आर.) पृष्ठ क्र.61 (राष्ट्रीय आयोग दिल्ली) मधील मा.राष्ट्रीय आयोगाने अशाच प्रकारच्या प्रकरणात दिलेले मत विचारात घेवुन व रिपोर्टेड केसचा आधार घेवुन आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत. आदेश 1 अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2 गैरअर्जदाराने आदेश तारखेपासून 30 दिवसाचे आत अर्जदारास उस जळाल्याची नुकसान भरपाई रुपये 91,000/- द्यावी. 3 या खेरीज मानसिक त्रास व सेवा त्रूटीची नुकसान भरपाई रुपये 3000/- व अर्जाचा खर्च रुपये 1000/- अर्जदारास आदेश मुदतीत रोख द्यावा. 4 संबंधीताना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |