निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 14/09/2012
तक्रार नोदणी दिनांकः- 26/09/2012
तक्रार निकाल दिनांकः- 12/08/2013
कालावधी 10 महिने. 17 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM, LLB.
------------------------------------------------------------------------------------------------------------
महारुद्र नि.नागनाथअप्पा पोपडे. अर्जदार
वय 45 वर्षे. धंदा.नौकरी. अड.डि.यु.दराडे.
रा.शिवाजी नगर,परभणी ता.जि.परभणी.
विरुध्द
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, गैरअर्जदार.
तर्फे उपअभियंता,शहर विभाग,परभणी. अड.एस.एस.देशपांडे.
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदाराने अर्जदारास रिडींग न घेता बिले देवुन सेवेत त्रुटी दिल्याबद्दलची तक्रार आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदार हा शिवाजी नगर, परभणी येथील घर क्रमांक 807/1 चा ताबेदार आहे.त्यामध्ये बसविलेले विद्युत मिटर ज्याचा क्रमांक 9000104547 असा आहे अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, सदरचे घर अर्जदाराने पूर्वीचे मालक मंदाकिनी नृंसीह कुलकर्णी यांच्याकडून विकत घेतले. त्यानंतर अर्जदाराने दिनांक 28/01/2002 रोजी खरेदी खत क्रमांक 249/2 नुसार विद्युत मिटरसह अर्जदारास विक्री केले,तेव्हा पासून अर्जदार सदर घराचा मालक व ताबेदार असून गैरअर्जदर यांच्या विजेचा वापर करतो. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदार हे पूर्वी पासूनच विज भरणा करतात, परंतु गैरअर्जदार यांचे कर्मचारी कधीही अर्जदाराच्या घरी जावून रिडींग घेत नाहीत व कधी तरी वर्षा काठी एकदाच रिडींग घेवून एकदमच वर्ष भराचे बिल 7 ते 8 हजार रुपये बिल दिले जाते व एरव्ही 79 ते 131 युनिट प्रतिमहा बिल दिले जाते.गैरअर्जदाराने दिनांक 29 मार्च 2012 रोजी अर्जदारास एकदम रु. 8600/- चे बिल दिले ज्यावेळी गैरअर्जदाराने प्रत्यक्ष रिडींग घेवुन तफावत आलेल्या 1641 युनिटचे बिल दिले जर गैरअर्जदाराने नियमित रिडींग घेतली असती तर 1641 समायोजित इतकी रिडींग झाली नसती व 8600/- रुपये इतके देयक अर्जदारास आले नसते, परंतु गैरअर्जदार यांच्या निष्काळजीपणामुळे अर्जदारास 5 महिन्यात 8600/- रुपयांचे ईतके बिल अचानक भरावे लागले अर्जदार हा न्यायालयीन कर्मचारी आहे. त्यांना आवश्यक वजावटी नंतर केवळ रु.10,000/- इतका पगार शिल्लक राहतो, त्यामुळे जर अशा स्वरुपाची देयके दिल्यामुळे अर्जदारास उपासमारीची वेळ येते.अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, सामनेवाला यांना वेळोवेळी तक्रार देखील केली, परंतु त्याची दखल गैरअर्जदारानी घेतली नाही अर्जदाराने दिनांक 26/05/2010 रोजी व 11/03/2011 रोजी लेखी अर्ज देवुन मिटर रिडींग नियमित घ्यावे व त्यानुसार बिले द्यावी,अशी विनंती केली, परंतु आजपर्यंत रिडींग नुसार बिले दिली नाही, म्हणून अर्जदारास मानसिकत्रास होत आहे. म्हणून अर्जदाराने सदरची तक्रार दाखल करुन मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार मंजूर करुन गैरअर्जदारास असा आदेश व्हावा की, अर्जदारास नियमित रिडींग नुसार बिले द्यावी, व मानसिकत्रासापोटी रु.10,000/- व तक्रार अर्जाचा खर्च म्हणून रु.5,000/- गैरअर्जदाराने अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा,अशी विनंती केली आहे.
तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ अर्जदाराने शपथपत्र नि.क्रमांक 2 वर दाखल केलेले आहे व नि.क्रमांक 4 वर 4 कागदपत्रांच्या यादीसह 4 कागदपत्रे दाखल केलेली आहेत जयामध्ये 4/1 वर मंदाकिनी कुलकणी मार्फत अर्जदाराने गैरअर्जदारास दिनांक 26/05/2010 रोजी दिलेला अर्ज, 4/2 वर अर्जदाराने दिनांक 11/03/2011 रोजी गैरअर्जदारास दिलेला तक्रार अर्ज, 4/3 वर विद्युत देयके ऑगस्ट 2010 चे, 4/4 वर मार्च 2012 चे बिल इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
गैरअर्जदाराना त्यांचे लेखी म्हणणे दाखल करण्यासाठी मंचातर्फे नोटीसा पाठविण्यात आल्यावर गैरअर्जदार मंचासमोर वकिला मार्फत हजर, परंतु गैरअर्जदारास अनेक संधी देवुनही त्यांनी मुदतीत लेखी जबाब दाखल न केल्यामुळे त्यांच्या विरुध्द विनाजबाबचा आदेश पारीत करण्यात आला.
तक्रार अर्जावरुन व दाखल कागदपत्रांवरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदाराने अर्जदारास रिडींग न घेताच विद्युत बिलें देवुन
सेवेत त्रुटी दिली आहे काय ? होय.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1
अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे ही बाब नि.क्रमांक 4/1 व 4/2 वरील अर्जावरुन व तसेच 4/3 व 4/4 वरील बिलावरुन सिध्द होते.गैरअर्जदाराने अर्जदारास त्याच्या मिटरचे रिडींग न घेताच एकदम मार्च 2012 चे बिल रु. 8600/-चे दिले ही बाब नि.क्रमांक 4/3 व 4/4 वरील कागदपत्रांवरुन सिध्द होते. गैरअर्जदाराने अर्जदारास मार्च 2012 चे बिल एकदम देवुन सेवेत त्रुटी दिली आहे. असे मंचास वाटते,तसेच गैरअर्जदाराने सदरच्या प्रकरणात जबाब दावा दाखल न करुन अर्जदाराची तक्रार एक प्रकारे मान्यच केल्या प्रमाणेच आहे. म्हणून मंच मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देवुन खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदाराने आदेश तारखे पासून पूढे प्रत्येक महिन्यात अर्जदाराच्या मिटरची रिडींग घेवुन योग्य ते बिल त्या त्या महिन्यात द्यावे.
3 गैरअर्जदाराने अर्जदारास अर्जाच्या खर्चा पोटी रु.2,000/- फक्त (अक्षरी रु.दोनहजार फक्त) आदेश तारखे पासून 30 दिवसांच्या आत द्यावेत.
4 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्य मा.अध्यक्ष