नि. २६
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचे समोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
मा.सदस्या – श्रीमती सुरेखा बिचकर
ग्राहक तक्रार अर्ज क्र. ६१९/०८
-------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : ०९/०६/२००८
तक्रार दाखल तारीख : १६/०६/२००८
निकाल तारीख : ३१/१०/२०११
--------------------------------------------------------------
श्री वसंत सत्याप्पा देसाई
व्यवसाय – सेवानिवृत्त
रा.कर्मवीर नगर, मु.पो.कवलापूर
ता.मिरज जि. सांगली ..... तक्रारदारú
विरुध्दù
१. असिस्टंट सुपरिटेंडंट, पोस्ट मास्टर
पेन, जि.रायगड
२. सुपरिटेंडंट,
सुपरिटेंडंट ऑफ पोस्ट ऑफिस
रायगड डिपार्टमेंट, अलिबाग ४०२२
३. व्ही.व्ही.रमणमूर्ती,
असिस्टंट डायरेक्टर ऑफ पोस्टल सर्व्हिसेस
ऑफिस ऑफ पीएमजी गोवा रिजन,
पणजी ४०३ ००१
४. सिनिअर सुपरिटेंडंट पोस्ट मास्टर
ऑफिस ऑफ सिनिअर सुपरिटेंडंट ऑफ पोस्ट ऑफिस
सांगली डिव्हीजन, मेन ब्रॅंच, सांगली
५. असिस्टंट पोस्ट मास्टर जनरल
ऑफिस ऑफ चीफ पोस्ट मास्टर जनरल
महाराष्ट्र सर्कल, मुंबई – ४०० ००१ .....जाबदारúö
तक्रारदारतर्फेò : +ìb÷.श्री पी.एम.मैंदर्गी
जाबदार तर्फे : +ìb÷. श्री ए.आर.देशमुख
नि का ल प त्र
द्वारा- अध्यक्ष- श्री.अनिल य.गोडसे
१. तक्रारदार यांनी सदरचा तक्रार अर्ज जाबदार यांनी दिलेल्या सेवेतील त्रुटी बाबत दाखल केला आहे.
२. सदर तक्रार अर्जाचा थोडक्यात तपशील पुढीलप्रमाणे –
तक्रारदार हा सध्या तक्रारअर्जातील पत्त्यावर रहात आहे. तक्रारदार हा पूर्वी नोकरीनिमित्त पेण येथे रहात होता. पेण येथे रहात असताना तक्रारदार यांनी सन १९९२ मध्ये जाबदार क्र.१ यांचेकडे बचत खाते उघडले होते. तसेच तक्रारदार याने आपल्याला मासिक व्याज मिळावे म्हणून जाबदार यांचेकडे सन १९९५ ला रक्कम गुंतविली होती. सन २००२ मध्ये नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर तक्रारदार हा तक्रारअर्जातील पत्त्यावर राहण्यास आला. तक्रारदार हा बुधगाव येथे राहण्यास आल्यानंतर तक्रारदार यांनी जाबदार क्र.१ व २ यांना त्याचे बचत खाते बंद करण्यास सांगितले अथवा सदरचे खाते अलिबागवरुन बुधगाव येथे ट्रान्स्फर करण्यास सांगितले. जाबदार क्र.२ यांनी तक्रारदार यांचे खात्याबाबत पेण पोस्ट ऑफिसमध्ये चौकशी करण्यास सांगितले. त्यानंतर जाबदार क्र.१ यांनी तक्रारदार यांना फॉर्म नं.एसबी १० भरुन जाबदार क्र.२ यांचेकडे पाठविण्यास सांगितला. तक्रारदार याने त्याप्रमाणे पूर्तता केली. त्यानंतर सातत्याने पाठपुरावा करुनही जाबदार यांनी तक्रारदार यांचे खाते ट्रान्स्फर केले नाही. जाबदार क्र.१ व २ यांनी दखल न घेतल्यामुळे तक्रारदार यांनी त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार केली. जाबदार क्र.५ यांच्याकडून तक्रारदार यांना त्यांचा तक्रारअर्ज जाबदार क्र.३ कार्यालयाकडे पाठविण्यात आला असल्याचे कळविण्यात आले. त्यानंतर तक्रारदार यांना जाबदार क्र.२ यांचेकडून तक्रारदार यांचे खात्यामध्ये शिल्लक रु.-३१८.९० असल्याचे कळविण्यात आले व अकाऊंट ट्रान्स्फर करण्यासाठी कमीत कमी शिल्लक रु.५०/- असणे गरजेचे आहे त्यामुळे तक्रारदार यांना रक्कम रु.३६२/- भरण्यास सांगण्यात आले. तक्रारदार यांच्या खात्यावर रक्कम नोंद करताना जाबदार यांनी चूक केली आहे व सदरची चूक जाबदार यांनी मान्य केली आहे. जाबदार यांनी दिलेल्या या सदोष सेवेमुळे तक्रारदार यांनी सदरचा तक्रारअर्ज दाखल केला आहे. तक्रारदार यांनी तक्रारअर्जासोबत नि.३ ला शपथपत्र व नि.५ चे यादीने ११ कागद दाखल केले आहेत. तक्रारदारतर्फे नि.६ वर तक्रारअर्ज या मंचामध्ये दाखल करणेसाठी परवानगी मिळावी असा अर्ज दाखल केला आहे. त्याबाबत जाबदार यांनी म्हणणे द्यावे असा आदेश करण्यात आला आहे.
३. जाबदार यांनी नि.१३ वर आपले म्हणणे दाखल केले आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारअर्ज दाखल करण्यास या मंचाच्या अधिकारक्षेत्रात कोणतेही कारण घडले नसल्याकारणाने प्रस्तुतचा तक्रारअर्ज या मंचाच्या भौगोलिक अधिकारक्षेत्रात येत नाही, त्यामुळे तक्रारअर्ज रद्द करणेत यावा, तक्रारदार यांचा तक्रारअर्ज मुदतबाहय झाला आहे. तक्रारदार याने सदरचे अकाऊंट हे त्याचे व त्याच्या पत्नीचे संयुक्त नावे उघडले होते. तक्रारदार याने प्रस्तुत कामी त्याच्या पत्नीस आवश्यक पक्षकार म्हणून सामील केले नसलेमुळे प्रस्तुत तक्रारअर्जास नॉन-जॉइंडर ऑफ नेसेसरी पार्टी या तत्वाची बाधा येते. तक्रारदार यांनी पेण पोस्ट ऑफिसमध्ये पासबुक दाखवले नसल्यामुळे पासबुकवरील शिल्लक रक्कम व पोस्टाच्या लेजर पेजरवरील शिल्लक रकमेमध्ये तफावत निर्माण झाली. तक्रारदार याने त्याच्या खात्यावर कमीत कमी शिल्लक रु.५०/- न ठेवल्यामुळे सदरचे खाते ट्रान्स्फर करता आले नाही. तक्रारदार यांना जाबदार यांनी कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही, तक्रारदार यांचा तक्रारअर्ज फेटाळणेत यावा. जाबदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयर्थ नि.१४ ला प्रतिज्ञापत्र व नि.१५ च्या यादीने ५ कागद दाखल केला आहे.
४. तक्रारदार यांनी नि.१९ ला आपले प्रतिउत्तर दाखल केले आहे व त्याच्या सोबत नि.२० ला शपथपत्र दाखल केले आहे. तक्रारदार यांनी नि.२५ ला आपला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. जाबदार यांनी नि.२४ ला आपला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. तक्रारदार व जाबदार यांचे विधिज्ञ तोंडी युक्तिवादासाठी उपस्थित राहिले नाहीत.
५. तक्रारदार यांचा तक्रारअर्ज, जाबदार यांनी दिलेले म्हणणे, दाखल करण्यात आलेली कागदपत्रे, तक्रारदारांचे प्रतिउत्तर व दोन्ही बाजूंचा लेखी युक्तिवाद यांचे अवलोकन केले. जाबदार यांनी त्यांच्या म्हणण्यामध्ये मंचाच्या भौगोलिक अधिकारक्षेत्राबाबत आक्षेप घेतला आहे तसेच नि.१२ वर तक्रारदारांचा तक्रार अर्ज परत करणेत यावा असा अर्ज दिला आहे. तक्रारदार यांनी आपल्या तक्रारअर्जासोबत नि.६ ला अर्ज देवून प्रस्तुतचा तक्रारअर्ज या मंचात दाखल करुन घ्यावा अशी विनंती केली आहे. या सर्व वस्तुस्थितीवरुन तक्रारदारांचा तक्रारअर्ज चालविण्यास या मंचास भौगोलिक अधिकार क्षेत्र आहे का ? हे पाहणे गरजेचे आहे. तक्रारदार यांची मुख्य तक्रार ही जाबदार क्र.१ व २ यांचेविरुध्द आहे. तक्रारदार यांनी जाबदार क्र.४ सांगली पोस्ट ऑफिसलाही याकामी सामील केले आहे. परंतु सांगली कार्यालयाविरुध्द तक्रारदार यांची कोणतीही तक्रार नाही व सांगली कार्यालयाविरुध्द तक्रार करण्यास कोणतेही कारण घडलेले नाही. तक्रारअर्जास कारण हे संपूर्णत: पेण व अलिबाग येथे घडलेले आहे. तक्रारदार यांनी त्यांच्या युक्तिवादामध्ये जाबदार यांची शाखा या मंचाच्या अधिकारक्षेत्रात असल्याने तक्रारअर्ज चालविण्यास या मंचास अधिकारक्षेत्र आहे असे नमूद केले आहे. ग्राहक संरक्षण कायद्यातील कलम ११ नुसार जाबदार यांची शाखा या मंचाच्या भौगोलिक अधिकारक्षेत्रामध्ये आहे, केवळ या कारणास्तव तक्रारअर्ज या मंचात दाखल करता येईल का ? याबाबत सन्मा.सर्वोच्च न्यायालय यांनी 2010 CTJ Page 2 या सोनी सर्जिकल विरुध्द नॅशनल इन्शुरन्स कंपनी या निवाडयाचे कामी दिलेला पुढील निष्कर्ष महत्वपूर्ण ठरतो. The expression Branch Office in the amended section 17(2) of the C.P. Act means the branch office where the cause of action has arisen.
सन्मा. सर्वोच्च न्यायालयाने नोंदविलेली निष्कर्ष विचारात घेता प्रस्तुत तक्रारअर्जास या मंचाचे अधिकारक्षेत्रात कोणतेही कारण घडलेले नाही या निष्कर्षाप्रत सदरचा मंच आला आहे. तक्रारदार यांनी नि.६ मध्ये तक्रारदार हे वयस्कर असलेने तक्रारदार यांना पणजी किंवा रायगड येथे तक्रार करणे अशक्य झाले आहे त्यामुळे या मंचात तक्रारअर्ज दाखल करण्यास परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे. तक्रारदार यांनी केलेली विनंती कायदेशीर तरतुदीला धरुन नसल्याने सदरची विनंती मान्य करणे अशक्य आहे. प्रस्तुतचा तक्रारअर्ज चालविण्यास या मंचास भौगोलिक अधिकारक्षेत्र नसल्याने तक्रारअर्ज काढून टाकणे योग्य ठरेल या निष्कर्षाप्रत सदरचा मंच आला आहे.
वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
१. तक्रारदार याचा तक्रार अर्ज काढून टाकणेत येत आहे.
२. खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
सांगली
दिनांकò: ३१/१०/२०११
(सुरेखा बिचकर) (गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.
प्रत: तक्रारदार यांना हातपोहोच/रजि.पोस्टाने दि.//२०११
जाबदार यांना हातपोहोच/रजि.पोस्टाने दि.//२०११