(१) सामनेवाले यांच्या निष्काळजीपणामुळे तक्रारदार क्र.१ यांचे पती आणि तक्रारदार क्र.२ यांचे पिता यांचा मृत्यू झाला. त्या बाबत सामनेवाले यांच्याकडून भरपाई मिळावी यासाठी तक्रारदार यांनी ग्राहक सरंक्षण कायदा कलम १२ अन्वये सदरची तक्रार या मंचात दाखल केली आहे.
(२) तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, दि.०६-०७-२००९ रोजी तक्रारदार क्र.१ यांचे पती आणि तक्रारदार क्र.२ यांचे पिता रामा सावडू ठेलारी हे वाघापूर ता.साक्री शिवारात सीताराम तुकाराम कोळपे यांच्या शेतात मेंढया चारण्यासाठी गेले होते. शेतातील जुन्या विहिरीजवळ विद्युत कंपनीची वीज तार तुटून पडली होती. पावसाळयाचे दिवस असल्याने जमिनही ओली होती. त्या तुटलेल्या वीज तारेचा रामा सावडू ठेलारी यांना व त्यांच्या सोबतच्या दोन मेंढ्यांना विजेचा धक्का बसल्याने रामा ठेलारी व दोन मेंढ्यांचा जागीच मृत्यु झाला. या घटनेबाबत सामनेवाले यांना कळविण्यात आले. पोलीसातही फिर्याद देण्यात आली. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यांनी कोणतीही नुकसान भरपाई दिली नाही. म्हणून तक्रारदार यांना या मंचात सदरची तक्रार दाखल करावी लागली. सामनेवाले यांच्याकडून रु.५,००,०००/- नुकसान भरपाई मिळावी, मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.९०,०००/-, व तक्रारीच्या खर्चापोटी रु.२५,०००/- मिळावेत अशी मागणी तक्रारदार यांनी केली आहे.
(३) तक्रारदार यांनी आपल्या तक्रारीच्या पुष्टयर्थ सामनेवाले यांना दि.०५-१०-२००९ रोजी पाठविलेली नोटीस, नोटीस मिळाल्याच्या पावत्या, पोलीस ठाण्यात दिलेली खबर, शव विच्छेदन अहवाल, सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दिलेले उत्तर, रामा ठेलारी यांचे मृत्यू प्रमाणपत्र, विद्युत निरीक्षक यांनी दिलेले पत्र आदी कागदपत्रांच्या छायांकीत प्रती दाखल केल्या आहेत.
(४) सामनेवाले यांनी मंचात हजर होऊन आपला खुलासा दाखल केला. त्यात त्यांनी म्हटले आहे की, कोणतेही सबळ कारण नसतांना तक्रारदार यांनी सदरची तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार क्र.१ यांच्या पतीच्या मृत्युस सामनेवाले जबाबदार नाहीत. ज्या वेळी घटना घडली त्यावेळी पावसाळ्याचे दिवस होते, त्यामुळे विजा होत असतात. त्यामुळेही तक्रारदार क्र.१ यांच्या पतीचा मृत्यू संभवतो. त्यासाठी सामनेवालेंना जबाबदार धरता येणार नाही. कथित घटनेबाबत पोलिसांनी सामनेवाले कंपनीच्या वतीने कोणाचाही जबाब नोंदविलेला नाही. त्यामुळे सदरची तक्रार खर्चासह रद्द व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
(५) तक्रारदार व सामनेवाले यांच्या विद्वान वकिलांना युक्तिवादासाठी वेळोवेळी सुमारे १३ तारखांना संधी देण्यात आली. मात्र त्यांनी युक्तिवाद केला नाही. त्यामुळे तक्रारदार यांची तक्रार, त्या सोबत त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे आणि सामनेवाले यांचा खुलासा यावरुन आमच्यासमोर निष्कर्षासाठी पुढील मुद्दे उपस्थित होतात व त्यांची उत्तरेही आम्ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
मुद्देः | निष्कर्षः |
(अ) तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? | : नाही |
(ब) आदेश काय ? | : अंतिम आदेशा प्रमाणे |
विवेचन
(६) मुद्दा क्र. ‘‘अ’’ – तक्रारदार क्र.१ यांचे पती व तक्रारदार क्र.२ यांचे पिता रामा साडू ठेलारी (बोरकर) यांचे दि.०६-०७-२००९ रोजी वाघापूर ता.साक्री शिवारात सीताराम तुकाराम कोळपे यांच्या शेतात तुटलेल्या वीज तारांमुळे विजेचा धक्का लागून निधन झाले. त्या बाबत सामनेवाले यांनी नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले होते. तथापि, सामनेवाले यांनी ती नुकसान भरपाई दिली नाही. म्हणून तक्रारदार यांनी सदरची तक्रार या मंचात दाखल केली आहे. तक्रारदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे आणि त्यावर सामनेवाले यांनी दिलेला खुलासा या दोघांचेही मंचाने काळजीपूर्वक अवलोकन केले. त्यातून असे निदर्शनास आले की, तक्रारदार क्र.१ यांच्या पतीच्या मृत्यूची जी घटना घडली आहे ती घटना सामनेवाले यांनी नाकारलेली नाही. त्यांच्या खुलाशात मात्र त्या घटनेस सामनेवाले हे जबाबदार नाहीत असा पवित्रा घेण्यात आला आहे. तक्रारदार यांनी घटनेची खबर, घटनास्थळाचा पंचनामा, शव विच्छेदन अहवाल, या सोबत सामनेवाले कंपनीचे कार्यकारी अभियंता यांनी सहाय्यक अभियंता साक्री उपविभाग यांना पाठविलेले दि.१३ फेब्रुवारी २०१० चे पत्र दाखल केले आहे. या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, “विहिरगांव ता.साक्री,जि.धुळे येथे दि.०६-०७-२००९ रोजी कै.रामा सावडू ठेलारी व मेंढयांना प्राणांतिक अपघात झाला होता. सदर अहवाल संदर्भ १ अन्वये या कार्यालयास सादर केला आहे. संदर्भ २ अन्वये विद्युत निरीक्षक धुळे यांनी अपघात निष्कर्ष अहवाल या कार्यालयास सादर केला असून, अपघातास म.रा.वि.वि.कंपनीस जबाबदार धरुन नुकसान भरपाईची जबाबदारी कंपनीची आहे असे नमूद केले आहे. नुकसान भरपाई प्रस्ताव वरीष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक असून, संबंधितांकडून घेवून या कार्यालयास सादर करावीत ” असे म्हटले आहे. या पत्रावरुन दि.०६-०७-२००९ च्या संबंधित घटनेस सामनेवाले यांचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. तक्रारदार यांनीही आपल्या तक्रारीत तोच दावा केला आहे.
तथापि, तक्रारदार हे सामनेवाले यांचे कशा प्रकारे ग्राहक आहेत या बाबतचा कोणताही पुरावा, दाखला, उतारा तक्रारदार यांनी दाखल केलेला नाही. ग्राहक संरक्षण कायदा १९८६ च्या कलम २ मधील तरतुदी नुसार केवळ ग्राहकांच्याच किंवा ग्राहक म्हणून संबंध, नाते निर्माण होणा-या तक्रारदारांच्याच तक्रारी चालविण्याचा व त्यावर न्यायनिवाडा करण्याचा या मंचास अधिकार आहे. ग्राहक संरक्षण कायद्यातील कलम २ (ड) मध्ये “ग्राहक” या शब्दाचा अर्थ आणि व्याख्या स्पष्ट केली आहे. ती पुढील प्रमाणे.
२ (ड) ग्राहक याचा अर्थ...
(एक) ज्याचे प्रदान करण्यात आले आहे किंवा प्रदान करण्याचे वचन देण्यात आले आहे किंवा अंशत: प्रदान करण्यात आले आहे आणि अंशत: देण्याचे वचन देण्यात आले आहे अशा प्रतिफलाचे किंवा स्थगित किंवा स्थगित प्रदानाच्या कोणत्याही पध्दतीखाली कोणताही माल खरेदी करते अशी कोणतीही व्यक्ती असा असून त्यात देण्यात आलेल्या किंवा देण्याचे वचन दिलेल्या किंवा अंशत: दिलेल्या व अंशत: देण्याचे वचन दिलेल्या प्रतिफलासाठी किंवा असा वापर अशा व्यक्तीच्या संमतीने झाला असेल अशा बाबतीत स्थगित प्रदानाच्या कोणत्याही पध्दतीनुसार असा माल खरेदी करणा-या व्यक्तीव्यतिरिक्त अशा मालाचा वापर करणा-या व्यक्तीचा समावेश असेल. परंतु, त्यात पुनर्विक्री करिता किंवा वाणिज्यिक प्रयोजना करिता असा माल खरेदी करणा-या व्यक्तींचा समावेश असणार नाही.
(दोन)ज्याचे प्रदान करण्यात आले आहे किंवा प्रदान करण्याचे वचन देण्यात आले आहे किंवा अंशत:प्रदान करण्यात आले आहे किंवा अंशत: देण्याचे वचन देण्यात आले आहे अशा प्रतिफलाचे किंवा स्थगित प्रदानाच्या कोणत्याही पध्दतीनुसार कोणतीही सेवा (भाडयाने घेते किंवा तिचा लाभ घेते) अशी कोणतीही व्यक्ती असा असून जेव्हा अशी सेवा प्रथम निर्दिष्ट व्यक्तीच्या संमतीने उपलब्ध झाली असेल अशा बाबतीत त्यात देण्यात आलेल्या किंवा देण्याचे वचन दिलेल्या किंवा अंशत: दिलेल्या किंवा अंशत: देण्याचे वचन दिलेल्या प्रतिफलासाठी किंवा स्थगित प्रदानाच्या कोणत्याही पध्दतीसाठी अशी सेवा (भाड्याने घेते किंवा तिचा लाभ घेते अशा) व्यक्तीखेरीज अशा सेवेच्या कोणत्याही लाभधा-याचा समावेश असेल.
वरील स्पष्टीकरणाचा/व्याख्येचा विचार करता, सदर तक्रारीत तक्रारदार यांनी ते सामनेवाले यांचे “ग्राहक” असल्याचा कोणताही पुरावा सादर न केल्यामुळे ते सामनेवाले यांचे “ग्राहक” आहेत हे सिध्द होत नाही. याच कारणामुळे मुद्दा क्र. ‘‘अ’’ चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत.
(७) मुद्दा क्र. ‘‘ब’’ – वरील विवेचनाचा विचार करता, तक्रारदार हे सामनेवाले यांचे “ग्राहक” आहेत हे सिध्द होत नाही. ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदीचा विचार करता, जे ग्राहक आहेत किंवा ज्यांचे सामनेवाले यांचेशी ग्राहक म्हणून नाते निर्माण झाले आहे त्यांच्याच तक्रारींबाबत न्यायनिवाडा करण्याचा या मंचाला अधिकार आहे. त्यामुळे सदर प्रकरणात तक्रारदार यांची तक्रार ग्राहक म्हणून मान्य करता येणार नाही, असे आमचे मत बनले आहे. त्यामुळे न्यायनिवाडा करण्यासाठी तक्रारीतील इतर मुद्यांचा विचार करणे उचीत होणार नाही असे आम्हाला वाटते. तथापि न्यायाचे दृष्टीने तक्रारदार हे न्याय मिळवून घेण्यासाठी योग्य त्या न्याय व्यवस्थेकडे, मंचाकडे, प्राधिकरणाकडे दाद मागू शकतात असेही आम्हाला नमूद करावेसे वाटते. सबब या प्रकरणी आम्ही पुढील प्रमाणे आदेश करीत आहोत.
आदेश
(१) तक्रारदार यांची तक्रार रद्द करण्यात येत आहे.
(२) तक्रार अर्जाचे खर्चाबाबत इतर कोणतेही आदेश नाहीत.
धुळे.
दिनांक : २७-०६-२०१४
(श्री.एस.एस.जोशी) (सौ.व्ही.व्ही.दाणी)
सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.