तक्रारदार :- स्वत:
सामनेवालेतर्फे :- वकील –अँड. एस.एन.तांदळे.
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदाराची किल्लेधारुर येथे दर्शन आईल मील आहे. त्यासाठी त्यांनी विज जोडणी घेतलेली आहे. तक्रारदाराने तारीख 24/12/1998 ते 29/5/2003 पर्यंतची सर्व विदयुत बिले नियमित भरलेली आहेत. सामनेवालेंच्या भरारी पथकाने तक्रारदाराचे मिलला तारीख 25/10/2000, 2001 व डिसेंबर-2002 अशा तीन वेळेस भेट देवून मिटरची तपासणी केली.
डिसेंबर-2002 मध्ये उस्मानाबाद येथील भरारी पथकाने सदर मिटरची तपासणी केली व त्या तपासणीचा अहवाल दि. 19/1/2003 रोजी दिला. सदरचा अहवाल तक्रारदारांना मान्य नाही. सामनेवालेने असेसमेंट चालू विदयुत रिडींगच्या विदयुत देयकामध्ये सरळ वर्ग केले. असेसमेंटचे वेगळे बिल दिलेले नाही. असेसमेंट चालू विदयुत देयकांमध्ये वर्ग करणेपूर्वी कार्यकारी अभियंता यांची परवानगी घेण्यात आलेली नाही.
अहवालानंतर तक्रारदारास तारीख 21/6/2003 रोजी रु. 1,15,131/- चे विदयुत देयक देण्यात आले. तक्रारदाराविरुध्द कसलीही केस सामनेवालेने अदयाप केलेली नाही.
तक्रारदाराने सदरचे देयक स्विकारले. असेसमेंटच्या 20 टक्के भरणा तक्रारदाराने तारीख 14/11/2003 रोजी केला आहे. सामनेवालेने तारीख 09/03/2003 रोजी तक्रारदाराचा विज पुरवठा बंद करुन टाकला. सामनेवालेने तारीख 15/11/2003 रोजी नवीन मीटर टाकून पूर्ववत विज पुरवठा सुरु केला.
तारीख 20/12/2003 रोजी तक्रारदारास विज बिल देण्यात आले व त्यामध्येही पूर्वीची थकबाकी कायम दाखविण्यात आली. तारीख 16/7/2004 रोजी सामनेवालेने पुन्हा तक्रारदारास नोटीस देवून रक्कम रु. 1,12,306/- भरण्यास सांगितले नसता तक्रारदाराचा विज पुरवठा खंडित करण्यात येईल, अशी सुचना केली. तक्रारदाराने तारीख 04/01/2005 रोजी सामनेवालेकडे रक्कम रु. 46,000/- जमा केले आहेत.
विनंती की, तारीख 16/7/2004 ची वादग्रस्त नोटीस रदृबातल ठरवून मिटर रिडींगप्रमाणे देयक देण्याचा हुकूम व्हावा. तक्रारदाराने भरलेली रक्कम रु. 69,050/- परत देण्याचा हुकूम व्हावा. मानसिक त्रासापोटी रु. 25,000/- देण्याचा आदेश व्हावा.
सामनेवालेंनी त्यांचा खुलासा तारीख 10/3/2011 रोजी दाखल केला. तक्रारदाराचे तक्रारीतील सामनेवाले विरुध्दचे सर्व आक्षेप त्यांनी नाकारलेले आहेत. भरारी पथकाने दिलेला अहवाल तसेच बी.सी.टी. बंद असल्याचे अहवालातील मजकूर बरोबर आहे. सदर अहवालानुसार मिटर बॉक्सला सिल नव्हते. मिटर फेस बंद होते. विज मिटरचे एक फेस बी.सी.टी. बंद होते असे निष्पन्न झाल्याने तक्रारदारांना फरकाचे बिल दिलेले आहे. ते योग्य व कायदेशीर आहे. तक्रारदारांना सेवा देण्यास सामनेवालेंनी कसूर केलेला नाही. तक्रारदाराच्या विज बिलाची फेर तपासणी करुन विज बिल रिवाईज करुन दिलेले आहे. तक्रारदाराच्या बिलातून मुद्दल अधिक व्याज मिळून रु. 1,98,314/- वजावट करुन दिलेले आहे. त्याचा परिणाम जून-10 मध्ये दिलेला आहे. तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी.
सदरची तक्रार तारीख 15/10/2005 रोजी दाखल झाली होती. त्यावेळी सामनेवाले यांच्या विरुध्द एक तक्रार चालविण्यात आली. त्याचा निकाल तारीख 25/07/2006 रोजी होवून तक्रार नामंजूर करण्यात आली. सदर निकालाविरुध्द तक्रारदाराने मा. राज्य आयोग, परिक्रमा खंडपिठ औरंगाबाद यांच्याकडे तारीख 17/10/2006 रोजी प्रथम अपील क्रं. 2203/2006 चे दाखल केले. सदरचे अपील तारीख 17/06/2010 रोजी होवून सदरची तक्रार न्याय मंचात फेरचौकशीसाठी पाठविण्यात आली. त्यानुसार तारीख 04/11/2010 रोजी सदरचे प्रकरण फेरचौकशीसाठी बोर्डावर घेण्यात आले.
सामनेवालेंनी त्यांचा खुलासा दाखल केला. तक्रारदारांना फेरचौकशीसाठी नोटीस निशाणी-21 ची रजिस्टर पोष्टाने पाठविण्यात आली. त्याची पावती निशाणी-22 अन्वये न्याय मंचात तारीख 24/11/2010 रोजी प्राप्त झाली. तक्रारदार न्याय मंचात हजर नाही. त्यामुळे न्याय मंचाने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा-1986, दुरुस्ती कायदा-2003 चे कलम-13 (2)(c) प्रमाणे गुणवत्तेवर निकाली काढण्याचा निर्णय घेतला.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे शपथपत्र, सामनेवालेचा खुलासा, यांचे सखोल वाचन केले. सामनेवालेंचा खुलासा पाहता तक्रारदारांना तक्रारीच्या वादातील देयकाची फेरतपासणी करुन विज देयक रिवाईज करुन दिलेले आहे. तक्रारदाराचे बिलातून मुद्दल अधिक व्याज मिळून रु.1,98,314/- वजावट करुन दिलेले आहेत. या सामनेवालेचे विधानास तक्रारदाराचा कोणताही आक्षेप नाही, त्यामुळे तक्रारदाराच्या तक्रारीचे निराकरण झालेले असल्याचे तक्रारदाराच्या गैरहजेरीवरुन दिसते.
सबब, न्याय मंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
आ दे श
1. तक्रारदाराची तक्रार रदृ करण्यात येत आहे.
2. सामनेवालेंच्या खर्चाबाबत आदेश नाही.
(सौ.एम.एस.विश्वरुपे) ( पी.बी.भट )
सदस्या, अध्यक्ष,
चुनडे/- स्टेनो जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, बीड जि.बीड