(घोषित दि. 17.11.2014 व्दारा श्रीमती रेखा कापडिया, सदस्या)
अर्जदार या गैरअर्जदार यांच्या ग्राहक असून त्यांनी घरगुती वापरासाठी वीज पुरवठा घेतला आहे. गैरअर्जदार यांनी वाढीव वीज बिल दिले. परंतु याबाबत केलेल्या तक्रारीची गैरअर्जदार यांनी दखल न घेतल्यामुळे अर्जदाराने ग्राहक संरक्षण कायदा अंतर्गत तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारी नुसार त्या सिध्दार्थ नगर, जाफ्राबाद येथील रहिवासी असून त्यांनी घरगुती वापरासाठी गैरअर्जदार यांच्याकडून वीज पुरवठा घेतला आहे. गैरअर्जदार यांनी जानेवारी 2011 मध्ये त्यांचे वीज मीटर बदलले. प्रत्यक्षात एकदाच वीज मीटर बदलले असून सुध्दा गैरअर्जदार यांनी तीन वेळेस मीटर बदली करण्यात आल्याचे दाखवून त्यांना वाढीव वीज बिलाची आकारणी केली. अर्जदाराच्या म्हणण्यानुसार त्यांनी ऑगस्ट 2012 पर्यंत वीज बिलाचा नियमितपणे भरणा केलेला आहे. सप्टेंबर 2012 मध्ये त्यांना गैरअर्जदार यांच्या तर्फे कोरे बिल देण्यात आले. पण त्यात थकबाकीची रक्कम म्हणून 17,162/- रुपये दाखविण्यात आले. ऑक्टोबर 2012 मध्ये त्यांना 18,230/- रुपयाचे बिल देण्यात आले. अर्जदाराने या वीज बिलाबाबत तक्रार केल्यावर त्यांना 250/- रुपये भरण्या बाबत सांगण्यात आले अर्जदाराने ही रक्कम भरली. त्यानंतर पुढील काळात देखील गैरअर्जदार यांनी अशीच वाढीव वीज बिल आकारणी केली व तक्रारी नंतर रक्कम कमी करुन देण्यात येत होती व नंतर अर्जदार त्याचा भरणा करीत असे. जून 2013 मध्ये गैरअर्जदार यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता अर्जदाराचा वीज पुरवठा खंडित केला. अर्जदाराने फेब्रूवारी 2014 मध्ये चुकीच्या वीज बिला पोटी गैरअर्जदार यांना कायदेशीर नोटीस पाठविली. परंतू गैरअर्जदार यांनी कोणतीही दखल न घेतल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली. गैरअर्जदार यांनी पुनर्रजोडणी करुन देण्याची व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई देण्याची मागणी अर्जदाराने केली आहे.
अर्जदाराने तक्रारी सोबत वीज बिलाच्या प्रती, स्थळ पाहणी अहवाल, तक्रार अर्ज इत्यादि कागदपत्रे मंचात दाखल केली आहेत.
गैरअर्जदार यांनी मंचात दाखल केलेल्या जवाबानुसार त्यांनी अर्जदारास योग्य प्रकारे वीज बिल आकारणी केली आहे. ऑक्टोबर 2012 मध्ये अर्जदाराकडे 18,230/- रुपयाची थकबाकी होती. अर्जदाराच्या विनंतीवरुन त्यांना प्रोव्हिजिनल देयक भरण्याचे सांगण्यात आले. एप्रिल 2013 मध्ये वीज बिलातून 33989=36 रुपयाची वजावट करुन अर्जदारास 21387=45 रुपयाचे बिल देण्यात आले. परंतु अर्जदाराने त्याचा भरणा केलेला नाही. अर्जदाराने वीज बिलाचा भरणा न केल्यामुळे त्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. अर्जदारास देण्यात आलेल्या सेवेत कोणतीही त्रुटी नसल्याचे सांगून तक्रार खारीज करण्याची विनंती मंचास केली आहे.
गैरअर्जदार यांनी तक्रारी सोबत जानेवारी 2013 ते डिसेंबर 2013 या कालावधीचे सी.पी.एल मंचात दाखल केले आहे.
अर्जदार व गैरअर्जदार यांनी मंचात दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन व सुनावणी वरुन असे दिसून येते की, अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडून घरगुती वापरासाठी वीज पुरवठा घेतला असून त्यांचा ग्राहक क्रमांक 514050256069 असा आहे. अर्जदारास वीज पुरवठा दिनांक 29.11.2001 रोजी देण्यात आला होता. गैरअर्जदार यांनी जानेवारी 2011 ते जुलै 2014 या कालावधीचे अर्जदाराचे सी.पी.एल मंचात दाखल केले आहे. या सी.पी.एल चे बारकाईने निरीक्षण केल्यावर जानेवारी 2011 मध्ये अर्जदाराकडे बसविलेल्या मीटरचा क्रमांक 10/00294013 असा असल्याचे दिसून येते. जानेवारी 2011 ते जुलै 2011 या कालावधीत गैरअर्जदार यांनी अर्जदारास मीटर स्टेटस फॉल्टी दर्शवून 82 युनिट या सरासरीवर अधारीत वीज बिल आकारणी केलेली दिसून येते. या कालावधीत मीटर वरील चालू रिडींग व अंतिम रिडींग 5413 दाखविण्यात आले आहे. ऑगस्ट 2011 ते जानेवारी 2012 या कालावधीत मीटर स्टेटस समोर “मीटर चेन्ज” असे लिहीण्यात आले असून प्रत्यक्षात मात्र मीटर क्रमांक हा जुनाच आहे. या कालावधीत अर्जदारास 55 युनिट प्रतिमाह असे सरासरीवर बिल आकारण्यात आले आहे. या कालावधीत मीटर वरील चालू व अंतिम रिडींग हे 1 असे दाखविण्यात आले आहे. फेब्रूवारी 2012 मध्ये देखील मीटर क्रमांक तोच दर्शवून 60 युनिट चे बिल आकारण्यात आलेले दिसून येते. हे बिल आकारताना मीटर चेन्ज असा शेरा टाकण्यात आला असून मीटर वरील चालू व अंतिम रिडींग 1 दर्शविण्यात आले आहे. मार्च 2012 मध्ये त्याच मीटर क्रमांकावरील चालू व अंतिम रिडींग अनुक्रमे 191 व 1, व मागील समायोजित युनिट 140 दर्शवित 330 युनिटचे बिल आकारण्यात आल्याचे दिसून येते. सदरील बिल 8 महिन्याच्या कालावधीचे असल्याचे सी.पी.एल वरुन दिसून येते. एप्रिल 2012 ते ऑगस्ट 2012 या कालावधीत त्याच मीटर वरील रिडींग 191 दर्शवित गैरअर्जदाराने अर्जदारास 73 युनिट प्रतिमाह असे सरासरीवर अधारीत बिल आकारणी केलेली आहे. अर्जदाराने ऑगस्ट 2012 पर्यंतचे वीज बिल भरले असल्याचे दिसून येते. सप्टेंबर 2012 मध्ये गैरअर्जदार यांनी अर्जदारास त्याच क्रमांकावरील मीटरचे मागील रिडींग 191 व चालू रिडींग 2709 असे दर्शवून 2518 युनिट वीज वापराचे बिल दिले आहे. सदरील बिल हे सहा महिन्याच्या कालावधीचे असल्याचे सी.पी.एल मध्ये नमूद केले आहे. ऑक्टोबर 2012 व नोव्हेंबर 2012 या दोन महिन्यात गैरअर्जदार यांनी मीटर स्टेटस नॉर्मल दर्शवून व जुनाच मीटर क्रमांक दर्शवून 127 व 135 युनिट वीज वापराची आकारणी केलेली दिसून येते.
डिसेंबर 2012 मध्ये अर्जदाराचे जुने मीटर (क्रमांक 294013) बदलून त्या जागी नवीन मीटर (क्रमांक 01752376) लावण्यात आल्याचे सी.पी.एल वरुन दिसून येते. या वेळी अर्जदारास चालू व मागील रिडींग 1 व 1 दर्शवून 50 युनिट सरासरीवर आधारीत बिल देण्यात आलेले आहे. मात्र जानेवारी 2013 मध्ये गैरअर्जदार यांनी अर्जदारास मागील रिडींग 1 व चालू रिडींग 3211 दर्शवित 3210 युनिट वीज वापराचे बिल आकारले. फेब्रूवारी 2013 ते डिसेंबर 2013 या आठ महिन्याच्या कालावधीत गैरअर्जदार यांनी अर्जदारास मीटर स्टेटस नॉर्मल दर्शवित मीटर वरील रिडींग प्रमाणे बिल आकारणी केल्याचे दिसून येते. जानेवारी 2014 ते अर्जदाराचा वीज पुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आलेल्या कालावधी पर्यंत गैरअर्जदार यांनी अर्जदारास पुन्हा रिडींग न घेता बिल आकारणी केलेली आहे. गैरअर्जदार यांनी बी-एटी चा अहवाल दाखल केला आहे. परंतु त्या अहवालावरुन कोणताही उलगडा होत नाही.
अर्जदाराच्या सी.पी.एल चे वरील प्रमाणे निरीक्षण केल्यावर गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्या मीटरचे नियमितपणे रिडींग घेतले नसल्याचे व फॉल्टी स्टेटस दर्शवून सरासरीवर आधारीत आकरणी केलेली दिसून येते. मीटर प्रत्यक्ष न बदलता मीटर चेन्ज दर्शवून अर्जदारास अनेक महिन्या पर्यंत सरासरीवर आधारीत बिल आकारणी केलेली दिसून येते. डिसेंबर 2012 मध्ये मीटर बदली केल्याचे सी.पी.एल मध्ये दाखविले असले तरी जानेवारी 2012 मध्ये गैरअर्जदार यांनी अर्जदारास 3210 युनिट वीज वापराचे बिल आकारले आहे. जे चुकीचे असल्याचे मंचाचे मत आहे. फेब्रूवारी 2013 ते जून 2013 या 5 महिन्याच्या रिडींग वरुन अर्जदाराचा वीज वापराचा अंदाज काढता येऊ शकतो जो 90 युनिट (59 + 98 + 144 + 25 + 115 = 441 – 5 = 90) प्रतिमाह असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्या तक्रारीवर मुद्देसूद जवाब दाखल केलेला नाही. तसेच मीटर बदलीचा तपशील दाखल केलेला नाही अशा परिस्थितीत वरील सरासरीवर आधारीत वीज बिल आकारणी करणे योग्य ठरेल असे मंचाचे मत आहे.
म्हणून मंच खालील आदेश पारित करत आहे.
आदेश
- अर्जदाराची तक्रार अंशत: मान्य करण्यात येते.
- गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे सप्टेबर 2012 पासून आकारलेले सर्व वीज बिल रद्द करण्यात येते.
- गैरअर्जदार यांनी सप्टेंबर 2012 ते जानेवारी 2014 या कालावधीत अर्जदारास सरासरी 90 युनिट प्रतिमाह या प्रमाणे वीज बिल आकारणी करावी व 30 दिवसात सुधारीत वीज बिल द्यावे.
- गैरअर्जदार यांनी वरील प्रमाणे सुधारीत बिल देताना अर्जदाराने भरलेल्या वीज बिलाची रक्कम वजा करावी व व्याज व दंडाची आकारणी करु नये.
- गैरअर्जदार यांनी अर्जदारास सेवेतील त्रुटी व मानसिक त्रासा बद्दल रुपये 3,000/- (अक्षरी रुपये तिन हजार फक्त) व खर्चा बद्दल रुपये 1,500/- (अक्षरी रुपये एक हजार पाचशे फक्त) 30 दिवसात द्यावे.