--- आदेश ---
(पारित दि. 20-01-2007 )
द्वारा श्रीमतीप्रतिभाबा. पोटदुखे, अध्यक्षा
अर्जदार सौ. मीराबाई सिध्दार्थ नंदनवार यांनी दाखल केलेल्या ग्राहक तक्रारीचा आशय असा की,...........
1 अर्जदार यांचे देवरी येथे सरगम लेडील कलेक्शन नावाचे सौंदर्य प्रसाधनाचे दुकान आहे.
त्या दुकानाकरिता फर्निचर व सजावटीसाठी अर्जदार यांनी रु.1,00,000/- खर्च केले आहेत. अर्जदार यांनी त्यांच्या दुकानात विद्युत पुरवठयासाठी दि. 13.09.06 ला अर्ज दिला तसेच दि. 13.10.06 ला स्मरणपत्र देखील दिले. परंतु गैरअर्जदार क्रं. 1 व 2 यांनी अर्जदार यांना विजपुरवठा दिलेला नाही.
2 सदर दुकानात पुर्वी घरमालक गैरअर्जदार क्रं. 3 यांनी विद्युत पुरवठा दिला होता. परंतु काही दिवसांनी त्यांनी तो कोणत्याही प्रकारे सुचना न देता बंद केला.
3 गैरअर्जदार क्रं. 1 व 2 यांनी विद्युत पुरवठा न दिल्यामुळे अर्जदार यांच्या धंद्यावर फरक पडला आहे . दि. 13.10.06 पासून प्रतिदिवस व्यापार धंदयात 200/-रु.प्रमाणे 3400/- रु. नुकसान झालेले आहे.
4 अर्जदार यांनी मागणी केली आहे की, त्यांना धंद्यात झालेले नुकसान 3400/- रु व मानसिक , शारीरिक त्रासासाठी रु.5000/- असे एकूण रु.8,400/- हे अर्जदार यांना मिळावे. तसेच अर्जदार यांनी मागितलेला विद्युत पुरवठा लवकरात लवकर देण्यात यावा.
5 गैरअर्जदार क्रं. 1 व 2 यांनी त्यांचे लेखी बयान नि.क्रं. 11 वर दाखल केले आहे. गैरअर्जदार म्हणतात की, अर्जदार हे ग्राहक या व्याख्येत येत नाही. त्यांनी नविन वीज पुरवठयासाठी योग्य कागदपत्रांसह विहीत नमुन्यात अर्ज केलेला नाही. अर्जदार हा घरमालक आहे किंवा वहिवाटदार आहे या संबंधिचा पुरावा त्यांनी जोडलेला नाही. त्यामुळे त्यांची नविन विजपुरवठयाची विनंती मान्य करता येत नाही. अर्जदार यांची तक्रार ही खर्चासह खारीज होण्यास पात्र आहे.
6 गैरअर्जदार क्रं. 3 यांना मंचातर्फे पाठवण्यात आलेला नोटीस घेण्यास इन्कार या शे-यासह परत आला.
कारणे व निष्कर्ष
7 अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे, शपथपत्र, इतर पुरावा व केलेला युक्तिवाद यावरुन असे निदर्शनास येते की, अर्जदार व गैरअर्जदार क्रं. 3 यांच्यातील वाद हा किरायेदार व घरमालक यांच्यातील वाद आहे. अर्जदार व गैरअर्जदार क्रं. 3 यांच्यात झालेला करारनामा हा रेकॉर्डवर दाखल आहे. करारनाम्याच्या कलम 4 मध्ये असे नमूद केले आहे की, "हया करारनाम्याची मुदत ही फक्त 31.07.06 पर्यंत आहे. त्यानंतर दुस-या दिवशी म्हणजेच दि. 01.08.06 रोजी अर्जदार यांना खोली खाली करुन द्यावी लागेल." करारनाम्यावरुन असे निदर्शनास येते की, ग्राहक तक्रार दाखल करतांना म्हणजेच दि. 30.11.06 रोजी अर्जदाराकडे जागेचा अधिकृत ताबा नव्हता.
8 अर्जदार यांनी गैरअर्जदार क्रं. 1 व 2 यांचेकडे महाराष्ट्र विद्युत विनियम आयोग (विद्युत पुरवठा संहिता आणि पुरवठयाच्या इतर अटी) विनियम 2005 मध्ये नमूद केलेल्या अट क्रं. 4 नुसार नविन वीज पुरवठयासाठी योग्य कागदपत्रासह विहीत नमुन्यात अर्ज केलेला दिसत नाही. अर्जदार यांनी नियमाप्रमाणे विहीत नमुन्यात गैरअर्जदार यांना वीज पुरवठयासाठी अर्ज केलेला नाही. त्यांनी टेस्ट रिपोर्ट सुध्दा गैरअर्जदार क्रं. 1 व 2 यांना दिल्याचे दिसून येत नाही.
9 अर्जदार यांनी त्यांच्या व्यवसायासाठी विद्युत पुरवठयाची मागणी केल्याचे दिसून येते. त्यांचा व्यवसाय हा स्वयंरोजगारासाठी असल्याचा उल्लेख ग्राहक तक्रारीत नाही.
10 अर्जदार यांनी त्यांच्या लेखी युक्तिवाद नमूद केलेले केस लॉ या ग्राहक तक्रारीतील तथ्य व परिस्थिती वेगळी असल्यामुळे लागु होत नाहीत.
11 सदर खोलीवर अर्जदार यांचा अधिकृत ताबा नाही. अर्जदार यांनी विहीत नमुन्यात आवश्यक त्या कागदपत्रासह गैरअर्जदार क्रं. 1 व 2 यांचेकडे नविन वीज पुरवठयासाठी अर्ज केलेला दिसून येत नाही. तसेच अर्जदार यांनी त्यांच्या व्यवसायासाठी नविन विद्युत पुरवठयाची मागणी केल्याचे दिसते.
अश्या स्थितीत सदर आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
अर्जदार यांची तक्रार ही खारीज करण्यात येत आहे.