::: आ दे श :::
( पारित दिनांक : 29/12/2014 )
आदरणीय सदस्या, मा. श्रीमती.जे.जी.खांडेभराड, यांचे अनुसार : -
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रार प्रकरणातील मजकूर, थोडक्यात आढळून येतो तो येणेप्रमाणे,
तक्रारकर्त्याचा विदयुत ग्राहक क्र. 326100076597 आहे. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांचे कार्यालयात दिनांक 23/09/2013 रोजी मिटर बदलण्यासाठी रितसर अर्ज दिला. परंतु विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी कसल्याही प्रकारची मिटर बदलण्यासाठी कार्यवाही केली नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याचे दिनांक 1/09/2013 पासुन तक्रार दाखल करेपर्यंत प्रतीमाह 210/- रुपये प्रमाणे 860/- चे नुकसान झाले. त्यामुळे तक्रारकर्त्याने दिनांक 28/10/2013 रोजी विरुध्द पक्षास कायदेशीर नोटीस दिली परंतु विरुध्द पक्षाने त्याची दखल घेतली नाही. परिणामत: तक्रारकर्त्याने नोटीस खर्च 500/- रुपये, दावा खर्च 1,000/- रुपये, प्रवास खर्च 500/- रुपये, छपाई खर्च 100/- रुपये, तसेच झालेले नुकसान खर्च 860/- रुपये असे एकूण 2,960/- रुपये विरुध्द पक्षाकडून मिळावेत तसेच मिटर बदलुन देण्याचा आदेश विरुध्द पक्षाविरुध्द व्हावा, अशी विनंती,तक्रारकर्त्याने ही तक्रार दाखल करुन, केली.
तक्रारकर्त्याने सदर तक्रार शपथेवर दाखल केली असून त्यासोबत एकुण 7 दस्तऐवज पुरावे म्हणुन जोडलेले आहेत.
2) विरुध्द पक्ष यांचा लेखी जबाब -
वरील प्राप्त तक्रारीची विरुध्द पक्ष यांना नोटीस काढल्यानंतर विरुध्द पक्ष यांनी त्यांचा लेखी जबाब मंचात दाखल केला परंतु त्यामध्ये त्यांनी चुकीने तक्रारकर्त्याचा लेखी जबाब असे नमुद केले असुन, त्यानुसार त्यांनी तक्रारकर्ता यांचे बहुतांश कथन फेटाळले. विरुध्द पक्षाने थोडक्यात नमुद केले की, तक्रारकर्त्याला विदयुत पुरवठा केलेले मिटर हे फॉल्टी झाल्यामुळे म्हणजे रिडींग दाखवित नसल्यामुळे विरुध्द पक्ष कंपनीने दिनांक 02/04/2014 रोजी तक्रारकर्त्याचे जुने मिटर काढून नविन मिटर लावले. तसेच या प्रकरणाची नोटीस दिनांक 01/07/2014 ला प्राप्त झाली त्यावेळी तक्रारकर्त्याकडे नविन विदयुत मिटर लावलेले होते. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार निरस्त झालेली आहे, अशा परिस्थितीत तक्रारकर्त्याचा विज पुरवठा हा कधीही खंडीत झालेला नाही. तक्रारकर्त्याला त्याचे वापराप्रमाणे सरासरी बील दिलेले आहेत, त्यामुळे तक्रारकर्त्याचे असे कोणतेही नुकसान झालेले नाही. म्हणून तक्रारकर्त्याची तक्रार ही खर्चासह खारिज करण्यांत यावी.
3) कारणे व निष्कर्ष -
या प्रकरणातील तक्रारकर्ता यांची तक्रार, विरुध्द पक्षा चा लेखी जबाब, उभय पक्षाने दाखल केलेले सर्व दस्तऐवज यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन, खालील निर्णय पारित केला.
हे प्रकरण दिनांक 09/10/2014 पासून तक्रारकर्त्याचे प्रतिऊत्तर व पुरावा याकरिता मुकर्रर असून देखील, तक्रारकर्त्याने प्रतिऊत्तर व पुरावा दाखल केला नाही तसेच युक्तिवाद केला नाही व तक्रारकर्ता सतत गैरहजर आहे. अशा परिस्थितीत उपलब्ध दस्तऐवजांचे अवलोकन मंचाने केले असता, असे दिसून येते की, विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला त्याने बदलुन मागीतलेले विदयुत मिटर हे दिनांक 02/04/2014 रोजीच बदलुन दिलेले आहे. तसेच तक्रारकर्त्याने त्याची कथीत नुकसान भरपाई कशी सिध्द होते याबद्दलचे कोणतेही दस्तऐवज रेकॉर्डला दाखल केलेले नाही. शिवाय तक्रारकर्ता मंचात सतत गैरहजर राहिलेला आहे. अशा परीस्थितीत, तक्रारकर्त्याची तक्रार खारिज करण्यांत येत आहे. सबब अंतिम आदेश पारित केला तो येणेप्रमाणे.
:: अंतीम आदेश ::
1. तक्रारकर्त्याची तक्रार खारिज करण्यात येत आहे.
2. न्यायिक खर्चाबाबत कोणताही आदेश पारित नाही.
3. उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
(श्रीमती जे.जी. खांडेभराड) (श्री. ए.सी.उकळकर) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्या. सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.