::: आ दे श :::
( पारित दिनांक : 24/08/2015 )
आदरणीय अध्यक्षा, सौ.एस.एम.उंटवाले, यांचे अनुसार : -
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रार प्रकरणातील मजकूर, थोडक्यात आढळून येतो तो येणेप्रमाणे,
तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे. तक्रारकर्त्याचे विदयुत मिटर हे घरगुती वापराचे असून त्याचा ग्राहक क्र. 322220044464 हा आहे. सदर मिटर हे एम.ए.वानखडे यांचे नावाने आहे. तक्रारकर्त्याकडे नविन इलेक्ट्रॉनिक्स मिटर अंदाजे 4-5 वर्षापूर्वी बसविले. तेंव्हापासून तक्रारकर्त्यास अवाजवी व अवास्तव विद्युत देयके येत आहेत. त्याबाबत तक्रारकर्त्याने दिनांक 01/06/2010 व 29/06/2010 रोजी विरुध्द पक्षाकडे तक्रारअर्ज दाखल केलेत. त्यानंतर विरुध्द पक्षाने इलेक्ट्रॉनिक्स मिटर सदोष आहे किंवा नाही हे तपासण्याकरिता पॅरलल मिटर बसविले. त्यानुसार दिनांक 14/02/2011 ते 15/03/2011 या साधारण एक महिन्याच्या कालावधीमध्ये 77 युनीटचा फरक दाखविला. विदयुत पुरवठा खंडित होऊ नये म्हणून तक्रारकर्त्याने वेळोवेळी देयकाचा भरणा केला. माहे फेब्रुवारी 2012 मध्ये एकाच महिन्याचे 233 युनिटचे देयक देण्यांत आले, त्याची तक्रार केल्यावर विरुध्द पक्षाने ते कमी करुन दिले. तक्रारकर्त्याच्या तक्रारीचे कोणतेही समाधान विरुध्द पक्षातर्फे करण्यांत आलेले नाही. विरुध्द पक्षाने मागील 4 वर्षापासून दर महिन्याला 77 युनिट प्रमाणे 3699 युनिटचे रुपये 18,480/- जास्तीचे वसूल केल्याबाबत तक्रारकर्त्याची तक्रार आहे.
त्यामुळे तक्रारकर्त्याने ही तक्रार दाखल करुन, विनंती केली की, तक्रारअर्ज मंजूर व्हावा, तक्रारकर्त्याला विरुध्द पक्षाने आकारलेली अवाजवी देयकाची रक्कम रुपये 18,480/- परत करावी, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई रुपये 25,000/- व तक्रारीचा खर्च मिळावा तसेच विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास अवाजवी देयक पाठवू नये, असा आदेश व्हावा.
तक्रारकर्त्याने सदर तक्रार शपथेवर दाखल केली असून त्यासोबत दस्तऐवज यादी निशाणी-4 प्रमाणे एकुण 13 दस्तऐवज पुरावे म्हणुन जोडलेले आहेत.
2) विरुध्द पक्ष यांचा लेखी जबाब -
वरील प्राप्त तक्रारीची विरुध्द पक्ष यांना नोटीस काढल्यानंतर विरुध्द पक्ष
यांनी निशाणी-11 प्रमाणे त्यांचा लेखी जबाब, प्राथमिक हरकत सादर केली. त्यानुसार तक्रारकर्त्याच्या तक्रारीतील बहुतांश विधाने नाकबूल केली व नमुद केले की, तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाचा ग्राहक नाही. विदयुत पुरवठा हा 1960 सालचा दिसतो आणि तो एम.ए.वानखडे यांना केलेला आहे. तक्रारकर्त्याचा अर्थाअर्थी काही संबंध दिसून येत नाही, त्यामुळे तक्रारकर्ता हा ग्राहक नसल्यामूळे सदर तक्रार चालू शकत नाही. विरुध्द पक्षाने पुढे अधिकच्या कथनात नमुद केले की, रेकॉर्डवर एम.ए.वानखडे ग्राहकाच्या मे 2006 पासून कंझूमर पर्सनल लेजरची संगणकीय प्रत दाखल करीत आहे. परंतु प्रफुल वानखडे हे नविन इलेक्ट्रॉनिक मिटर बसविले तेंव्हापासून तक्रार करीत आहेत. सदरचे इलेक्ट्रॉनिक मिटर हे जून 2006 मध्ये बसविले आहे. रेकॉर्डप्रमाणे माहे फेब्रुवारी 2005 ते जून 2008 पर्यंतचा वापर नमूद करीत, तो कधी कधी कमी होता तर कधी 200 युनिटच्या वर होता. ही बाब लेजरशिटवरुन तसेच विवरणपत्रावरुन सिध्द होते. यावरुन, हे स्पष्ट होते की, एम.ए.वानखडे चे मिटर हे लावल्यापासून सदोष नव्हते. कोणताही सुज्ञ व्यक्ती 4-4 वर्षे चूप बसणार नाही. सदरहू वायरींग ही 1960 सालापासूनची आहे, त्यात दुरुस्ती केलेली नव्हती व अर्थींग खराब झाले होते. म्हणून कंपनीने लिकेजेस जरी झाले तरी अतिरिक्त वाचन येऊ नये म्हणून नवीन विकसीत इन्फो रेड मिटर पुरवठयावर लावणे सुरु केले, त्यामुळे लिकीजेस झाले तरी, अर्थींग खराब असला तरी, मिटरचे अतिरिक्त वाचन होत नाही. त्या मिटरमध्ये छेडछाड केली हे संगणक दाखवते, ते मिटर स्लो किंवा फास्ट करता येत नाही. ते मिटर एम.ए.वानखडे कडे ऑगष्ट 2012 मध्ये लावले आहे व त्यात सुध्दा भरपूर वापर आढळून आला आहे. तक्रारकर्त्याला विज वापराचे फरकाचा क्रेडीट दिलेला आहे. तक्रारकर्त्याची मागणी कपोलकल्पीत आहे, त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खर्चासह खारिज करण्यांत यावी.
3) कारणे व निष्कर्ष -
या प्रकरणातील तक्रारकर्ता यांची तक्रार, विरुध्द पक्षाचा लेखी जबाब, उभय पक्षाने दाखल केलेले सर्व दस्तऐवज, तक्रारकर्ता यांचा लेखी युक्तिवाद व विरुध्द पक्षाचा तोंडी युक्तिवाद यांचे काळजीपूर्वक अवलोकन केल्यास असे दिसते की, . . . .
तक्रारकर्ता यांची ही तक्रार विरुध्द पक्षाविरुध्द अवाजवी बिलाची रक्कम रुपये 18,480/- परत मिळणेकरिता व नुकसान भरपाई मिळण्याकरिता केली. तक्रारकर्त्याचे असे म्हणणे आहे की, नवीन इलेक्ट्रॉनिक मिटर बसविल्यापासून अवास्तव विद्युत बील येत होते, याची तक्रार केल्यानंतर विरुध्द पक्ष आधी बीलाची रक्कम भरावयास सांगत होते, सदर मीटर सदोष आहे का ? हे पाहण्याकरिता त्या मिटरजवळ दुसरे पॅरलल मीटर बसविले होते, त्यानुसार मीटर रिडींगच्या नोंदी घेतल्या तर, त्यात सुध्दा तफावत आढळली. म्हणजे इलेक्ट्रॉनिक मिटर सदोष होते. विरुध्द पक्षाने कोणतीही पुर्वसूचना न देता हे मीटर बदलले व नवीन मीटर लावले, नवीन मीटर नुसार आलेल्या रिडींगबद्दल तक्रारकर्त्याने तक्रार केल्यावर, चुक मान्य करत बिल कमी करुन दिले. अशारितीने 4-5 वर्षापासुन सदोष मिटरच्या आधारे चुकीचे बिल विरुध्द पक्षाने दिले व लाईन खंडित होईल या भितीने तक्रारकर्त्याने ते बिल भरले. अशारितीने अवास्तव बिल वसुल केले आहे.
यावर विरुध्द पक्षाने दाखल केलेला, वीज वापराचा तक्ता ( Consumer Personal Leager ) हे दस्त तपासले असता व त्यावरुन, विरुध्द पक्षाचा युक्तिवाद ऐकला असता असे आढळले की, तक्रारकर्त्याचा विद्युत पुरवठा हा एम.ए.वानखडे यांचे नावे आहे. परंतु त्याबद्दलचा तक्रारकर्त्याचा खुलासा असा आहे की, एम.ए.वानखडे हे तक्रारकर्त्याचे सख््खे आजोबा होते. वारसहक्काने तक्रारकर्ता त्या घरात राहतो आहे, म्हणून तक्रारकर्ता हा बेनीफीशीयरी ग्राहक या संज्ञेत बसतो. तक्रारकर्त्याचे मीटर दिनांक 03/11/2011 ला बदलले ही बाब उभय पक्षाला मान्य आहे. वीज वापराचा तक्ता या दस्तात मे-2006 पासूनचे विवरण दिसून येते. त्यात तक्रारकर्त्याचा वीज वापर हा कधी कमी तर कधी 300 युनिटच्या वर होता असे दिसते. यावर विरुध्द पक्षाने असा खुलासा केला की, तक्रारकर्त्याकडील मिटरचा आऊट गोईंग न्युट्रल वायर अर्थींगला जोडला होता, त्यामुळे वीज मिटरमध्ये अतिरिक्त नोंदणी होत होती, तक्रारकर्त्याकडील वायरींग ही फार जुनी होती, त्यामुळे विद्युत पुरवठयामध्ये जिथे लिकेज होते तिथे अतिरिक्त वाचन मीटर दाखवायचे. म्हणून विरुध्द पक्ष कंपनीने विकसीत केलेले इन्फ्रारेड मीटर लावणे सुरु केले होते. सदर वीज वापराचा तक्ता या दस्तावरुन असेही ज्ञात होते की, नवीन मीटर दिनांक 03/11/2011 ला लावल्यावर त्या दिवशीचे वाचन 264 होते. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या प्रत्येक महिन्याचे मासीक 289 युनिटचे बील होते. फेब्रुवारी 2012 मध्ये एकूण 579 युनिटचे बील होते व हया बिलात वजावट रुपये 6,511.22 पैसे तसेच रुपये 2,500/- देण्यात आली होती असे दिसते. विरुध्द पक्षाच्या मते, संगणक विभागात मीटर बदलीची नोंद उशिरा झाल्याने, वरीलप्रमाणे बिलात वजावट देण्यात आली. म्हणजे विरुध्द पक्षाने अवास्तव बील वसूल केले, असे सिध्द होत नाही. शिवाय विरुध्द पक्षाने दाखल केलेल्या दस्तांवरुन, असेही सिध्द होते की, त्यांनी तक्रारकर्त्याला त्यांच्या विद्युत संच मांडणीमध्ये वरीलप्रमाणे त्रुटी आहे हयाबद्दल, पत्राव्दारे अवगत करुन दिले होते. तक्रारकर्त्याने सदर प्रकरण दिनांक 29/09/2012 रोजी दाखल केले आहे, त्यामुळे या तारखेच्या आधी दोन वर्षापर्यंतचे विद्युत देयकाचा वाद मंचाला सोडवता येईल. त्यामुळे या सर्व कालावधीतील विद्युत वापर, वीज वापराचा तक्ता या दस्तावरुन तपासला असता, विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला फेब्रुवारी 2012 च्या वीज देयकात रुपये 2,500/- ची वजावट व मार्च 2012 च्या वीज देयकात रुपये 2,477/- ची वजावट दिली होती, असे दिसून येते. त्यामुळे दाखल दस्तात तक्रारकर्ता यांचा वीज वापर व त्या वीज वापराचा फरकाचा क्रेडीट हया दोन्ही गोष्टी दिसून येतात. तक्रारकर्त्याने प्रतिऊत्तरात दस्तऐवज दाखल करुन असे कथन केले की, विरुध्द पक्षाचे कनिष्ट अभियंता यांनी दिनांक 28/02/2011 रोजी पत्र देवून विद्युत मीटर दोषपूर्ण ( फॉल्टी) आहे असा अहवाल दिला, परंतु त्यानंतर हे मीटर बदलल्या गेले व त्यानंतर विरुध्द पक्षाच्या पाहणीवरुन त्यांनी तक्रारकर्त्या- कडील विद्युत संच मांडणीमध्ये दुरुस्ती करावी, असे पत्र देवून, तक्रारकर्त्याला सुचित केले होते. त्यामुळे अवाजवी बील येणे, यामागचे कारण फक्त विरुध्द पक्षाची सेवा न्युनता नाही, असे मंचाला वाटते. सबब विरुध्द पक्षाने दाखल केलेल्या दस्तांवरुन, विरुध्द पक्षाने अवाजवी बिलाची रक्कम तक्रारकर्त्याकडून घेतल्याचे सिध्द न झाल्यामुळे, तक्रारकर्ता यांची प्रार्थना मंजूर करता येणार नाही. सबब अंतिम आदेश पारित केला तो येणेप्रमाणे.
:: अंतीम आदेश ::
1. तक्रारकर्त्याची तक्रार खारिज करण्यात येते.
2. न्यायिक खर्चाबाबत कोणताही आदेश पारित नाही.
3. उभय पक्षकारांना आदेशाची प्रत विनामुल्य देण्यात यावी.
(श्रीमती जे.जी. खांडेभराड) (श्री. ए.सी.उकळकर) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्या. सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.
svGiri