ग्राहक तक्रार क्र. 105/2013
अर्ज दाखल तारीख : 12/08/2013
अर्ज निकाल तारीख: 13/05/2015
कालावधी: 01 वर्षे 09 महिने 02 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1) भाऊ पांडूरंग पडवळ,
वय - 57 वर्षे, धंदा – शेती व नौकरी,
रा.उपळे, (मा) ता. जि.उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1) अनिल एन. नेरळकर उपअभियंता,
महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कंपनी लि. उपविभाग
तेर, ता. जि. उस्मानाबाद.
2) माणिकचंद आण्णा लवटे,
कार्यकारी अभियंता,
म.रा.वि.वि. कंपनी लि. उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्य.
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.पी.एस.पडवळ,
विरुध्द पक्षकार क्र.1 व 2 तर्फे विधीज्ञ : श्री.व्ही.बी.देशमुख.
न्यायनिर्णय
मा. सदस्य श्रीमती विद्युलता जे.दलभंजन यांचे व्दारा:
अ) 1. अर्जदार भाऊ पांडूरंग पडवळ हे मौज उपळे ( मा.) ता.जि. उस्मानाबाद येथील रहिवाशी आहेत त्यांनी विरुध्द पक्ष (संक्षिप्त रुपात वितरण कंपनी) यांचे विरुध्द नुकसान भरपाईची तक्रार दाखल केलेली आहे.
2. अर्जदार शिक्षक असून त्यांनी मौजे शिंगोली येथे जमीन गट नं.397 मध्ये स्वत:ची घरजागा व जनावरांसाठी गोठा बांधलेला आहे. अर्जदारास 5 जनावरे व 1 दुभती म्हैस जिचे बाजारी मुल्य रु.60,000/- पेक्षा जास्त असून एकूण 6 जनावरे सांभाळलेली आहेत.
3. अर्जदाराच्या वरील वर्णनाची धरजागा व गोठा याचे वरुन वितरण कपंनीची 11 के.व्ही. विद्युत वाहीनी उपळे (मा) ते उपळा पाटी या अंतरावर गेलेली अहे. वरील नमूद गोठा घर बांधकाम झाले नंतर तब्बल 9 वर्षानंतर विदयुत वाहीनी गेलेली आहे. वितरण वाहीनीचे काम चालू असतांना अर्जदाराचे घर व गोठा यांचेवरुन जात असल्याने जीवीत व वित्त हानी अथवा जनावरे यांचे जीवीतास धोका असल्याने सदरच्या वाहिनीच्या कामास अर्जदाराने हरकत घेतली असता वितरण कंपनीने विदयुत वाहीनीचे मेन्टनन्स देखभाल इ. बाबींकडे खात्रीने लक्ष देणार असलेबाबत व तसेच काही धोका उदभवल्यास त्याचे सारले करणार असल्याचे सांगितले.
4. अर्जदाराने घरजागा व गोठयासाठी वितरण कपंनीकडून स्वतंत्र कनेक्शन घेतलेले आहे म्हणून ते ग्राहक आहेत. मे-2013 मध्ये वितरण कंपनील च्या संबंधीत कर्मचा-यांना भेटून सदर विद्युत वाहीनी तुटून अपघात होण्याची शक्यता असल्याने आवश्यक ते मेन्टनन्स करुन घेण्याबाबत कळवले होते परंतू वितरण कंपनीने त्याकडे दुर्लक्ष केले.
5. वितरण कंपनीला आवश्यक ती कल्पना देऊनही त्यांच्या निष्काळजीपणामुळे दि.30/042013 रोजी रात्री 11.00 वाजता अर्जदार यांचे घरावरुन व गोठयावरुन गेलेली वितरण कंपनीची तार स्पार्कींग होऊन घरावर व गेाठयावर पडली. सदर विदयुत वाहीनीत इलेक्ट्रीक करंट असल्याने अर्जदाराच्या घरातील उपकरणे टी.व्ही. रु.13,000/-, फ्रिज रु.12,000/-, फॅन रु.1200/- इ. उपकरणे जळून खाक झाली. सदर जिवंत वायर गोठयामध्ये असणा-या जनावरांपैकी एका म्हशीवर पडून म्हैशीस विजेचा धक्का लागून जागीच मरण पावली आणि अर्जदाराचे रक्कम रु.86,200/- चे नुकसान झाले. अर्जदाराच्या हक्काच्या जागेत सदर घटना घडलेली आहे.
6. अर्जदाराने वितरण कंपनीकडे अर्ज करुन नुकसान भरपाईची मागणी केली त्यानुसार कंपनीने दि.31/05/2013 रोजी घर व गोठयामध्ये घटनास्थळाचा पंचनामा केला. ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीसांना सदरच्या अपघाताबद्दल दि.31/05/2013 रोजी आकस्मीत जळीत 10/13 अन्वय नोंद करुन पंचनामा केला. पोलिसांनी दिलेल्या पत्रानुसार वैद्यकिय अधिकारी व्हेटररनी डिस्पेन्सरी वर्ग 2 उपळा (मा.) ता. जि. उस्मानाबाद यांनी उपघातग्रस्त जळीत म्हशीचे पोष्टमार्टम दि.30/05/2013 रोजी करुन मृत्यूचे कारण विजेचा शॅाक लागल्याने मृत्यू झाल्याबाबत रिपोर्ट दिलेला आहे तरीही वितरण कंपनीने नुकसान भरपाई न दिल्यामुळे अर्जदाराने प्रस्तुत तक्रारीव्दारे वितरण कपंनीकडून रु.86,200/- 12 टक्के व्याजासह तसेच मानसिक त्रासासाठी रु.5,000/-, व तक्रारीचा खर्च रु.3,000/- मिळावेत अशी विनंती केलेली आहे.
ब) 1. वितरण कंपनीने त्यांचे म्हणणे अभिलेखावर दाखल केलेले आहे त्यांचे म्हणण्यानुसार तक्रार काही अंशी बरोबर तर काही अंशी खरी नाही असे म्हणणे आहे. 11 के.व्ही. ची लाईन घरावरुन व गोठयावरुन गेली हे खोटे आहे. सदर लाईनची उभारणी करते वेळी अर्जदाराचा गोठा किंवा घरजागा नव्हती. अर्जदार हा वितरण कंपनीचा ग्राहक आहे हे बरोबर आहे असे नमूद करुन मान्य केलेले आहे परंतु सदर लाईनवरुन अर्जदारास विद्युत पुरवठा दिलेला नसल्याचे म्हंटले अहे. अर्जदाराने विरुध्द पक्षकाराला विद्युत वाहीनी तुटून गंभीर उपघात होण्याची शक्यता आहे असे सांगितले होते हे संपूर्णपणे खोटे आहे. वितरण कंपनीने लाईनची देखाभाल करण्याकरीता तज्ञ लोकांच्या नेमणूका केल्या व ते वेळोवेळी लाईनची देखभाल करीत असतात. वितरण कपंनीच्या निष्काळजीपणामुळे दि.30/05/2013 रोजी तार तुटून गोठयावर पडली हे खरे नसून नैसर्गिक आपत्तीमुळे घडलेली आहे. टी.व्ही. फ्रिज फॅन हे जळाले हे म्हणणे खोटे आहे. सदर घटनेबाबत वितरण कंपनीने पंचनामा केला आहे हे बरोबर असल्याचे म्हंटले आहे. पोष्टमार्टम केले हे ही बरोबर असल्याचे म्हंटले आहे. पोलिसांनी पंचनामा केल्याचेही बरोबर असल्याचे म्हंटलेले आहे. पंचनामा करतांना वितरण कंपनीला बोलावले नाही त्यामुळे पंचनाम्याचा इन्कार केलेला आहे. पंचनाम्यात फक्त वाहीनी दाखवलेली आहे. विदयुत लाईन कोठून आली व पुढे कोठे गेली व तसेच घर असल्याबाबतचा उल्लेख केला नाही. तक्रारदाराची तक्रार खोटी आहे. विद्युत निरीक्षकाचा अहवाल नाही. घटना घडली किंवा नाही हे सांगता येत नाही. त्यामुळे तक्रार खर्चासह नामंजूर करण्यात यावी अशी विनंती वितरण कंपनीने केलेली आहे.
क) अर्जदाराने तकारीसोबत स्वत:चे विद्युत देयक, मयत म्हशीचे छायाचित्र, उस्मानाबाद (ग्रामीण) यांचा उस्मानबाद (शहरी) यांना माहितीस्तव पत्र, पोष्टमार्टम एक्सामीनेशन रिपोर्ट, घटनास्थळ पंचनामा पोलिसांचा दि.31/05/2013 वितरण कंपनीच्या sub division Engineer दि.31/05/2013 रोजी केलेला पंचनामा घटनास्थळाचा, अर्जदाराचा अर्ज वितरण कंपनीला दिलेला या सर्व कागदपत्रांचे सुक्ष्म अवलोकन केले असता सदर प्रकरणात खालीलप्रमाणे मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1) अर्जदाराचा गोठा व घर जळून नुकसान झाल्याचे सिध्द होते का ? होय.
2) वितरण कंपनीने अर्जदाराला देण्यात येणा-या
सेवेत त्रुटी केली हे सिध्द होते का ? होय.
3) अर्जदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे का ? होय.
4) काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
ड) कारणमीमांसा
मुद्दा क्र. 1 :
1. अर्जदार वितरण कंपनीचा ग्राहक आहे आणि वितरण कंपनीच्या विद्युत वाहीनीमुळे अर्जदाराचे घर व गोठा जळालेला आहे. वितरण कंपनीच्या सब इंजिनीअरने घटनास्थळ पंचनामा लाईनमन - श्री. धोत्रे शिवाजी नामदेव तसेच तंत्रज्ञ कोकाटे बबन डि,, श्री. पडवळ रामराजे व श्री. शिराज बाबू शेख यांच्या उपस्थितीत व साक्षिसह पंचनामा केलेला आहे.
2. सदर वर नमूद साक्षीदार हे घटनास्थही पोहोचले आहेत आणि या विद्युत वाहिनी खाली श्री. भाऊ पांडूरंग पडवळ यांचे घर असून घरासमोरील गोठयामध्ये 1 म्हैस बसलेल्या अवस्थेत मरण पावलेली दिसत आहे. सदर घटना ही उपळा उपकेंद्र येथून 10 व्या पोलवर घडलेली आहे. पोलवर स्पार्किंग तसेच 1 छेद पडलेला दिसत आहे. सदर वाहीनीचा Y-phase हा conductor पडलेला दिसत आहे. सदर घटना ही दि.30/05/2013 रोजी रात्री 11.30 ते 12.00 च्या दरम्यान घडल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. सदर ठिकाणी घर आधी बांधण्यात आले व नंतर वाहीनी ओढलेली आहे.
3. वितरण कंपनीचे असे म्हणणे आहे की 11 के.व्ही. वरुन विदयुत पुरवठा देता येत नाही पंरतू वितरण कंपनीच्या घटनास्थळ पंचनाम्यात स्प्ष्ट नमूद केलेले आहे की वाहीणीखाली श्री. भाऊ पांडूरंग पडवळ यांचे घर आहे त्यावर स्पार्किंग झालेली आहे. घरावर conductor पडलेला दिसत आहे.
तसेच, पोलिसांनी केलेल्या घटनास्थळ पंनाम्यात गोठयामध्ये दक्षिण कडेला एक म्हैस, काळया रंगाची, लांग शिंगे असलेली, अंदाजे रु.60,000/- ची तारेचा करंट लागून मयत झालेली दिसत आहेत. तसेच सदर घटनेत खबर देणा-याचे म्हणजेच अर्जदाराचे घरातील उपकरणे टीव्ही, र्फिज कुलर तसेच घरातील लाईटची वायरींग जळून अंदाजे रु.25,000/- चे नुकसान झालेले दिसत आहे. असे स्पष्टपणे नमूद केलेले आहे. दोन्ही घटनास्थळ पंचनाम्याचे सुक्ष्म अवलोकन केले तर वितरण कंपनीच्या विद्यूत वाहीणीची स्पार्किंग होऊन अर्जदाराचे घर व गोठा जळून नुकसान झाल्याचे स्पष्ट होते, सिध्द होते त्यामुळे आम्ही मुद्दा क्र. 1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र. 2
4. वास्तवित पाहता वितरण कंपनीने अर्जदार यांना विदयूत पुरवठा दिला यात वाद नाही पण विद्युत पुरवठा देताना जी काही काळजी घ्यावी लागते ती खरी काळजी वितरण कंपनीने घेतलेली नाही. वितरण कंपनीच्या म्हणण्याप्रमाणे भारतीय विद्युत अधिनियम 1956 चे कलम 82 (3) प्रमाणे विद्युत लाईन खालील जागेचा कोणत्याही प्रकारे उपयोग करता येत नाही आणि पुढे असे ही म्हंटलेले आहे की अर्जदाराने कायद्याचा भंग करुन लाईन खाली गोठा बांधलेला आहे. परंतू वितरण कंपनीच्या सब इंजिनीअरने केलेल्या पंचनाम्यात सदर ठिकाणी घर आधी बांधण्यात आले व नंतर वाहीनी ओढलेली आहे असे स्पष्ट नमूद केल्यामुळे वितरण कंपनीची चूक आहे की सदर अर्जदाराच्या घर व गोठयावरुन सदर विद्युत वाहिनी न नेता दूसरीकडून वितरण कंपनी वाहीनी नेऊ शकली असती किंवा ओढू शकली असती परंतू विद्युत वाहिनीच्या खाली अर्जदाराचा घर व गोठा येत आहे हे माहित असतांना सुध्दा जाणून बूजून घरावरुन व गोठयावर विद्युत वाहीनी ओढून कायद्याचा भंग केलेला आहे ही सेवेतील गंभीर त्रुटी आहे. त्यामुळे आम्ही मुद्दा क्र. 2 चे उत्तर होकारार्थी देत आहोत.
5. तसेच अभिलेखावर मयत म्हशीचा शवविच्छेदन अहवाल दाखल केलेला आहे; त्या शवविच्छेदन अहवालाचे सुक्ष्म अवलोकन केले तर ग्रामीण उपळा ता. जि. उस्मानाबाद येथील डॉक्टरांनी असे मत नोंदविलेले आहे की As per my opinion the animal (She Baffelow) died due to electric shock असे सपष्ट नमूद केलेले आहे त्यामुळे अर्जदाराचे नुकसान झालेले आहे. अर्जदाराने केलेली मागणी रास्त आहे.
6. घटनास्थळाची केलेले दोन्ही प्रत्यक्ष पंचनामे पाहणी यावरुन असे स्पष्ट होते की 11 केव्ही फिडर हा स्पार्किंग होऊन अर्जदाराच्या घरावर व गोठयावर पडून घर व गोठा हे जळून अर्जदाराचे नुकसान झालेले आहे.
7. निर्विवादपणे विजेचे वितरण व पुरवठा करण्यासाठी उभारलेल्या उपरी तारमार्ग यांचे संलग्न विद्युत संच मांडणी, ग्राहकांना विज जोडणी देण्यात येणारी वायर इ. बाबत आवश्यक देखभाल व दुरुस्ती करुन सुरक्षीत ठेवण्याची जबाबदारी वितरण कंपनीवर आहे. विदयुत दुर्घटना घडण्यामागे मानवी चूका, निकृष्ठ देखाभाल, उपकरणांची चूक, मांडणी, अप्रशिक्षित वर्ग त्यांच्यातील असमन्वय याबरोबर अनेक कारणे असू शकतात तसेच विद्युत कारद्यानुसार अशा दुर्घटनाची चौकशी करण्याचे अधिकार विद्युत निरीक्षकांना आहेत व ते सक्षम व तज्ञ व्यक्ति आहेत. मा. राष्ट्रीय आयोगाने दिलेल्या निवाडयांचा आम्ही परामर्श करीत आहोत. मा. राष्ट्रीय आयोगाने कर्नाटक पॉवर ट्रॉन्समिशन कार्पो. लि. यांना जबाबदार धरुन त्यांच्या सेवेत त्रुटी केल्याचे म्हंटले आहे असेच तत्व मा. राष्ट्रीय आयोग The Assistant Exectutive Engineer Hubli V/s Shri. Nilkantgouda Sidhgouda Patil 1986 2004 Consumer 7145(N.S.) या निवाडयात विषद केले आहे. मा. राष्ट्रीय आयोगाने विषद केलले तत्व व तक्रारीची वस्तुस्थिती पाहता विरुध्द पक्ष वितरण कंपनीने विदयुत वाहीनीच्या तारा सुस्थिती पाहता विरुध्द पक्ष वितरण कंपनीने विद्युत वाहीणीच्या तारा सुस्थितीत न ठेवल्यामुळे स्पार्किंग होऊन अर्जदारदाराचे नुकसान झाल्याचे सिध्द होते आणि असा वाद ग्राहक मंचाच्या कार्यक्षेत्रात येतो आणि प्रस्तुत विवाद हा ग्राहक विवाद ठरतो या निर्णयाप्रत आम्ही आलो आहोत. अर्जदाराने कृषी उत्पन्न बाजार समीती उस्मानाबाद यांचे म्हशीची कमाल व किमान या दोन्ही किंमती सचिवाच्या सहीने अभिलेखावर दाखल केलेल्या आहेत.
8. वितरण कंपनीने सेवेत त्रुटी केलेली आहे या निर्णयाप्रत आम्ही आलेलो आहेत. वितरण कपंनीच्या निष्काळजीपणामुळे अर्जदाराचे नुकसान हे झालेले आहे हे नक्की आहे व नाकारता येत नाही. अर्जदाराने म्हशीची नुकसान भरपाई रु.60,000/- (रुपये साठ हजार फक्त) मागणी केलेली आहे तसेच फ्रिज, टी.व्ही. फॅन याची नुकसान भररपाई रु.25,000/- (रुपये पंचवीस हजार फक्त) मागितलेली आहे. वितरण कंपनीने अर्जदाराच्या पुराव्याचे विरुध्द जाऊन स्वतंत्रपणे पुरावे दाखल करुन खंडन केलेले नाही, अभिलेखावर दाखल नाही. असे असले तरी सर्वसाधारण मुल्यमापन करता व अर्जदार हे म्हशीची रु.40,000/- (रुपये चाळीस हजार फक्त) नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत तसेच अर्जदाराचे इलेक्ट्रॉनिक वस्तू जसे कि टी.व्ही. फ्रिज, फॅन यांची खरेदी पावती अभिलेखावर दाखल केलेली आहे. त्यांचे सर्वसामान्य मुल्यमापण करता व टी.व्ही., फ्रिज, फॅन चे रु.20,000/- (रुपये वीस हजार फक्त) नुकसान भरपाई मिळविण्यास अर्जदार पात्र आहे. वितरण कंपनीने मा. राष्ट्रीय आयोगाचा न्याय निवाडयाचा आधार घेऊन अर्जदार हा ग्राहक नाही असा बचाव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु सदर निवाडयात 1986-99 Consumer 3695 (NS) Haryana state Electricity Board V/s Mohanlala सदर निवाडयात विषद केलेले तत्व पाहता विद्युत पुरवठा हा दुस-या ग्राहकाला दिलला आहे. यातील तक्रारदार हा दुस-या ग्राहकाला दिलेल्या विद्युत पुरवठा वाहिनीचा ग्राहक होऊ शकत नाही म्हणून Rivision Petition allowed केलेले आहे. सदर मा. राष्ट्रीय आयोगाचा निवाडा या प्रकरणात लागू पडत नाही. त्यामुळे मुद्दा क्र.3 उत्तर आम्ही होकारार्थी देऊन खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार अंशत: मान्य करण्यात येते.
2) वितरण कंपनीने अर्जदारास म्हशीच्या नुकसान भरपाई पेाटी रु.40,000/- (रुपये चाळीस हजार फक्त) तसेच अर्जदाराचे इलेक्ट्रॅानीक्स वस्तू जळाल्यापोटी रक्कम रु.20,000/- (रुपये वीस हजार फक्त) दि.30/05/2013 पासून 9 टक्के व्याज दाराने आदेश पारीत दिनांकापासून तीस दिवसात दयावेत.
3) वितरण कंपनीने अर्जदारास तक्रार खर्चापोटी रक्कम रु.5,000/- (रुपये पाच हजार फक्त) आदेश पारीत दिनांकापासून 30 दिवसात दयावेत.
4) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(सौ.विद्युलता जे.दलभंजन) (श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.