ग्राहक तक्रार क्र. 125/2013
अर्ज दाखल तारीख : 13/10/2013
अर्ज निकाल तारीख: 15/05/2015
कालावधी: 01 वर्षे 07 महिने 03 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.
1. श्री. निळकंठ प्रल्हादराव पाटील,
वय - सज्ञान, धंदा – नौकरी,
रा.सरकारी दवाखाना कोपरा मेन रोड,
उमरगा, ता. उमरगा जि.उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. सहाय्यक अभियंता म.रा.वि.वि.कं..मं उमरगा.
2. कार्यकारी अभियंता म.रा.वि.वि.कं.मं. तुळजापूर. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विदयुलता जे.दलभंजन. सदस्या.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.आर.आर.मुंढे.
विरुध्द पक्षकार क्र.1 व 2 तर्फे विधीज्ञ : श्री.व्ही.बी.देशमूख.
न्यायनिर्णय
मा. अध्यक्ष श्री.एम.व्ही.कुलकर्णी यांचे व्दारा:
अ) 1. विरुध्द पक्ष (विप) विदयुत वितरण कंपनी यांनी अवाजवी बिल देऊन तक्रारकर्ता
(तक) चे सेवेत त्रुटी केली म्हणून भरपाई मिळण्यासाठी तक ने ही तक्रार दिलेली आहे.
2. तक चे तक्रारी अर्जातील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे आहे.
तक हा उमरग्याचा रहिवाशी असून तो नोकरी करतो. त्याने घरगूती वापरासाठी विप कडून वीज जोडणी घेतलेली आहे. त्याचा ग्राहक क्र.596520185330 असा आहे. असे असतांना दि.20/03/2013 रोजी विप यांनी तक ला व्यावसायिक दराने रु.10,820/- चे बिल दिले व भरणा न केल्यास कनेक्शन तोडण्याची धमकी दिली त्यामुळे तक ने सदर बिलाचा भरणा केला. तक चे घराचे मागील बाजूस दरवाजा असून पुढील बाजूस शटर आहे. जरी ते दुकान होते तरी शटर बंद ठेऊन तक ती जागा घर म्हणून वापरत होता. तेथे मीटर क्र.4299 रेसीडेन्शीअल म्हणून दिलेले आहे. महाराष्ट शासनाचे दि.05/09/2012 चे परिपत्रकाप्रमाणे जर ग्राहक 3600 युनिट पर्यंत वार्षीक व 30 युनिट प्रमाणे मासिक वीज वापर करत असेल तर त्याला घरगूती दराने बिल द्यावे व व्यावसायीक दर लावू नये असे असतांनाही विप यांनी जास्तीचे रु.15,000/- तक कडून वसूल केले ते परत मिळावे म्हणून ही तक्रार दि.03/10/2013 रोजी दाखल करण्यात आलेली आहे.
3. तक ने तक्रारीसोबत दि.20/03/2013 चे बिल भरल्याची पावती, दि.22/03/2013 चे बिल भरल्याची पावती, दि.20/03/2013 चे अर्जाची प्रत, दि.18/03/2013 चे असेसमेंट बिल, कनेक्शन इन्फॉरमेशन, सर्क्यूलर 175, इत्यादी कागपत्रांच्या प्रती हजर केल्या आहेत.
ब) विप क्र. 1 व 2 यांनी हजर होऊन दि.08//08/214 रोजी आपले म्हणणे दाखल केलेले आहे. विप चे म्हणणे आहे की तक च्या प्लॉटवर दुकाने होती. तक ला घरगूती वापराकरीता वीज पुरवठा दिला होता. मात्र पाहणी करता असे आढळले की तक ने वीज वापराची वर्गवारी बदलली होती व व्यापारी कारणांसाठी चोरून वीज वापरत होता अशा प्रकारे चोरुन वापरलेल्या वीजेचे बिल रु.10,820/- तक ला देण्यात आले. सदरचे बिल विद्यूत कायदा कलम 126 प्रमाणे दिले असल्यामुळे सदची तक्रार चालविण्याचा या मंचास अधिकार नाही. त्यामुळे तक्रार रद्द करण्यात यावी असे नमूद केले आहे.
क) तक ची तक्रार त्याने दिलेली कागदपत्रे व विप चे म्हणणे याचे अवलोकन केले असता आमचे विचारार्थ खालील मुद्दे निघतात त्यांची उत्तरे आम्ही त्यांच्या समोर खाली दिलेल्या कारणांसाठी लिहिली आहेत.
मुद्दे उत्तरे
1) विप ने सेवेत त्रुटी केली आहे काय ? होय.
2) तक अनुतोषास पात्र आहे काय ? होय.
3) आदेश कोणता ? शेवटी दिल्याप्रमाणे.
ड) कारणमीमांसा
मुद्दा क्र.1 व 2 :
1. जे एकमेव बिल दाखल केले ते असेसमेंटचे आहे त्यावर घरगूती अगर व्यावसायीक असा उल्लेख नाही मात्र विद्यूत कायदा कलम 126 खालील बिल असा उल्लेख आहे. तक ने अर्ज देऊन अंडरप्रोटेस्ट बिल भरल्याचे दिसते. तक चे म्हणणे आहे की घराचे पुढील बाजूस शटर असले तरी ते बंद ठेवलले होते. मागील बाजूस दरवाजा ठेऊन जागेचा घर म्हणून तक तर्फे वापर होता म्हणूनच कमर्शिअल मिटर क्र.4299 बंद करुन रेसिडेंन्शिअल वापर करण्यात येत होता. 12 महीन्याच्या कनेक्शन इन्फॉरमेशन मध्ये घरगूती की व्यावसायिक वापरापैकी घरगूती वापर असा उल्लेख दिसून येतो. विप तर्फे दि.11/12/2012 चा प्रत्यक्ष पाहणी अहवाल हजर करण्यात आलेला आहे. दुकानामध्ये वीजेचा वापर करीत आहे असा शेरा मारला आहे. घरगूती वापर व व्यावसायिक वापर वेगळा वेगळा दाखवला आहे. एक कॉम्प्यूटर घरगूती वापराचा तर एक कॉम्प्यूटर व्यावसायिक वापराचा दाखवला आहे. व्यावसायिक वापरात अधिकची गोष्ट म्हणजे झेरॉक्स मशीन दाखवली आहे. घराचे दोन भाग कोणते किंवा कसे याबद्दल खुलासा नाही.
2. हे स्पष्ट आहे की तक ला एकच मिटर देण्यात आले असून ते घरगूती वापराचे आहे. विप चा असा बचाव दिसतो की तक झेरॉक्स मशीन वापरत असल्यामुळे त्याचा वापर व्यावसायिक आहे. केवळ झेरॉक्स मशीन वापरल्यामुळे तक ने चोरून वीज वापरली असे म्हणता येईल काय हा खरा प्रश्न आहे. दि.05/09/2012 चे परिपत्रकाप्रमाणे 1 ऑगस्ट 2012 पासून जे लोक घरगूती व्यवसाय करतात तो वार्षीक 3,600 युनिट व महीना 300 युनिट पर्यंत वीज वापर करतात त्यांना घरगुती दराने वीज बिल देण्यात यावे. त्या परिपत्रकाचा विप ने का अवलंब केला नाही याचा खुलासा होत नाही त्यामुळे विप ने सेवेत त्रुटी केली व तक अनुतोषास पात्र आहे असे आमचे मत आहे. म्हणून आम्ही मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देतो व खालीप्रमाणे आदेश करतो.
आदेश
तक ची तक्रार खालीलप्रमाणे मंजूर करण्यात येत आहे.
1) विप ने तक ला दि.05/09/2012 चे परिपत्रकाचा लाभ देण्याबद्दल योग्य तो विचार करावा.
2) खर्चाबद्दल कोणताही आदेश नाही.
3) वरील आदेशाची पुर्तता करुन विप यांनी 45 दिवसात तसा अहवाल मा. मंचासमोर
सादर करावा. सदर कामी उभय पक्षकारांनी मंचासमोर हजर रहावे. सदर आदेशाची
पुर्तता विप यांनी न केल्यास तक्रारदार यांनी सदरबाबत मंचात अर्ज दयावा.
4) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विदयुलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.