(द्वारा- श्रीमती रेखा कापडिया, सदस्य) अर्जदार हे वीज वापरणारे ग्राहक असून, त्यांना दिलेल्या वाढीव बिलाबाबत त्यांनी मंचात तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांचे सिल्लोड जिल्हा औरंगाबाद येथे इलेक्ट्रीक सामानाचे दुकान असून, त्यावर त्यांची उपजिवीका चालते. त्यांनी सदरील दुकान श्री.मुबीन खॉ मेहबुब खान यांच्याकडून विकत घेतले असून, ते गैरअर्जदार यांच्याकडे नियमितपणे वीज बिलाचा भरणा करतात. दि.13.11.2009 रोजी गैरअर्जदार (2) त.क्र.06/10 यांनी, त्यांचे वीज मीटर बदलले व दि.16.11.2009 रोजी त्यांना मीटर स्टॉप व वीजचोरीचे 18,840/- रुपयाचे वीज बिल पाठविले. त्यानंतर गैरअर्जदार यांनी हे वीज बिल रदद करुन दि.30.11.2009 रोजी 5,000/- रुपयाचे वीजचोरीचे बिल आकारले. गैरअर्जदार यांनी जेलमध्ये पाठविण्याची धमकी दिल्यामुळे अर्जदाराने या बिलाचा भरणा केला. अर्जदाराने दि.16.12.2009 रोजी गैरअर्जदार यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करुन वीज बिल कमी करुन देण्याची विनंती केली. गैरअर्जदार यांच्यातर्फे अर्जदारास दि.21.12.2009 रोजी 10,806/- रुपयाचे वीज बिल देण्यात आले. अर्जदाराने हे बिल रदद करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी मंचाकडे केली आहे. गैरअर्जदार यांनी मंचात दाखल केलेल्या जवाबानुसार दि.03.11.2009 ते दि.18.11.2009 या कालावधीत सिल्लोड येथे वीज ग्राहकांच्या मीटरची तपासणी करण्यात आली. अर्जदाराचे मीटर बंद आढळून आल्यामुळे अर्जदारास 18,840/- रुपये प्रोव्हिजनल बिल देण्यात आले. अर्जदाराने तोंडी तक्रार केल्यानंतर त्यांना 5,000/- रुपयाचे बिल देण्यात आले, ज्याचा भरणा अर्जदाराने केलेला आहे. अर्जदाराचे मीटर बदलल्यानंतर त्यास जुन्या मीटरवरील व नवीन मीटरवरील वीज वापरानुसार 2030 युनिट वीज वापराचे बिल आकारण्यात आले. जानेवारी 2010 मध्ये 3424.92/- रु वीज बिलातून कमी करण्यात आले, जे योग्य असल्याचे गैरअर्जदार यांचे म्हणणे आहे. अर्जदारास बिल भरण्याचे आदेश देण्याची विनंती त्यांनी मंचास केली आहे. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन व सुनावणीवरुन मंचास असे आढळून येते की, अर्जदार हे वीज वापरत असल्यामुळे वीज कायदा 2003 मधील तरतुदीनुसार ते ग्राहक आहेत. दि.12.11.2009 रोजी अर्जदाराचे जुने मीटर क्र.जे.653070 बदलून त्या जागी 4402903 या क्रमांकाचे नवीन मीटर बसविण्यात आल्याचे अहवालावरुन दिसून येते. त्या वेळेस जुन्या मीटरची अंतिम रिडींग 1989 असे असून मीटरचे सील, ग्लास इत्यादी व्यवस्थित असल्याचे नमूद केले आहे. दि.12.11.2009 रोजी करण्यात आलेल्या स्थळ पाहणी अहवालात मीटरचे बॉक्स Intact असून, रिडींग दिसत नसल्याचे म्हटले आहे. सदरील स्थळ पाहणी अहवालावर गैरअर्जदार यांच्यातर्फे कोणाचीही सही नाही. अर्जदाराचा एकूण विद्युत भार 510 वॅट असल्याचे या अहवालात नमूद केले आहे. गैरअर्जदार यांनी जवाबासोबत दाखल केलेले, कार्यकारी अभियंता यांनी मंजूर केलेल्या बिल रिव्हीजनची पाहणी केल्यावर अर्जदारास जुन्या व नवीन मीटरवरील रिडींग नुसार 2030 युनिट वीज वापराचे बिल आकारण्यात आल्याचे दिसून येते. अर्जदाराचे सी.पी.एल. मंचात दाखल केलेले नसल्यामुळे जुन्या मीटरचे बिल (3) त.क्र.06/10 हे किती कालावधीचे आहे, तसेच अर्जदाराने वीज बिलापोटी भरलेल्या रकमेची माहिती गैरअर्जदार यांच्यातर्फे उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे सदरील बिल रिव्हीजन मंच मान्य करीत नाही. सदरील प्रकरण वीज चोरीचे नसल्याचे स्पष्ट होते. आदेश 1) गैरअर्जदार यांनी अर्जदारास जुन्या मीटरवरील रिडींगप्रमाणे बिल आकारणी करावी व ते त्या कालावधीप्रमाणे विभागून द्यावे. 2) गैरअर्जदार यांनी अर्जदारास वरीलप्रमाणे सुधारीत बिल देताना व्याज व दंड आकारु नये, व अर्जदाराने भरलेल्या रकमेची वजावट करावी. 3) अर्जदाराने वीज चोरी केली नसल्यामुळे त्यांनी वीजचोरीपोटी भरलेले रु.5,000/- वीज बिलातून वळते करुन द्यावे. 4) अर्जदाराने सुधारीत बिल तसेच नवीन मीटरप्रमाणे वीज बिल भरावे. 5) खर्चाबददल आदेश नाही. श्रीमती ज्योती पत्की श्रीमती रेखा कापडिया श्री.डी.एस.देशमुख सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |