(मंचाचे निर्णयान्वये, श्रीमती रोझा फुलचंद्र खोब्रागडे, सदस्या)
(पारीत दिनांक : 27 मे 2015)
तक्रारकर्त्याने सदर तक्रार, माहे नोव्हेंबर 2014 चे घरगुती विद्युत देयक रुपये 30,050/- विज बिल विद्युत आकारणीनुसार न पाठविल्याबाबत दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे.
1. तक्रारकर्त्याचा घरगुती विद्युत ग्राहक क्र.476700019297 आहे. जुलै 2014 पासून व त्यापूर्वीसुध्दा नियमीत गैरअर्जदारांच्या विद्युत वितरण कंपनीमध्ये नियमीत घरगुती विज देयक भरत आले. माहे नोव्हेंबर 2014 या महिण्याचे घरगुती विज बिल रुपये 27,730/- एक वेळेस गैरअर्जदाराच्या कार्यालयाकडून पाठविण्यात आले. त्यासंबंधाने अर्जदाराने दि.12.11.2014 रोजी गैरअर्जदाराकडे लेखी अर्ज दिला असता त्यांनी मिटरची चेकींगकरीता रुपये 150/- गैरअर्जदाराचे कार्यालयात दि.22.11.2014 रोजी भरणा केले. त्यानुसार अर्जदाराचे मीटरची चेकींग होवून त्यामध्ये 1 कुलर, 2 फॅन, 2 सीएफएल, बल्ब, टेबल फॅन, फ्रिज एवढे सामान सदरच्या मीटर टेस्टींग रिपोर्टमध्ये आढळून आले व त्याअनुषंगाने 1.250 कि.वॅट एवढी विद्युत क्षमता घरगुती मिटरसाठी वापरात येत आहे असे मीटर टेस्टींग अहवालामध्ये गैरअर्जदाराला आढळून आले. त्यानंतर माहे नोव्हेंबर 2014 पासून अर्जदाराचे घरगुती मिटरचे बिल माहे नोव्हेंबर 2014 चे रुपये 30,050/- अवाजवी रक्कम पाठवून अर्जदारास आर्थिक भुर्दंडास भाग पाडले. तक्रारकर्ता दि.12.11.2014 पासून गैरअर्जदाराकडे तक्रार केल्यापासून वारंवार चकरा मारीत आहे. तरीसुध्दा गैरअर्जदाराने अर्जदाराचे विद्युत देयक कमी केले नाही. गैरअर्जदार अर्जदारास उलट-सुलट उत्तरे देवून अर्जदारास मानसिक, शारिरीक ञास देत आहे. त्यामुळे, अर्जदारास गैरअर्जदाराने विज बिल रुपये 30,050/- कमी करुन नियमीत आकरणीनुसार व नियमानुसार विज देयकात दुरुस्ती करुन देण्यात यावे. अर्जदारास झालेल्या मानसिक व अर्थिक ञासापोटी रुपये 50,000/- व तक्रार खर्च रुपये 2000/- देण्याची यावे, अशी प्रार्थना केली आहे.
2. अर्जदाराने नि.क्र.4 नुसार 7 दस्ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदारांविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदाराने नि.क्र.9 नुसार लेखी उत्तर व नि.क्र.10 नुसार 1 दस्ताऐवज दाखल केले.
3. गैरअर्जदाराने नि.क्र.9 नुसार दाखल केलेल्या लेखी उत्तरातील विशेष कथनात नमूद केले की, तक्रारकर्ता हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे. अर्जदाराने मीटर सुस्थितीत न ठेवल्यामुळे मे 2014 ते ऑक्टोंबर 2014 पर्यंत मीटर रिडरला मीटर रिडींग घेता आले नाही, त्यामुळे वीज देयक देतांना सदर देयकावर INACCS म्हणजे In Accessible असा शेरा नमूद करुन वीज देयक देण्यात आले. In Accessible याचा अर्थ म्हणजे रिडींग घेण्यास शक्य न होणे. गैरअर्जदाराने स्वतः तक्रारकर्त्याच्या समक्ष मीटरवरील धुळ स्वच्छ करुन रिडींगचे वाचन करुन नमूद केले व तेंव्हा मीटर रिडींग 18640 एवढे असल्याने त्यास माहे नोव्हेंबर 2014 चे रुपये 27,183/- चे वीज देयक देण्यात आले. गैरअर्जदाराने तक्रारकर्त्यास मे 2014 ते ऑक्टोंबर 2014 पर्यंत सरासरी वीज देयकाची तक्रारकर्त्याकडून प्राप्त केलेली रक्कम रुपये 7,168.70 वजा करुन नोव्हेंबर 2014 चे विज देयक देण्यात आले. तक्रारकर्त्याने मीटर तपासणी शुल्क 150/- गैरअर्जदार यांचेकडे भरणा केल्यानंतर दि.22.11.2014 रोजी तक्रारकर्त्याचे समक्ष मीटरची तपासणी करण्यात आली असता मीटर योग्य व सुस्थितीत असल्याचे आढळून आले. तक्रारकर्त्याने स्वतः मीटर सुस्थितीत न ठेवल्यामुळे मीटर रिडरला रिडींग घेणे शक्य होत नव्हते त्यामुळे त्यास सरासरी 210 युनीटचे वीज देयक देण्यात आले होते. तक्रारकर्त्याने दाखल केलेली तक्रार कोणत्याही संयुक्तीक कारणाशिवाय दाखल केलेली असून ती खारीज होण्यास पाञ आहे.
4. अर्जदाराने दाखल केलेली तक्रार शपथपञ समजण्यात यावे अशी पुरसीस नि.क्र.11 व नि.क्र.13 नुसार लेखी युक्तीवाद व नि.क्र.17 नुसार तीन दस्ताऐवज दाखल केले. तसेच गैरअर्जदाराने नि.क्र.12 नुसार पुरसीस व नि.क्र. 16 केस-लॉ दाखल केले. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले लेखी बयान, दस्ताऐवज, लेखी युक्तीवादावरुन खालील मुद्दे निघतात.
मुद्दे : निष्कर्ष
1) अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? : होय.
2) गैरअर्जदाराने अर्जदाराप्रती सेवेत न्युनतापूर्ण व्यवहार : होय.
केला आहे काय ?
3) अंतीम आदेश काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे
- कारण मिमांसा –
मुद्दा क्रमांक 1 बाबत :-
5. तक्रारदाराने गैरअर्जदाराकडून त्यांच्या घरगुती वीज वापराकरीता मागील 10 ते 15 वर्षापासून वीज पुरवठा घेतला असून तक्रारकर्त्याचा घरगुती विद्युत ग्राहक क्र.476700019297 आहे, ही बाब दोन्ही पक्षांना मान्य असून अर्जदार हे गैरअर्जदाराचे ग्राहक आहे असे सिध्द होते. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रमांक 2 बाबत :-
6. अर्जदाराने दाखल नि.क्र.4 वर दस्त क्र.अ-1 व अ-2 ची पडताळणी करतांना असे दिसले कि, सदर दस्ताऐवज गैरअर्जदाराने पाठविलेल्या देयकांची प्रत असून त्या देयकांमध्ये मीटरचे घेतलेले छायाचीञामध्ये चालु रिडींग दर्शवीत नाही. प्रकरणात वादातीत असलेला देयक दि.7.11.2014 मधील सुध्दा चालु रिडींग छायाचीञामध्ये दर्शवीत नाही. गैरअर्जदाराने त्याचे लेखी जबाबात असे लेखी कथन केले आहे की, ‘’सहाय्यक अभियंता यांनी व्यक्तीशः जावून मीटर रिडींग घेण्याचे प्रयत्न केले असता, मीटर कवर वर धुळ साचल्याने व मीटर अडचणीच्या ठिकाणी असल्याने फोटो रिडींग घेतल्या गेले नसल्याचे लक्षात आले, त्यामुळे गैरअर्जदाराने स्वतः तक्रारकर्त्याचे समक्ष त्याचे मदतीने मीटरवरील धुळ स्वच्छ करुन रिडींग वाचन करुन नमूद केले व तेंव्हा मीटर रिडींग 18640 ऐवढे होते.’’ मंचाने देयक दि.7.11.2014 ची पडताळणी करतांना असे दिसले की, त्यामध्ये चालु रिडींग 18640 अशी दर्शविलेली आहे. त्या देयकामध्ये छायाचीञ मीटरचे दर्शविलेले आहे, परंतु त्या छायाचिञामध्ये चालु रिडींग दर्शवीत नाही. जरी गैरअर्जदाराने सदर मीटर वरुन धुळ स्वच्छ करुन रिडींग वाचन केली होती तर छायाचिञांमध्ये ती रिडींग कां दर्शविलेली नाही. तसेच देयक दि.6.12.2014 ची पडताळणी करतांना सुध्दा असे दिसून आले की, ज्यामध्ये चालु रिडींग 18970 दर्शविली असून परंतु छायाचिञामध्ये चालु रिडींग दर्शवीत नाही. गैरअर्जदाराने पाठविलेले देयक दि.7.8.2014, 8.9.2014, व 7.10.2014 चे देयकांमध्ये चालु रिडींग ‘’ INACCS’’ दर्शवीत असून त्या छायाचिञांमध्ये चालु रिडींग दर्शवीत नव्हते. तसेच अर्जदाराने नि.क्र.17 नुसार गैरअर्जदाराने दिलेले दि.7.3.2015 चे देयकाचे छायाचिञात सुध्दा मीटर रिडींग दिसून येत नाही. गैरअर्जदार देयक पाठवितावेळी मीटरचे छायाचिञ काढण्याचे हाच उद्देश राहतो की, अर्जदाराचे मीटर चालु रिडींग काय आहे, हे ग्राहकाला कळवीणे. परंतु, सदर प्रकरणात असे दिसून येते की, गैरअर्जदाराने चालु रिडींग अर्जदाराची घेण्यास कुठेतरी चुक केली आहे. गैरअर्जदाराचे सांगण्याप्रमाणे जरी मीटरवरुन धुळ स्वच्छ केली होती तर त्यांचे नंतरचे छायाचिञांमध्ये चालु रिडींग दर्शविली असती. परंतु, सदर चालु रिडींग देयकांमध्ये असलेल्या छयाचिञांमध्ये दर्शवीत नसून आणि त्यावर कोणत्याही ठोस कार्यवाही गैरअर्जदाराकडून केलेली दिसून येत नाही, ही बाब गैरअर्जदाराची अर्जदाराप्रती न्युनतम सेवा दर्शवीत असून गैरअर्जदाराने अर्जदाराप्रती न्युनतम सेवा दिली आहे असे सिध्द होते. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रमांक 3 बाबत :-
7. मुद्दा क्र.1 व 2 चे विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
- अंतिम आदेश -
(1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) गैरअर्जदाराने अर्जदारास दिलेले देयक दि.7.11.2014, देयक क्र.48 अर्जदाराचे नियमीत वीज वापरानुसार दुरुस्तीकरुन अर्जदाराला सुधारीत देयक पाठविण्यात यावे.
(3) अर्जदाराने गैरअर्जदाराकडे भरलेली रक्कम रुपये 15,000/- वरील नमूद असलेल्या सुधारीत देयकांमध्ये वजा करुन गैरअर्जदाराने अर्जदाराला सुधारीत देयक पाठविण्यात यावे.
(4) अर्जदाराने गैरअर्जदाराकडे वादातील देयकाच्या नंतर दिलेल्या देयकाचे नियमीत भरणा करावे.
(5) उभय पक्षाने आप-आपला खर्च सहन करावे.
(6) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य देण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :- 27/5/2015