ग्राहक तक्रार क्र. 123/2013
दाखल तारीख : 30/09/2013
निकाल तारीख : 25/05/2015
कालावधी: 01 वर्षे 07 महिने 25 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. मिलनबाई भ्र. माधव घाटे,
वय -50 वर्षे, धंदा – घरकाम,
रा. औराद, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद,
ह.मु. समता नगर, उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1) सहाय्यक अभियंता,
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.
उमरगा, ता. उमरगा , जि. उस्मानाबाद.
2) कार्यकारी अभियंता,
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.
तुळजापूर.
3) अधिक्षक अभियंता,
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.
उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्य.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.आर.ए.सुर्यवंशी.
विरुध्द पक्षकारां तर्फे विधीज्ञ : श्री.व्ही.बी.देशमूख.
न्यायनिर्णय
मा.अध्यक्ष, श्री.एम.व्ही.कुलकर्णी यांचे व्दारा
अ) विरुध्द पक्षकार (विप) विद्युत कंपनीने आपल्या शेतामध्ये वीज पुरवठा देतांना निष्काळजीपणा व हयगय केल्यामुळे तारेतून ठिणग्या पडून शेतातील ऊस जळाल्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी म्हणून तक्रारकर्ती (तक) हिने हि तक्रार दिलेली आहे.
1. तक चे तक्रारी अर्जातील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे...
तक ही औराद ता. उमरगा येथे रहाते व तेथे तिला जमीन गट क्र.85/2 मध्ये 1 हे. 77 आर. हि जमीन आहे. विप चे वीजेचे पोल व तारा तक चे शेताततून गेले असून विप चा डि.पी. सुध्दा तक चे शेतात आहे. तक चे जमीनीतील पिकास पाणी देण्यासाठी विप कडून विद्युत पुरवठा घेतला असून त्यामुळे तक विप ची ग्राहक आहे. सन 2012-13 मध्ये तक हिने संपूर्ण क्षेत्रात उच्च प्रतीच्या ऊसाची लागवण केली होती. कारण तिला ऊस बेणे म्हणून विकायचे होते. सन 2011-12 मध्ये तक ला ऊस बेण्याची विक्री करुन रु.7,00,000/- चे उत्पन्न मिळाले होते. ता.12/04/2013 रोजी दुपारी 2.00 चे सुमारास तक च्या शेतातून गेलेल्या तारा लूज असल्यामुळे एकमेकांना चिकटून ठिणग्या पडल्या. ठिणग्या ऊसावर पडून सर्व ऊस जळून खाक झाला तक चे रु.7,00,000/- चे नुकसान झाले. तक ने याबद्दल पो.स्टे. उमरगा तसेच तहसील कार्यालय उमरगा यांना माहिती दिल्यावर त्यांनी पंचनामा केला. केवळ विप च्या सेवेतील त्रुटीमुळे तक चे रु.7,00,000/- चे नुकसान झाले ते व्याजासह मिळावे तसेच तक्रारीचा खर्च, मानसिक व शारीरिक त्रासापोटी भरपाई मिळावी म्हणून तक ने हि तक्रार दिलेली आहे.
2. तक्रारीसोबत तक ने डिमांड रक्कम भरल्याची पावती, विप ने अर्ज पाठविल्याबद्दल पोष्टाची पावती, तलाठी पंचनामा, पोलिस पंचनामा, सातबारा व आठ -अ उतारा, जळालेल्या ऊसाचे फोटो, आधीच्या वर्षी ऊस वजन केला त्याच्या पावत्या इत्यादी कागदपत्रांच्या प्रती हजर केल्या आहेत. त्यानंतर वीज बिल भरल्याच्या पावत्या सुध्दा हजर केल्या आहेत. तसेच सन 2012 मध्ये विकलेल्या ऊसाचा हिशोब सादर केलेला आहे.
ब) विप यांनी हजर होऊन आपले लेखी म्हणणे दि.10/01/2014 रोजी दाखल केलेले आहे. तक हिने ऊसाचे क्षेत्र वाढवून सांगितले. तक ने हजर केलेल्या पावत्या दुस-या कोणाच्या तरी आहेत. तिला बेणे विक्री करुन रु.7,00,000/- मिळाल्याचे कबूल नाही. वीजेच्या तारांमध्ये शॅार्टसर्कीट होऊन ठिणग्या पडून तक चा ऊस संपूर्ण जळाला हे मान्य नाही. तक चे रु.7,00,000/- चे नुकसान झाले हे मान्य नाही. तक चे नुकसानीस विप जबाबदार आहे हे मान्य नाही. दिलेले पंचनामे चुकीचे आहेत. विप तर्फै तज्ञ लोक वीजेच्या तारांची वेळोवेळी देखभाल करतात. तक हिने तारा लूज असल्याबद्दल कधीही कळवले नाही. सदरच्या लाईनवरुन तक ला वीज पुरवठा दिला नसल्यामुळे तक ही विप ची ग्राहक नाही. त्यामुळे तक्रार रद्द होण्यास पात्र आहे.
क) तक ची तक्रार, तिने दाखल केलेली कागदपत्रे व विप यांचे म्हणणे यांचे अवलोकन करता आमचे विचारार्थ खालील मुद्दे निघतात त्यांची उत्तरे आम्ही त्यांच्यासमोर खाली दिलेल्या कारणांसाठी लिहली आहेत.
मुद्दे उत्तर
1) विप ने सेवेत त्रुटी केली आहे काय ? होय.
2) तक अनुतोषास पात्र आहे काय ? होय.
3) आदेश कोणता. शेवटी दिल्याप्रमाणे.
ड) कारणमीमांसा
मुद्दा क्र. 1 व 2 :
1. तक चे म्हणण्याप्रमाणे ती औराद येथील गट क्र.85/2 क्षेत्र 1 हे 77 आर. या जमीनीची मालकीण आहे व सन 2012 – 13 मध्ये संपूर्ण जमीनीत ऊस लावलेला होता. सातबारा ऊतारा हे दाखवतो की 5 हे. 81 आर. पैकी 1 हे.77 आर. जमीनीची तक मालकीण आहे. सन 2012 - 13 मध्ये 1 हे.60 आर. क्षेत्रावर ऊस व इतर क्षेत्रावर इतर पिकांची नोंद आहे. तक ने ऊसाची लागण केल्याबद्दल कुठल्याही साखर कारखान्याला नोंद केल्याचे दिसत नाही. तिचे म्हणणे आहे की ऊस बेण्याकरीता ऊस विक्री केला जात होता. सन 2011-12 मध्ये बेणे विकून तिला सात लक्ष रुपयाचे उत्पन्न मिळाले. ऊस वजन केल्याच्या पावत्या हजर केल्या असून त्याबद्दलचा हिशोब तक ने हजर केलला आहे. मात्र पावत्यावर इतर माणसांची नावे आहेत. तक ने उतारा हजर करुन ज्या माणसांना बेणे विकले त्याचा हिशोब लिहल्याचे म्हंटले आहे.
2. तक ने पाच एच. पी. मोटार चालविण्याकरीता कनेक्शन घेण्यासाठी डिपॉझिट रु.4,950/- दि.03/11/2013 रोजी भरल्याची पावती हजर केलेली आहे. नंतर बिले भरल्याच्या पावत्या ही हजर केल्या आहेत. यावरुन विप ने तक ला तिच्या शेतात विद्युत पुरवठा दिल्याचे दिसून येते. तक चे म्हणण्याप्रमाणे ज्या तारा तिच्या शेतातून गेल्या त्याच तारांव्दारे तिच्या शेतात विद्युत पुरवठा दिलेला आहे. जर यापेक्षा वेगळी परिस्थिती असती म्हणजे तक च्या शेतातून एल.टी.लाईन गेलेली नसती अगर दुस-या कुठूनतरी तक चे शेतात विद्युत पुरवठा दिलेला असता, तर विप ने त्याबद्दल पुरावा दिला असता केवळ तक ही विप ची ग्राहक नाही एवढा बचाव विप ने घेतला आहे मात्र तो टिकणार नाही.
3. विप तर्फे राज्य आयोगाचे खालील निवाड्यावर भर देण्यात आलेला आहे. एफ. ए. 2238/2005 निकाल ता.02/08/2006 येथे जमीनीतून टॉवर लाईन गेल्यामुळे शेतकरी ग्राहक होत नाही असे म्हंटलेले आहे. राष्ट्रीय आयोगाचा निवाडा हरीयाणा एस.व्ही.ई. विरुध्द मोहनलाल 1986/99 कंझ्यूमर 3695 या प्रकरणातसुध्दा जमीनीतून हाय टेन्शन लाईन गेल्यामुळे जमीनदार ग्राहक होत नाही असे म्हंटले आहे. प्रस्तूत प्रकरणात हाय टेन्शन लाईन अगर टॉवर लाईन असल्याचा विप चा बचाव नाही. उलट जमीनीतून लाईन गेल्याचे मान्य करण्यात आले आहे. तक ला जमीनीत विद्युत पुरवठा सुध्दा केला जातो त्यामुळे तक ही विप ची ग्राहक होते.
4. तक चे म्हणण्याप्रमाणे दि.12/04/2013 रोजी तिच्या शेतातून गेलेल्या विद्युत तांरांमध्ये ठिणग्या पडून तक चा ऊस जळून गेला. पोलिसांनी दि.13/04/2013 रोजी पंचनामा केल्याचे दिसुन येते. जळीताचे कारण शॅार्टसर्कीट असे नमूद आहे. सोबत नकाशा दिलेला नाही त्यामुळे जमीनीत पोल व तारा असल्याचे नमूद नाही पण फोटो तक तर्फे हजर करण्यात आले त्यामध्ये जमीनीत ऊसाचे पीक तसेच इलेक्ट्रीक पोल व तारा दिसून येतात. विप ने से कलम पाच मध्ये म्हंटले आहे की तक ने घटनेपूर्वी विप कडे शेतातून गेलेल्या विद्युत तारा व्यवस्थित ओढून घेणेबद्दल विनंती केली होती. मात्र तारा व्यवस्थित होत्या.
5. तक ने म्हंटले आहे की दि.12/04/2013 रोजी दुपारी दोन चे सुमारास तारा एकमेकांना चिकटून ठिणग्या पडून ऊस जळाला. घटनेची उमरगा पोलिस ठाण्यात दि.13/04/2013 रोजी नोंद झाल्याचे दिसते व पोलिसांनी पंचनामा केला. तलाठयाने दि.18/04/2013 रोजी पंचनामा केला. विप ला माहिती दिली असे तक चे म्हणणे नाही. तसेच विद्युत निरीक्षकाला कळवल्याचे दिसत नाही पण विप ने हे मान्य केले की तक ने पुर्वी तक्रार केली होती त्यामुळे तक चे म्हणणे की विप चे निष्काळजीपणामुळे तारेमध्ये ठिणग्या पडून ऊस जळाला हे मान्य करावे लागेल.
6. दि.13/04/2013 चे पोलिस पंचनाम्यात तसेच दि.18/04/2013 चे तलाठी पंचनाम्यात तक चे रु.2,00,000/- चे नुकसान झाल्याचे म्हंटले आहे. फोटोमध्ये एकाबाजूला ऊस खाली पडल्याचे व काळसर झाल्याचे दिसते. तक ने म्हंटले की तिच्या ऊसाची किंमत रु.7,00,000/- होती. एका एकरात 40 टन या प्रमाणे 4 एकरात 160 टन ऊस सरासरी होतो जून जूलै 2012 मध्ये ऊस वजन केल्याच्या पावत्या हजर केल्या त्यावर निरनिराळी नावे आहेत तो तक चा ऊस असल्याबद्दल कोठेही नोंद नाही. तक ने बेणे विकल्याबद्दल हिशोब हजर केला आहे तो तक नेच लिहलेला हिशेाब आहे त्याच्या पुष्ठयार्थ पुरेसा पुरावा नाही. अगदी हिशोब मान्य केला तरी 211 टन ऊस विकल्याचे म्हंटलेले आहे. फोटोचे अवलोकन केले असता जास्तीत जास्त 100 टन ऊसाचे नुकसान झाले असावे जळलेला ऊस करखान्यास निम्या भावाने विकता आला असता म्हणून 50 टन ऊसाचे नुकसान प्रती टन रु.2,000/- प्रमाणे रु.1,00,000/- होते. एवढी नुकसान भरपाई मिळण्यास तक पात्र आहे म्हणून आम्ही मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर होकारार्थी देतो व खालीलप्रमाणे आदेश पारीत करतो.
आदेश
तक ची तक्रार खलीलप्रमाणे अंशत: मंजूर करण्यात येते.
1. विप यांनी तक ला ऊस जळीताची भरपाई म्हणून रु.1,00,000/- ( रुपये एक लक्ष फक्त) द्यावी.
2. विप यांनी तक ला वरील रकमेवर तक्रार दाखल तारखेपासून द.सा.द.शे 9 दराने व्याज द्यावे.
3. विप यांनी तक ला तक्रारीचा खर्च म्हणून रु.5,000/- (रुपये पाच हजार फक्त) द्यावे.
4. उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष यांनी आदेश दिल्या तारखेपासुन तीस
दिवसात करुन विप यांनी तसा अहवाल 45 दिवसात मा.मंचासमोर सादर करावा,
सदरकामी उभय पक्षकारांनी मंचात हजर रहावे. सदर आदेशाची पुर्तता विप यांनी न
केल्यास तक्रारदाराने तसा अर्ज दयावा.
5. उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.