ग्राहक तक्रार क्र. 94/2014
अर्ज दाखल तारीख : 05/05/2014
अर्ज निकाल तारीख: 22/05/2015
कालावधी: 01 वर्षे 0 महिने 18 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1) केशव किसनराव नळेगांवकर,
वय - 30 वर्ष, धंदा – शेती,
रा. बेंबळी, ता.जि. उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1) सहायक अभियंता,
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी,
सहायक अभियंता कार्यालय, उस्मानाबाद,
ता.जि. उस्मानाबाद.
2) कनिष्ठ अभियंता,
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी,
बेंबळी ता.जि. उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्य.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.एस.डी.घाटगे.
विरुध्द पक्षकारा क्र.1 व 2 तर्फे विधीज्ञ : श्री.व्ही.बी. देशमूख.
न्यायनिर्णय
मा. अध्यक्ष श्री.एम.व्ही.कुलकर्णी यांचे व्दारा :
अ) विरुध्द पक्षकार (विप) वीज मंडळाने वीज पुरवठा काळजीपूर्वक न केल्यामुळे शेतातील ऊस जळून झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी म्हणून तक्रारकर्ता (तक) ने ही तक्रार दिलेली आहे.
1. तक चे तक्रारी अर्जातील कथन थोडकयात पुढीलप्रमाणे आहे...
तक हा बेंबळी येथील रहिवाशी असून त्याला तेथे गट क्र.349 दोन हेक्टर 50 आर एवढी जमीन आहे. सन 2011 - 12 मध्ये तक ने 3 एकर क्षेत्रात ऊसाचे पीक घेतले होते. विप ने जमीनीत विद्यूत पुरवठा दिला असून तक चा ग्राहक क्र.590190308717 असा आहे. तक च्या शेतात पोल ऊभे करुन त्यावरुन तारा नेलेल्या आहेत. मात्र त्यामध्ये स्पेसर्स बसवले नव्हते. दि.21/05/2012 रोजी तारांमध्ये झोळ पडल्याने एकमेकाला चिकटल्या व ठिणग्या पडल्या. तोडणीस योग्य असलेल्या ऊसाच्या पचटामध्ये ठिणग्या पडून संपूर्ण ऊस जळाला. तक ची पी.व्ही.सी. पाईपलाईनही जळाली. तहसीलदार पोलीस स्टेशन उस्मानाबाद तसेच विप क्र.2 यांना तक ने कळविले. तलाठी यांनी दि.22/05/2012 रोजी तर बेंबळी पोलिसांनी दि.08/06/2012 पंचनामा केला. विप यांनी घटनास्थळास भेट दिली नाही. ऊसाच्या पीकाचे एकूण रु.3,00,000/- चे नुकसान झाले. तक ला आर्थिक व मानसिक त्रास झाला याबद्दलचे अधिकचे रु.50,000/- असे एकूण रु.3,50,000/- देण्यास विप जबाबदार आहे. दि.30/09/2013 रोजी तक ने विप ला नोटीस पाठवून नुकसान भरपाईची मागणी केली विप ने नुकसान भरपाई न दिल्यामुळे सदरची तक्रार दि.05/05/2014 रोजी दाखल करण्यात आलेली आहे.
2. तक्रारीसोबत तक ने गट क्र.149 चा सातबारा ऊतारा, दि.30/09/2011 चे वीज बिलाची पावती, दि.26/07/2011 चे वीज बिल, दि.08/06/2012 चा पोलिस पंचनामा, दि.22/07/2012 चा तलाठी पंचनामा, दि.18/07/2013 चा विद्यूत निरीक्षकाचा अहवाल, दि.30/09/2013 चे सदरची नोटीस व पोहोच पावत्या इत्यादी कागदांच्या प्रती मंचाच्या अभिलेखावर हजर केल्या आहेत.
ब) विप ने हजर होऊन दि.11/07/2014 रोजी लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. तक ने तीन एकर क्षेत्रावर ऊसाचे पीक घेतले हे नाकबूल केले आहे. विजेच्या तारांमधून ठिणग्या पडून ऊस व पी.व्ही.सी. पाईपलाईन जळाली हे नाकबूल केले आहे. पंचनामे हे विप च्या अपरोक्ष करुन घेतल्याचे म्हंटलेले आहे. पोलिसांना 18 दिवसानंतर जळालेला ऊस दिसला हे अशक्य आहे. विप तर्फे तक च्या तक्रारीनंतर लाईनची पाहणी करण्यात आली तेव्हा लाईन अगर डि.पी. मध्ये कोणताही दोष दिसून आला नाही. विद्यूत निरीक्षकांनी एक वर्षानंतर चुकीचा दाखल दिलेला आहे. जोराच्या वादळामुळे सदरची घटना घडली असावी. विप मुळे कोणतेही नुकसान झालेले नाही. विप कोणतीही भरपाई देण्यास जबाबदार नाही सदरच्या लाईनवरुन तक ला विद्युत पुरवठा दिला नसल्यामुळे तक हा विप चा ग्राहक नाही. तक ने ऊस कारखान्यात नेल्यामुळे कोणतेही नुकसान झालेले नाही. ऊस जळीताचे प्रकरण या मंचात चालणार नाही. त्यामुळे तक्रार रद्द करण्यात यावी असे नमूद केले आहे.
क) तक ची तक्रार त्यांनी दिलेली कागदपत्रे व विप यांचे म्हणणे यांचे अवलोकन केले असता आमचे विचारार्थ खालील मुद्दे निघतात त्यांची उत्तरे आम्ही त्यांचे समोर खाली दिलेल्या कारणांसाठी लिहली आहेत.
मुद्दे उत्तर
1) विप ने सेवेत त्रुटी केली आहे काय ? होय.
2) तक अनुतोषास पात्र आहे काय ? होय.
3) आदेश कोणता? अंतिम आदेशाप्रमाणे.
ड) कारणमीमांसा
मुद्दा क्र. 1 व 2 :
1. तक चे म्हणण्याप्रमाणे बेंबळी गट क्र.349 दोन हेक्टर 50 आर. जमीनीचा तो मालक आहे. दाखल केलेला सातबारा ऊतारा त्याप्रमाणे दर्शवितो सन 2011-2012 मध्ये तक ने 3 एकर क्षेत्रात ऊस लावला असे तक चे म्हणणे आहे. सातबारा ऊता-यात ऊस पिकाची नोंद नाही. दोन हेक्टरवर मका, 2.50 हे. क्षेत्रावर सोयाबीन, 0.50 हे. क्षेत्रावर तुर अशी पिकाची नोंद आहे. तक ने ऊस पिकाची नोंद सातबारा ऊता-यात करुन घेतली नाही तसेच ऊसाच्या लागवडीची नोंद साखर कारखान्याकडे केली नाही असे दिसून येते.
2. तक चे म्हणणे आहे की त्याचे शेतातून विद्युत पुरवठा घेण्यासाठी विप ने पोल ऊभे करुन त्यावर तारा ओढल्या मात्र स्पेसर्स न बसवल्यामुळे तारांत झोळ पडला. दाखल वीज बिल असे दाखवते की 5 एच.पी. मोटर चालविण्यासाठी तक ला वीज पुरवठा दिला होता. सप्टेंबर 2011 ची वीज बिलाची मागणी केली होती.
3. तक चे म्हणणे आहे की दि.21/05/2012 रोजी तारा एकमेकांना चिकटल्याने ठिणग्या पडल्या व तोडणीस आलेला ऊसाने पेट घेतला. असे दिसत की दि.22/05/2012 रोजी तलाठी बेंबळी यांनी पंचासमक्ष गट क्र.349 या जमीनीत पंचनामा केला. पंचनाम्याप्रमाणे दि.31/05/2012 रोजी दुपारी 12.00 वा. उसाला अचानक आग लागली पंचानुमते जळालेल्या ऊसामुळे रु.70,000/- ते 80,000/- चे नुकसान झाले. तलाठयाने दि.23/05/2012 चे पत्रासोबत पंचनामा तहसिलदार यांच्याकडे पाठविल्याचे दिसते. पोलिसांनी सुमारे दोन आठवडयांनी दि.08/06/2012 रोजी पंचनामा केल्याचे दिसते. शेतातून एल.टी. लाईनचे पोल व तारा गेल्याचे नमूद आहे. पोलिस स्टेशनला नं.160/12 आकस्मात जळीत अशी नोंद झाल्याचे दिसून येते. विद्यूत निरीक्षकांनी दि.18/06/2013 चा अहवाल दि.15/05/2013 चे पत्रावरुन दिला आहे. त्याप्रमाणे तारांमध्ये झोळ पडल्याने तसेच फ्यूज वायर म्हणून जाड तारेचा वापर केल्यामुळे ठिणग्या ऊसाच्या पाचटावर पडून जळीत घडले.
4. विप तर्फे राज्य आयोगाचे निवाडे एफ.ए. /01/1369 दि.22/6/2011 तसेच एफ. ए. 1423/2000 दि.05/06/2009 या निवाडयांवर भर दिला आहे. दोन्हीमध्ये वीज कंपनीच्या सेवेत त्रुटी नसल्याचे राज्य आयोगाने म्हंटले आहे. तक तर्फे राष्ट्रीय आयोगाचा निवाडा कर्नाटक पॉवर विरुध्द मनी टॉमस दि.09/03/2006 वर भर दिलेला आहे. तेथे विद्युत कंपनीची सेवेतील त्रुटी मान्य केली आहे.
5. वर म्हंटल्याप्रमाणे तक ने ऊस लागवडीची नोंद साखर कारखान्याकडे अगर सातबारा ऊता-यावर केली नाही व त्याबद्दल कोणताही खुलासा केलेला नाही. तलाठी पंचनामा दुस-या दिवशी केला त्यात ऊसाला अचानक आग लागल्याचे म्हंटले आहे. ऊस 10 ते 12 महीन्याचा होता व 3 एकरातील ऊस जळून खाक झाला असे म्हंटले आहे. मात्र पंचनामा अवास्तव वाटतो. तक तर्फे तारेतून ठिणग्या पडून ऊस जळाला हि माहिती देण्यात आली नसावी. आकस्मात जळीताची केस तयार केली होती. दि.03/06/2012 रोजी पोलिसांमधे तारांतील ठिणग्यामुळे ऊस जळाल्याबद्दल तक ने अर्ज दिल्याचे दिसते. नुकसान रु.1,00,000/- चे झाल्याचे म्हंटले आहे. पंचनाम्यासोबत नकाशामध्ये शेतातून जाणा-या वीजेच्या तारा दाखविल्या आहेत. इलेक्ट्रीक इन्सपेक्टरने एक वर्षानंतर तक ला अनुकूल अहवाल दिला आहे.
6. शेतातून वीज तारा गेल्यामुळे व तक ला वीज पुरवठा केल्यामुळे तक हा विप चा ग्राहक होतो. तारांमध्ये ठिणग्या पडून ऊस जळाला हे आपण मानू मात्र तीन एकर ऊस होता व तो पूर्णपणे जळाला हे मान्य करता येणार नाही. शिवाय जळालेला ऊस साखर कारखान्याने स्विकारुन सुमारे 50 टक्के मोबदला देत असतो. जळालेल्या ऊसामध्ये साखरेचा अंश जास्त असतो कारण पाण्याची वाफ होऊन गेलेली असते असा ऊस तक ने कारखान्याला का घातला नाही याचा खुलासा दिलेला नाही त्याअर्थी असा ऊस कारखान्याला घातला असला पाहिजे. प्रथम पंचनाम्यामध्ये 70 ते 80 हजार रुपयाचे नुकसान दाखवले आहे. ते सुध्दा अवास्तव व तक चा फायदा करुन देण्यासाठी लिहल्याचे दिसते. आमचे मते ऊस वगैरे जळून रु.20,000/- चे नुकसान झाले असावे म्हणून मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देतो व खालीलप्रमाणे आदेश करतो.
आदेश
1) तक ची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2) विप यांनी तक याला ऊस जळीताची भरपाई म्हणून रु.20,000/- (रुपये वीस हजार फक्त) द्यावे.
3) विप यांनी वरील रकमेवर तक ला तक्रार दाखल तारखेपासून रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.9 दराने व्याज द्यावे.
4) विप यांनी तक ला या तक्रारीचा खर्च म्हणून रु.3,000/- (रुपये तीन हजार फक्त) द्यावे.
5) उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष यांनी आदेश दिल्या तारखेपासुन तीस
दिवसात करुन विप यांनी तसा अहवाल 45 दिवसात मा.मंचासमोर सादर करावा,
सदरकामी उभय पक्षकारांनी मंचात हजर रहावे. सदर आदेशाची पुर्तता विप यांनी न
केल्यास तक्रारदाराने तसा अर्ज दयावा
6) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.