Maharashtra

Sindhudurg

CC/10/31

Shri Uday narayan Khare - Complainant(s)

Versus

Assistant Engineer M.S.E.D.C Devgad - Opp.Party(s)

Shri Umesh Sawant

27 Aug 2010

ORDER

 
Complaint Case No. CC/10/31
 
1. Shri Uday narayan Khare
R/O Home No.1503,K,vareri Tal Devgad
Sindhudurg
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. Assistant Engineer M.S.E.D.C Devgad
R/O Devgad Tal Devgad
Sindhudurg
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Mr.Mahendra Goswami. PRESIDENT
  Smt. Ulka Gaokar Member
  smt vafa khan MEMBER
 
PRESENT:Shri Umesh Sawant, Advocate for the Complainant 1
 
ORDER

 

सिंधुदुर्ग जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
                                               तक्रार क्र.31/2010
                             तक्रार दाखल झाल्‍याचा दि. 12/03/2010
                                         तक्रार निकाल झाल्‍याचा दि. 27/08/2010
श्री उदय नारायण खरे
वय सु.53 वर्षे, धंदा- व्‍यापार
राहाणार घर नं.1503, क, मु.पो.वरेरी,
ता.देवगड, जिल्‍हा सिंधुदुर्ग                  ... तक्रारदार
           विरुध्‍द
सहाय्यक अभियंता,
महाराष्‍ट्र राज्‍य विद्युत वितरण कंपनी मर्यादित,
देवगड.                         ... विरुध्‍द पक्ष.
 
                                                                                 गणपूर्तीः-
                                           1) श्री. महेन्‍द्र म. गोस्‍वामी,  अध्‍यक्ष
                                                                                     2) श्रीमती उल्‍का राजेश गावकर, सदस्‍या
                                           3) श्रीमती वफा जमशीद खान, सदस्‍या.                                         
तक्रारदारतर्फे - विधिज्ञ श्री उमेश सावंत.
विरुद्धपक्षातर्फे - विधिज्ञ श्री प्रसन्‍न सावंत
                  (मंचाच्‍या निर्णयाद्वारेश्री महेंद्र म. गोस्‍वामी, अध्‍यक्ष)
नि का ल प त्र
(दि.27/08/2010)
            1)    तक्रारदाराला त्‍याच्‍या घरगुती वापराच्‍या वीज पुरवठयाची देयके जादा आल्‍यामुळे सदरचे देयक रद्द करुन मिळावे, यासाठी सदरची तक्रार दाखल करण्‍यात आली आहे. तक्रारीची थोडक्‍यात हकीगत अशी की, तक्रारदार हे विरुध्‍द पक्षाच्‍या महाराष्‍ट्र राज्‍य विद्यूत वितरण कंपनीचे ग्राहक असून त्‍यांचा ग्राहक क्रमांक 23291003770 असा आहे. विरुध्‍द पक्षाने दि.26/2/2010 रोजी विद्युत कायदा कलम 56 अन्‍वये विद्यूत देयकाची प्रचंड थकबाकी दर्शवून रु.63120/-चे नोटीस पाठविले व दि.13/3/2010 पर्यंत थकबाकी न भरल्‍यास विद्यूत पुरवठां खंडीत करण्‍यात येईल असे कळविले. सदरची नोटीस बेकायदेशीर असून तक्रारदाराने यापूर्वीचे दि.26/7/2008 ते 25/10/2008 या कालावधीतील 1825 युनिटचे देयक रु.8650/- भरणा केले आहे. तसेच दि.25/10/2008 ते 25/1/2009 या कालावधीचे देयक 1095/- युनिटचे आले होते. त्‍यानंतर 24/12/2008 पासून 24/3/2009 पर्यंत 1826 मागील रिडींग दाखवून चालू रिडिंग 1837 दर्शविणेत येऊन 11 युनिटकरीता रु.4080/- दाखवून 5320 रुपयाचे बील देण्‍यात आले. त्‍यानंतर 24/3/2009 ते 24/6/2009 या कालावधीतील रिडिंग Locked दर्शवून 189 युनिटचा वीज वापर दाखवून रु.3920/- चे वजा बील दाखवण्‍यात आले. त्‍यानंतर 24/6/2009 ते 24/9/2009 या कालावधीचे 153 युनिट वापर दाखवून रु.3650/- चे बील देण्‍यात आले. हे बील तक्रारदाराने अदा केले असून या बीलामध्‍ये रिडिंग घेतल्‍याबद्दल कोणताही फोटो दर्शविण्‍यात आलेला नाही. मात्र त्‍यानंतर दि.24/9/2009 ते 24/12/2009 या कालावधीतील वीज देयकामध्‍ये 8134 युनिट वीज वापर झाल्‍याचे दर्शवून रु.61810/- ची मागणी करण्‍यात आली. या बीलात देखील मीटरचा फोटो दर्शविण्‍यात आलेला नाही. हे बील भरण्‍याची अंतीम तारीख 29/1/2010 होती; परंतु त्‍यापूर्वीच दि.23/1/2010 रोजी तक्रारदाराने विरुध्‍द पक्षाकडे अर्ज देऊन सदरचे वीज बील चुकीच्‍या पध्‍दतीने आकारण्‍यात आले असल्‍यामुळे चौकशी करण्‍याची विनंती केली. त्‍यानंतर विरुध्‍द पक्षाने सदरचा मीटर नादुरुस्‍त असल्‍याचे घोषित करुन मीटर तपासणीसाठी शुल्‍क रु.100/- भरुन घेतले. परंतु मीटर टेस्‍टींगचा अहवाल येण्‍याची वाट न बघता विरुध्‍द पक्षाने बेकायदेशीर नोटीस पाठवून वीज पुरवठा खंडीत करण्‍याची धमकी दिल्‍यामुळे तक्रारदाराने सदरची तक्रार दाखल केली असून विरुध्‍द पक्षाने तक्रारदारास पाठविलेले दि.24/9/2009 ते 24/12/2009 या कालावधीचे रु.61810/- चे देयक रद्द करणेत यावे तसेच कलम 56 ची नोटीस रद्द करणेत यावी व मागील 6 म‍हिन्‍यातील सरासरीने विद्यूत देयक देण्‍यात यावे अशी मागणी तक्रारदाराने त्‍याच्‍या तक्रारीत केली आहे. 
      2)    तक्रारदाराने त्‍याच्‍या तक्रारीसोबत नि.4 वरील दस्‍तऐवजाच्‍या यादीनुसार वीज देयकाच्‍या झेरॉक्‍स प्रती, विरुध्‍द पक्षाने पाठविलेले दि.24/09/2009 ते 24/12/2009 चे वादग्रस्‍त बीलाची झेरॉक्‍स, विरुध्‍द पक्षाकडे केलेला आक्षेप अर्ज, मीटर टेस्‍टींगसाठी शुल्‍क भरल्‍याचे कोटेशन, विरुध्‍द पक्षाने तक्रारदारास दिलेली नोटीस प्रत इ. कागदपत्रे दाखल केली. तसेच तक्रारदाराने त्‍याचा विद्यूत पुरवठा खंडीत होऊ नये यासाठी नि.5 वर अंतरिम आदेश मिळणेसाठी अर्ज दाखल केला. सकृतदर्शनी तक्रारदाराची तक्रार दाखल होण्‍यास पात्र असल्‍याचे निदर्शनास आल्‍यामुळे मंचाने तक्रार दाखल करुन घेतली व विरुध्‍द पक्षास नोटीस पाठविण्‍याचे आदेश पारीत केले. तसेच अंतरिम अर्जाला अर्ज क्र.2/2010 क्रमांक देऊन अंतरिम अर्ज नोंदणी केला. तसेच नि.5 वर अंतरिम आदेश पारीत करुन तक्रारदाराचा विद्यूत पुरवठा पुढील आदेशापर्यंत खंडीत न करण्‍याचे आदेश पारीत केले व तक्रारदाराने वादग्रस्‍त बिलाच्‍या 50 टक्‍के रु.31560/- विज कंपनीकडे भरण्‍याचे आदेश पारीत केले. 
      3)    सदर तक्रार प्रकरणाची नोटीस विरुध्‍द पक्षास बजावण्‍यात आले. त्‍यानुसार विरुध्‍द पक्ष हे त्‍यांचे वकील प्रतिनिधीमार्फत मंचात हजर होऊन त्‍यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणणे नि.13 वर दाखल केले. तसेच नि.14 वरील पुरसीसद्वारे नि.13 वर दाखल केलेले लेखी म्‍हणणे हेच त्‍यांचे अंतरिम अर्जावरील म्‍हणणे समजावे असे स्‍पष्‍ट केले. विरुध्‍द पक्षाच्‍या वीज वितरण कंपनीने त्‍यांच्‍या लेखी म्‍हणण्‍यात तक्रारदाराचे तक्रारीवर आक्षेप घेऊन तक्रारदारास देण्‍यात आलेले वीज देयक हे तक्रारदाराच्‍या वापराप्रमाणे देण्‍यात आल्‍याचे स्‍पष्‍ट केले. तक्रारदाराने त्‍याच्‍या कर्मचा-यांमार्फत वीज देयकाबाबत तक्रार केल्‍यामुळे मीटर असलेल्‍या जागेची पाहणी करण्‍यात आली व मीटरबाबत तक्रार असल्‍यामुळे तो काढून त्‍या ठिकाणी नवीन मीटर बसविण्‍यात आला व सदरचा मीटर तपासणीकरीता कार्यकारी अभियंता चाचणी विभाग, रत्‍नागिरी यांचेकडे पाठविण्‍यात आला. त्‍यानुसार दि.17/3/2010 रोजी तपासणी अहवाल प्राप्‍त झाला असून रिपोर्टनुसार मीटर पूर्णपणे योग्‍य असल्‍याचा अहवाल दिलेला आहे व मीटरमध्‍ये कोणताही दोष नाही, असे स्‍पष्‍ट करुन तक्रारदारास दि.19/3/2010 रोजी रजिस्‍टर पोस्‍टाने सदरचा अहवाल पाठविल्‍याचे स्‍पष्‍ट केले. तक्रारदाराने जरी मीटर घरगुती वापरासाठी घेतला असला तरी तक्रारदार त्‍याचा वापर व्‍यापारी कारणासाठी करीत असल्‍याचे आढळून आले असून या मीटरवरुन 2 ए.सी, 2 कॉम्‍प्‍युटर, 11 फॅन , 33 टयुब व 1 फ्रिजचा वापर करीत आहेत. तसेच या मीटरवरुन इमारतीच्‍या बाहेर ठेवलेल्‍या मोठया डिप फ्रिजरला विद्युत पुरवठा केला असल्‍याचे नमूद केले 
त्‍याचप्रमाणे मीटर असलेली इमारत ही तक्रारदाराच्‍या ऑफिसची व कर्मचा-यांच्‍या निवासाची आहे. सदर ठिकाणी तक्रारदाराची फ्रुट कॅनिंगची फॅक्‍टरी असून सिझनल धंदा असल्‍यामुळे ठराविक महिन्‍यात विजेचा जास्‍त वापर असतो त्‍यामुळे तक्रारदार
वाणिज्‍य हेतूसाठी विजेचा वापर करीत असल्‍यामुळे त्‍याला पाठविण्‍यात आलेले वीज देयक योग्‍य असल्‍याचे नमूद करुन तक्रार नामंजूर करण्‍याची विनंती केली. 
      4)    मंचाने नि.5 वरील अंत‍रिम अर्जावर उभय पक्षाच्‍या वकीलांचे तोंडी युक्‍तीवाद ऐकून घेतले. मंचाने पारीत केलेल्‍या अंतरिम आदेशानुसार तक्रारदाराने 50 टक्‍के रक्‍कम विरुध्‍द पक्षाकडे जमा केल्‍याचे स्‍पष्‍ट करण्‍यात आले. त्‍यामुळे मंचाने तक्रारीचा निकाल लागेस्‍तोवर तक्रारदाराचा विद्युत पुरवठा खंडीत न करण्‍याचे आदेश पारीत केले व अंतरिम अर्ज क्र.2/2010 निकाली काढला. दरम्‍यान विरुध्‍द पक्षाने नि.17 वरील दस्‍तऐवजाच्‍या यादीनुसार मीटर टेस्‍टींगच्‍या अहवालाची प्रत दाखल केली. त्‍याचप्रमाणे तक्रारदाराने त्‍याचे पुराव्‍याचे शपथपत्र नि.19 वर दाखल केले तर विरुध्‍द पक्षाने उलटतपासाची प्रश्‍नावली नि.20 वर दाखल केली. तर त्‍याची उत्‍त्‍रावली तक्रारदाराने उशीराने रु.500/- कॉस्‍ट भरुन नि.26 वर दि.8/6/2010 ला दाखल केली. विरुध्‍द पक्षाने त्‍याचे पुराव्‍याचे शपथपत्र नि.28 वर दाखल केले व नि.30 वरील दस्‍तऐवजाच्‍या यादीनुसार भरारी पथक, कुडाळ यांनी दिलेले पत्र, भरारी पथकाचा तपासणी अहवाल, विद्युत देयक भरल्‍याची दिलेली नोटीस इ.कागदपत्रे दाखल केली तर तक्रारदाराने नि.33 वर प्रश्‍नावली दाखल केली. त्‍याची उत्‍तरावली विरुध्‍द पक्षाने नि. 35 वर दाखल केली. तसेच विरुध्‍द पक्षाने वीज वितरण कंपनीच्‍या उप कार्यकारी अभियंत्‍याचे शपथपत्र नि.36 वर दाखल केले व नि.38 वरील दस्‍तऐवजाच्‍या यादीनुसार Spot Inspection Report  ची प्रत, तपासणी अहवाल, वीज देयक व वीज देयकाची नोटीस इ. कागदपत्रे दाखल केली. सदर साक्षीदाराचा उलटतपास नि.42 वरील प्रश्‍नावलीने करण्‍यात आला असून त्‍याची उत्‍तरावली नि.43 वर दाखल करण्‍यात आली. तसेच विरुध्‍द पक्षाने त्‍यांचा पुरावा संपल्‍याचे पुरसीस नि.41 वर दाखल केले.
      5)    त्‍यानुसार प्रकरण उभय पक्षकारांच्‍या तोंडी युक्‍तीवादासाठी ठेवण्‍यात आले. त्‍यानुसार उभय पक्षकारांच्‍या वकीलांचे विस्‍तृत स्‍वरुपात तोंडी युक्‍तीवाद ऐकून घेतले व प्रकरण निकालासाठी ठेवले; परंतु प्रकरण निकालासाठी ठेवले असतांना विरुध्‍द पक्षाने नि.45 वर अर्ज दाखल करुन त्‍यांना काही महत्‍वाची कागदपत्रे दाखल करावयाची असल्‍यामुळे परवानगीची विनंती केली. मंचाने रु.500/- च्‍या कॉस्‍टवर अर्ज मंजूर केला व नि.46 वरील दस्‍तऐवजाच्‍या यादीनुसार कागदपत्रे दाखल करुन घेतली. त्‍यामध्‍ये तक्रारदाराचा वीज पुरवठा मागणी अर्ज, कोटेशन प्रत, तक्रारदाराचा मीटर टेस्‍टींगसाठी पाठविल्‍याचे पत्र व तक्रारदारास टेस्‍टींगचा रिपोर्ट पाठविल्‍याचा पत्राचा समावेश आहे. तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार व तक्रारीसोबत जोडलेली कागदपत्रे, विरुध्‍द पक्षाचे लेखी म्‍हणणे व त्‍यांनी दाखल केलेली कागदपत्रे व उभय पक्षकारांनी प्रकरणात दिलेला तोंडी पुरावा व केलेला युक्‍तीवाद बघता खालील मुद्दे निष्‍कर्षासाठी निघतात.
 
अ.क्र.
मुद्दे
निष्‍कर्ष
1
तक्रारदार हे विरुध्‍द पक्षाच्‍या वीज वितरण कंपनीचे ‘ग्राहक आहेत   काय ?   व सदरची तक्रार चालविण्‍याचे अधिकार ग्राहक मंचाला आहेत काय ?
होय
2
ग्राहकाला देण्‍यात येणा-या सेवेत विरुध्‍द पक्षाने त्रुटी केली आहे काय ?
होय
3
तक्रारदाराची तक्रार मंजूर होणेस पात्र आहे काय ?
होय/अंशतः
                   
                                                       
                   -का र ण मि मां सा-
    6)   मुद्दा क्रमांक 1विरुध्‍द पक्षाच्‍या वीज वितरण कंपनीने तक्रारदारास घरगुती वापराचा वीज पुरवठा दिला असल्‍यामुळे तक्रारदार हे विरुध्‍द पक्षाच्‍या वीज वितरण कंपनीचे ग्राहक ठरतात. वीज बिलाच्‍या संबंधाने उद्भवलेली सेवेतील त्रुटीची तक्रार चालविण्‍याचे अधिकार ग्राहक मंचाला आहेत. 
    7)   मुद्दा क्रमांक 2 तक्रारदारास विरुध्‍द पक्षाकडून देण्‍यात आलेले दि.24/9/2009 ते 24/12/2009 या कालावधीचे वीज देयक अवास्‍तव असल्‍याची तक्रार तक्रारदाराने केली आहे. तक्रारदाराने नि.4 वरील यादीवर दाखल केलेल्‍या वीज देयकाचे अवलोकन केल्‍यास तक्रारदारास नवीन मीटर बसविल्‍यावर पहिले बील दि.26/7/2008 ते 25/10/2008 या दरम्‍यानचे दिल्‍याचे दिसून येते. या बीलात वीज वापर मागील रिडिंग 1 युनिटपासून 1826 चालू रिडिंग दर्शविली आहे. त्‍यामध्‍ये वीज वापर 1825 युनिट दर्शविला आहे. त्‍यानंतरचे वीज बील 25/10/2008 ते 25/1/2009 पर्यंतचे असून हे वीज बील सरासरीनुसार 1095 युनिटचे देण्‍यात आले आहे व त्‍यानंतर 24/12/2008 ते 24/3/2009 या कालावधीचे देयक 11 युनिटचे देण्‍यात आले असून चालू रिडिंग 1836 व मागील रिडिंग 1826 दर्शविली आहे. त्‍यानंतर दि.24/3/2009 ते 24/6/2009 चे देयक 189 युनिटचे दिले असून हे बील सरासरीने दिले आहे. त्‍यानंतरचे देयक दि.24/6/2009 ते 24/9/2009 चे दिले असून वीज वापर 153 युनिट दर्शविले आहे व त्‍यामध्‍ये चालू रिडिंग 1990 दाखविले आहे. ही सर्व वीज देयके बघता तक्रारदाराचा 3 महिन्‍यातील जास्‍तीत जास्‍त वीज वापर 1825 युनिट एवढयापुरता मर्यादित असल्‍याचे दिसून येते. जुलै 2008 मध्‍ये तक्रारदाराला नवीन इलेक्‍ट्रॉनिक मीटर बसवून देण्‍यात आल्‍याचे दिसून येत असून तक्रारदारास 24/9/2009 ते 24/12/2009 पर्यंतचे वीज देयक एकूण 8134 युनिटचे दिल्‍याचे दिसून येत असून मागील रिडिंग 1990 व चालू रिडिंग 10124 दर्शविले आहे. तक्रारदारास दिलेले यापूर्वीचे वीज देयक बघता हे वीज देयक (नि.4/6) अवास्‍तव असल्‍यामुळे तक्रारदाराने दि.23/1/2010 ला आक्षेप अर्ज (नि.4/7) दिला व चौकशीची विनंती केली व मीटर टेस्‍टींगसाठी रु.100/- (नि.4/8) जमा केले: परंतु सदर मीटर टेस्‍टींग अहवालाची वाट न बघता वीज वितरण कंपनीने तक्रारदारास रु.63120/- भरण्‍यासाठी नोटीस (नि.4/9) दिली व वीज देयक न भरल्‍यास पुरवठा खंडीत करण्‍यात येईल असे कळविले. त्‍यामुळे ग्राहकाला देण्‍यात येणा-या सेवेत विरुध्‍द पक्षाच्‍या वीज वितरण कंपनीने त्रुटी केली आहे असे आमचे स्‍पष्‍ट मत आहे. 
      8)    मुद्दा क्रमांक 3 – i)   तक्रारदारास देण्‍यात आलेले दि.24/9/2009 ते 24/12/2009 चे वीज देयक रद्द करण्‍यात यावे, अशी विनंती तक्रारदाराने त्‍याच्‍या तक्रारीत केली आहे. त्‍यावर विरुध्‍द पक्षाने उत्‍तर देतांना आपल्‍या नि.13 वरील म्‍हणण्‍यात तक्रारदाराच्‍या मागणीवर आक्षेप घेऊन तक्रारदाराने घरगुती वापरासाठी घेतलेल्‍या मीटरचा वापर ‘व्‍यापारी’ कारणासाठी करीत असल्‍याचे नमूद केले. वादग्रस्‍त मीटरवरुन 2 ए.सी, 2 कॉम्‍प्‍युटर, 11 फॅन, 33 टयुब, 1 फ्रिज व 1 मोठा डिप फ्रिजचा वापर केला जात असल्‍याचे आक्षेप घेण्‍यात आले; परंतु तक्रारदार व्‍यापारी कारणासाठी वीज मीटरचा वापर करतो किंवा त्‍यांने व्‍यापारी कारणासाठी विजेचा वापर केला हे दाखवणारा कोणताही कागदोपत्री पुरावा विरुध्‍द पक्षाने सादर केला नाही. जर विरुध्‍द पक्षाला मीटरवरुन होणा-या अवैध वापराची माहिती होती तर त्‍यांनी त्‍यांचे अभियंत्‍यामार्फत स्‍पॉट इन्‍स्‍पेक्‍शन का करुन घेतले नाही ? व तसा अहवाल कंपनीने का घेतला नाही ? याचे कोणतेही समाधानकारक उत्‍तर विरुध्‍द पक्ष देऊ शकले नाही. विरुध्‍द पक्षाने वीजेचा अवैध वापर दर्शविण्‍यासाठी नि.38 वरील यादीवर चौकशी अहवाल व नि.36 वर उप कार्यकारी अभियंत्‍याचे शपथपत्र दाखल केले; परंतु सदरचा चौकशी अहवाल वादग्रस्‍त मीटरचा नसून अन्‍य मीटरचा आहे. त्‍यामुळे हा चौकशी अहवाल या प्रकरणात लागू होत नाही. घरगुती वापरासाठी तक्रारदाराने 8134 युनिटचा वापर केला असे विरुध्‍द पक्षाचे म्‍हणणे नाही. याउलट त्‍यांनी त्‍यांच्‍या लेखी म्‍हणण्‍यात परिच्‍छेद क्र.6 मध्‍ये तक्रारदार वर नमूद ठिकाणी राहत नाही, असे मान्‍य केले आहे. त्‍यामुळे तक्रारदार त्‍या ठिकाणी राहत नसल्‍यामुळे तेवढा जास्‍त वीज वापर होणे शक्‍य नाही, त्‍यामुळे वीज मीटर हा सदोष आहे असे म्‍हणण्‍यास वाव आहे. त्‍यामुळे तक्रारदारास देण्‍यात आलेले वादग्रस्‍त वीज देयक रद्द होण्‍यास पात्र आहे. 
      ii)         तक्रारदाराचा वीज मीटर तपासणीसाठी कार्यकारी अभियंता, रत्‍नागिरी यांचेकडे पाठविण्‍यात आला होता; परंतु सदरच्‍या टेस्‍टींग अहवालाची वाट न बघता तक्रारदारास वादग्रस्‍त नोटीस देण्‍यात आली. त्‍यामुळे तक्रारदाराने मंचासमोर दि.11/3/2010 रोजी तक्रार दाखल केली त्‍या कालावधीपर्यंत टेस्‍टींग रिपोर्ट आलेला नव्‍हता. मात्र प्रकरणाच्‍या चौकशीदरम्‍यान विरुध्‍द पक्षाने नि.17 वरील दस्‍तऐवजाच्‍या यादीनुसार टेस्‍टींग रिपोर्ट सादर केला. या रिपोर्टचे अवलोकन केल्‍यास सदरची टेस्‍टीग दि.17/3/2010 ला झाल्‍याचे दिसून येते. यामध्‍ये संदर्भाअतंर्गत Telephonic message from J.E. असे नमूद केले असून या अहवालात मीटरमध्‍ये काही त्रुटी असल्‍याचे नमूद करण्‍यात आले आहे. पण त्‍या त्रुटी Errors are within limits अशा असल्‍याचे नमूद केले आहे. सदरचा टेस्‍टींग अहवाल स्‍वीकारण्‍याजोगा नसून वीज वितरण कंपनीच्‍या जे.ई.च्‍या हस्‍तक्षेपाने अहवाल देण्‍यात आल्‍याचे दिसून येते. त्‍याचप्रमाणे एकदा मंचासमोर प्रकरण दाखल असतांना तक्रारदाराच्‍या गैरहजेरीत मीटर टेस्‍टींग करणे व मीटर टेस्‍टींगबाबतची नोटीस तक्रारदारास न पाठवणे ही कृती देखील स्‍वीकारार्ह नाही. त्‍यामुळे देखील तक्रारदाराचे वादग्रस्‍त वीज देयक रद्द होण्‍यास पात्र आहे. 
      iii)         मा.राज्‍य आयोग, पंजाब यांनी Punjab State Electricity Board V/s Karamjitsingh (2008(1) CPR 296) या प्रकरणात निर्वाळा देतांना मीटरची टेस्‍टींग ग्राहकाच्‍या उपस्थितीतच केली जावी व त्‍याला टेस्‍टींगपूर्वी नोटीस देणे अनिवार्य असल्‍याचे स्‍पष्‍ट केले आहे. त्‍याचे वर्णन खालीलप्रमाणे आहे.
      Deficiency in service – Electric meter must be tested in the M.E. Lab after giving notice to the consumer of the date, time and venue of the testing of the electric meter in the M.E. Lab and it should be tested in his presence. If it is not done, the demand raised would be illegal ”
            त्‍याचप्रमाणे मा. राष्‍ट्रीय आयोगाने Uttari Hariyana Bijalil Vitran Nigam Ltd. V/s Gautam Plastic (I ) (2008) CPJ 62 (NC) या प्रकरणात निर्वाळा देतांना मीटरची टेस्‍टींग करण्‍यापूर्वी ग्राहकाला नोटीस देणे अनिवार्य असल्‍याचे घोषित केले आहे.
      iv)        तक्रारदारास देण्‍यात आलेले वादग्रस्‍त वीज देयक वगळता त्‍यांना यापूर्वी देण्‍यात आलेले नि.4 वरील वीज देयकांचे अवलोकन केल्‍यास वादग्रस्‍त वीज देयक हे अवास्‍तव असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. त्‍यामुळे तक्रारदाराचा मीटर हा सदोष असल्‍यामुळे चुकीची रिडिंग दर्शविण्‍यात आल्‍याचे स्‍पष्‍ट होते. तक्रारदाराचा वीज वापर हा जास्‍तीत जास्‍त 1825 युनिटपर्यंतचा मर्यादित असून त्‍याला देण्‍यात आलेले 8134 युनिटचे वीज देयक निश्चितच अवास्‍तव आहे असे आमचे स्‍पष्‍ट मत आहे. त्‍यामुळे तक्रारदारास मागील 1 वर्षाच्‍या वीज वापराच्‍या सरासरीने दि.24/09/2009 ते दि.24/12/2009 या कालावधीचे वीज देयक मिळण्‍यास तक्रारदार पात्र आहेत, असे आमचे स्‍पष्‍ट मत असून, त्‍या दृष्‍टीकोनातून आम्‍ही खालील अंतीम आदेश पारीत करीत आहोत.
-अंतिम आदेश-
      1)    तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
      2)    विरुध्‍द पक्षाच्‍या वीज वितरण कंपनीने तक्रारदारास दिलेले दि.24/9/2009 ते दि.24/12/2009 या कालावधीचे रु.61810/- चे वीज बील रद्द करणेत येते. तसेच विद्युत कायदा 2003 च्‍या कलम 56 नुसार       देण्‍यात आलेले नोटीस रद्द करणेत येते.
      3)    तक्रारदारास मागील एक वर्षाच्‍या सरासरी युनिटनुसार दि.24/9/2009 ते दि.24/12/2009 या कालावधीचे वीज देयक विरुध्‍द पक्षाच्‍या वीज वितरण कंपनीने देण्‍याचे आदेश पारीत करण्‍यात येतात.
      4)    सदरचे वीज देयक प्राप्‍त झालेवर 30 दिवसांच्‍या आत वीज देयकाचा भरणा तक्रारदाराने करण्‍याचे आदेश पारीत करणेत येतात.
      5)    ग्राहकाला देण्‍यात येणा-या सेवेत त्रुटी केल्‍याबद्दल व तक्रारदारास मानसिक व शारीरिक त्रास दिल्‍याबद्दल व प्रकरण खर्चाबद्दल एकत्रितपणे रु.3000/- (रुपये तीन हजार मात्र) विरुध्‍द पक्षाने तक्रारदारास देण्‍याचे आदेश पारीत करणेत येतात.
      6)    तक्रारदाराने मंचाचे आदेशानुसार Under Protest म्‍हणून भरलेली रक्‍कम रु.31560/-(रुपये एकतीस हजार पाचशे साठ मात्र) विरुध्‍द पक्षाने तक्रारदारास परत करण्‍याचे आदेश पारीत करणेत येतात.
      7)    उपरोक्‍त आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्‍तीच्‍या 30 दिवसांच्‍या आत करणेत यावी.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः  27/08/2010
 
 
 
      सही/-                           सही/-                      सही/-
(उल्‍का गावकर)                 (महेन्‍द्र म.गोस्‍वामी)                   ( वफा खान)
सदस्‍या,                        अध्‍यक्ष,                      सदस्‍या,
जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
 
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्‍टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्‍टाने रवाना दि.
Ars/-
 
 
[HON'ABLE MR. Mr.Mahendra Goswami.]
PRESIDENT
 
[ Smt. Ulka Gaokar]
Member
 
[ smt vafa khan]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.