ग्राहक तक्रार क्र. 165/2012
अर्ज दाखल तारीख : 10/07/2012
अर्ज निकाल तारीख: 11/09/2014
कालावधी: 02 वर्षे 02 महिने 02 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1) युवराज भागवत आंधळे,
वय-36 वर्षे, धंदा – शेती व व्यापार,
रा.तेर, ता.जि. उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1) कनिष्ठ अभियंता,
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं.लि. सब डिव्हीजन ऑफीस तेर,
ता.जि.उस्मानाबाद.
2) कार्यकारी अभियंता,
म.रा.वि.वि. कं. उस्मानाबाद, ता.जि.उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
२) मा.श्री.एम.बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.एस.यु.मुळे.
विरुध्द पक्षकार तर्फे विधीज्ञ : श्री.व्ही.बी.देशमुख.
निकालपत्र
मा.सदस्य, श्री.मुकुंद बी. सस्ते यांचे व्दारा :
1) तक्रारदाराच्या तक्रारी अर्जाचे थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे :
तक्रारदार हे मौजे तेर ता. जि. उस्मानाबाद येथील रहीवाशी असून अर्जदार यांची ग.क्र.847 मध्ये विदयूत पुरवठा घेतला आहे. मे. तहसीलदार साहेब उस्मानाबाद यांच्या कडील संचिका क्र.2011/जमा-02/कवि प्रमाणे दि.21/05/2011 रोजी अर्जदाराच्या मालकी व कब्जेवहिवाटीच्या जमीन गट नं.875 व 786 या जमीनीत पाईपलाईन करण्यास परवानगी दिलेली आहे. त्यानंतर अर्जदाराने जमीन गट क्र.785 व 786 मध्ये पाईप लाईन केली आहे. गट क्र. 847 मध्ये बोअर असून त्यावर 5 एच.पी. चे विदयुत कनेक्शन शेतीसाठी विपकडून घेतलेले आहे परंतु सदर बोअरचे पाणी कमी झाल्यानंतर अर्जदाराने विपकडे रितसर अर्ज देवून जमीन गट क्र.847 मधील सदर विदयुत कनेक्शन जमीन गट क्र.785 व 786 मध्ये ट्रान्स्फर करण्याची विनंती केली त्यासाठी मागील थकबाकी रु.3,726/- भरुन घेतली व विदयुत पुरवठा हस्तांतरीत करण्यासाठी दिलेले बिल रु.645 दि.05/08/2011 रोजी पावती क्र.0194063 प्रमाणे ट्रान्सफर चार्जेस विपकडे भरले. आवश्यक ती सर्व कागदपत्राची पुर्तता केली. दि.16/12/2011 रोजी विपकडे जावून चौकशी केली असता विपने तुम्हास कनेक्शन देता येत नाही असे सांगितले व अर्जदारासोबत आरेरावीचे भाषा केली. म्हणून तक्रारदाराने दि.10/01/2012 रोजी वकीलामार्फत रजि. पोस्टाने नोटीस पाठविली असता दि.01/02/2012 रोजी चुकीचे उत्तर दिले. म्हणून विपने सेवेत त्रुटी केली असल्याने तक्रारदारास सदरची तक्रार दाखल करावी लागली. विपने सदर कनेक्शन हस्तांतरीत करून मिळावे. शेतातील उत्पन्नाचे झालेले नुकसान रु.1,00,000/- व पाईपलाईनसाठी झालेला खर्च रु.50,000/-, झालेल्या आर्थिक, मानसिक, शारीरिक त्रासापोटी रु.40,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.10,000/- मिळण्याचा आदेश व्हावा अशी विनंती केली आहे.
तक्रारदाराने तक्रारीसोबत लाईट बिल, मंजूरीचे पत्र व त्याचे इस्टीमेंट, पोचपावती, विजबील, बिलपावती, पाईपलाईन खोदकाम कलेलेली पावती, परवानगी मंजुरीच्या आदेशाची नक्कल, करारनामा, करारनामा इत्यादींच्या प्रती मंचाच्या अभिलेखावर दाखल केलेल्या आहेत.
2) सदर प्रकरणात मंचामार्फत विरुध्द पक्षकार यांना नोटीस मिळाल्यानंतर त्यांनी दि.13/09/2013 रोजी आपले म्हणणे दाखल केलेले असून ते पुढीलप्रमाणे.
तक्रारदाराने गट क्र.847 मधील असलेल्या बोअरचे पाणी कमी झाल्यामुळे गट क्र.785 व 786 मध्ये कनेक्शन बदलून मिळण्याची विनंती केली होती व त्यापोटी थकबाकी रु.3726/- भरुन घेतली व सदरचा विदयूत पुरवठा स्थलांतर करण्याचे चार्जेस भरुन घतले होते हे मान्य आहे. तक्रारदाराने सर्व कागदपत्रांची पुर्तता केलेली नाही. तक्रारदाराने विप क्र.1 यांना गावठाण डि.पी. वर शेती पंपासाठी विज जोडणी देता येत नाही असे तोंडी हुज्जत घातली व रस्ता अडवून घरला. सदर घटनेची पो.स्टे. ढोकी येथे फिर्याद क्र.173/11 पडलेला आहे. सदर तक्रार त्रुटी केल्याबाबत नसून ती ग्राहक संरक्षण कायदयाचे कलम 2 च्या व्याख्येत बसत नसल्यामुळे ती मे. कोर्टात चालू शकत नाही. म्हणून खर्चासह नामंजूर करुन तक्रारदारास दंड करण्यात यावा असे नमूद केले आहे.
3) तक्रारदाराची तक्रार, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, गैरतक्रारदार यांचे म्हणणे, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, उभयतांचा लेखी युक्तीवाद इत्यादींचा विचार करता आम्ही निष्कर्षासाठी खालील मुद्ये उपस्थित करीत आहोत. त्यांचे निष्कर्ष खाली दिलेल्या कारणांसाठी देतो.
मुद्ये निष्कर्ष
1) विरुध्द पक्षकार यांनी सेवेत त्रुटी केली आहे काय ? होय.
2) तक्रारदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे काय ? नाही.
3) काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
निष्कर्षाचे विवेचन
4) मुद्या क्र.1 व 2 चे उत्तर:
तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार व दाखल केलेली सर्व कागदपत्रांची पडताळणी करुन असे लक्षात येते की तक्रारदाराने विपकडे कनेक्शन ट्रान्सफर चार्जेस यांच्याकडे भरुन देखील विपने वीजेची कनेक्शन हस्तांतरीत करुन दिलेले नाही म्हणुन तक्रारदाराच्या उत्पन्नात झालेली नुकसान भरपाई मिळावी म्हणून सदरची तक्रार दाखल झालेली आहे. या संदर्भात विपचे म्हणणे पाहीले असता तक्रारदाराची जमीन गट क्र.847 मधील बरेच पाणी कमी झाल्यामुळे गट क्र.785 व 786 मध्ये कनेक्शन बदलून मिळण्याची विनंती केली हया बाबी विपने मान्य केल्या. तक्रारदाराकडून विपने रु.3,726/- रुपये भरुन घेतले ही बाबही मान्य केली तथापि सर्व कागदपत्रांची पुर्तता केल्याचे मान्य केले नाही. म्हणुन उलट विप क्र.1 शी तक्रारदाराने वाद केल्यामुळे फिर्याद क्र.173/11 नुसार विपने पोलीस स्टेशनला तक्रार केल्याचे नमुद केलेले आहे. तक्रार दाखल केल्या नंतर पुढील कोणतीही कार्यवाही वेगाने केल्याचे आढळून येत नाही. तक्रारदाराने दि.13/09/2013 रोजी दाखल केलेल्या युक्तिवादा नुसार तक्रारदाराला गावठाण डीपीवरुन कनेक्शन दिलेले नाही व उलट दुस-या व्यक्तींना गावठाण डिपीवरुन कनेक्शन दिल्याने विपने तक्रारदारास सेवा देण्यात त्रुटी केली आहे असे नमूद केले आहे. त्यामुळे या अनुषंगाने झालेले नुकसानीला विपस जबाबदार धरले आहे. परंतु या संदर्भात कोणतेही स्पष्ट पुरावे रेकॉडवर दाखल केलेले नाहीत. त्यामुळे नुकसान भरपाईबाबत या न्याय मंचास कोणतेही आदेश करणे शक्य नाही. तथापि याच डिपी वरुन तक्रारदारास कनेक्शन का देता येणे शक्य नाही या बाबत विपने समाधानकारक खूलासा केलेला नाही. त्यामुळे जर नियमानुसार तक्रारदाराने ट्रान्सफर फिस भरलेली असल्यामुळे त्याला गावठाण डिपीवरुन तांत्रीक बाधा येत नसल्यास कनेक्शन का देण्यात येवू नये. म्हणून मुद्या क्र.1 व 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देतो व खालीलप्रमाणे आदेश करतो.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते.
2) विरुध्द पक्षकार यांनी तक्रादार यांना गावठाण डिपीवरुन अगर नियमाप्रमाणे दुस-या
डीपीवरुन कनेक्शन देण्यात यावे.
3) विरुध्द पक्षकार यांनी वरील आदेशाची पुर्तता सहीशीक्याची नक्कल मिळाल्यापासून
येत्या 30 दिवसात करावी.
4) विप यांनी वरील आदेशाची पुर्तता करुन 45 दिवसात तसा अहवाल मंचात सदर
करावा. सदरबाबत उभय पक्षकारांनी मंचात उपस्थित रहावे.
5) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री.एम.व्ही.कुलकर्णी) (श्री.मुकूंद.बी.सस्ते)
अध्यक्ष सदस्य
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.