जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच लातूर यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक – 29/2012 तक्रार दाखल तारीख – 18/02/2012
निकाल तारीख - 14/05/2015
कालावधी - 03 वर्ष , 02 म. 26 दिवस.
- शांताबाई संभाजी इंगळे,
वय – सज्ञान, धंदा – शेती व घरकाम
- रमेश संभाजी इंगळे,
वय – सज्ञान, धंदा – शेती
- आनंत संभाजी इंगळे,
वय – सज्ञान, धंदा – शेती
- दिलीप संभाजी इंगळे,
वय – सज्ञान, धंदा – शेती
सर्व रा. सरवाडी ता. निलंगा,
जि. लातुर. ....अर्जदार
विरुध्द
मा. सहाय्यक अभियंता,
महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कं. लि.,
विभागीय कार्यालय, निलंगा,
ता. निलंगा, जि. लातुर. ..गैरअर्जदार
को र म - श्रीमती ए.जी.सातपुते, अध्यक्षा.
श्री अजय भोसरेकर, सदस्य
श्रीमती रेखा जाधव, सदस्या.
तक्रारदारातर्फे :- अॅड. ए.डी.पाटील.
गैरअर्जदारातर्फे :- अॅड. एस.एन.शिंदे.
निकालपत्र
(घोषितव्दारा - श्रीमती ए.जी.सातपुते, मा.अध्यक्षा )
अर्जदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे.
अर्जदइार क्र. 1 ही अर्जदार क्र. 2 ते 4 यांची आई आहे. अर्जदाराने मौजे सरवाडी येथील जमीन गट क्र. 125 मध्ये विहीर पाडली असून त्यावर गैरअर्जदार यांच्याकडे रितसर डिमांड भरुन शेतीसाठी विदयुत जोडणी करुन घेतली आहे. त्यावर रितसर मीटर बसवले आहे ज्याचा ग्राहक क्र. 614710008815 असा आहे. अर्जदाराने गट नं. 125/क मध्ये 00 हे. 74 आर जमीनीवर नोव्हेंबर - 2008 मध्ये ऊसाची लागवड केली होती. अर्जदाराच्या शेताच्या बांधावर ऊसाच्या कडेला गैरअर्जदारा मार्फत विदयुत डि.पी बसविण्यात आला होता. तसेच ऊसामधुन विजेच्या तारा व पोल गेलेल्या आहेत. सदरील तारा लुज पडलेल्या होत्या त्यामुळे डि. पी मध्ये व पोलवरील तारावर सतत स्पार्कींग होत होती ते थांबविण्यासाठी वेळोवेळी अर्जदाराने गैरअर्जदाराला विनंती केली. दि 13/04/2010 रोजी दुपारी 4.00 वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्कीटमुळे अर्जदाराच्या ऊसाला आग लागली आणि त्या आगीमध्ये संपुर्ण ऊस जळून खाक झाला. याबाबतची माहिती अर्जदाराने तहसीलदार निलंगा, पोलीस निरीक्षक कासार शिरसी आणि गैरअर्जदारास याची कल्पना दिली. त्यामुळे मंडळ अधिकारी मदनसुरी यांनी दि. 15/04/2010 रोजी जायमेाक्यावर जावून ऊस जळाल्या बाबतचा पंचनामा केला. गैरअर्जदाराच्या निष्काळजीपणामुळे अर्जदाराचे रु. 2,50,000/- ऊस जळाला. म्हणून गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रुटी केली आहे. म्हणून गैरअर्जदाराने अर्जदारास रु. 2,50,000/- दयावेत. तसेच पुढील भविष्यातील पिकाचे रु. 2,00,000/- नुकसान झाले व मानसिक त्रासापोटी रु. 30,000/- दाव्याचा खर्च रु. 5,000/- 18 टक्के व्याजाने दयावेत.
तक्रारदाराने तक्रारी सोबत लाईट बील, लाईट बील पावती, अर्ज (तहसील कार्यालय), अर्ज (म.रा.वि.वि कं), पंचनामा (महसुल विभाग), नोटीसची प्रत, रजिस्ट्रीची पावती, यु.पी.सी.पावती, पोहच पावती, 7/12 उतारा, लाईट बील प्रत इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
गैरअर्जदाराच्या म्हणण्यानुसार अर्जदाराचे ऊसाचे नुकसान हे गैरअर्जदाराच्या निष्काळजीपणामुळे झालेले नाही. तसेच अर्जदाराने त्याच्या शेतात विहीर पाडली होती व गट क्र. 125 मध्ये 74 आर मध्ये ऊस लावला होती ही बाब सिध्द करावी. सदर डि. पी त्यांच्या शेतामध्ये होता ही बाब देखील सिध्द करावी. अर्जदाराचे ऊस जळीतामुळे काही नुकसान झालेले नाही व अर्जदार हा खोटे कागदपत्र गोळा करुन ऊस जळाल्याचे सांगत आहे. म्हणून अर्जदाराची तक्रारी फेटाळण्यात यावी.
मुद्दे उत्तरे
- अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय
- गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केली आहे काय ? होय
- अर्जदार अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? होय
- काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
मुद्दा क्र. 1 चे उत्तर होय असून अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे. व त्याच्या शेतात गैरअर्जदारानी मीटर बसवलेले आहे. त्याचा ग्राहक क्र. 614710008815 असा आहे. त्यामुळे सदरच्या घटनेमुळे अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक होतो हे सिध्द होते. मुद्दा क्र. 2 चे उत्तर होय असून अर्जदाराचे ऊस जळीतामुळे नुकसान झालेले आहे त्याने गट क्र. 125/क मध्ये ऊस 60 आर जमीनीत लावलेले आहे असे त्याच्या 7/12 वरुन दिसुन येते. सदर 7/12 नुसार अर्जदार क्र. 1 ते 4 हे गैरअर्जदाराचे ग्राहक असलेले दिसुन येतात अर्जदाराने तहसीलदाराला सदर घटनेबाबत सांगितले आहे. पंचनामा दि. 15/04/2010 रोजी केलेला आहे. त्या पंचनाम्यानुसार दि. 15/04/2010 चे पत्र व ऊस जळाल्या बाबतचा अर्ज आम्हा पंचाना वाचून दाखवला. अर्जदाराने त्यांची जमीन सर्वे नं. 13 क्षे 00 हे 74 आर मध्ये नोव्हेंबर - 2008 मध्ये ऊसाची लागवड केली आहे. सदरील ऊसाचे दक्षिण बांधावर लाईटची डि. पी आहे, ऊत्तर बाजूस मेन लाईनचे खांब आहे. दुपारी 4.00 वाजण्याच्या सुमारास आवाज झाला खांबावरुन ठिणग्या पडुन आग लागली व लाईट बंद झाली. जवळचे शेतकरी आग विझवण्यासाठी आले. परंतु वाळलेली पाचट असल्यामुळे, पाणी नसल्यामुळे व आग विझवता आली नाही. 74 आर ऊस जळाला आहे. अर्जदारास 70 टन ऊसाचे उत्पादन झाले असते त्या जळालेल्या ऊसाचे रु. 1,62,000/- चे नुकसान झाले आहे. सदर पंचनाम्यानुसार 74 आर जमीनीत ऊस लावलेला पंच सांगत आहेत तर शेताचा 7/12 हा 60 आर क्षेत्रामध्ये ऊस लावल्याचे सांगत आहेत. तसेच विदयुत निरीक्षकाचा अहवाल दि. 15/02/2013 रोजी आलेला असून त्यानुसार दि. 13/04/10 रोजी सरवाडी येथील गट नं. 1 सर्वे नं. 125 श्रीमती शांताबाई संभाजी इंगळे यांच्या शेताच्या बाजूच्या 11 के. व्ही. मदनसुरी फीडर वरिल 11 कट पॉंईंट विदयुत प्रवाहीत जंम्पर तुटुन लोखंडी चॅनलवर पडले. त्यामुळे प्रचंड ठिणग्या झाल्या व त्या ठिणग्या ऊसात पडल्या व ऊसास आग लागली व ऊस जळाला. अर्जदाराच्या ऊसाच्या जळीताचे फोटो न्यायमंचात दाखल असून ऊस हा पुर्णपणे जळालेला आहे. व अर्जदाराने 2009-10 या काळातील ऊसाच्या दराचे दि. 17/12/14 रोजीचे प्रमाणपत्र दिले आहे. त्यानुसार 2009-10 हंगामात रु. 2200/- भाव दिसुन येतो. तहसीलदाराच्या पंचनाम्यानुसार व फोटोनुसार इतर कागदोपत्री पुराव्यानुसार अर्जदाराचा ऊस जळाला हे निष्पन्न होत असल्यामुळे अर्जदाराचा 7/12 वर 60 आर चा भाव रु. 2,000/- धरुन अर्जदारास 60 टन ऊसास रु. 1,20,000/- उत्पन्न झाले असते. त्यानुसार हे न्यायमंच अर्जदाराचा अर्ज मंजुर करत असून, त्यास रु. 1,20,000/- गैरअर्जदाराने 30 दिवसाच्या आत दयावेत. तसेच मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु. 4,000/- दाव्याचा खर्च रु. 2,000/- देण्यात यावा.
सबब हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.
आदेश
1) अर्जदारांची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
2) गैरअर्जदार यांना आदेश देण्यात येतो की, अर्जदार क्र. 1 ते 4 यांना रक्कम रु.
1,20,000/-(अक्षरी एक लाख वीस हजार रुपये फक्त) आदेशाची प्रत प्राप्तीपासुन 30
दिवसाच्या आत देण्यात यावेत.
3) गैरअर्जदार यांना आदेश देण्यात येतो की, आदेश क्र. 2 चे पालन मुदतीत न
केल्यास तक्रार दाखल तारखेपासुन त्यावर द.सा.द.शे. 9 टक्के व्याज
देण्यास जबाबदार राहतील.
4) गैरअर्जदार यांना आदेश देण्यात येतो की, अर्जदार क्र. 1 ते 4 यांना मानसीक व
शारिरीक त्रासापोटी रु. 4,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु. 2,000/- आदेशाची प्रत
प्राप्तीपासुन 30 दिवसाच्या आत देण्यात यावेत.
(श्री.अजय भोसरेकर) (श्रीमती ए.जी.सातपुते) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्षा सदस्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, लातूर.