1 अर्जदाराने सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे. 2 अर्जदाराचे वडील श्री दादाजी पांडुरंग शास्ञकार यांनी शेतीचे मोटारपंपा करीता विज कनेक्शन गैरअर्जदाराकडून मागणी केली. श्री दादाजी पांडुरंग शास्ञकार यांचा दि.20.1.11 रोजी मृत्यु झाला व अर्जदार हे वारस आहेत. अर्जदाराचे वडीलांनी शेती पंपाकरीता विज कनेक्शन मिळण्याकरीता जानेवारी 2010 ला अर्ज दिला. गैरअर्जदाराकडून दि.22..6.2010 रोजी डिमांड मिळाला, दि.2.7.2010 ला रक्कम रुपये 5550/- पावती क्र.9381123 अन्वये भरले. अर्जदार यांनी वडीलाचे मृत्युनंतर वारस म्हणून सदर शेतीवर आपले नांव सुध्दा 7/12 यावर चढविले. त्यामुळे, अर्जदाराने, गैरअर्जदारास दि.5.3.2011 ला लेखी पञ दिले. यावर, गैरअर्जदाराने दि.26.4.2011 ला अर्जदाराला दिलेल्या माहितीनुसार गैरअर्जदार यांनी विज कनेक्शन लावून देण्यास जाणीवपूर्वक विलंब लावला आहे. कारण, सी.नं.217 सुरेश खाटीक यास अवघ्या तीन महिण्यात विज कनेक्शन गैरअर्जदार यांनी लावून दिला आहे. अर्जदार यांनी पुन्हा दि.11.5.2011 रोजी गैरअर्जदारास पञ देवून विज कनेक्शन लावून देण्याची विनंती केली. गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे लेखी पञाला कसलीही दाद दिली नाही. अर्जदाराचे शेती पिकाचे सन 2010 व सन 2011 या कालावधीचे पिकाचे नुकसान केले आहे व अर्जदारास शारीरीक व मानसिक ञास देत आहेत. त्यामुळे, गैरअर्जदार यांनी, अर्जदाराचा विजपुरवठा तातडीने सुरु करुन देण्याचे आदेश व्हावे. अर्जदारास शारीरीक व मानसिक ञासापोटी रुपये 75,000/- व तक्रार खर्चापोटी रुपये 10,000/- देण्याचे आदेश व्हावे, अशी मागणी केली आहे. 3 अर्जदाराने नि.क्र. 5 नुसार 10 दस्ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन, गैरअर्जदारास नोटीस काढण्यात आला. गैरअर्जदार हजर होऊन नि.क्र.13 नुसार लेखी उत्तर व नि.क्र. 14 नुसार 1 झेरॉक्स दस्ताऐवज दाखल केले.
4 गैरअर्जदाराने लेखी बयाणात नमूद केले की, अर्जदाराचे हे म्हणणे नाकबुल की, अर्जदाराचे वडील श्री दादाजी पांडुरंग शास्ञकार यांनी शेतीचे मोटारपंपाकरीता विज कनेक्शनची गैरअर्जदाराकडून मागणी केली. हे म्हणणे कबुल की, श्री दादाजी पांडुरंग शास्ञकार यांचा दि.20.1.2011 रोजी मृत्यु झाला. हे म्हणणे नाकबुल की, अर्जदार हे वारस आहेत. अर्जदाराचे हे म्हणणे खोटे म्हणून नाकबुल की, अर्जदाराचे वडिलांनी शेती पंपाकरीता गैरअर्जदाराकडून विज कनेक्शन मिळण्याकरीता जानेवारी 2010 ला अर्ज दिला, गैरअर्जदाराकडून दि.22.6.2010 रोजी डिमांड मिळाला, दि.2.7.2010 ला रक्कम 5550/- पावती क्र.9381123 अन्वये भरले आहे. हे म्हणणे नाकबुल की, अर्जदार यांनी वारस म्हणून सदर शेतीवर आपले नांव सुध्दा 7/12 वर चढविले. हे म्हणणे नाकबुल की, सदर शेतीवर विज कनेक्शन लावून मिळणे आवश्यक असल्याने अर्जदाराने गैरअर्जदारास दि.5.3.2011 ला लेखी पञ दिला. हे म्हणणे खोटे म्हणून नाकबुल की, गैरअर्जदार यांनी दि.26.4.2011 ला अर्जदाराला दिलेल्या माहितीनुसार अर्जदारास विज कनेक्शन लावून देण्यास जाणीवपूर्वक विलंब लावला. हे म्हणणे चुकीचे असून नाकबुल की, सी.नं.217 सुरेश खाटीक यास अवघ्या तीन महिण्यात विज कनेक्शन गैरअर्जदार यांनी लावून दिले आहे. अर्जदाराने केलेली मागणी ही खोट्या कथनाच्या आधारावर असून, ती पूर्णतः खोटी आहे. अर्जदाराला सदरची तक्रार दाखल करण्यांस कसलेही कारण उरले नाही, म्हणून अर्जदाराने केलेली मागणी खारीज होण्यांस पाञ आहे.
5 गैरअर्जदाराने लेखी बयानातील विशेष कथनात नमूद केले की, तक्रारकर्ता श्री सतिश दादाजी शास्ञकार यांचे वडील श्री दादाजी पांडुरंग शास्ञकार यांनी गैरअर्जदाराकडे कृषी पंप विज पुरवठ्यासाठी अर्ज केला होता. परंतु, अर्जदाराचे वडील दि.20.1.2011 रोजी मरण पावले. त्यापूर्वी मृत वडीलांचे नांवे दि.2.7.2010 रोजी डिमांड रुपये 5550/- भरले होते. चाचणीपञ अर्जदाराचे वडीलांचे नांवे होते. गैरअर्जदाराचे कार्यालयातर्फे वारसदारांचे नावांने सात-बारा पञक व चाचणी पञात बदल करण्यास अर्जदारास सांगितले होते. परंतु, अर्जदाराकडून आवश्यक बदलाच्या कागदपञात पुर्तता करण्यांत आली नाही. दि.7.3.2010 चे चाचणीपञाप्रमाणे अर्जदाराचे वडिलांची क्रमवारी डिसेंबर 2010 नुसार 163 क्रमांकावर आहे. गैरअर्जदार कंपनीच्या उद्दीष्टाप्रमाणे सदर ग्राहकाचे क्रमवारी चाचणी अहवालानुसार मार्च 2010 नंतरचे असल्यामुळे त्यांचा क्रमांक वर्ष 2011-12 मध्ये लागतो. अर्जदारास विद्युत पुरवठा करण्याकरीता 25 केव्हीए चा ट्रान्सफार्मर 15 पोल, 11 केव्ही लाईन व लघुवाहीन 0.12 कि.मी.प्रस्तावीत आहे.सदर कामाची पुर्ततेकरीता गैरअर्जदार कंपनीचे अंदाजपञकाप्रमाणे 7.5 लाख रुपयाचा खर्च आहे. श्री सुरेश खाटीक, राह.नेरी यांना विद्युत पुरवठा लवकर मिळण्यामागे कारण असे की, त्यांना फक्त 0.3 के.लघुवाहीनी लागली. सुरेश खाटीक यांनी डिमांड दि.15.1.09 रोजी व चाचणीपञ दि.16.1.09 रोजी भरल्यामुळे गैरअर्जदार कंपनीचे मार्च 2009 च्या उद्दीष्टपूर्तीमध्ये त्याचा क्रमांक लागल्यामुळे व त्याकरीता फक्त रुपये 60,000/- खर्च करावा लागला. अर्जदाराचे वडील यांचा क्रमवारीनुसार सप्टेंबर 2010 ची कामे पूर्ण करण्यासाठी टर्न की एजन्सी मे.श्री कालेश्वरवार, नागपूर यांना कृषी पंप जोडणी टेंडरनुसार यादी सादर केली आहे. अर्जदाराचे काम ताबडतोब सुरु करण्याकरीता एजन्सीला सुचना दिलेल्या आहे. गैरअर्जदार कंपनीतर्फे अर्जदार यांना कुठलाही ञास दिला नसून त्यांच्या कामाकरीता इन्फ्रास्ट्राक्चर तयार करण्यामध्ये वेळ लागेल अशा सुचना अर्जदारास कार्यालयीन भेटीमध्ये वेळोवेळी देण्यांत आलेल्या आहे. त्यामुळे,अर्जदाराचे मागणीनुसार नुकसान भरपाई रुपये 75,000/- देण्यासाठी गैरअर्जदार कंपनीतर्फे हेतुपुरस्पर चुक झालेली नाही. अर्जदारास तक्रार खारीज होण्यास पाञ आहे. 6 अर्जदाराने तक्रारीच्या कथना पृष्ठार्थ नि. 16 नुसार पुरावा शपथपञ दाखल केले. गैरअर्जदाराने लेखी बयानाला पुरावा शपथपञ समजण्यात यावा अशी पुरसीस नि. 17 नुसार दाखल केली. गैरअर्जदाराने लेखी बयानासोबत नि 14 नुसार 1 दस्तऐवज दाखल केला. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले दस्ताऐवज आणि अर्जदार व गैरअर्जदार यांच्या वकिलांनी केलेल्या युक्तीवादावरुन खालील कारणे व निष्कर्ष निघतात. // कारणे व निष्कर्ष// 7 अर्जदार यांनी सदरची तक्रार म़ृतक दादाजी पाडूंरंग शास्ञकार याचा वारसदार म्हणून दाखल केले आहे. मृतक दादाजी शास्ञकार यांनी शेती पंपाकरिता विद्युत पुरवठा मिळण्यासाठी जाने. 2010 ला गैरअर्जदाराकडे अर्ज केला होता. गैरअर्जदाराकडून दि. 22/6/2010 ला डिमांड देण्यात आली. त्या डिमांडची रक्कम मृतकाने दि. 2/7/2010 ला रु. 5,550/- पावती क्रं. 9381123 प्रमाणे भरणा केला आणि लगेच टेस्ट रिपोर्ट गैरअर्जदाराला सादर केले. मृतकाने डिमांडची रक्कम भरुनही गैरअर्जदार यांनी शेती करीता विद्युत पुरवठा त्यांचे हयातीत (जिवंतपणी) जोडून दिला नाही. अर्जदाराच्या वडीलांचा मृत्यु विद्युत पुरवठा जोडून मिळण्याचे पूर्वी दि. 20/1/2011 रोजी झाला. गैरअर्जदार यांनी लेखीउत्तरात असा आक्षेप घेतला आहे की, अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक नाही. अर्जदाराने वारस प्रमाणपञ किंवा मृत्यपञ दाखल केलेले नाही. परंतु गैरअर्जदार यांनी असे मान्य केले आहे की, सतिश दादाजी शास्ञकार यांचे वडील श्री. दादाजी पाडूंरंग शास्ञकार यांनी कृषीपंप विज पुरवठयासाठी अर्ज केला होता, त्यांनी मृत्युचे पूर्वी 2/7/2010 ला रु.5,550/- भरले चाचणीपञ अर्जदाराच्या वडीलांचे नावे होते. अर्जदार यांनी तक्रारीसोबत अ-2 वर 7/12 उताराची प्रत दाखल केली आहे. सदर दस्ताचे अवलोकन केले असता भूमापन क्र. 32 आराजी 1.48 मौजा वाघेडा येथील शेत जमिनीवर अर्जदाराचे नावाने फेरफार क्र. 32 दि. 30/7/2010 ला झालेली आहे. सदर राजस्व विभागाच्या फेरफार नोंदणीनुसार अर्जदाराचे नाव मृतक दादाजी पाडूरंग शास्ञकार यांचे नावाने असलेल्या शेतीवर नोंद झालेली आहे. यावरुन अर्जदार हा मृतकाचा वारसदार असल्याचे सिध्द होतो. त्यामुळे गैरअर्जदार यांनी ग्राहक नसल्याचा उपस्थित केलेला मुद्दा न्यायोचित नाही. 8 गैरअर्जदार यांनी लेखीबयानात मृतक दादाजी शास्ञकार यांनी डिमांड भरुन चाचणी पञ दि. 2/7/2010 ला सादर केले हे मान्य केले आहे. दादाजी शास्ञकार यांचा मृत्यु डिमांड भरल्यानंतर जवळपास सहा महिन्यानंतर झालेला आहे. मृतकाने विद्युत पुरवठा करीता रकमेचा भरणार केला असल्यामुळे तो गैरअर्जदाराचा ग्राहक होता. आणि त्यानंतर त्याचा मृत्यु झालेला आहे. त्यामुळे त्याचे वारसदाराला तक्रार दाखल करण्याचा अधिकार आहे असे ग्राहक सरंक्षण कायदयात तरतुद आहे. अर्जदाराने दाखल केलेल्या 7/12 नुसार वारसदार नोंद झाली असल्याने अर्जदार, हा लाभधारक असुन ग्राहक संरंक्षण कायदयाच्या कलम 2(1)(b)(v) नुसार अर्जदार मृतकाचा वारसदार असल्याने तक्रार दाखल करण्याचा अधिकार त्याला आहे. आणि म्हणूच तो लाभधारक असल्याने गैरअअर्जदाराचा ग्राहक होतो. त्यामुळे गैरअर्जदार यांनी ग्राहक नसल्याचा उपस्थित केलेला मुद्दा ग्राहय धरण्यास पाञ नाही. या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आले आहे. 9 गैरअर्जदार यांचे वकीलांनी काही वरिष्ठ न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर केले. सदर न्यायनिर्णयातील बाब या प्रकरणाला लागू पडत नाही. मा. केरला राज्य ग्राहक निवारण आयोग यांनी असिस्टन्ट एक्झीक्युटिव्ह इंजिनियर वि. माधवन 1997(1) CPR 359 या प्रकरणात दिलेली बाब ही या प्रकरणातील बाबीसी भिन्न आहे तसेच गैरअर्जदाराचे वकीलांनी AIR 2009 (NOC) 2313 (NCC) या प्रकरणाचा दाखला दिला परंतु सदर न्यायनिवाडाची प्रत दाखल केलेली नाही त्यामुळे त्यात काय रेषो दिला आहे हे ठरविता येणार नाही. परंतु सदर न्यायनिवाडयातील बाब ही ग्राहक संरक्षण कायदयात सन 2003 च्या दुरुस्तीपूर्वीचे असल्याचे दिसून येते. ग्राहक संरक्षण कायदयात सन 2003 मध्ये सुधारणा (Amendment) करण्यात येवून मृतक ग्राहकाच्या वारसदार किंवा प्रतिनिधीला तक्रार दाखल करण्याचा अधिकार दिलेला आहे. हीच बाब या प्रकरणात आहे. 10 अर्जदार यांनी तक्रारीत असे कथन केले की गैरअर्जदार यांना विद्युत पुरवठा जोडून देण्यास पञ दिले तरी शेती पंपाकरीता विद्युत पुरवठा जोडून दिला नाही. आणि माहितीच्या अधिकारात माहिती मागितली असता माहिती पुरविली त्यात दिलेल्या माहिती नुसार सुरेश खाटीक यास तिन महिन्यात विज कनेक्शन लावून दिले, यावरुन गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा विद्युत पुरवठा सुरु करुन देण्यास दिरंगाई केली. गैरअर्जदार यांनी यावर असे सांगीतले की, अर्जदाराच्या विद्युत पुरवठयाकरिता रु.साडेसात लाख खर्च आहे आणि सुरेश खाटीक यांना विद्युत पुरवठा करण्याचा खर्च हा फक्त रु. 60,000/- करावा लागला. त्यामुळे त्याचा विद्युत पुरवठा लवकर जोडून देण्यात आला. अर्जदाराच्या बाबतीत असे सांगितले की, मार्च 2010 नंतरचे चाचणी अहवाल असल्यामुळे त्यांचा क्रमांक सन 2010–11 मध्ये लागतो. सन 2010 ची कामे करण्याकरिता टर्न की ऐजंन्सी मेसर्स श्री. कालेश्वरवार, नागपूर यांना कृषिपंप जोडणीचे टेंडर देण्यात आले. पुरेशी साधन सामग्री (Infracturer) अभावी विद्युत पुरवठा जोडून देण्यात आला नाही यात गैरअर्जदाराचे सेवेत न्युनता नाही. गैरअर्जदाराचे वकिलांनी युक्तिवादात असे सांगितले की, पोल टाकणीचे काम सुरु असून टेंडर दिलेल्या कंपनीने कृषिपंप जोडणीचे काम सुरु केले आहे. गैरअर्जदाराचे वकिलांनी युक्तीवादात सांगीतले की, 10 ते 15 दिवसात विद्युत कनेक्शन लागेल. गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे वडीलास विद्युत पुरवठा जोडून देण्यास विलंब केला. अर्जदार यांनी विद्युत पुरवठा जोडून मिळण्यास लेखीपञ 11/5/2011 ला दिले. माहिती अधिकाराचे पञ 5/3/2011 ला दिले. परंतु गैरअर्जदार यांनी विद्युत पुरवठा जोडून दिला नाही. ही गैरअर्जदाराची सेवेतील न्युनता आहे. काही शेतीपंप धारकारकांना प्रतिक्षा यादी डावलून तिन महिन्याचे आत विद्युत पुरवठा करुन दिला ही गैरअर्जदाराची अनुचित व्यापार पध्दत असल्याची बाब सिध्द करणारी आहे. 11 गैरअर्जदार यांनी अर्जदारास त्याचे वडिलांचे मृत्य नंतर दस्तऐवज मागणी केले परंतु अर्जदाराने ते दाखल केले नाही, या कथना समर्थनार्थ पुरावा सादर केला नाही. अर्जदाराने जेव्हा मंचात तक्रार दाखल केली तेव्हा फेरफाराचे कागद दाखल केला नाही. असा खोटा बचाव पुढे आणला आहे. एकंदरीत गैरअर्जदार यांनी शेतीपंपाकरिता विद्युत पुरवठा जोडून देण्यात विलंब केला असाच निष्कर्ष दाखल दस्तऐवजा वरुन निघतो. 12 अर्जदाराने शेतीपंपाकरिता विद्युत पुरवठा जोडून न दिल्यामुळे पिकाचे नुकसान झाले व आर्थिक व मानसिक ञास सहन करावा लागला त्यामुळे रु. 75,00/- ची नुकसान भरपाईची मागणी केली आहे. गैरअर्जदार यांचे वकिलाने असे सांगितले की, अर्जदाराच्या शेतीचे कोणतेही नुकसान झाले नाही. दस्त अ- 2 वर गाव नमुना 12 मध्ये ‘’जलसिंचनाचे साधन’’ ऑईल इंजिन असे 7/12 चे उतारा-यात दाखविले आहे त्यामुळे कोणत्याही पिकांचे नुकसान झाले नाही. व नुकसान भरपाई मिळण्यास पाञ नाही. गैरअर्जदार यांचे हे म्हणणे संयुक्तित नाही, वास्तविक दस्त, 3- अ नुसार सन 2010 मध्ये 7/12 चे उता-यात ‘’जलसिंचनाचे साधन’’ या रकान्यात काहीच उल्लेख नाही सदर 7/12 हा दादाजी शास्ञकार यांचे नावाने असुन त्यावर विहीर एक अशी नोंद आहे. गैरअर्जदार यांचे कडून विद्युत पुरवठा करुन दिला नाही. त्यानंतर ऑईल इंजिनची नोंद सन 10-11 च्या वर्षात केलेली आहे, जरी ऑईल इंजिन पासुन ओलिताची सोय झाली असली तरी अर्जदारास आर्थिक खर्च कराचा लागला, तसेच शारीरीक व मानसिक ञास सहन करावा लागला. त्यामुळे अर्जदार हा नुकसान भरपाई मिळण्यास पाञ आहे. तसेच गैरअर्जदाराचे वकिलांनी केलेल्या युक्तीवादावरुन विद्युत पुरवठा जोडून देण्यास पाञ आहे हया निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आले आहे. 13 गैरअर्जदार यांनी सेवा देण्यात न्युनता केली हेच सिध्द होतो गैरअर्जदाराने प्रतिक्षा यादीत कोणत्या क्रमांका पर्यंत कृषीपंप जोडणी झाले व कोणत्या क्रमांक पर्यंत बाकी आहे असा पुरावा रेकॉर्डवर नाही. एकंदरीत गैरअर्जदाराच्या सेवेत न्युनता असल्यामुळे तक्रार मंजुर करण्यास पाञ आहे, या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आले असल्याने तक्रार अशंतः मंजुर करुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे. // अंतिम आदेश //
(1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजुर (2) गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्या शेतीपंपाचा विज पुरवठा आदेशाची प्रत प्राप्त झाल्या पासुन 60 दिवसाचे आत जोडून दयावे. (3) गैरअर्जदार यांनी अर्जदारास अार्थिक, मानसिक व शारिरिक ञासापोटी रु 500/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु 500/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासुन 60 दिवसांचे आत दयावे. (4) उभय पक्षाना आदेशाची प्रत देण्यात यावी. चंद्रपूर, दिनांक :05/01/2012. |